WebImages_ManjilSeBehtar4

माणसाच्या चेहऱ्यामागची गोष्ट सांगणारा चित्रकार (मंझिलसे बेहतर है रास्ते)

चारुदत्त पांडे हे नाव मी कुणा एकाकडून नाही, तर अनेकांकडून अनेकदा ऐकलं होतं. फेसबुकवर त्याच्या नेटक्या पोस्ट्सही वाचत होते. प्रत्यक्ष भेट झाली ती अमृता शेरगीलच्या आयुष्यावर बेतलेल्या एका नाट्यप्रयोगाच्या वेळी! एका चित्रकाराची सपत्निक भेट ‘द ग्रेट अमृता शेरगील’च्या संदर्भाने व्हावी, याचं त्या वेळी फार अप्रूप वाटलं होतं. या लेखाच्या निमित्ताने त्याच्या स्टुडिओमध्ये त्याला भेटले, तेव्हा भेटला तो माणूस समजून घेण्याचं तीव्र कुतूहल असणारा, आयुष्यातले अगणित विरोधाभास आणि गोंधळ यांचं कमालीचं आकर्षण असणारा चित्रकलेच्या प्रांताविषयी भरभरून बोलणारा, आत्मविश्वास ही काय चीज आहे, हे सांगणारा, सोप्या कामात रमायचं नाही, हे स्वतःला आणि कलेच्या रसिकांनाही सतत बजावत राहणारा अस्सल कलाकार. चारुदत्त बोलतो, तेव्हा तो तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो, तुमच्या शंका दूर करत असतो, पण प्रत्यक्षात तो स्वतःशीही संवाद साधत असतो. त्याची स्वतःशी चर्चा सुरू असते, अनेक गोष्टी तो स्वतःशीच ताडून, पारखून बघत असतो. ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटत असतं. बोलता बोलता एक क्षण थांबून ‘आलं ना लक्षात?’ असं तो म्हणतो तेव्हा तो प्रश्न आपल्यालाही असतो, आणि त्याने स्वतःलाही विचारलेला असतो.

त्याच्या स्टुडिओमध्ये तुम्हाला अनेक प्रकारची माणसं भेटतात… अर्थातच त्याच्या चित्रांतून. ती तुमच्याकडे बघतायत असं वाटेपर्यंत त्यांच्या नजरेतले वेगळेच भाव दिसायला लागतात. त्या चेहऱ्यांत, त्यांच्या नजरेत, त्यांच्या देहबोलीत, हाताच्या घट्ट्यांत, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांत, डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांत, कडक इस्त्रीच्या शर्टात, झोपलेल्या श्रांत शरीरावर त्यांची गोष्ट असते. तुमच्या मनात ती तयार होऊ लागते. एखादी कथा किंवा कादंबरी वाचत जाताना समजायला लागते, तशीच ती चित्रातली व्यक्ती उलगडत साकार व्हायला लागते. आपलं चित्र बघून होत आलं, की चारुदत्त त्याच्याविषयी माहिती देतो. कधी आपल्या मनातली आणि त्याची गोष्ट जुळते, कधी अगदीच वेगळी असते. चारुदत्तची माणसांची दुनिया फार रोचक आहे. ती आपला, समाजाचा आणि वेगवेगळ्या परिस्थितीचा लखलखीत आरसा आहे.

‘माझ्या चित्रांतल्या माणसांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव ठसठशीत आहेत. त्यांना कसलं तरी आश्चर्य वाटतं, त्यांच्या मनात अनेक अनुत्तरित कोडी आहेत, परिस्थितीच्या त्या क्षणात ती भांबावून गेली आहेत. ती पूर्णतः आनंदी किंवा दुःखी, पूर्ण निराश किंवा खचलेली अशी नाहीत. तसंही आपल्या रोजच्या जगण्यात एकच एक ठोक एक्स्प्रेशन चेहऱ्यावर वागवत नाहीच ना आपण! आयुष्यातलं हे गोंधळलेपण मला कमाल वाटतं. कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यात आणि देहबोलीत हीच गोष्ट माझं लक्ष खेचून घेते. मग कॅनव्हासवर तो माणूस उतरताना त्याच्या गोष्टीसकट उतरतो.’ चारुदत्त सांगतो.

चहाच्या टपरीवर शुष्क नजरेने बघणारी, फूटपाथवर दुपारच्या कडक उन्हात शरीराची वळकटी करून झोपलेली, पेपर वाचत बसलेली, मोबाईलवर बोलणारी, पत्ता विचारायला आलेली, शून्यात नजर लावून बसलेली अनेक माणसांची गोष्ट त्याच्या चित्रांतून कळते. ही अगदी साधी माणसं आहेत, म्हणजे अगदी तुमच्या आमच्या घराच्या कोपऱ्यावर भेटतील अशी! फरक एव्हढाच की आपल्याला ती जशी दिसतात, त्यापेक्षा खूप खोलवर चारुदत्तला दिसतात. तो प्रामुख्याने ‘फिगरेटिव्ह’च करतो. अर्थात माणसं चितारतो. तो सांगतो,

‘अगदी पहिल्यांदा जेव्हा मी माणसांची चित्रं काढायला सुरुवात केली, त्यावेळी माझा खऱ्याखुऱ्या माणसांशी खूप संवाद नव्हता. त्यामुळे माझ्या चित्रांत एक तुटकपणा होता, अलिप्तता होती. मी आधी विचार करायचो आणि मग चित्र काढायचो. ही पद्धत चुकीची नाही, पण ती मला रुचली नाही. या काळात सचिन निंबाळकर यांच्याशी भेट झाली. निंबाळकर यांनी स्वतःच्या स्टुडिओत चारुदत्तला काम करायला जागा दिली. पुणे शहराच्या मध्यभागी अलका चौकाजवळ आर्ट इम्प्रेशन्स स्टुडिओ या निंबाळकरांच्या जागेत त्याचं काम सुरू झालं आणि ‘रँडम’ माणसं भेटायला लागली. मग मला त्यांच्या गोष्टी समजू लागल्या.’

मूळ गाव नांदेड, तिथलंच बालपण आणि घडत जाणं, प्रचंड वाचन करणारा शांत वृत्तीचा हा मुलगा. मध्यमवर्गीय घरांत आणि निमशहरी गावात मोठं होणं हा एक खास अनुभव असतो. या अनुभवाचे अनेक कंगोरे असतात. मोठ्या शहरातली चौकट नसते. बरेच लोक माहितीचे असतात. अमक्यातमक्याचा मुलगा किंवा मुलगी ही ओळख असते. चारुदत्तने हे सारं अनुभवलं. पण त्याच्या या अनुभवांना आणखी एक वेगळं अस्तर होतं, ते म्हणजे बँकेत अधिकारी असणाऱ्या त्याच्या वडिलांचं आश्वासक आणि खंबीर अस्तित्व! त्यांना असणारा मान, त्यांच्या प्रचंड ओळखी. या सगळ्या गोष्टी अशा काही जुळून आल्या होत्या की दहावीपर्यंत फारसे धक्के बसलेच नाहीत. अनपेक्षित अनुभव नाहीत की अकल्पित आव्हानांना सामोरं जाणंही नाही. खूप काही नियोजन न करता, एका मित्राने डिप्लोमाला प्रवेश घेतला म्हणून चारुदत्तनेही घेतला आणि आपल्याच कोषात राहण्याला पहिला सुरुंग लागला तो इथेच. गावाबाहेर लांबवर असणाऱ्या कॉलेजात जायला लागल्यावर अनेक गोष्टी नव्याने अंगावर येऊ लागल्या. त्या विषयांची आवड नाहीये, इंग्लिश भाषा अजून अंगवळणी पडली नाहीये, भोवताली वयाने मोठी असणारीच मुलं आहेत, त्यामुळे मित्र नाहीत, जे सुरू आहे, ते आवडत नाहीये आणि कळतही नाहीये. या काळातला स्वतःभोवती तयार झालेला कोष हा जास्ती वाईट होता. ‘मला स्वतःची ओळख करून द्यायची ही भीती वाटत होती. त्यामुळे कॉलेजात ओळख करून देण्याच्या सत्रात तर मी चक्क घरी निघून आलो.’ चारुदत्त सांगतो. ही परिस्थिती फार विचित्र होती, एकीकडे ‘पांडे साहेबांचा मुलगा’ म्हणून अनेक गोष्टी आपोआप घडत होत्या. काहीही कष्ट घ्यायला लागत नव्हते. आणि दुसरीकडे नव्याने रुजायचीच भीती वाटत होती. वाचन खूप होतं, पण त्याविषयी बोलायला कुणीही नव्हतं, ज्यांच्याजवळ भरपूर गप्पा माराव्यात असं कुणीही नाही, जे विषय शिकतो आहोत, त्यात आनंद तर नाहीच, उलट त्यांचा ताणच जास्ती येतो आहे, सभोवताली लोक नकोच वाटत आहेत. आणि आपण हे का शिकत आहोत, याचं अर्थपूर्ण उत्तरही मिळत नाहीये, अशा भांबावलेल्या अवस्थेतली ती वर्षं होती.

परिणाम व्हायचा तोच झाला. डिप्लोमाला पहिल्या दोन्ही वर्षी त्याचे सर्वच्या सर्व विषय राहिले. कुठल्याही मध्यमवर्गीय घरात या गोष्टीचा स्वीकार ही जवळपास अशक्य गोष्ट असते. चारुदत्तच्या घरात मात्र ती नव्हती. आपल्या लेकाचा हा मार्ग नाहीये, तो त्या वातावरणात सुकून जाईल, हे त्याच्या वडलानी ओळखलं. ‘काहीही बिघडत नाही. बारावी कर’, असा मार्ग त्यांनीच दाखवला. पण तो मार्गही फार आवडणारा नव्हता. त्याही कॉलेजमध्ये एकटेपणा त्याला चिकटलेलाच होता. ते विश्वदेखील फारसं आपलं नाही, हे पावलोपावली कळत होतं. कधी कधी आपण परिस्थिती ओढत राहतो. एक पाउलही पुढे टाकायची इच्छा नसली तरी यातूनच मार्ग सापडेल, अशी आशा असते म्हणून! त्यावेळी त्याच्या समोर फक्त अवघड कोडीच होती. उत्तरं सापडत नव्हती, मार्ग दिसत नव्हता. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट एकच होती, आणि ती म्हणजे आई-वडलांचा भक्कम पाठिंबा! पुढे काय काय होऊ शकतं, त्यासाठी काय करावं लागेल हा विचार त्याच्याऐवजी त्याचे वडील करत होते. बारावीलाही एकदा नापास झाल्यानंतरसुद्धा वडलांकडे त्याच्यासाठी उत्तरं होती. ऑक्टोबर मध्ये बारावी पास झाल्यावर पुढे काय, या प्रश्नावर नात्यातल्या एका काकूंनी कलाक्षेत्राचा पर्याय सुचवला.

नांदेडमधल्या कलामहाविद्यालयात त्याने बारावीच्या रिझल्टनंतर अक्षरशः दुसऱ्या दिवशी प्रवेश घेतला. MGMकॉलेजमध्ये त्याच्यासाठी एक नवी दुनिया खुली झाली. इथेही ओळखी नव्हत्या, वातावरण परिचित नव्हतं. हादेखील कदाचित एक प्रयत्नच ठरू शकला असता. पण कलाक्षेत्रात चारुदत्त काही चांगला करू शकेल, असं वाटण्यामागे एक कारण होतं, ते म्हणजे तो चित्रं चांगली काढतो. त्यामुळे या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी सर्वानुमते या कारणावर शिक्कामोर्तब झालं होतं. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सचा विद्यार्थी झाल्यावरही पहिले सहा महिने चाचपडण्यात गेले. पण ते अगदी वाईट नव्हते. या दिवसांबद्दल चारुदत्त फार संवेदनशील आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक गोष्टींची जाणीव याच काळात त्याला व्हायला लागली.

मात्र त्याला हळूहळू इंटरेस्ट वाटायला लागला. आपल्या आनंदाची गोष्टच इथे शिकायची आहे, ही भावना हुरूप देणारी होती. सोबतचे अनेक विद्यार्थी भरपूर टक्के-टोणपे खाऊन आले होते. त्यामुळे भांबावलेपण फक्त आपल्यातच नाही… त्या वयातल्या अनेकांमध्ये असू शकतं, हे त्याला लक्षात आलं. सोबत शिकणाऱ्या अनेक मुलांना बेसिक शिक्षण घेउन शिक्षक म्हणून पटकन नोकरी मिळवण्याची घाई होती.

चित्रकला शिकायची – ही पॅशन असणारे विद्यार्थी कमी होते. चारुदत्तच्या बाबतीत हा टर्निंग पॉइंट ठरला… त्याच्याही नकळत! आत्तापर्यंत केलेलं चौफेर वाचन त्याच्या मदतीला आलं, नव्हे त्याचं एक सामर्थ्य ठरलं. आपल्याकडे भरपूर काही सांगण्यासारखं आहे, आपल्याकडे खूप सारे संदर्भ आहेत, इतर चारजणांपेक्षा आपल्याकडचे संदर्भ जास्ती चांगले आहेत, हे त्याच्या लक्षात येत गेलं. आणि स्वतःभोवतीचा कोष भेदायची पहिली किल्ली त्याला सापडली – आत्मविश्वास! अबोल, अंतर्मुख स्वभावाचं कवच गळून पडायची सुरुवात झाली. त्याला त्याच्या आयुष्यातला ‘तो क्षण’ सापडला होता. आपण जे करत आहोत, शिकत आहोत त्याबद्दलचा आत्मविश्वास!

अनेकांना कार्यक्षेत्राची निवड करताना आपल्या आवडी, आपले छंद, लहानपणापासून बघितलेलं स्वप्न अशा गोष्टींतून ‘तो निर्णायक क्षण’ गवसत असतो, चारुदत्तसाठी आत्मविश्वास हीच ती गोष्ट होती. अजून एक दालन त्याच्यासाठी खुलं केलं ते MGMकॉलेजच्या ग्रंथालयाने! चित्रकलेसंदर्भात प्रचंड साहित्य तिथे उपलब्ध होतं, त्या पुस्तकांनी त्याला जगभरातले चित्रकार, त्यांची कामं यांची ओळख करून दिली. हे जग किती मोठं आहे, याचा आवाका काय आहे, याची झलक त्याला मिळत होती. त्याची कला एकीकडे शिस्तबद्ध रीतीने वाढत होती, आणि एकीकडे या क्षेत्राची समजही! चित्र म्हणजे लँडस्केप – ही धारणा त्या वाचनाने पुसून टाकली. प्रयोग करत राहण्याचं महत्त्व आणि इच्छा त्याच दिवसांत मनात रुजली. त्याने ३ फूट बाय ४ फुटाचं एक न्यूड करायला घेतलं. एका विलक्षण उर्मीतून! पण त्याला तिथे ती चित्रं काढणं कम्फर्टेबल वाटलं नाही, तो घरी निघून आला. घराच्या वरच्या मजल्यावर त्याने चित्रकलेचा संसार थाटला. त्याला हवी तशी चित्रं काढण्यासाठी! ते दिवस इंटरनेटच्या आगमनाचे होते. कॉलेजमध्ये तो फक्त पुस्तकं वाचण्यासाठी जात राहिला. प्रत्यक्ष काम घराच्या वरच्या मजल्यावर करत राहिला आणि इंटरनेटवरून माहिती घेत राहिला. जे.जे सारखी प्रसिद्ध कॉलेजेस, चित्रकार आणि त्यांच्या शैली समजून घेत राहिला. या दिवसांचं वर्णन करताना तो म्हणतो,

‘नवीन नवीन माहिती करून घेण्याची अमानवी भूक माझ्यात होती. चित्रकले अभ्यासक्रमात मी जेव्हा प्रवेश घेतला, त्यावेळी माझ्यासमोर खास ध्येय काहीही नव्हतं. मला माणसं नको होती, ५-१० हजारांची नोकरी मिळवायची, इतकाच विचार होता. पण कॉलेजच्या शेवटच्या वर्षाने मला बदलून टाकलं. हे जग मोठं आहे, आपण यात काही तरी करायचं आहे – ही महत्त्वाकांक्षा माझ्यात रुजत गेलेल्या आत्मविश्वासानेच दिली. आणि मी पुण्यात आलो. मास्टर्स करायला. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समध्ये!’

चारुदत्तची मास्टर्सची वर्षं हे एक नवीन वळण ठरलं. इथे त्याला भेटली वेदांती आणि इतर मोजके पण जीवाभावाचे मित्र. ‘वेदांतीमुळे मला खूप बोलण्यासाठी हक्काचं माणूस मिळालं. कलाकार म्हणून माझ्यासाठी ते फार गरजेचं होतं.’ गृहसजावटीच्या आपल्या कामात वेदांतीने त्यालाही जोडून घेतलं आणि ‘माझ्या कमाईतले २ टक्के तुला देईन,’ यावर सुरुवात झालेलं हे नातं एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वांना पूर्ण करण्यापर्यंत बहरलं. कोणत्या कलाकारासाठी काय गरजेचं असतं, हे सांगणं अवघड आहे. एक विश्वासाचा आणि आपुलकीचा कोपरा कुणात सापडेल, हे कसं सांगावं? चारुदत्तमधल्या कलाकाराची बैठक स्थिर आणि स्वस्थ होण्यात वेदांती हा योग्य वळणावर भेटलेला सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे.

आणखी एक महत्वाचा घटक आवर्जून नमूद करायलाच हवा, तो म्हणजे काही गोष्टींचा स्वीकार! आपली सामर्थ्यस्थळं ओळखताना काय करायचं नाही आणि ते का करायचं नाही, हे मान्य करणं महत्वाचं असतं. त्यासाठी नकाराची क्षमता विकसित करावी लागते.

जेव्हा चारुदत्त पुण्यात आला त्यावेळी ‘फिगरेटिव्ह’ चित्रं काढत असताना आपली ‘अॅनाटोमी’वर हुकमत नाही, हे इतर लोकांचं काम बघताना त्याच्या लक्षात आलं. त्याच्यातल्या या तांत्रिक कमतरतेमुळे तो अमूर्त शैलीकडे वळला. या शैलीत काम करत असताना त्याच्या कॉलेजमधल्या पोपट माने सरांनी त्याला खूप मदत केली. नाशिक मध्ये मिळालेल्या रेसिडेन्सीमध्ये त्याने काही अमूर्त चित्र काढली. या शैलीत त्याने जवळपास अडीच वर्षं काम केलं. आणि एक दिवस कोऱ्या कॅनव्हासकडे बघत तो उभा राहिला. तो सांगतो,

‘त्या क्षणी माझ्या मनात आलं, हे माझं खरं काम नाहीये. मला सांगायचं आहे, ते हे नाहीच. ही शैली मला पाठ झाली आहे, आणि मी ती पोपटपंची करावी तशी फक्त कागदावर उतरवतोय… मी काहीही सांगत नाहीये.’ कलाकार म्हणून मला साचलेपणाची भीती वाटते.

त्याने त्या क्षणी अमूर्त शैली थांबवली आणि पुढचे सहा महिने त्याचं काम बंद होतं. या काळात एकदा माने सर सहज म्हणाले, ‘नांदेडला असताना तू जशी चित्रं काढत होतास तीच पुन्हा सुरु करून बघ. कोणास ठाऊक, त्यात काही तरी सापडेल.’ पुन्हा एकदा फिगरेटिव्ह शैली मध्ये काम सुरु केलं. अॅनाटोमी शिकायला सुरुवात केली. तांत्रिकदृष्ट्या अचूक होण्याचा प्रयत्न सतत करत राहयलाच हवा, ही खूणगाठ त्याने तेव्हा बांधली. कलाकार म्हणून ही गोष्ट फार विशेष आहे.

त्याने पहिलं प्रदर्शन २०१७ मध्ये पुण्यात दर्पण आर्ट गॅलरीमध्ये केलं. चित्रकार म्हणून समाधान देणारी आणि स्वतंत्र ओळख देणारीही ही गोष्ट होती. अहमदाबादच्या अबीर या गॅलरीने २०२०मध्ये त्याची चित्रं घेतली आहेत. २०१९ साली त्याला अबीरचा पहिला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी भोपाळच्या रवीन्द्रनाथ टागोर युनिव्हर्सिटीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

त्याचं काम वाढतंय… मोठ्या स्तरावर पोचतंय. माणसं हीच त्याच्या अभिव्यक्तीचा केंद्रबिंदू आहेत, आणि तीच काही काळ राहणार आहेत. कदाचित काही वर्षांनी त्यात बदल होईलही! पण समाजाशी तुटलेपणा हा त्याचा ‘कनेक्ट’ आहे, असं तो म्हणतो. ‘माणूस समजणं, ही फार अवघड आणि मोठी प्रक्रिया असते. आत्ता मी जी माणसं रंगवतोय, ती तर सुरुवात आहे. त्यापेक्षा खोल उतरायचं आहे. खुंटीला बांधून ठेवलेली शेळी ज्या प्रमाणे दोरीच्या लांबीनुसार फिरते, तसं आत्ता मी एकाच आवर्तनात फिरतो आहे. त्या पलीकडे जाण्याच्या संधी शोधतोय…त्या मिळणार, ही खात्री आहे.’ आयुष्यातल्या अनेक गोष्टींचे, अनुभवांचे रांगोळीसारखे ठिपके तो जोडतोय. मात्र सर्वात ठळक ठिपका आजही त्याच्या बाबांच्या व्यक्तिमत्वाचाच आहे. त्यांच्याबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘बाबांचं असणं हे इतकं धीर देणारं आणि आश्वासक असतं, त्यांचा लोकसंग्रह, त्यांचा स्वभाव यामुळे ते कशातूनही मार्ग काढतील, हा विश्वास मला आजही वाटतो. तोच विश्वास आणि बाबांसारखी प्रतिमा मला माझ्या लेकीच्या वडील म्हणून मनात रुजवायची आहे. वारसा कोणकोणत्या गोष्टींचा असू शकतो, काय सांगावं?

त्याचा लोकसंग्रह वाढतोय, त्यासाठी तो जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय. त्याच्या कलेच्या विचाराच्या मूळाशी माणसंच आहेत. आणि म्हणूनच तो चित्रांतून जे सांगू पाहतोय त्या शक्यता अमर्याद आहे. तो आणखी एक गोष्ट सांगतो, ‘चित्र पूर्ण होतच नसतं. चित्र कुठे थांबतं, हे सांगणंही अवघड असतं, हे लक्षात येण्यासाठी त्यासाठी बरंचसं आयुष्य जातं. चित्र ही कलेक्टिव्ह प्रोसेस असते. ते बघणाऱ्या प्रत्येक माणसाची गोष्ट त्यात गुंफली जाते. सिनेमा किंवा पुस्तक संपतानाही मला हुरहूर लागते. मला त्याच्या शेवटानंतरची गोष्ट जाणून घेण्याची ओढ लागते. इथे तर मीच रेखाटलेली चित्रं आहेत. चित्र थांबवताना (संपवताना नाही) मला त्यातूनही पुढच्या चित्राच्या अगणित शक्यता दिसायला लागतात. तसंही एक कलाकार म्हणून ‘मला सगळं माहिती पाहिजे, ही एक विचित्र जिगीषा माझ्या मनात असते. त्यासाठी मी पुस्तकं, माणसं, प्रसंग आणि परिस्थिती वाचत असतोच. मी त्या त्या माणसाची गोष्ट सांगतो तुम्हाला! म्हणूनच माझ्या ब्रशने रंगवलेला माणसाच्या त्वचेचा पोतदेखील तुमच्याशी बोलतो.’

माणसांच्या दुनियेचं विलक्षण कुतूहल असणारा हा चित्रकार. त्याच्याशी गप्पा – म्हंटलं तर अगदी सहजसोप्या असतात, म्हंटलं तर विचारात पाडणाऱ्या असतात. खूप गुंतागुंतीच्या असतात. त्याला खूप काही सांगायचं असतं. आयुष्य नावाच्या कुणालाही न सुटणाऱ्या कोड्याने त्याला मोहात पाडलं आहे. तरीही एक पाऊल पुढे आलोय, हीच त्याची भावना आहे. त्याला अजुनी माणूस अचूकपणे सापडलेला नाहीये. त्याचा शोध सुरूच आहे. त्यामुळेच त्याची कला आश्वासक वाटते.

प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यामागे एक विस्मयकारक गोष्ट असते… त्याला तिचाच शोध घेऊन सांगायची आहे.


चित्रकाराने आपलं चित्र स्पष्ट करून सांगावं का, याबाबत तो सांगतो: ‘चित्रकाराने चित्राविषयी सांगितलं तर त्यामागची दुनिया बघणाऱ्याला कळते. चित्र बघण्याचा मार्ग सांगायला हरकत नसते. मुळात आपल्याकडे चित्रकलेतलं काही कळत नाही, असं म्हणणाऱ्यांची संख्या खूप असते. हा विचारच दूर व्हायला हवा. त्यासाठी चित्रकारांनी पुढे होऊन बोलायला हवं. कारण चित्रकाराकडे गोष्ट सांगण्याच्या शक्यता अधिक असतात. त्या लोकांपर्यंत पोचवता यायला हव्यात. माणसं आणि चित्र यांच्यात दुवाच नसतो. तो तयार करायला हवा. हे माध्यम लोकांपर्यंत अधिक प्रकर्षाने न्यायला हवं. चित्र बघायचं म्हणजे काय करायचं, हेच सांगितलं जात नाही, ते सांगायला हवं.’


सर्जनशील व्यक्तीच्या कामात येणारा ब्लॉक त्याला त्रास देत नाही का? तर देतो. विशेषत: लॉकडाऊनच्या काळात माणसं भेटत नव्हती, स्टुडिओमध्ये येता येत नव्हतं, त्यावेळी चित्रांसाठीची ऊर्जाच मिळत नव्हती. पण त्याकाळात वॉटर कलरमध्ये काही चित्रं त्याने केली. मास्कच्या आड दडलेल्या अस्वस्थ चेहऱ्यांची काही चित्रं झाली. हतबलपणे शेकडो मैलांवरच्या गावांकडे चालत निघालेल्या जत्थ्यांची चित्रं झाली. ब्लॉक येतो, पण तेव्हा थांबून न राहता काम करत राहणं, सतत विचार करत राहणं हाच पर्याय तो निवडतो. कधी कधी स्वतःचा संयमही पारखून घ्यावा लागतो. रोटरिंग पेननी केलेल्या स्केचेसनी त्याला स्वतःला तपासता आलं कारण एका चित्राला ८ ते १० दिवस द्यावे लागले.


  • नीता कुलकर्णी

Shipla Parandekar

या सदरातील लेख…

खाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर

महाराष्ट्रातल्या ५०० गावांचा प्रवास एकटीने करून शिल्पाने विस्मृतीत गेलेले, जाऊ पाहणारे शेकडो पदार्थ आणि त्यांच्या कृती समजून घेऊन त्यांची नोंद केली आहे.

लेख वाचा…


मल्हार इंदुरकर – नदीमित्र

मल्हार हा मूळ चिपळूणचा! तिथलाच रहिवासी. त्याच्या घरामागे वशिष्ठी नदी वाहाते. त्यामुळे पाण्याची ओढ त्याला जन्मजात आहे….

लेख वाचा…


सिराना – द परफेक्ट ब्लेंड!

संधीने दार ठोठवलं तर ते पटकन उघडायलाही अनेकदा धाडस करावं लागतं. योगिनीने ते केलं….

लेख वाचा…


3 Responses

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *