फॉन्ट साइज वाढवा
अबू धाबी संयुक्त अरब अमिराती देशाची सर्वाधिक सधन अमिराती आहे. भरभरून तेल प्रसवणाऱ्या या अमिरातीच्या प्रमुखपदी असलेलं ‘अल नाहयान’ कुटुंब समस्त अरब आसमंतात वर्षानुवर्षे आपला आब राखून आहे. कामाच्या निमित्ताने या अमिरातीमध्ये अनेकदा जायचा योग जुळून आला असला, तरी मला अबू धाबीबद्दल विशेष माहिती नव्हती. दुबईच्या तुलनेत अबू धाबी मला बरंचसं शांत आणि आळसावलेलं वाटे. पण एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मी एकदा आमच्या ऑफिसच्या अबू धाबीच्या एका सहकाऱ्याबरोबर ‘अल एन’ला गेलो आणि अचानक या अमिरातीबद्दल मला जबरदस्त कुतूहल वाटायला लागलं.
माझा हा सहकारी मूळचा सीरियाचा. दोन दशकांपासून अबू धाबी येथे स्थायिक झालेला हा बशर… वास्तुविशारद व्हायच्या आधी सीरियाच्या दमास्कस महाविद्यालयातून पुरातत्व संशोधन या विषयाची ‘डिग्री’ घेऊन तिथे तो सुरुवातीची दोन वर्षं उत्खननात रमलेला होता. पण पुढे सीरियाच्या अंतर्गत अस्थिरतेला वैतागून त्याने कैरो गाठलं, पाच वर्षाचा ‘आर्किटेक्चर’चा ‘डिग्री कोर्स’ त्याने तिथेच पूर्ण केला आणि १९९०च्या दशकात त्याने अबू धाबी गाठलं. अरबस्तानच्या इतिहासाबद्दल आणि भूगोलाबद्दल त्याच्याकडे माहितीचा खजिना होता. मी त्याच्याकडे सहज ‘अबू धाबी कंटाळवाणं आहे’ अशी तक्रार केली आणि तो खुलला. त्याने मला आग्रहाने अबू धाबीला राहायची विनंती केली, आणि पुढच्या दिवशीचा शुक्रवार साधून त्याने मला ‘अबू धाबी’ नामक शहराची भटकंती करवली.
हेही वाचून पहा : रोहन शिफारस
मदुराई ते उझबेकिस्तान
‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन…
या भटकंतीची सुरुवात त्याने केली ती ‘अल-एन’ शहरापासून. अल-एन हे शहर मरूद्यानाच्या (ओयासिसच्या) आजूबाजूला वसलेलं. कोरड्या वाळवंटात जिथे मुबलक पिण्याच्या पाण्याचे स्रोत उपलब्ध व्हायचे, तिथे जुने अरब आपल्या वस्त्या उभ्या करायचे. एकूण सात मरूद्याने असलेला हा अल-एनचा भाग अबू धाबीच्या पूर्वेकडच्या भागात ओमान देशाच्या हद्दीला लागून आहे. अबू धाबीच्या सध्याच्या राजाचं म्हणजे, शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान याचं हे जन्मशहर. कुतूहल म्हणून त्याच्या जन्माची जागा बघण्याची इच्छा मी बशरकडे व्यक्त केली आणि त्याने गाडी थेट अल-एनच्या मध्यभागाकडे वळवली.
काही वेळातचं आम्ही एका भल्या मोठ्या तटबंदीच्या समोर येऊन थांबलो. डोळे विस्फारून त्या तटबंदीची लांबी बघून मी बशरकडे बघितलं. ‘आता समजलं; अबू धाबी काय आहे ते?’ अशा अर्थाचा कटाक्ष टाकून त्याने मला त्या तटबंदीकडे नेलं. प्रवेशद्वाराकडे ‘कसर-अल-मुवेजी’ नावाचा फलक बघितल्यावर माझी उत्सुकता चाळवली गेली. बशरने पाण्याची बाटली रिचवली आणि त्याच्याकडून माहितीचा ओघ सुरू झाला.
‘कसर-अल-मुवेजी’ या किल्ल्याचं बांधकाम १८५५ साली अबू धाबीचा तत्कालीन राजा असलेल्या शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान (पहिला) याच्या कारकिर्दीत सुरू झालं. पुढची पन्नास वर्षं टप्प्याटप्प्याने विस्तारत गेलेला हा किल्ला म्हणजे ‘अल नाहयान कुटुंबा’चा ‘दरबार’. संयुक्त अरब अमिराती ज्याच्या द्रष्टेपणामुळे आकाराला आलं, त्या शेख झाएद बिन सुलतान अल नाहयान याने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या किल्ल्यातून आपला सगळा कारभार सांभाळायला सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीत हा किल्ला त्याच्या सत्तेचं केंद्रस्थान झालेला असल्यामुळे साहजिकच विस्तारत गेला. पाहुण्यांचा स्वागतकक्ष, त्यांच्या राहण्याच्या जागा, मोठ्या प्रमाणात प्रार्थना करता यावी म्हणून आकाराने विस्तारलेली ‘मशिदीची’ जागा, विस्तीर्ण स्वयंपाकघर, भोजनकक्ष, सल्ला-मसलतीचा वेगळा दरबार, असे अनेक भाग शेख झाएद यांच्या काळात बांधले गेले.
या किल्ल्याचं प्रवेशद्वार अतिशय देखणं आहे. इस्लामी पद्धतीच्या कमानीच्या रचनेने बांधून काढलेलं हे द्वार पाहिल्या पाहिल्या किल्ल्याच्या आत काहीतरी भव्य बघायला मिळणार आहे, याची खात्री पटते. किल्ल्याची रचना चौकोनी पद्धतीची आहे. ६५ x ६५ मीटर आकाराच्या आणि वीस-पंचवीस मीटर उंचीच्या भव्य तटबंदीतून आत प्रवेश केला, की समोर दिसतो तो भला मोठा चौक. प्रवेशद्वाराच्या बाजूलाच तटबंदीबाहेर चारशे ते पाचशे व्यक्ती एका वेळेस नमाज पढू शकतील इतकी मोठी मशीद आहे.
“१९२८ साली जगभरात मंदी आली होती ना, तेव्हा याच किल्ल्यातून शेख खलिफा आपल्या जनतेला जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करायचे. पुढे शेख झाएद यांच्या हाती सत्ता आली तेव्हा त्यांनी तेलाच्या अर्थकारणाचा भविष्यात होणारा विस्तार अचूक ओळखला आणि याच किल्ल्यात देशोदेशीचे राजदूत बोलावून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. या प्रांतांवर वरचष्मा होता ब्रिटिशांचा, पण शेख झाएद कधीही ब्रिटिशांच्या हातातलं बाहुलं होऊन राहिले नाहीत. इथेच त्यांनी आपल्या मुलांना आणि सहकाऱ्यांना द्रष्ट्या आणि दूरदृष्टीच्या राजकारणाचे धडे दिले. “बशर उत्साहाने मला माहिती पुरवत होता.
“या किल्ल्याचा उपयोग प्रत्यक्ष लढाईत कधी झाला असेल का?”
“झाला ना….१९५२ साली इब्न सौद यांच्या सौदी सैन्याने अबू धाबी आणि आसपासच्या मरूद्यानाच्या सुपीक भागाला सौदीच्या साम्राज्यात सामील करून घेण्यासाठी या भागावर चढाई केली. शेजारच्या ओमान देशाच्या सैन्याने नाहयान कुटुंबियांना मदत केली म्हणून, अन्यथा, अबू धाबी सौदीमध्ये विलीन झालं असतं….शिवाय ब्रिटिशांनीही आपलं वजन वापरून सौदी सैन्याला माघारी वळण्यासाठी भाग पाडलं. या सगळ्या धामधुमीत कसर-अल-मुवेजी हे नाहयान कुटुंबीयांचं मुख्यालय होतं. सगळी सूत्रं इथूनच हलत होती. सुदैवाने रक्तपात फारसा झाला नाही, आणि पुढे नाहयान कुटुंबीयांनी सौदीच्या राजघराण्याशी सलोख्याचे संबंध ठेवून पुन्हा अशी वेळ येऊच दिली नाही…. १९७१ साली ‘संयुक्त अरब अमिराती’ची स्थापना झाल्यावर ओमानबरोबरच्या सीमारेषा आखण्याचा वाटाघाटीही इथेच झाल्या होत्या. मूळच्या अल-बुरेमी मरूद्यानाला आंतरराष्ट्रीय सीमारेषेने दुभंगून या दोन देशांनी मरूद्यानाचा परिसर वाटून घेतला….आणि अल-एन जन्माला आलं…”
‘वाळूत काढल्या रेषा’ या उक्तीचा प्रत्यय इथल्या इतिहासात पदोनपदी येत असतो. १९६६ साली शेख झाएद यांच्याकडून राज्यकारभाराची धुरा शेख खलिफा यांच्या हाती आल्यावर हळूहळू त्यांनी आपल्या कारभाराची सूत्रं मुख्य अबू धाबी शहरातून हलवायला सुरुवात केली. ‘कसर-अल-मुवेजी’चं महत्त्व हळूहळू कमी होतं गेलं. इथली काही बांधकामं पाडली गेली. तटबंदीच्या आत खजुराच्या झाडांची लागवड व्हायला लागली.
“इतक्या महत्त्वाच्या जागेकडे अचानक इतकं दुर्लक्ष?” मी आश्चर्याने विचारलं. “काही काळ झालं खरं; पण नंतर नाहयान कुटुंबीयांनी या किल्ल्याचं रूप पालटून टाकण्याचा निर्णय घेतला. १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात या किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचं काम अबू धाबीच्या तत्कालीन पुरातत्व संशोधकांनी हाती घेतलं. तेव्हा पुरातत्व विभागाचं स्वतंत्र असं खातं नव्हतंच…पण नाहयान कुटुंबियांसाठी हा किल्ला म्हणजे जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी जीर्णोद्धारासाठी पैसे आणि मनुष्यबळ अशा दोन्ही गोष्टी व्यवस्थित पुरवल्या.”
२००९ साली अबू धाबीच्या पुरातत्व खात्याने या किल्ल्याचा कायापालट केला, आणि या किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या ‘वर्ल्ड हेरिटेज साईट्स’मध्ये केला गेला. नाहयान कुटुंबीयांचं आणि अबू धाबीच्या इतिहासाचं महत्त्व पर्यटकांना आणि नव्या पिढीला कळावं यासाठी या किल्ल्यात अत्याधुनिक ‘पुराणवस्तू संग्रहालय’ उभारलं गेलं. किल्ल्याशी निगडित असलेला इतिहास कालक्रमानुसार इंग्रजी आणि अरबी भाषेत इथं मांडला गेलेला आहे. जुन्या काळचे दुर्मीळ फोटो, इथल्या उत्खननात सापडलेल्या चीजवस्तू, नाहयान कुटुंबियांच्या खाजगीतल्या चीजवस्तू अशा अनेक गोष्टी इथं बघायला मिळतात. किल्ल्याची डागडुजी स्थानिक प्रशासनाने चोख केलेली असल्यामुळे आजही हा किल्ला अतिशय चांगल्या अवस्थेत आहे.
पुढे अबू धाबी अमिरातीतल्या अनेक जागा मी बघितल्या. या अमिरातीच्या इतिहासाचा बराच अभ्यास केला, पण या सगळ्याचा शुभारंभ ज्या जागेपासून झाला, तो हा ‘कसर-अल-मुवेजी’ किल्ला अजूनही मला खुणावतो. इथल्या दरबारात घडत असलेल्या वाटाघाटी आपसूक मला दिसायला लागतात. शेख खलिफा, शेख झाएद आणि त्यांचे सहकारी डोळ्यांसमोर उभे राहतात आणि मन इतिहासात रमायला लागतं. पु.ल. देशपांडेंच्या हरितात्यांइतका नाही, तरी थोडाफार मी त्या जुन्या काळात ओढला जातो. रायगडावर पाऊल ठेवल्यावर अंगावर जसे शहारे येतात, तसेच या अरबस्तानच्या किल्ल्यात पाऊल ठेवल्यावरही येतात. इतिहासाचा हाच खरा महिमा आहे, नाही का?
– आशिष काळकर
“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”
“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”