फॉन्ट साइज वाढवा

जग सुंदर आहेच, पण भारतात म्हणजे या सौंदर्याचा सारांश!

‘काहीपे पहूचने के लिए, काहीसे निकलना जरुरी होता है..’ हे मी नाही, ‘ये जवानी है दिवानी’मधला बनी म्हणतो. आणि त्यात तथ्यही आहे. भारत अद्भुत आहे, अतर्क्य आहे फक्त तो अनुभवण्याची तयारी घरचा उंबरठा ओलांडून आपण दाखवली पाहिजे. आपल्या देशातली काही ठिकाणं चघळून-चघळून पर्यटकांनी इतकी सपक करून टाकलीत, की विचारायची सोय नाही! लग्न झालं की हिमाचल, मित्र जमले की गोवा, कुटुंब असेल तर केरळ आणि देवस्थानं तर दर काही किमीवर आहेतच. या चौकटीच्या पलीकडचा भारत अजून खरा आणि नितळ आहे, जो तितक्याच संवेदनेनं आपण टिपायला हवा, जपायला हवा.

गोकर्ण हे देवस्थान आपल्याला ऐकून माहिती असेलच; समुद्र किनाऱ्यांसाठीही ते प्रसिद्ध आहे. इथल्या दोन भन्नाट ठिकाणांबद्दल मला तुम्हाला आज सांगायचंय. मुख्य ‘गोकर्ण बीच’ म्हणजे जवळ-जवळ चौपाटी, सहसा फिरत तिथल्या मंदिरात दर्शनाला आलेली कुटुंब ‘आहेच समुद्र तर बघून येऊ, त्यात काय…’ म्हणत इथे गर्दी करतात. बाकी कुडले बीच, ओम बीच म्हणजे ‘भाई मजा आ गया..’ या दर्जाचे! पण पुढची अनवट ठिकाणं, चौकटी पलीकडचा अनुभव देतात यात शंका नाही.

याही वेळी सोलोच गेलो होतो. ‘झोस्टेल’ या हॉस्टेलमध्ये बुकिंग होतं, त्यामुळे तिथे असाच एकटा आलेला बंगलोरचा मुलगा आनंद आणि केरळच्या चार मुलींचा ग्रुप माझा मित्र झाला. आमच्या बाईक्स असल्यामुळे कुडले आणि ओम बीच आम्ही निवांत भाटकलो. कुडलेसारखा विस्तीर्ण देखणा किनारा आणि ओम बीचवरच्या खडकांवर बसून जगलेला सूर्यास्त कधीच विसरता येणार नाही. 

माझ्या संशोधनातले गोकर्णमधील समुद्र किनारे बघून झाले होते. साडे आठ-नऊपर्यंत आम्ही झोस्टेलवर परतलो. हॉस्टेलमध्ये होत राहते ती दंगामस्ती एकीकडे सुरू होती आणि अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं, ही नवीनच माहिती मला मिळाली. रात्र झाली होती, हॉस्टेलमध्ये टाईमपास किंवा बंक बेडवर उताणं पडून झोपून जाणं, यापलीकडे मी आता काही खास करणार नव्हतो, त्यामुळे हसत होकार दिला. या वेळी आमच्यासोबत जर्मनीचा एक आणि दिल्लीचा एक मुलगा जॉईन झाले. आणि रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही आमच्या बाईक्स काढून पॅरडाईज बीचच्या दिशेनं निघालो. माझ्या मागे बसलेली सखी रसिक होती, तिनं थेट मल्याळम चित्रपटातील गाणं (सुदैवाने) तिच्या गोड गळ्यातून गुणगुणायला सुरुवात केली, त्या नादात मी एकदा रस्ता चुकलो, पण पुन्हा योग्य वाटेवर येऊन आम्ही पॅरडाईज बीच परिसरात पोहचलो.

इथे किनाऱ्यावर जायला तुम्हाला एक छोटी टेकडी पार करावी लागते. दिल्लीचा मुलगा यापूर्वीही इथे आल्यामुळे त्याच्या मागोमाग सगळे निघाले आणि सायबाच्या अतिआत्मविश्वासातून किर्र रात्री आम्ही त्याच टेकडीला दोनदा वळसे घातले. या अथक परिश्रमानंतर शेवटी ती समुद्राची गाज ऐकू आली. त्या आनंदात सगळ्यांनी उगीच एकमेकांचं अभिनंदन केलं. गाज ज्या दिशेनं येत होती त्या दिशेनं आम्ही चालू लागलो आणि कुट्ट काळोखात चंद्राच्या शीतल प्रकाशातर चमकणारा, ‘पॅरडाईज’ हे नाव सार्थ ठरवणारा समुद्र किनारा हा असा आम्हाला समोर दिसला. 

त्या संपूर्ण किनाऱ्यावर फक्त आम्ही आठ जण होतो. हा या भागातील अस्पर्शित किनारा आहे. आजूबाजूच्या माडांच्या झावळीची सळसळ, आलाच तर जागरण करणाऱ्या एखाद्या पक्ष्याचा आवाज; बाकी समुद्राची गाज म्हणजेच इथली निरव शांतता! पायातल्या चपला काढून ठेवताना, (बहुदा नुकतीच ओहोटी लागल्यामुळे) अजूनही ओल धरल्या वाळूत माझी दोन्ही पावलं खोल रुतली.

आम्ही या वाळूतून कसरत करत चालू लागलो. इतक्यात आधीच समुद्राच्या जीवणीपर्यंत पोचल्या सखीनं आम्हाला अनोळखी हाक देऊन घाईनं बोलावून घेतलं. गुडघाभर समुद्रात आम्ही पोचताच तिनं ते पाणी आपल्या हातानं घुसळलं आणि समोर निर्माण झालं अतर्क्य दृश्य पाहून मी अक्षरशः अचंबित झालो. त्या विस्कटल्या समुद्राच्या पाण्यातून चक्क हिरव्या चांदण्या जन्माला येऊन क्षणात नाहीशा झाल्या. डोळ्यांवर विश्वास होता, तरीही मी तसं स्वतःच्या हातांनी करून पाहिलं, पुन्हा पुन्हा करून पाहिलं, कारण हा प्रकारच मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होतो. ‘याला Sea Planktons म्हणतात’ अशी सामान्य ज्ञान वाढवणारी माहिती मला मिळाली, पण मी अजूनही त्या निर्सगाच्या करिष्म्यातून बाहेर यायला तयार नव्हतो.

तेव्हा वेळेची आम्हाला तमा नव्हती. सगळे नंतर किनाऱ्यावर पांगले. डावीकडून ठराविक वेळानं डोकावणारा दीपस्तंभ, उजवीकडे दूरवर दिसणारा गावातून उगवला हलका उजेड, वर चंद्र आणि समोर अथांग फेसाळ समुद्र असा चारही दिशांचा सोहळा रात्री दोन-अडीचपर्यंत आम्ही किनाऱ्यावर बसून जगत होतो. शेवटी एकाक्षणी घड्याळाचे काटे टोचू लागले आणि आम्हाला उठावंच लागलं. जाताना एकदा पुन्हा पाण्यात हात घुसळून आलो, समुद्रातल्या त्या चांदण्या डोळ्यांत साठवल्या आणि आम्ही परतीच्या वाटेवर लागलो. 

दुसऱ्या दिवशी केरळच्या मुलींचा ग्रुप त्यांची आठवडाभराची ट्रिप संपवून घरी परतला. माझा प्रवास आत्ता कुठे सुरू झालेला. तेव्हा प्रवासाचं नियोजन करताना गवसली आणखीन एक भन्नाट जागा. ती बघण्याकरता आनंद आणि मी बाईकवर स्वार झालो आणि कर्नाटकच्या प्रेमात पाडणाऱ्या रस्त्यावरून सुसाट सुटलो. आम्ही जात होतो गोकर्णवरून पन्नास किमी अंतरावर असणाऱ्या ‘याना केव्ह्ज’ बघायला! 

आम्ही दीड तासात याना गावाच्या परिसरात पोचलो. बाईक पार्क केली आणि तिथून जंगलाच्या कुशीत वसल्या या गुहा पाहायला चालत निघालो. कालांतरानं एक सरकारी रस्ता लागला, पण तो संपताना अचानक समोरचा नजारा पाहून मी पुन्हा एकदा स्तिमित झालो. दोन दिवसांत ही माझी दुसऱ्यांदा आ वासण्याची वेळ होती. आपण छायाचित्र पाहिलंत तर मी हे का म्हणतोय? याचा पुसटसा अंदाज येईल. गुहा म्हटल्यावर माझ्या मनात ‘डोंगराच्या मध्यात वटवाघळांची वस्ती पाहून येण्याची ‘दुर्वासी’ जागा’ इतकंच चित्र होतं, पण इथे त्या डोंगर खडकाच्या आवरणातच या जागेची जान होती. अशी कल्पना करा, की जमिनीतून एखाद्या तीक्ष्ण महाकाय खडकानं वरच्या दिशेनं झेप घ्यावी आणि नेमका तो विलग होताना त्यास धरित्रीनं घट्ट धरावं, असा तो समोरचा विस्मयकारक आकार बघताना मी दोन मिनिटं खरं विचारच करू शकलो नाही. विज्ञान म्हणतं चुनखडकाची ही निर्मिती आहे. असे दोन १२० मीटर आणि ९० मीटर उंचीचे ‘भैरवेश्वर शिखर’ आणि ‘मोहिनी शिखर’ नावाचे समोरासमोर खडक आहेत, त्यांच्या आत गुहा असून इथे स्वयंभू शिवलिंगसुद्धा असल्यामुळे धार्मिक महात्म्यही या जागेला प्राप्त झालं आहे, पण आपण गुंतून राहतो ते या निसर्गाच्या धर्मकृत्यात!

माघारी फिरताना पुनःपुन्हा मागे वळून बघत राहावं अशी ती दैवी कलाकृती नजरेत साठवून, गोकर्णच्या दिशेनं निघताना आता मी बाईकची चावी घेतली. विभूती नामक धबधबा इथे जवळ आहे, तिथे धावती भेट दिली आणि मग संध्याकाळी पाच वाजताच्या ऊन-कलत्या वेळेत, स्वच्छ-रिकाम्या रस्त्यावरून बाईक जणू तरंगत चालू लागली. 

अनेकदा असं काही अकल्पित अनुभवलं की आपोआप शब्द आतल्याआत विसावतात, तसा मागे आनंदही शांत होता. माझं सजग मन पुढे येणाऱ्या वळणांवर लक्ष ठेवून असलं, तरी अबोध मन मात्र अजूनही कालच्या समुद्रातील चांदण्यांत आणि आत्ताच्या आकाशाकडे झेपावल्या, पण धरतीनं घट्ट पकडल्या खडकांच्या तीक्ष्ण शिखरांभोवती घिरट्या घालत होतं..!

 • आदित्य दवणे

Comments(4)

  • SAURABH BURUNGALE

  • 2 years ago

  प्रवास वर्णन आणि आदित्य दवणे म्हणजे वाचकांसाठी आनंदाची पर्वणीच! आदित्यजी तुमचे शब्दच बसल्या जागी मुशाफिरी करुन आणतात. हीच अनुभूती पुन्हा एकदा हा लेख वाचून आली. ‘सर्वात लांबचा रस्ता आपल्या घरातून दारापर्यंतचा असतो’ हे वाक्य फार भावलं. ‘भारत हा अतर्क्य आणि अद्भुत आहे’ तुमच्या ह्या वाक्याचा आता खरंच अनुभव घ्यायचा आहे. फारच सुंदर लेख. मन प्रसन्न झालं!

   • Ankush S. Patil

   • 2 years ago

   अतिशय सुंदर लेख..

  • Saurabh Burungale

  • 2 years ago

  प्रवास वर्णन आणि आदित्य दवणे म्हणजे एक हळूवार रंगत जाणारी मैफल! जी कधीच संपू नये असं वाटतं. शब्दांतून फुलवलेली ही मैफल आनंदाची एक छान अनुभूती देते. ‘सर्वात दूरचा प्रवास हा आपल्या घरापासून ते आपल्या दारापर्यंतचा असतो’ हे वाक्य फार भावलं. हिमाचल, शिमला, केरळ, गोवा, कोकण अशा ठरावीक स्थळांपुरतंच अनेक जणांची मुशाफिरी मर्यादित आहे. पण आदित्यजी तुम्ही सांगितलेले आणि दाखवलेले ‘अद्भुत’ निसर्ग दृश्य स्वत: सोलो जाऊन पाहण्याची तीव्र इच्छा झाली आहे. खास करुन paradise beach वरील sea planktons! पुढील लेखासाठी फार फार उत्सुक!

  • Shlesha Rekha Dattatray Boke

  • 2 years ago

  खूप सुंदर अनुभव होता सर .
  स्वतःच्या डोळ्यांनी Sea planktons पाहता आले, अनुभवता आले ही एक वेगळीच आठवण हा प्रवास देऊन गेला.
  पुढील प्रवासवर्णनं वाचण्यास , अनुभवण्यास उत्सुक आहोत !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *