‘पर्वतपुत्र शेर्पा’ या पुस्तकामधील निवडक भाग

सोनम शेर्पा

‘एव्हरेस्ट हार्डवेअर’ या गिर्यारोहण साहित्याचं उत्पादन करणाऱ्या कंपनीचा संस्थापक-प्रमुख

काठमांडू हे गजबजलेलं शहर आहे. इथे अनेक पर्यटक, गिर्यारोहकांचे जथेच्या जथे नेहमीच दिसतात. मग ते पशुपतीनाथाचं मंदिर असो, किंवा चिंचोळ्या गल्ल्यांचं थमेल मार्केट असो. गर्दी हे या शहराचं वैशिष्ट्यच. थमेल मार्केटमधल्या अशाच गर्दीतून वाट काढत मी सोनम शेर्पाच्या घरी पोहोचलो. सोनमचा गिर्यारोहकांसाठी फेदर जॅकेट्स विकण्याचा व्यवसाय होता. त्याचं छोटंसं घर व दुकान हे काठमांडूतील थमेल-थ्याती भागात होतं. हा सर्व परिसर म्हणजे मला अगदी पुण्यातल्या लक्ष्मी रोड परिसरातील बाजारपेठ सारखाच आहे. एकमेकांना लागून असलेली दुकानं, दुकानांच्याच डोक्यावर राहणारी माणसं व ग्राहकांच्या गर्दीने खुलून गेलेला परिसर. अशा चिरपरिचित वातावरणातून वाट काढत मी आज अखेरीस सोनमला गाठलं होतं. मी गेलो तेव्हा सोनम घरीच होता. मी आपल्या पुणेरी थाटात चितळेंची आंबा बर्फी सोनमला दिली. त्याच्या ‘एव्हरेस्ट’वरील यशस्वी चढाईबद्दल त्याचं अभिनंदन केलं. सोनमची आणि माझी ही पहिलीच भेट!

 Sherpa

‘एव्हरेस्ट हार्डवेअर’ ही कंपनी गिर्यारोहणाचे विशेष कपडे आणि इतर आवश्यक साहित्य बनवते. सोनम शेर्पा हा या मोठ्या कंपनीचा मालक. मी जेव्हा त्याला २००८मध्ये पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्याने नुकताच व्यवसाय सुरू केला होता. १० बाय १०च्या खोलीत दोन कामगारांच्या साथीने तो गिर्यारोहकांना आवश्यक असणारं साहित्य बनवत असे. २००८ साल हे सोनमसाठी आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष होतं. मे २००८मध्ये सोनमने जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एव्हरेस्ट’वर यशस्वी चढाई केली. वास्तविक सोनम हा अतिउंचीवर चढाई करताना मदतनीस म्हणून काम करणारा शेर्पा नव्हे. त्याने जेव्हा ‘एव्हरेस्ट’वर चढाई केली तेव्हा त्याच्यासोबत तीन शेर्पा साथीदार होते. सोनम हा एव्हरेस्ट शिखरचढाई करणाऱ्या सर्वसामान्य नेपाळी नागरिकांपैकी एक होता. मला त्याच्या एव्हरेस्ट चढाईविषयी जाणून घ्यायचं होतं आणि म्हणूनच मी त्याला भेटायला गेलो.
सोनमची व माझी पूर्वीची काहीच ओळख नव्हती. डिसेंबर २००८मध्ये मी नेपाळमध्ये ‘गिरिप्रेमी’च्या एव्हरेस्ट मोहिमेच्या रेकीसाठी गेलो होतो त्या वेळी माझी व सोनमची गाठ पडली. ‘एव्हरेस्ट’सारख्या आव्हानात्मक मोहिमेसाठी उत्तम शेर्पा एजन्सी शोधणं आम्हाला गरजेचं होतं. एका चांगल्या शेर्पा एजन्सीच्या शोधात मी काठमांडूमध्ये दाखल झालो होतो. मात्र, कोणत्या निकषांवर शेर्पा एजन्सी ठरवावी, याबद्दल अजूनी विचारविनिमय चालू होता. यातूनच मला एक कल्पना सुचली. एखादी स्थानिक नेपाळी व्यक्ती ज्या शेर्पा एजन्सीसोबत शिखरचढाईला गेली असेल त्या एजन्सीची माहिती काढू असं मी ठरवलं. मात्र, यासाठी स्थानिक एव्हरेस्टवीरांची माहिती मिळवणं क्रमप्राप्त होतं. मग मी काठमांडूतील ‘नेपाळ माउंटेनिअिंरग असोसिएशन’च्या अर्थात ‘NMA’च्या कार्यालयात धडकलो. इथे दरवर्षी नेपाळमधल्या विविध शिखरांवर कोणी यशस्वी चढाई केली, याची इत्थंभूत माहिती संकलित केली जाते. २००८साली स्थानिक नागरिकांपैकी कोणी ‘एव्हरेस्ट’ शिखरचढाई यशस्वी केली आहे, हे शोधत असतानाच सोनम शेर्पाबद्दल कळलं. लगेच त्याचा पत्ता मिळवला व थमेल मार्केटच्या चिंचोळ्या गल्ल्यांतून त्याच्या घरी पोहोचलो. सोनम त्या वेळी थमेल मार्केटमध्येच बायको व जुळ्या मुलांसोबत राहत होता. थोडंफार औपचारिक बोलणं झाल्यावर मी त्याला माझ्या येण्याचं कारण सांगितलं. ‘एव्हरेस्ट’ जिंकायचं लक्ष्य असणारी व्यक्ती रेकीसाठी थेट भारतातून आपल्या घरी येते, याचं सोनमला फार आश्चर्य वाटत होतं, अर्थात आनंदही वाटत होताच. सोनमने एव्हरेस्ट मोहिमेत ‘पीक प्रमोशन’ या शेर्पा एजन्सीची मदत घेतली होती. त्याने मलाही याच एजन्सी सोबत जाण्याचा सल्ला दिला. एवढंच नव्हे, तर ‘पीक प्रमोशन’च्या वांगचू शेर्पाशी भेटही घडवून आणली. पहिल्याच भेटीत सोनमने दिलेली आपुलकीची वागणूक त्याच्या मनमिळाऊ स्वभावाचं दर्शनच घडवत होती.

सोनमला पर्वतांचं वेड लहानपणापासूनच होतं. हा हिमालय आपला ‘पोशिंदा’ आहे, त्याचं आपण देणं लागतो, अशी सोनमची ठाम भावना होती. यातूनच हिमालयाशी, या डोंगरांशी निगडित सतत नातं जोडणाऱ्या गिर्यारोहणातच काहीतरी करायचं, असं सोनमने मनाशी पक्कं केलं होतं. यातूनच त्याने थंड प्रदेशात, विशेषत: अतिउंचीवर, जिथे अत्यंत कमी तापमान असतं, बोचणारी थंडी असते व वाऱ्याला प्रचंड वेग असतो, अशा प्रदेशात वापरण्यात येणारं जॅकेट, डाउन सूट्स, ट्राउझर्स इत्यादी संसाधनं तयार करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. अवघ्या २ कामगारांना घेऊन सोनमने या व्यवसायात पाऊल टाकलं होतं. १० बाय १०च्या खोलीत सुरू झालेल्या या व्यवसायात सोनम अगदी मन लावून काम करत असे. गिर्यारोहणात, विशेषत: थंडीच्या ठिकाणी वापरण्यात येणारी साधनं बनवताना किती तांत्रिक गोष्टींची पाहणी करावी लागते कारण, इथे थेट ग्राहकाच्या जीवाचा प्रश्न असतो. म्हणूनच सोनमने अगदी जिद्दीने आपले प्रॉडक्ट्स हे जगामध्ये ग्राह्य धरण्यात येणाऱ्या मानकांनुसारच बनवले. सोनमला ‘एव्हरेस्ट हार्डवेअर’ हा ब्रँड म्हणून स्थापन करायचा होता, त्यासाठी तो जगभर फिरला, हा व्यवसाय सर्वांगाने जाणून घेतला, आपलासा केला. अगदी तोडकी-मोडकी इंग्रजी बोलता येणारा, जेमतेम शाळेपर्यंतच शिकलेल्या सोनमने जिद्दीच्या बळावर व्यवसायात भरभराट आणली. आज सोनमचा व्यवसाय हा काही हजार कोटींचा असून तब्बल पन्नास पूर्णवेळ कामगार त्याच्याकडे काम करत आहेत. दोन खोल्यांतून सुरू झालेला हा प्रवास आज एका मोठ्या हवेलीपर्यंत येऊन ठेपला आहे. ‘एव्हरेस्ट हार्डवेअर’ हा आता जगातील नामवंत ब्रँडपैकी एक ब्रँड म्हणून नावारूपाला आला आहे.
आपल्या ब्रँडचं नाव ‘एव्हरेस्ट’च असावं, याबद्दल सोनम अगदी आग्रही होता. सोनमने दोन स्वप्नं नेहमी उराशी बाळगली; एक म्हणजे एव्हरेस्ट चढायचं व दुसरं म्हणजे एक यशस्वी उद्योजक व्हायचं. त्याने दोन्हीही स्वप्नं आपल्या मेहनतीच्या बळावर पूर्ण केली. त्यात २००८साली यशस्वीरीत्या एव्हरेस्टवर चढाई केल्यावर सोनमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या यशाने आपल्या ब्रँडचं नावदेखील ‘एव्हरेस्ट’च असावं, हे शिक्कामोर्तब झालं. तसंच एव्हरेस्ट शिखरचढाई केलेल्या गिर्यारोहकाचा ब्रँड म्हणून ‘एव्हरेस्ट हार्डवेअर’ नावारूपाला येऊ लागलं. २००८साली त्याच्या प्रवासाने घेतलेली भरारी उत्तरोतर वाढतच गेली. यामागे सोनमची मेहनत तर आहेच, मात्र त्याच्या कुटुंबाचा असलेला पाठिंबादेखील वाखाणण्याजोगा आहे. त्याची बायको फार शिकलेली नाही, मात्र ती आपल्या नवऱ्याला उद्योगात सर्वतोपरी मदत करत आहे. एव्हरेस्ट शिखरावरची चढाई असो, वा उद्योग चालवणं, त्यासाठी मनाने धीट असणं गरजेचं असतं, हे सोनमने व सोनमच्या बायकोने दाखवून दिलं आहे. जेव्हा सोनम ‘एव्हरेस्ट’ चढाईला गेला होता, तेव्हा त्याची जुळी मुलं अवघी ४-५ महिन्यांची होती. मुलं एवढी लहान असताना त्याच्या बायकोने सोनमला एव्हरेस्ट-चढाई करण्याची परवानगी कशी दिली, तिला कधी भीती वाटली नाही का, याबद्दल मला कुतूहल होतं. मी तसं विचारलं असता, ती उत्तरली, “उसमें क्या डरना? सोनम तो शेर्पा है, वो एव्हरेस्ट कर सकता है, और उसने किया भी.” तिच्या या उत्तराने मला तिचा नवऱ्यावर असणारा दृढ विश्वास तर दिसलाच, सोबतीला शेर्पा लोकांच्या मानसिक कणखरतेचं दर्शनदेखील झालं. काही गोष्टी या रक्तातच असतात, तसं साहस व धाडस हे शेर्पांच्या रक्तातच असतं.

लेखक, गिर्यारोहक उमेश झिरपे आपल्या सहकाऱ्यांसोबत…

धाडस व साहसासोबतच मी सोनम शेर्पामधला कनवाळू व प्रेमळपणादेखील अनुभवला आहे. आपला व्यवसाय उभा करताना त्याने समाजहिताकडेदेखील तेवढंच लक्ष दिलं आहे. आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसोबत त्याचे जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध आहेत. मालक-नोकर असा भेदभाव मी तरी कधी पाहिला नाही. उलट सर्वांशी मिळून-मिसळून राहणारा सोनमच मला आजपर्यंत दिसत आला आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपनीचे आपण चालक-मालक आहोत, असा अहंकाराचा लवलेशही मला कधी सोनम शेर्पाच्या चेहऱ्यावर दिसला नाही. उलटपक्षी, गरीब शेर्पा बांधवांसाठी झटणारा, त्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते करणारा सोनम शेर्पाच सगळ्यांना माहीत आहे. आपला ब्रँड मोठा करत असताना त्याने जमिनीशी असणारी आपली नाळ मात्र कधीच तोडली नाही. विविध शिखरचढाईमध्ये मदतनीस व मार्गदर्शक म्हणून सहभागी होणाऱ्या गरीब शेर्पांना सोनम नेहमीच मदत करत आला आहे. अनेक शेर्पांना त्याने महागडे डाउनसूट अगदी मोफतही उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्या मते, शेर्पा हे कोणत्याही शिखरमोहिमांचे जणू ऑक्सिजन असतात, त्यामुळे त्यांना सर्वतोपरी मदत ही केलीच पाहिजे.
व्यवहारी, पण तेवढाच उदार; मितभाषी पण व्यावसायिक असणारा सोनम शेर्पा हा अवलिया आहे. एव्हरेस्ट चढाई, नंतर एव्हरेस्टच्याच नावाने गिर्यारोहणात आवश्यक असणाऱ्या ‘गेअर्स’चा ब्रँड, शून्यातून उभा राहत, करोडोची उलाढाल करणारा व्यावसायिक अशी बहुरूपी ओळख असणारा सोनम शेर्पा हा ‘अनडाइंग शेर्पा स्पिरीट’चे उत्तम उदाहरण आहे.

  • पर्वतपुत्र शेर्पा
  • लेखक : उमेश झिरपे

पूर्वप्रकाशित रोहन साहित्य मैफल जुलै २०२०


या पुस्तकाबद्दल…

पर्वतपुत्र शेर्पा

बर्फातल्या वाटा मोकळ्या करणारे, घळींवर शिड्या टाकणारे, अडकलेल्या गिर्यारोहकांच्या ‘रेस्क्यू’ला धावणारे, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून स्वत: रांधून खाऊ घालणारे, मणामणांचं ओझं उचलून नेणारे शेर्पा ! हिमालय त्यांना जसा कळतो, तसा इतर कुणालाही कळत नाही आणि म्हणूनच ते गिर्यारोहकांचे खरे पार्थ ठरतात. हिमालयाचे हे खरेखुरे साहसवीर गिर्यारोहकांच्या यशस्वी मोहिमांमध्येही आनंद घेतात. मुख्य म्हणजे आजकाल शेर्पा इतर व्यवसायांतही मुसंडी मारत असून त्यांतही त्यांची कामगिरी उत्तुंग होत आहे. सुप्रसिद्ध आणि अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या पुस्तकात शेर्पांच्या या खडतर जीवनाचे विविध पैलू रंजकपणे उलगडले आहेत. शेर्पा म्हणजे केवळ ‘सामान उचलणारे’ नव्हेत, हे सांगून हिमालयातल्या या खऱ्या खुऱ्या साहसवीरांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी अधोरेखित करणारं पुस्तक…

225.00Add to Cart


Umesh Zirpe
गिर्यारोहक, लेखक उमेश झिरपे यांचा परिचय

एव्हरेस्ट मोहीम, अष्टहजारी शिखरांवरच्या मोहिमा, माउंट ल्होत्से, माउंट मकालू, माउंट चो ओयू, माउंट धौलागिरी, माउंट मनास्लू, माउंट कांचनजुंगा अशा अत्यंत आव्हानात्मक गिर्यारोहण मोहिमा त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली `गिरिप्रेमी’संस्थेच्या अनेक सदस्यांनी पूर्ण केल्या आहेत.

वाचा...

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *