हृद्य मनोगत : ‘मैत्रिणी म्हणाव्यात अशा लेखिका’ हे संपादक प्रदीप चंपानेरकर यांचं मनोगत हृद्य वाटलं. हृद्य या दृष्टीने की, आपल्या व्यवसायामध्ये भेटलेल्या स्त्रियांविषयी असे कौतुकोद्गार काढणारी व्यक्ती – विशेषत: पुरुष विरळाच. हा लेख म्हणजे स्त्री-पुरुषांमधल्या विशुद्ध स्नेहाचं प्रतीकच म्हणावं लागेल. मनोगताच्या निमित्ताने चंपानेरकर यांचं एकंदर लेखनही मला कसदार वाटतं. माझा, त्यांचा व रोहन प्रकाशनाचा स्नेह मला मोलाचा वाटतो.
-डॉ. वर्षा जोशी
जवळचा मित्र : ‘रोहन साहित्य मैफल’च्या मार्च १९च्या अंकातलं प्रदीप चंपानेरकर यांचं संपादकीय मनोगत वाचलं. त्यात त्यांनी महिला लेखिकांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. ते वाचून मलाही त्या मनोगताला प्रतिसाद द्यावासा वाटला म्हणून हा प्रपंच! साधारण १९९५मध्ये सदा डुंबरे यांच्यामुळे माझी आणि प्रदीप यांची ओळख झाली आणि थोड्याच दिवसांत आमचं ‘लेखिका आणि प्रकाशक’ हे नातं जाऊन ते ‘अरे प्रदीप’ म्हणण्याएवढं मोकळं केव्हा झालं हे मला उमगलंच नाही. या स्नेहाच्या मुळाशी होता प्रदीपचा उमदा स्वभाव. माझं पहिलं पुस्तक ‘पाहुणचार’. त्याच्या लेखनाच्या दरम्यान मला असं समजलं की, प्रदीप पर्फेक्शनिस्ट आहे. तेव्हा मी लेखनाच्या क्षेत्रात नवखी होते. मी त्याच्याकडून बरंच काही शिकले. पाहुणचार पुस्तकासाठी रेखाचित्रं, फोटो यांबाबत तो घेत असलेले परिश्रम पाहून मी थक्क होत असे. त्याच्या चोखंदळपणाचा मला आलेला अनुभव मजेशीर आहे. ‘संपूर्ण पाककला’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी त्याला माझा आणि त्याची सून- नम्रताचा फोटो हवा होता. त्या वेळी त्याने योजलेल्या रंगसंगतीशी सुसंगत अशी नवी साडी त्याने माझ्यासाठी घेतली. कव्हरवर अर्थातच त्याच साडीतला माझा फोटो आहे. तीन वर्षांपूर्वी मी काही कारणाने हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा तो मला मानधनाचा चेक आणि पुष्पगुच्छासह भेटायला आला. त्यामुळे मला बरं वाटलं. मी रोहन प्रकाशनाची लेखिका होऊ शकले याचा मला रास्त अभिमान आहे. प्रदीप हा माझा जवळचा मित्र आहे.
-उषा पुरोहित
अकृत्रिम स्नेह : रोहन साहित्य मैफल मासिक सुरू होऊन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यातून विविध पुस्तकांची माहिती तर मिळतेच, पण मला त्यातलं संपादकीय मनोगत विशेष वाचनीय वाटतं. कारण त्याला एक पर्सनल टच असतो. तसेच त्यात वेगवेगळे विषयही हाताळलेले असतात. संपादक प्रदीप चंपानेरकर कधी मित्र-मैत्रिणींबद्दल, तर कधी शास्त्रीय संगीताच्या आवडीबद्दल, तर कधी त्याच्या मनाच्या हळव्या कोपऱ्याबद्दल त्यात लिहितो. त्याला त्याने स्वानुभवांची जोडही दिलेली असते. त्यामुळे हे मनोगत खरोखरच वाचनीय असतं. माझा पती अशोक याचा प्रकाशक या नात्याने माझी व प्रदीपची प्रथम ओळख झाली. आणि बघता बघता तो नुसता मित्रच नाही, तर आमच्या कुटुंबाचा आणि आमच्या विस्तारित कुटुंबाचा सदस्य कधी झाला हे कळलंच नाही. त्याच्या स्वभावातील अकृत्रिम जिव्हाळा आम्हाला भावला. आता आमच्यात एक अकृत्रिम स्नेह निर्माण झाला आहे.
-सुनीती जैन
प्रदीपजी, ‘रोहन साहित्य मैफल’च्या मार्च १९च्या अंकातलं मनोगत आवडलं. त्यात स्त्री-स्नेही, विशेषत: लेखिका आणि रोहन प्रकाशन यांचं नातं तुम्ही फार सुंदर प्रकारे मांडलं आहे. कुठलाही खास अभिनिवेश न बाळगता, ज्या सहजतेने रोहन परिवारात लेखिका सामील झाल्या ते फार महत्त्वाचं आहे. माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्या झडलेल्या चर्चा म्हणजे एक आनंद मैफलच! परंतु तुम्हालाच अडचणीत टाकणारी दोन-तीन वाक्यं तुम्ही लिहून गेलात (आता पुण्याचे असूनही) ते म्हणजे एका लेखिका मैत्रिणीला साडी दिल्याचं गाफीलपणे लिहून गेला आहात, आणि मैत्रिणींना रागवायचा हक्क आहे हेसुद्धा (सावधपणे) सांगून टाकलंत! अर्थात आमचा उल्लेख जाता जाता केल्यामुळे आम्ही रागावणार याची कल्पना तुम्हाला लेख लिहिताना आलेली असणार! तर पुढील लेखात उर्वरित (अल्पउल्लेखित) मैत्रिणींवर तुम्ही सविस्तर लिहिणार आहात हे गृहीत धरून वाट बघतेय!
-डॉ. मृदुला दाढे-जोशी
पारदर्शी निर्मळपणा : ‘रोहन साहित्य मैफल’मधील प्रदीप चंपानेरकर यांचं संपादकीय मनोगत वाचणं हा नेहमीच एक आनंददायी अनुभव असतो. त्यातून विविध माहिती मिळते तसेच मोठ्या लेखक-संपादकांसोबतचे वैयक्तिक अनुभव समजतात, त्यांची व्यक्तिमत्वं लक्षात येतात. या मनोगतातून विचारप्रवृत्तदेखील व्हायला होतं. ‘मैत्रिणी म्हणाव्यात अशा लेखिका’ या मार्च १९च्या अंकातील मनोगतात चंपानेरकरांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. त्याचप्रमाणे पारदर्शी निर्मळपणाही दिसतो. या लेखातील स्त्री-पुरुषांमधील स्नेहभावाविषयीचे विचार मनाला विशेष भिडून गेले. त्यांनी त्यांच्या एकंदर विचारांचं पुस्तक अवश्य लिहावं, असं आवर्जून वाटतं.
-डॉ. विजया फडणीस
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०१९
हे मनोगत वाचण्यासाठी…
मैत्रिणी म्हणाव्यात अशा लेखिका (प्रदीप चंपानेरकर)
काही जणांशी या ऋणानुबंधांचं रूपांतर एका चांगल्या स्नेहात होतं, मैत्रीत होतं. लेखिकांपैकी अशा काही जणींशी माझा उत्तम स्नेह जुळला आहे.