दुबईमध्ये काही वर्षं काढल्यावर आणि भाड्याचंच पण पोटभाडेकरू नसलेलं घर घेण्याइतपत खिसा जड झाल्यावर माझ्या अनेक मित्रांप्रमाणे मीही शारजा येथे राहू लागलो. एक तर शारजा ते दुबई हे अंतर गाडी अथवा मेट्रो-बसच्या आवाक्यातलं, आणि शारजा येथे घराचं भाडं दुबईपेक्षा १०-१५% कमी, त्यामुळे बरेच जण कुटुंबवत्सल झाले की दुबईचे ‘शेजारी’ होतात. मीही शारजा येथे आलो, स्थिरावलो आणि काही महिन्यांतच या अमिरातीच्या सैल आणि संथ वातावरणात रमलो.
दुबईचा शेजारी असूनही या अमिरातीची तऱ्हा वेगळी आहे. शारजाचे राजे शेख कासिमी उच्चशिक्षित. शिक्षण या विषयावर त्यांचं विशेष प्रेम. डॉक्टरेट मिळवलेले आणि ‘अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ शारजा’सारख्या नावाजलेल्या संस्थेचे सर्वेसर्वा असलेले शेख कासिमी म्हणजे विरोधाभासी व्यक्तिमत्त्व. दर वर्षी साहित्यसंमेलन, कलासंमेलन, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मंडळींकडून शाळा-युनिव्हर्सिटीच्या मुलांसाठी विशेष व्याख्यानं असे अनेक उपक्रम हिरीरीने राबवणारे शेख कासिमी बाकीच्या बाबतीत बऱ्यापैकी संथ. इथे सरकारी काम इतक्या मंदगतीने चालतं की थेट भारताच्या नोकरशाहीची आठवण यावी… पण तरीही शारजा ही अमिराती यूएईच्या सात अमिरातींपैकी पहिल्या तिघांमध्ये सहज बसू शकते.
वास्तुविशारद असल्यामुळे इमारतींच्या संदर्भातले आंतरराष्ट्रीय पातळीवर वार्षिक पुरस्कार जाहीर झाले की, आमच्या ऑफिसच्या गोतावळ्यात तो चर्चेचा विषय होऊन जातो. २०१९ सालचा आर्किटेक्चर विभागाचा ‘आगा खान पुरस्कार’ शारजा येथे असलेल्या वासित वेटलँड सेंटर या प्रोजेक्टला मिळालेला आहे ही बातमी आमच्या कानावर आली आणि आम्ही सगळेच गोंधळून गेलो. इतकी महत्त्वाची इमारत शारजा येथे आहे आणि तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजला गेलेला पुरस्कार जाहीर झाला आहे हे आमच्यासाठी धक्कादायक होतं…. राहत्या घरापासून अगदी पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर हे प्रोजेक्ट आहे असं ‘गूगल’ गुरुजींनी शोधून दिल्यावर त्या आठवड्याच्या शनिवारी माझा आणि माझ्या अनेक वास्तुविशारद मित्रांचा मोर्चा त्या दिशेला निघाला.
आम्ही जेव्हा या प्रोजेक्टच्या जवळ पोचायला लागलो, तेव्हा आम्हाला अजूनच चकित व्हायला झालं… या प्रोजेक्टच्या आजूबाजूने आम्ही अनेकदा गेलो होतो. शारजा-अजमान या दोन अमिरातिंच्या सीमेपाशी खाऱ्या पाणथळ जमिनीचा मोठा भूभाग अनेक वर्षांपासून आम्ही बघत आलेलो होतो. काही वर्षांपूर्वी या जमिनीच्या आजूबाजूला उंच झाडं लावून शारजाच्या महापालिकेने ही जमीन दृष्टीआड केलेली होती…. पण तिथे त्यांनी ही सृष्टी निर्माण केल्याचा सुगावा मात्र आम्हाला कधीही लागलेला नव्हता. अर्थात दुबईप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा गवगवा न करण्याची शारजाची ख्याती असल्यामुळे आम्हाला या सगळ्या प्रकारचं विशेष आश्चर्य वाटलं नाही. खुद्द शेख कासिमी यांनी लाल फीत कापून या सेंटरचं लोकार्पण केलेलं होतं, आणि तरीही दुबईप्रमाणे याचा मोठा ‘सोहळा’ मात्र झाला नव्हता.
ही जागा तशी आम्हाला नवीन नव्हती. साधारण २०० एकरइतक्या विस्तीर्ण जागेवर पसरलेला हा पाणथळ भाग फ्लेमिंगो पक्ष्यांचा दरवर्षीचा हक्काचा थांबा होता. इथे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या दलदलीत, गोड्या आणि खाऱ्या पाण्याच्या डबक्यात, चिखलात आणि झाडाझुडपांत या पक्ष्यांना पोटभर अन्न मिळू शकत असल्यामुळे इथे बरेच लोक पक्षीदर्शनासाठी पूर्वीपासून यायचे.. आणि म्हणूनच या जागेला शारजा महापालिकेने अतिशय जपलेलं होतं. इथे साधा बारबेक्यू करायची परवानगी कोणाला मिळत नव्हती. त्यामुळे अशा जागी एक इमारत तयार करण्याची परवानगी शेख कासिमी यांनी कशी दिली, याचं मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. पण मी जेव्हा या इमारतीच्या समोर पोचलो, तेव्हा माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या.
‘एक्स आर्किटेक्ट्स’ नावाच्या एका फर्मने हे प्रोजेक्ट केल्याचं एव्हाना मला माहीत झालं होतं. ही फर्म इथलीच. फर्मचा संस्थापक स्थानिक अमिराती अरबी. त्याला या प्रोजेक्टबद्दल विशेष आस्था असल्याचं मला पहिल्या मिनिटात समजून गेलं, कारण खरोखर या जागेचा आराखडा तयार करताना त्याने देशाचा हा नैसर्गिक ठेवा दृष्ट लागल्यासारखा जपला होता. मुख्य इमारत जमिनीपासून चार-साडेचार मीटर खाली तयार करून इमारतीचं छत त्याने हिरवंगार ठेवलं होतं. मुख्य पाणथळ जमिनीचाच एक भाग वाटावं असं ते छत आम्ही बघितलं तेव्हा तिथे चार-पाच बगळे आमच्या स्वागताला हजर होते.
इमारतीची रचना साधारण इंग्रजीच्या ‘x’ आकाराची आहे. इमारतीत शिरल्या शिरल्या दोन्ही बाजूंना असलेली काच आणि त्यापलीकडे असलेले अनेक वेगवेगळे पक्षी येणाऱ्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेतात. ही काचसुद्धा अशी आहे की, तिच्यातून इमारतीच्या आतून बाहेरचं दिसत असलं तरी बाहेरून आतलं दिसू शकणार नाही. काही पक्ष्यांना आपल्याकडे कोणी बघत आहे याचा सुगावा लागला तर ते लपून किंवा सावध होऊन सावरून बसतात. तसं होऊ नये म्हणून ही काचेची शक्कल लढवली होती. त्यामुळे पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक हालचाली करताना बघायची एक वेगळीच मजा अनुभवायला येत होती. बाहेरच्या मोकळ्या जागेत हरण, बदक, रानकोंबड्या, अधूनमधून येणारे बहिरी ससाणे, मधूनच दर्शन देणारं एखादं घुबड बघता येत असे. तिथून फेरफटका मारण्यासाठी छोटीशी गोल्फ कार्टसुद्धा या सेंटरमध्ये तैनात होती.
पक्षी ठेवलेल्या जागा आजूबाजूने कुंपण घालून आणि वरून कपडा लावून उन्हापासून सुरक्षित केलेल्या होत्या. आयबिस, हेरोन, पेलिकन, स्वांफेन असे मातब्बर पक्षी आपापल्या जागा राखून होते. त्यांच्यासाठी कुंपण घालून वेगळे भाग तयार केलेले होते…. पण बदक, हंस, फ्लेमिंगो अशा कुटुंबवत्सल पक्ष्यांना मात्र मोठे मोकळे भाग आखून दिलेले होते. त्या भागात त्यांचा मुक्त वावर बघायला मिळत होता.
या इमारतीचा मुख्य ‘गाईड’ विसाम आमचा टोळक्यात सामील झाला आणि आम्हाला गमतीशीर किस्से समजायला लागले. हा विसाम पक्षीमित्र. आपल्या भल्या मोठ्या कॅमेऱ्याने पक्ष्यांचे फोटो काढणं हा त्याचा मुख्य व्यवसाय, आणि कॉलेजमध्ये शिकवणं हा जोडव्यवसाय.
“शेख कासिमींनी स्पष्ट केलं होतं, की इथे आपण ‘उपरे’ असणार आहोत. पक्षी त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने वावरले पाहिजेत, आपण फक्त त्यांना बघायला यायचं. त्यामुळे आम्ही अख्खी इमारत जमिनीखाली बांधली. काचेपलीकडे आहे ते पक्ष्यांचं विश्व. अलीकडे आहे आपलं. दोघांचं एकमेकांशी तसंही जुळणार नाही कधीच. त्यामुळे दोघांमध्ये लावलीय ही काच.
पाणथळ जागांमध्ये आम्ही विशेष ढवळाढवळ केली नाही. त्या जागेची मालकी निसर्गाची. फक्त एक केलं, अख्ख्या जागेच्या भोवताली उंच झाडं लावून जागा सुरक्षित केली. गाड्यांचा आवाज, रात्री गाड्यांमुळे होणार गोंगाट पक्ष्यांना त्रास देतो. ते दिव्यांच्या प्रखर झोतामुळे बावचळतात. झाडं लावून आम्ही या सगळ्या गोष्टी कुंपणाबाहेर ठेवल्या.”
“पण इथे इमारत बांधायची गरज काय होती? त्याशिवाय काही होऊ शकलं नसतं का?” आमच्यातल्या एकाने एका बदकाच्या पिल्लांकडे बघत शंका काढली.
“ही इमारत का बांधली माहीत आहे? आम्हाला इथल्या पक्ष्यांसाठी एक अशी जागा तयार करायची होती, जिथे आम्ही त्यांची देखभाल सुद्धा करू शकू,” विसाम उत्तरला. “बरेचदा पक्षी जखमी होतात, पंखांना इजा झाली तर त्यांना उडता येत नाही. इथे त्यांना आम्ही आणतो आणि त्यांची देखभाल करतो. शिवाय इथे न आढळणारे अनेक पक्षी आम्ही मुद्दाम विकत आणून ठेवले आहेत. त्यांना बघायला लोक येतात, आमची कमाई होते आणि त्यातून खर्च निघतो.”
या जागेच प्रवेशशुल्क फक्त दहा दिरहाम इतकं कमी कसं, याचा उलगडा मला झाला. मुळात हे प्रोजेक्ट पैसा कमवायला नाही तर शैक्षणिक कामासाठी तयार केलं गेलं आहे हे माझ्या लक्षात आलं. शेख कासिमी यांच्या शिक्षणावरच्या निस्सीम प्रेमामध्ये शारजा येथे अनेक वस्तुसंग्रहालये, शिक्षण संस्था अगदी वाजवी शुल्क आकारून काम करतात हे मला माहीत होतं. त्यांच्या मांदियाळीत एक नवं प्रोजेक्ट जोडलं गेलं. दलदल असो वा वाळवंट, मनात आणलं तर कुठेही काहीही तयार करता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही जागा!
प्रिन्स आगा खान फाउंडेशनने या कामाला दिलेली पोचपावती म्हणजे २०१९ सालचा मानाचा ‘आगा खान एक्ससेलेंस इन आर्किटेक्चर’ पुरस्कार. ही जागा मला इतकी आवडली, की आता तर दर एक-दोन महिन्यांनी माझी वाट या दिशेला आपोआप वळते. या जागी मागच्या २ वर्षांत मी माझ्या मुलीला, पाहुण्यांना, मित्रांना घेऊन आणि काही वेळा एकटाही गेलो आहे. इथले पक्षी मला आता चांगले परिचयाचे झाले आहेत. त्यांची नावं आता मला पाठ झाली आहेत. त्यांनी मला बघितलं नसलं तरी मी त्यांना अनेकदा बघून आलो आहे. अजूनही एखाद्या सुट्टीच्या दिवशी मी कोणाला तरी बरोबर घेऊन या जागेचा फेरफटका मारून येतो आणि परत येताना माझ्यासारखाच कोणी पाहुणा पक्षी इथे येऊन इथलाच झालाय का याचा विचार मनात सुरू होतो.
‘Paint the flying spirit of the bird rather than its feathers’ असं कुठेतरी वाचल्याचं मला आठवतं…. पण त्या सुभाषिताची प्रचिती मात्र मला या ठिकाणी दर वेळी नव्याने येते.
- आशिष काळकर
“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”
“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”
डोळे विस्फारून त्या तटबंदीची लांबी बघून मी बशरकडे बघितलं. ‘आता समजलं; अबू धाबी काय आहे ते?’
‘अल जझीरा अल हमरा – घोस्ट टाऊन, रास अल खैमा’ असं लिहिलेलं होतं आणि ते वाचून माझी उत्सुकता चाळवली गेली…’