RangmanchavarilTare_SurajParasnis

‘रंगमंचावरील तारे’ – सूरज पारसनीस

आपण लहान असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडतात म्हणून करून बघत असतो. त्यात जर कोणी कौतुक केलं, तर आपल्याला फार भारी वाटतं. या कौतुकाची सुरुवात सोसायटीतल्या गणपती उत्सवात जे कार्यक्रम घेतले जातात ना, त्यातून होते असं मला वाटतं. त्याला पुढं बूस्ट मिळतो तो शाळेतल्या गॅदरिंगचा.

काही जण त्यात आणखी सुधारणा करून त्याच क्षेत्रात पुष्कळ पुढं जातात. त्यातलंच एक नाव म्हणजे सूरज पारसनीस. त्यानंही त्याच्या नाटकाची सुरुवात सोसयटीतल्या गणपती उत्सवापासून केली. पण त्यानं तिथं पहिल्यांदा काही सादर केलेलं नव्हतं. तिथलं आवडलेलं सादरीकरण घरात करून बघितलं होतं आणि ते जमायला लागल्यावर तो ते करत होता.

त्याचं झालं असं, की त्याच्या सोसायटीत ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्रीचा प्रयोग होता. लक्ष्मणराव देशपांडे यांच्यानंतर अनेक जण त्याचे प्रयोग करायचे. त्यातल्या कोणाचा तरी प्रयोग होता असं सूरज सांगतो. त्याला नीट आठवत नाही कारण त्या वेळी पाचवी किंवा सहावीत असेल.

तो प्रयोग त्यानं अगदी समोरून, म्हणजे सतरंजीवर बसून बघितला होता आणि तो प्रसंग आजही जसाच्या तसा आठवतो असं तो सांगतो. त्याला ते बघितलेलं एवढं आवडलं, की तो घरात ते सारखं करून बघायचा.

त्याचं ते घरातलं सादरीकरण त्याच्या आई-बाबांनी बघितलं आणि मग त्याला त्या संपूर्ण एकपात्रीची कॅसेट आणून दिली. ते सूरज ऐकायचा आणि जमेल तसं करूनही बघायचा. एका स्पर्धेत त्यानं याचं सादरीकरण करून बक्षिसही मिळवलं होतं.

शाळेत असतानाही ऑफ तासाला कोणी आलं, की त्यांना मुलं सांगायची, सूरजला ते करायला सांगा. तो छान करतो. मुलं असं म्हणाली की ते शिक्षकही सूरजला पुढं बोलवून सादर करायला लावायचे.

सूरजचे आई-वडील एका कोणत्या तरी प्रदर्शनाला गेले असताना त्यांना नाट्य संस्कार कला अकादमीच्या शिबिरांबद्दल समजलं. मग त्यांनी सूरजची सहावी संपल्यानंतर त्याला मे महिन्यातल्या शिबिरात पाठवलं. प्रकाश पारखी सर पहिले गुरू असं सूरज त्यामुळं सांगतो.

शिबिराच्या समारोपाला भरत नाट्य मंदिरला शिबिरातल्या मुलांचं ‘फॅन्टॅस्टिक फाइव्ह’ नावाचं बालनाट्य सादर झालं. पण ते नाटक संपल्यानंतर मी बाहेर येऊन खूप रडलो होतो, अशी आठवण सूरजनं सांगितली.

त्याचं कारण विचारल्यावर तो म्हणाला, आता नाटक करता येणार नाही. शिबिर संपलं म्हणून रडलो होतो. पण शाळा सुटल्यानंतर अकादमीच्या रविवार सत्रामध्ये नाटकात काम करता येईल हे समजल्यावरच शांत झालो होतो. त्याच पहिल्या नाटकाच्या वेळी मिहिर कुलकर्णी नावाचा मित्र सूरजला भेटला आणि पुढं अनेक वर्षं आम्ही एकत्र काम केलं, असं सूरज म्हणाला.

हे सगळं सुरू असताना शिक्षणाचा विषय निघाला. त्यावर सूरजनं मोकळेपणानं मतं मांडली. त्याचं बेसिक शिक्षण बीकॉम झालं आहे. त्यानंतर त्यानं सीए फायनलचा एक ग्रुपही दिला आहे. वेळ मिळेल, तसा पुढचा ग्रुपही देणार आहे, असं त्यानं सांगितलं.

तो म्हणतो, की शिक्षणाला प्राधान्य दिलं नाही असं कधीच केलं नाही. सध्या टॅक्स रिटर्नसंबंधीचं कामं वगैरे सुरूच आहे. ते पूर्णपणे सोडून दिलेलं नाही आणि तेसुद्धा आकड्यांची आवड म्हणून करतो, असं सूरजनं सांगितलं. पण नाटकाची जेवढी आवड आहे, तेवढी त्याची नाही, हेही त्यानं अगदी प्रामाणिकपणे कबूल केलं.

नाटकाच्या प्रोसेसमध्ये जेवढा रमतो, तेवढा त्यात रमत नाही, हे सांगतानाच तो म्हणाला की ते शिक्षण त्याच्यावर लादलेलं नाही. घरच्यांनी सांगितलं म्हणून करतोस का असा विचार कोणाच्याही मनात येऊ शकतो, असंही तो म्हणाला. पण तो म्हणतो की सीए करायचं हा त्याचाच निर्णय आहे. त्याचे वडील गेली अनेक वर्षं सीएची प्रॅक्टिस करत आहेत. पण त्यांनी कधीच तू हे पूर्ण कर असा लकडा सूरजच्या मागे लावला नाही. तरीही त्याचं भान सूरजला अजूनही आहे, त्यामुळंच त्यानं शिक्षण सोडून दिलेलं नाही.

कलाक्षेत्रात इन्सिक्युरिटी प्रचंड आहे याची त्याला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच तो म्हणतो की प्रत्येकानं शिक्षण घ्यावं. नाटक करताना सूरज अगदी मनापासून करतो आणि बाकीच्या गोष्टी माहिती असल्यानं आर्थिक बाजूंचा विचार नाटक करत असताना त्याच्या डोक्यात येत नाही, असं तो म्हणतो. तो हे सांगत असताना मी त्याच्याकडं बघत होतो. त्यामुळं तो अचानक थांबला आणि म्हणाला, की डोक्यात येत नाही म्हणण्यापेक्षा त्याचा माझ्या कलेवर परिणाम होत नाही.

त्याचं स्पष्टीकरण त्यानं पुढं दिलंच. तो म्हणाला, की प्रत्येकाला रोजच्या कामातून थोडा ब्रेक हवाच असतो. सतत एकच एक काम करून ब्लॉक येतो. त्यामुळं तो म्हणतो, की फायनान्स रिलेटेड ज्या गोष्टी तो करतोय तो त्याचा क्रिएटिव्ह ब्रेक आहे. त्यामुळं त्याचं बाकी काम तर सुरू आहेच, पण बहुतांश वेळ नाटकासाठी आहे.

नाटकातल्या अनुभवाविषयीही त्यानं अगदी भरभरून सांगितलं. पण अजूनही खूप काम करायचं आहे, ही त्याची बेस लाइन होती. तो म्हणाला, आधी चाहता म्हणून ज्यांची सही घ्यायचो, आता त्यांच्याबरोबर काम करताना फार भारी वाटतं.

आम्ही सध्या सहकलाकार म्हणून, लेखक दिग्दर्शक म्हणून मित्र मित्र काम करतो, स्वत:ची संस्था आहे. चांगले लोक भेटत गेले, वेगवेगळ्या वयोगटातले लोक भेटत गेले हा नशीबाचा भाग आहे. मला वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करायला फार मजा येते. मला अनेक अनुभव लोकांसमोर आणायचे आहेत. मला गोष्टी सांगायला फार आवडतं, त्यामुळं मला असं वाटतं की मी दिग्दर्शनात जास्त रमतो. आणखी अनेक लोक असे आहेत ज्यांच्याबरोबर मला काम करायचं आहे.

वेगवेगळ्या भाषांमध्ये नाटक करायचं आहे. सध्या वर्षभरात बरेच प्रयोग करता येतात, नवीन लोक भेटतात हे सगळं मला खूप आवडतं, पण आवड आणि पैसे या विषयावर आम्ही पुन्हा आलो. पण त्यात काहीही हातचं राखून न ठेवता त्यानं मतं व्यक्त केली.

तो म्हणाला, “सध्याच्या काळात पैसे कोणासाठी महत्त्वाचे नाहीत. पण त्यातही दृष्टिकोनाचा खूप मोठा भाग आहे. काहींना पाच लाखही खूप वाटतील, तर काहींना ५० लाखही खूप कमी वाटतील. फिक्स्ड इन्कम हवं की नाही, हा प्रत्येकानुसार बदलत जाणारा विचार आहे. पण फायनॅन्शिअल सिक्युरिटी हवी. मी फायनान्स आणि एंटरटेन्मेंट या दोन्ही क्षेत्रांत काम करतोय म्हणून हे सांगतो. फायनॅन्शिअली लिटरेट असावं लोकांनी. कारण मला या क्षेत्रातल्या लोकांची ही बाजू कमकुवत वाटते. बेसिक गोष्ट माहिती हवी. कारण मी या गोष्टीत जर कमी पडत नसीन, तर माझ्या कलेतही कमी पडत नाही.”

त्यानंतर मी त्याला विचारलं की नाटक तुझ्यासाठी का महत्त्वाचं आहे? त्यावर त्यानं दिलेलं उत्तर मला फार आवडलं. तो म्हणाला, आपण कुठंही बाहेर गेलो तर नाटकातल्या माणसाला एक वेगळी व्हॅल्यू आहे. थिएटर केलंय म्हटलं, की बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. नाटक म्हणजे काय, सातत्य आणि प्रॅक्टिस. रियाजच आहे ना तो एक शेवटी.’

suraj parasnis, omkar gokhale

पण मग नाटकांतल्या कलाकारांची एवढी व्हॅल्यू आहे, तर मग सध्या नाटकांना प्रेक्षक नाहीत, असं का म्हटलं जातं? हा सगळ्यांच्याच मनात असलेला प्रश्न मी त्याला विचारला. त्यावरीह त्यानं त्याचं मत स्पष्टपणे मांडलं. तो म्हणाला, ‘नाटकांना प्रतिसाद आहे की नाही यापेक्षा ते लोकांपर्यंत कसं पोहोचवलं जातं, याविषयी बोलणं जास्त योग्य ठरेल.’ त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह त्याला कदाचित दिसलं असेल. मग त्यानं उदाहरण दिलं.

“बालनाट्याचं उदाहरण घेऊ. त्याच्या नावातच मुळात टार्गेट कोणाला करायचं आहे ते स्पष्ट होतं. तसं बाकी नाटकांच्या बाबतीत होतं का? तरुण लोकांपर्यंत आपण पोहोचतोय का हा भाग विचार करण्यासारखा आहे. रील्ससारख्या प्रकारांमुळे कलाकाराची व्हॅल्यू १५ आणि ३० सेकंदांवर आली आहे. ज्यांना पटापट स्क्रोल करायची सवय लागली आहे, त्यांच्यात स्थैर्य कुठं दिसतंय आपल्याला. सरेंडरनेस हवा ना? सतत आभासी जगात वावरणाऱ्या लोकांना नाटक बघावं असं वाटावं म्हणून काय लेव्हलचे प्रयत्न करावे लागतील याचा विचार केलेला बरा. नाटकाला प्रेक्षक नाही, हे वाक्य काही नवीन नाही. तुम्ही काय देताय, काय आणताय हे महत्त्वाचं आहे. कंटेट इज द किंग. पण तो कसा पोहोचवताय हे बघणं महत्त्वाचं आहे.” मला हे थोडं थोडं समजलं. पण अजूनही चित्र स्पष्ट झालं नव्हतं. त्याला बहुतेक हेही कळलं असावं, की याला उदाहरण दिल्याशिवाय समजणार नाही.

मग त्यानं मला पुन्हा एक उदाहरण दिलं. तो म्हणाला, “म्हणजे बघ हां. एखादी व्यक्ती घरात बसली आहे. तिला एका क्लिकवर स्वत:चं मनोरंजन करून घेण्याचे असंख्य पर्याय आहेत. पण त्या व्यक्तीनं जागेवरून उठावं. प्रवास करून थिएटरमध्ये यावं. पैसे भरावेत आणि नाटक बघावं. ते झाल्यावर पुन्हा घरी जावं. हे सगळं त्या व्यक्तीनं करावं, अशी अपेक्षा असेल, तर तसं काम करून दाखवण्याची जबाबदारी नाही का? त्याकडे जर जबाबदारी म्हणून बघितलं, तर काही तरी शक्य आहे. पण पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की आपण कितीही चांगली कलाकृती केली, तरी ती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही तर काय? ती पोहोचवण्याचं काम कोण करणार? ज्या दिवशी नाटकातला माणूस बाहेर स्टार म्हणून ओळखला जाईल, तेव्हा नाटक पोहोचलं असं म्हणता येईल.

प्रायोगिक नाटकांबद्दल बोलायचं झालं, तर सातत्य कमी पडतं असं मला वाटतं. म्हणजे काही नाटकांचे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रयोग होतात आणि मग ते नाटक बंद पडतं. पण व्यावसायिक नाटकांचं तसं होत नाही. तिथं प्रेक्षक असतातच. तिथं तर दुप्पट तिप्पट तिकीट काढून लोक जातात. त्यामुळं नाटकांना प्रतिसाद नाही, हे वाक्य मला पटत नाही. मला कधीकधी असं वाचतं, की लोकांनी प्रायोगिक नाटकांची भीती घालून घेतली आहे का.

हा भेदभाव नक्की कधी झाला माहीत नाही. पण आता एक नक्की आहे, की नाटकांच्या बजेटच्या वेळी मार्केटिंगसाठी वेगळा हिस्सा बाजूला ठेवायला लागणार आहे. मी नाटक बसवलं, त्याचे प्रयोग लावले आणि लोक आले असं आता राहिलेलं नाही. ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. पण ती गोष्टही लोकांना खिळवून ठेवण्यासारखी असावी असं मला वाटतं. नाटकांची आता बाकी माध्यमांसह रील्ससोबतही स्पर्धा आहे.”

बास! आता माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र अगदी स्पष्ट झालं.
मग आमची चर्चा सुरू झाली ती लोकांबद्दल. अर्थातच त्यानं लोकांचं उदाहरण दिलं होतं, त्यामुळं त्यांच्या वागण्याबद्दल बोलणं झालं. त्यात एकदम त्यानं काही तरी आठवल्यासारखं केलं आणि किस्सा सांगायला सुरुवात केली.

“कबाडी अनकट नावाच्या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. त्याचा पृथ्वी थिएटरला प्रयोग झाला होता. ते संपल्यानंतर लंडनच्या दोन मुली भेटल्या. त्यांनी नाटकाचं खूप कौतुक केलं. पण नाटक हिंदी आणि मराठीत असल्यामुळं मी त्यांना विचारलं की नाटक समजलं का म्हणून. तेव्हा त्यांनी सांगितलं, की आतापर्यंत जगात अनेक फेस्टिव्हल बघितले आहेत. आताचं नाटक व्हिज्युअली एवढं स्ट्राँग होतं, की भाषेची अडचण आली नाही. अर्थात, हे सगळं बोलणं इंग्लिशमधून झालं.”

मी याला दाद देईपर्यंत तो म्हणाला, “आणखी एक किस्सा पेशंट नाटकाचा आहे. कॅन्सर पेशंटच्या प्रवासावर होतं ते. भरत नाट्य मंदिरला त्याचा प्रयोग झाल्यावर एक लहान मुलगा आला होता. साधारण चौथी-पाचवीत असेल तो. तो खूप रडत होता. त्याला वाटलं होतं, की नाटकातला पेशंट खरंच गेला. पण त्याला आम्ही त्या कलाकाराला भेटवलं आणि सांगितलं, की आहे हा. लोकांना इतकं चांगलं कन्व्हिन्स करणं ही या क्षेत्राची ताकद आहे. नुकताच आम्ही साठ कलाकार असलेला वार्ता वार्ता वाढे या नाटकाचा प्रयोग केला होता. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाबाहेर एक आजी मला भेटायला थांबल्या होत्या. त्या मला म्हणाल्या, की मी एवढी हसले, की तू माझं आयुष्य चार दिवसांनी वाढवलंस. तेव्हा मी एक दिग्दर्शक असल्याचा अभिमान आणि आनंद झाला.

अॅनाथिमा या आमच्या हॉरर नाटकाबद्दल तर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. एक जण म्हणाला मी हे नाटक पाहिल्यापासून खिडकीजवळ झोपणं बंद केलं. एका व्यक्तीनं ॲनाथिमा ४० वेळा बघितलं आहे. हा माझा एकट्याचा अनुभव नाही, माझ्या टीमचा आहे. नंतर तर प्रेक्षकही माझ्या टीमचा एक भाग होतात.”

त्यानं प्रेक्षकांविषयी एवढं सांगितल्यावर मी त्याला म्हणालो, ते सगळं ठीक. पण मग लॉकडाउनच्या काळात तुम्ही सगळ्यांनी काय काय केलं होतं? हे विचारल्यावर त्याचा चेहरा खुलला. बहुतेक तो याच्याबद्दल पुढं सांगणारच होता. पण मी त्याला अडवलं होतं. आता मीच विचारल्यावर तो म्हणाला, ‘आम्ही एक प्रयोग करून बघितला होता. जेव्हा लॉकडाउन सुरू झालं, तेव्हा आम्ही आमची नाटकं लाइव्ह स्ट्रीम केली होती.

gaynache_rangi

त्यानंतर म्हणजे लॉकडाउन संपल्यावर जेव्हा लोक नाटक बघायला आले, तेव्हा त्यांनी आधी ऑनलाइन नाटक बघितल्यामुळं प्रत्यक्ष नाटक बघायला येताना ते सोबत आणखी लोकांना घेऊन आले होते. त्यामुळं मला असं वाटतं, की नाटकांत इंरनेटचा काही वापर करता येईल का, म्हणजे त्याचं लाइव्हस्ट्रीम वगैरे काही करता येईल का. मला याच्यावर काही जण म्हणतात की त्यानं नाटकाचा प्रत्यक्ष अनुभव कसा येईल? पण मी जर पुण्यात नाटक सादर करत असीन आणि ते जर दिल्लीतल्या एकाला बघता आलं तर त्याच्यापर्यंत माझी गोष्ट पोहोचणार नाही का?’

त्यानं असं विचारल्यावर मी म्हणालो, की हा उपक्रम खूप छान होता. पण नाटक प्रत्यक्ष बघणं ते प्रत्यक्षच बघणं. कारण नाटक म्हणजे काय चीज आहे, ते लोकांना माहिती असतं आणि ती गोष्ट खुलत कशी जाते हे लोकांनाच काय मला विचारशील तर मलाही प्रत्यक्ष बघायलाच आवडतं. मी हे बोलल्यावर तो गालातल्या गालात हसला होता आधी पण नंतर गंभीर झाला.

“कोणाचा विश्वास बसणार नाही अशी एक गोष्ट सांगतो. बऱ्याच लोकांना नाटक म्हणजे काय ही संकल्पनाच माहीत नाही असं मला वाटतं. नाटकात आपल्यासमोर काही लोक प्रत्यक्ष कला सादर करतात हे यांच्या गावीही नसतं. एक प्रसंग सांगतो. आम्ही एकदा फेस्टिव्हल सुरू केला होता नाटकांचा. तेव्हा त्याच्या बाहेर एका प्रसिद्ध कॉफीच्या ब्रँडचा स्टॉल होता.

स्टॉलवरच्यानं विचारलं की अंदर क्या चल रहा है? ओंकार त्याच्याशी बोलत होता. तो म्हणाला थिएटर चल रहा है. त्यावर त्यानं विचारलं, की वो क्या होता है? अंदर लोग है क्या? लाइव्ह परफॉर्मन्स कर रहे है क्या? तर त्यावर ओंकार त्याला म्हणाला ये छोडो थोडी देर, चलो मेरे साथ.

त्यानं आम्ही करत असलेल्या नाटकाचा प्रयोग बघितला आणि तो चकित झाला. लोक असं काही तरी करतात हे त्याला माहीत नव्हतं.”

त्यानं हे सांगितल्यावर मला मजा वाटली होती पण नंतर त्यातलं गांभीर्य समजलं. नाटक बघायला प्रेक्षक नाहीत, तर ते का नाहीत याचं उत्तर तर काही प्रमाणात सूरजनं सांगितलंच. पण जर लोकांना नाटक म्हणजे काय हेच माहिती नसेल, तर पुढं परिस्थिती अवघड होत जाईल असं मला वाटतं. त्यामुळं आपण प्रत्येकानं नाटकांचे प्रयोग बघायला हवेत असं मला वाटतं. काय मग, बघू या ना नाटकं?

  • गौरांग कुलकर्णी

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
रंगमंचावरील तारे


 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *