WebImages_KalawadiniKausalya

आर्यगंधर्व (कलावादिनी)

फॉन्ट साइज वाढवा

विसाव्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ… या काळातच बालगंधर्व नावाचा सुवर्णपक्षी संगीत रंगभूमीच्या अवकाशात मनसोक्त विहरत होता… आणि त्यांच्या गाण्याने व स्त्री-रूपातल्या छबीने संपूर्ण महाराष्ट्र वेडावलेला होता. पुरुषवर्गाला बालगंधर्वांच्या गाण्याचा मोह पडला होता. तर महिलावर्ग बालगंधर्वांच्या केवळ वेशभूषेचंच नाही; केशभूषा, त्यांच्या बोलण्या-चालण्याची रीत सा‍ऱ्याचंच अनुकरण करत होता… अन् तरीही ‘प्रतिगंधर्व’ ही उपाधी मिळाली, ती फक्त- कौसल्याबाई कोपरगावकर यांनाच! कौसल्याबाई खरंतर लावणीकलावंत. गंधर्वांचा बहराचा काळ, तो त्यांचा उमेदीचा काळ… त्या उमेदीच्या वयातच कौसल्याबाईंना बालगंधर्वांच्या वेशभूषेचा असा काही सोस पडला की, आपल्याही नकळत कौसल्याबाईंनी बालगंधर्वांची नकल करायला सुरुवात केली. म्हणजे- कपाळावर दोन्ही बाजूना काढलेल्या वळणदार बटा, अंगात नक्षीदार चोळी, चापूनचोपून नेसलेलं पायघोळ लुगडं आणि खांद्यावरून पार कमरेखाली गेलेला पदर… आणि या अशा घरंदाज सोज्ज्वळ रूपात कौसल्याबाई लावणी सादर करायच्या, ती आपली पारंपरिक लावणीच- मग ती खडी लावणी असो वा बैठकीची. मात्र लावणी सादर करतानाही आपल्या बालगंधर्वी वेशभूषेचा आब त्या अशा काही राखायच्या, की पाहणाऱ्याला बालगंधर्वांचाच भास व्हावा… नि त्यामुळेच त्यांच्या रसिकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे पदवी बहाल केली- प्रतिगंधर्व!

…स्वतः बालगंधर्व मात्र कौसल्याबाईंना म्हणायचे – आर्यगंधर्व! कारण पुण्यातील तमाशापंढरी असलेल्या आर्यभूषण तमाशा थिएटरवर त्याकाळी कोसल्याबाईंचं अनभिषिक्त साम्राज्य होतं. कौसल्याबाईंची पार्टी उभी राहिली की – आर्यभूषणचं आवार रसिकांनी फुलून जायचं. बाई येण्याआधी रंगमंच्यावर तबलजी, ढोलकीवाला आणि पेटीवाल्याने बैठक जमवलेली असायची. या वाद्यांच्या लकेरी सुरात निनादत असतानाच, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण टाळ्यांच्या नादाची भर घालत कोसल्याबाई अवतरायच्या आणि बघता बघता लावण्यांचा फड जमून जायचा. दोन हात एकमेकांत गुंफून वाजवलेली टाळी हे बाईंचं खास अस्त्र होतं. बाईंचा हा टाळीनाद ऐकण्यासाठी रसिक हजेरी लावायचे, अशी आठवण पुण्याच्या आर्यभूषण तमाशा थिएटरचे मालक माजिदशेठ तांबे यांनी सांगितली होती… आणि या रसिकांमध्ये कोण नव्हतं? उपलब्ध माहितीनुसार नामवंत तवलावादक अल्लारखाँ आणि थिरकवाखाँसाहेब, मास्टर भगवान, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या अनेकांनी कौसल्याबाईंच्या लावण्यांचा आस्वाद अनेक वेळा घेतला. बाबासाहेब पुरंदरे तर, कोसल्याबाईंचा त्यांच्या मूळ गावी म्हणजे कोपरगावला दिवाणखाना होता, तिथपासूनचे त्यांचे चाहते. त्या वेळी बाबासाहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून कोपरगावला कार्यरत होते. तिथेच त्यांनी कौसल्याबाईंची टाळीची अदा पहिल्यांदा पाहिली आणि त्यांना ती कायमची आवडून गेली… कोपरगावचा दिवाणखाना सोडून बाई नंतर पुण्याला आल्या.

स्वतः बालगंधर्व कौसल्याबाईंना म्हणायचे – आर्यगंधर्व! कारण पुण्यातील तमाशापंढरी असलेल्या आर्यभूषण तमाशा थिएटरवर त्याकाळी कोसल्याबाईंचं अनभिषिक्त साम्राज्य होतं.

बघायला गेलं तर कौसल्याबाई जन्माने तमासगीर किंवा लावणी परंपरेतल्या नव्हत्या. त्या मूळ गोंधळी समाजातल्या (आडनाव थिटे) होत्या. त्यांचे वडील माधवराव गोंधळकलावंत म्हणून प्रसिद्ध होते, तर आई म्हाळसाबाईकडेही जुन्या लोकगीतांचा मोठा संग्रह होता. या दोघांच्या प्रभावातून गाण्याची आवड कौसल्याबाईंना फार लहानपणीच लागली. तसंच परंपरेनं आलेलं गाणं-बजावणं रक्तातच असल्यामुळे पूर्वापार अनेक गोंधळीकलावंत तमाशा-लावणीच्या क्षेत्रातही नाव कमावून होते. कौसल्याबाईंचा लावणीच्या क्षेत्रातला शिरकावही असाच झाला. मात्र एकदा या क्षेत्रात आल्यावर त्यांनी एकलव्यनिष्ठेने पारंपरिक लावणी शिकून घेतली. त्या काळात बाई सुंदराबाई जाधव, चंदा कारवारकरीण, हिराबाई सासवडकर, शेवंता जेजुरीकर, सरस्वती कोल्हापूरकर अशा अनेक नामवंत लावणीगायिका आपला जम बसवून होत्या. बहुतेकींचे पुण्यात दिवाणखाने होते. संध्याकाळ झाली की, या दिवाणखान्यांतून बैठकीच्या लावण्यांचे दीप उजळायचे. यातल्या बहुतेकींच्या आवाजातील लावण्यांच्या, त्या काळी म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रेकॉर्ड निघाल्या होत्या. कौसल्याबाईंची लावणीही या बुजुर्ग लावणीकलावंतांच्या गाण्याशी नातं सांगणारीच होती. त्यामुळेच त्यांच्याही लावण्यांच्या रेकॉर्ड निघाल्या. त्यांची अशीच ‘अबोला का रे धरसी, सखया बोला मजसी’सारखी जुन्या तबकडीवरची लावणी कानावर पडली, की आजही अवाक् व्हायला होतं. त्यांचं लावणीगायन ऐकताना त्यांना किमान उपशास्त्रीय प्रकारातील गाण्याचं अंग होतं, असं म्हणावंच लागतं. त्यांच्या या लावणीतला गोड आवाजातील लडिवाळपणा अशी काही जादू करतो, की ही लावणी ऐकताना आपल्या कानावर बाईंचं नुस्तं गाणंच पडत नाही, तर गाण्याबरोबरच नजरेसमोर बाईंचं भावकामही सुरू होतं. महत्त्वाचं म्हणजे कोसल्याबाईंचं लावणीगायन एकदम खानदानी होतं. बालगंधर्व संगीत रंगभूमीवर जी घरंदाज करामत करत होते, तीच करामत कौसल्याबाई लावणीच्या रंगमंचावर करत होत्या.


लक्षणीय पुस्तकं


बाईंनी एकदा लावणी म्हणायला सुरुवात केली की, त्या थांबत नाहीत तोपर्यंत रसिक खिळून असायचे. कधी उभ्याने नाचून म्हटलेली द्रुत लयीतली फक्कडशी छक्कड, तर कधी बसून घोळवत म्हटलेली ठाय लयीतली बैठकीची लावणी आणि सोबत अदेचा नखरा… कौसल्याबाईंचं नृत्य आणि गाननिपुणत्व पाहण्यासाठी रसिक पुनपुन्हा हजेरी लावत. बालगंधर्वांनी कौसल्याबाईंच्या लावण्या अनेकदा ऐकल्या. आर्यभूषणच नाही, तर बाईंच्या रास्तापेठेतील घरीही गंधर्व जात. बाईंची गायकी त्यांच्या विशेष आवडीची होती. कौसल्याबाईंच्या तरुण, पण दमदार आवाजातल्या लावण्या गंधर्वांना मोहात पाडायच्या. महत्त्वाचं म्हणजे कौसल्याबाई अनेकदा स्वतः पेटी वाजवून त्यावर बैठकीच्या लावण्या म्हणत. त्यामुळे पुणे मुक्कामी असल्यावर गंधर्व आणि कौसल्याबाईंची भेट झाली नाही असं सहसा होत नसे. या भेटीत कोसल्याबाईंनी बैठकीच्या लावण्या म्हणाव्यात आणि बालगंधर्वांनी ‘व्वा देवा, व्वा’ म्हणत तारीफ करावी, ही रीत जणू ठरूनच गेलेली. या लोभामुळेच बालगंधर्वांनी बाईंचा घरोबा आपल्या गंधर्व नाटकमंडळीतील गायकनट प्रभाकरपंत पटवर्धन यांच्याशी जुळवून दिला. बालगंधर्व आणि कौसल्याबाईंमधील या निकोप नात्याची आठवण ठेवूनच, जेव्हा बालगंधर्वांच्या स्मरणार्थ पुण्यात बालगंधर्व नाट्यगृह उभारलं गेलं, तेव्हा त्या रंगमंचावर कला सादर करण्याची पहिली संधी कौसल्याबाईंना दिली गेली…

बालगंधर्वांच्या प्रभावातून कौसल्याबाईंना गाण्याचीदेखील विशेष मर्मं आकळली असली पाहिजेत. कारण तीन मुलांच्या पाठीवर झालेली मुलगी कमल हिला गाणं शिकवण्यासाठी कौसल्याबाईंनी खास किराना घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँसाहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेशबाबू माने यांची नेमणूक केली होती. सुरेशबाबू मानेंकडे कमल वर्षभर शास्त्रीय पद्धतीचं गाणं शिकली. मात्र काही कारणाने वर्षभरानंतर ही तालीम बंद पडली. पण शास्त्रीय गाणं सुटलं, तरी परंपरेतलं गाणं मात्र कमलबाई पुढे मोठेपणी गात राहिल्या.

कौसल्याबाईंची रेकॉर्ड

कौसल्याबाईंनी मात्र अखेरपर्यंत लावणीशी असलेलं आपलं नातं जपलं आणि वाढवलंही. लावणीगायनाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणा‍ऱ्या अनेकींना त्यांनी शिकवलं. कौसल्याबाई, राधाबाई बुधगावकर आणि यशोदाबाई वाईकर या तिघींची तर खास दोस्ती होती. तिघींनी महाराष्ट्र गाजवला होता. पैकी आपल्या मुलीच्या मुलाचं लग्न राधाबाईंच्या नातीशी करून त्यांनी राधाबाई बुधगावकर यांच्याशी नातंही जोडलं. महाराष्ट्र शासन आयोजित तमाशा प्रशिक्षण शिबिरात कौसल्याबाईंनी प्रशिक्षकाची भूमिकाही पार पाडली. दिल्लीची संगीत नाटक अकादमी आणि पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात कौसल्याबाईंच्या कलेचं दस्तावेजीकरण करण्यात आलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनसारख्या माध्यमानेही त्यांची दखल घेतली होती. एवढंच नाही, तर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे दिल्लीत १९६६ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोरही आपली कला पेश केली… इतकं कौसल्याबाई हे लावणीपरंपरेतलं मानाचं लखलखीत पान होतं.
…अन् तरीही कौसल्याबाई कोपरगावकर यांचं नाव आज इतिहासात इतकं गडप झालंय, जणू कौसल्याबाई झाल्याच नाहीत!

-मुकुंद कुळे


Sundarabai
या सदरातील पहिला लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…




या सदरातील दुसरा लेख…

देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


या सदरातील तिसरा लेख…

एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…



रोहन प्राइम

वाचकांसाठी खास सभासद योजना!

‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु. १००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…

अधिक माहिती जाणून घ्या..

250.00Add to Cart


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *