READING TIME – 5 MINS
वीरेंद्र सेहवाग म्हणजेच आपल्या लाडक्या वीरूविषयी बोलायचं तर त्याच्या बेधडक, बिनधास्त वृत्तीची सगळ्यात आधी चर्चा होते. त्याने ठोकलेल्या २ आणि हुकलेल्या एका त्रिशतकाशिवाय ही चर्चा थांबू शकत नाही, हे वेगळं सांगायला नकोच! या बिनधास्तपणामुळेच वीरू काहीवेळा शतकापासून कोसो दूर राहिलाय. वीरूच्या अशाच एका खेळीची ही गोष्ट! त्याचं शतक हुकलं, पण तरीही त्याच्या खेळीचं महत्त्व कुठल्याही शतकापेक्षा कमी नव्हतं.
वीरू ज्या ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनच्या आक्रमकतेचं प्रतिबिंब मानला जातो, त्या सचिननं शतक ठोकलं होतं. मात्र नव्वदीच्या आत बाद होऊनही, वीरू सामनावीराचा पुरस्कार घेऊन गेला. ‘असं का घडलं आणि कुठली होती ती खेळी?’ या विचारात पडलाय ना? थांबा सांगतोय.
२००८ सालचा डिसेंबरचा महिना होता. चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध मालिकेतला पहिला सामना सुरु होता. पीटरसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ब्रिटिशांनी दोन्ही डावांत तीनशेहून अधिक धावा वसूल करून, जवळपास अशक्यप्राय असं ३७५ हून अधिक धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं.
क्रिकेटमधल्या त्याकाळातील मानसिकतेचा विचार केला, तर सामना अनिर्णित राखण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करणार हे कुठल्याही पोराटोराने सुद्धा सांगितलं असतं. मात्र टी-२० क्रिकेटच्या उदयाच्याही आधी आजच्यासारखीच स्फोटक फलंदाजी करणाऱ्या हेडन, जयसूर्या, अजय जडेजा, आफ्रिदी, सचिन वगैरे मंडळींच्या यादीतला वीरू सलामीला येणार होता, ही वस्तुस्थिती सारेच जण साफ विसरून गेले होते. वीरूच्या मनात काहीतरी वेगळंच सुरु होतं. इंग्लंडने समोर ठेवलेलं ३८७ धावांचं आव्हान त्याला एव्हरेस्ट सर करण्यासारखं अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक वाटतच नव्हतं बहुदा…
चौथ्या दिवसाचं शेवटचं सत्र खेळण्यासाठी त्यानं मैदानावर पाऊल ठेवलं आणि त्याचे इरादे स्पष्ट केले. हार्मिसन, अँडरसन, फ्लिंटॉफ, ग्रॅम स्वान, पानेसार अशी दमदार गोलंदाजी असणाऱ्या इंग्लंडच्या संघावर त्यानं भीमासारखा हल्ला चढवला. त्याच्या पुढ्यात पडलेला प्रत्येक बॉल जणू सीमारेषेच्या ओढीनं दुसऱ्या दिशेला धाव घेत होता.
पहिल्या पाच षटकांतच सेहवागच्या तळपणाऱ्या बॅटमधून सात खणखणीत चौकार आणि एक तुफानी षट्कार पाहायला मिळाला होता. या खेळीला टी-२० स्टाईल खेळी नाही म्हणायचं, तर मग आणखी काय म्हणायचं?
या सगळ्यात एक गोष्ट अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही; सेहवाग सलामीला आला होता आणि चौथ्या दिवसाच्या या अखेरच्या सत्रात भारताचा एखादा गडी लवकर बाद होणं भारताच्या पराभवाचं कारण नक्कीच ठरू शकलं असतं. वीरूला मात्र अशा भ्याड विचारांची भीती नव्हती.
द्रविड, सचिन, लक्ष्मण, गंभीर या संघसहकाऱ्यांवर त्याचा विश्वास होता. सामना वाचवण्यासाठी ते सक्षम आहेत, मला सामना जिंकण्यासाठी आक्रमक खेळी करायची आहे, हे जणू त्यानं मनावर कोरून घेतलं होतं. ‘अटॅक इज द बेस्ट डिफेन्स’ या उक्तीला जागून त्यानं त्याची आतषबाजी सुरु ठेवली. त्याचा दिल्लीचा साथीदार गौतमनं दुसऱ्या बाजूला त्याची उत्तम साथ दिली.
वीरूची आग ओकणारी ही खेळी किती विध्वंसक होती, हे काही आकडे बघून अगदी सहज समजून येतं. पीटरसननं पहिल्या १५ ओव्हर्समध्येच त्याच्या ५ मुख्य गोलंदाजांना वीरूला थांबवण्यासाठी बोलावून घेतलं होतं.
आजही असं काही वन-डेमध्ये झालेलं पाहिलं तरीही तो एक विलक्षण दिवस वाटतो. फलंदाजांचं वर्चस्व अगदी सहज अधोरेखित झालेलं दिसतं. वीरूनं २००८ साली ही परिस्थिती आणली होती, तीदेखील कसोटीत! मॉन्टी पानेसारचं स्वागत तर त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये षट्कार हाणून केलं होतं.
वीरूचा फोकस क्लिअर होता. त्याला सामना जिंकायचा होता. कुठलाही गोलंदाज समोर आला तरी तो स्थिरावणार नाही आणि पीटरसनला सतत विचार करत राहणं भाग पडेल याची काळजी वीरू घेत होता. फलंदाजी अशी सुरु होती, जसं काही वीरूचा एकेक फटका इंग्लंडच्या संघाला पराभवाकडे ढकलत होता. वीरूच्या या खेळीसमोर हतबल होण्यापलीकडं इंग्लंडच्या हाती काहीच नव्हतं.
वीरूनं चेंडू सीमापार धाडला, की मैदानावरील प्रेक्षकवर्ग विजयी आरोळीचा प्रत्यय येईल याची पुरेपूर काळजी घेत होता. भारतीय संघ नेहमीच १२ खेळाडू घेऊन खेळतो असं उगाच नाही म्हटलं जात. भारताचा एक खेळाडू नेहमीच सीमारेषेपलीकडून दमदार कामगिरी करत असतो.
एकीकडे वीरू तर दुसरीकडे प्रेक्षक इंग्लंडच्या आत्मविश्वासाला तडा देण्याचं काम करत होते. मात्र अचानक प्रेक्षकांचा आवाज थांबला. २३ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर स्वानने वीरूची विकेट घेतली. तो शतकापासून दूर राहिला. ८३ धावा करून तो परतला, पण त्यावेळी भारतानं ११७ धावांचा टप्पा गाठला होता. सेहवागनं ह्या ८३ धावा अवघ्या ६८ चेंडूंत वसूल केल्या होत्या.
भारतीय संघाला विजय शक्य वाटू लागला होता. साऱ्या संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता. भारताच्या एका ऐतिहासिक विजयाची पायाभरणी झाली होती. वीरूच्या ह्या अफलातून खेळीच्या जोरावर चौथ्या दिवसअखेर भारतानं २९ षटकांत १ बाद १३१ ही धावसंख्या रचली. पुढे सचिननं शेवटच्या दिवशी शतक ठोकलं.
नाबाद ८५ धावा करणाऱ्या युवराजनं सुद्धा भारताच्या विजयात वाघाचा वाटा उचलला. होय, इथं युवी आणि सच्चू यांच्या खेळीला सिंहाचा वाटा मी म्हणणार नाही. कारण, वीरू जंगलाच्या राजासारखाखेळला. शतक झालं नाही, पण त्या ८३ धावा प्रत्येक भारतीयाच्या मनावर शतकाहूनही अधिक ठळकपणे गोंदवल्या गेल्या. ती खेळी कल्पिताच्या पलीकडची होती आणि शतकाच्याही….!
– ईशान पांडुरंग घमंडे