अनेकदा पुस्तकं घेऊन ठेवलेली असतात. दरवेळी सगळी आणल्या आणल्या वाचून होत नाहीत. काही उगीच मागे पडतात आणि काही दिवसांनी अचानक त्यांचा नंबर लागतो. हे पुस्तक आधीच कसं वाचलं नाही, असा प्रश्न पडतो. आपल्यापैकी अनेकांचा हा अनुभव असेल.
लॉक डाऊनच्या काळातली गोष्ट! वाचायला भरपूर वेळ हाताशी होता. त्यावेळी वाचन करताना काही काही प्रयोग करण्याचा उत्साहही होता. म्हणजे एकाच लेखकाची किंवा लेखिकेची सगळी पुस्तकं वाचणं किंवा ज्या पुस्तकांवर सिनेमे बनले आहेत, ती पुस्तकं वाचणं, वगैरे.
पुस्तकांचं कपाट लावत असताना मिशेल ओबामा हिचं आत्मकथन ‘बिकमिंग’ आणि शशी देशपांडे यांची ‘दॅट लॉन्ग सायलेन्स’ ही कादंबरी पुनः वाचायला घेतली. दोन्ही पुस्तकं लागोपाठ वाचल्याने दोन्ही लेखिकांचा कणखर सूर जास्ती प्रभावीपणे जाणवला. त्यातून विचार आला, की स्त्रियांची आत्मचरित्रं, चरित्रं आणि आठवणीवजा लेखन सलग वाचायला हवं.
मनाशीच काही नावं पक्की केली. लॉक डाऊन असताना किंडलवर किंवा इ-बुक्स मिळवून आणि लॉक डाऊन नंतर पुस्तकाच्या प्रती मिळवून वाचन केलं. हे वाचन केवळ आनंद देणारं नव्हतं, तर स्वतःला अनेक प्रश्न विचारणारं, या सर्व लेखिकांप्रती कृतज्ञता वाटणारं, आधीच्या पिढीतल्या स्त्रियांनी केलेल्या संघर्षाची ओळख करून देणारं ठरलं.
मी पुस्तकं निवडली होती, त्यात, मिशेल ओबामा, शशी देशपांडे यांच्या जोडीला इस्मत चुगताई, देवकी जैन, मधुर जाफरी, ऑप्रा विनफ्रे, शांता गोखले, अगाथा ख्रिस्ती, नीना गुप्ता, कविता राव या लेखिकांची पुस्तकं होती.
वाचताना सवयीने काही टिपणं काढत होते, काही वाक्य जशीच्या तशी नोंदवून ठेवत होते. सर्व पुस्तकं वाचून झाल्यावर त्यांचा परिचय करणारे लेख लिहावेत असं वाटलं. ती समीक्षा नव्हती, तर तो पुस्तकांचा परिचय होता. त्या त्या लेखिकेच्या व्यक्तिमत्वाची ओळख होती.
आपापल्या काळात त्यानी केलेला संघर्ष होता, त्यांनी स्वतःच्या निवडीच्या कसोशीने जपलेल्या स्वातंत्र्याची गोष्ट होती, आपली passion जपण्यासाठी चाकोरी मोडण्याचं दाखवलेलं सामर्थ्य होतं. तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक काळात अशा स्त्रियांनी धाडस दाखवलं आणि त्यातून येणाऱ्या पिढीच्या स्त्रियांसाठी रस्ता तयार करून ठेवला.
याच पुस्तकांपैकी काही पुस्तकांचा परिचय या मालिकेत देत आहोत. तो सगळ्यांपर्यंत नक्की पोचेल. प्रेरणादायी ठरेल वगैरे म्हणणं फारच साचेबद्ध होईल. म्हणून ते मुद्दाम टाळते. कारण या सगळ्या जणींनी साचे मोडले. त्यामुळे या प्रत्येक पुस्तकातून प्रत्येक वाचकाला त्याला काय हवं, ते सापडेल.
या मालिकेला हे नाव देताना मालिकेच्या स्वरूपापेक्षा ज्या स्त्रियांची चरित्रं, आत्मचरित्रं किंवा आठवणीवजा लेखनाचा परिचय या मालिकेत करून दिला आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अधिक विचार केला आहे.
हा त्यांच्या कर्तबगारीचा स्वर आहे. तो वाचकांच्या मनातही घुमावा…
- नीता कुलकर्णी