फॉन्ट साइज वाढवा

उसळलेल्या समुद्राला साक्षात आवाहन करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कवितेतील कोलंबसाची जिद्द मला विलक्षण वाटते. ती अनुभवताना प्रवासानं भरलेली आणि भारलेली अशा मुशाफिरांची जीवनी कुठेतरी आपल्यात अंश होऊन उतरावी अशी इच्छाही मनोमन वाटत राहते. अमेरिका हा खंड म्हणून तिथेच होता, पण कोलंबसानं तो हुडकून काढल्यामुळे नव्या इतिहासाची नांदी झाली.

माझ्या अल्पशा मुशाफिरीतील एक प्रवासातला किस्सा मला मुद्दामून इथे सविस्तरपणे सांगावासा वाटतो. कोलंबसाची दूरपर्यंत तुलना नाही, पण ज्यात माझ्याही जिद्दीचा, इच्छाशक्तीचा कस लागला असा हा अनोखा प्रवास करताना, मला हीच कुसुमाग्रजांची कविता सतत आठवत होती. अटीतटीच्या मेहनतीनंतर, टोकाच्या नकारांना पचवून, अक्षरशः खुणून शोधून काढलेलं ठिकाण म्हणजे ‘अनेगुंडी’मधल्या अश्मयुगीन चित्र गुहा. त्या खडकांवरील अनघड चित्रांवरून हात फिरवताना मला अबोल-सर्जनशील पूर्वजांना स्पर्श केल्याचा भास झाला, पण त्यापूर्वीचा प्रवास म्हणजे एक दिव्य होतं!

हंपीहून पलीकडल्या हिप्पी आयलंडवर मी पुढचे काही दिवस राहायला आलो. इथे एक माणूस लांबीचा टेंट बुक केला, सायकल तीन दिवसांकरिता भाड्यावर घेतली आणि नियोजन करू लागलो. स्थानिक माणसाशी गप्पा मारताना अनेगुंडीतील केव्ह पेंटिंग्जचा निसटता उल्लेख झाला आणि माझे कान टवकारले गेले. त्याला पुन्हा मागे नेत या जागेविषयी विचारलं, पण दुर्दैवाने तो पक्का स्थानिक निघाला, त्याला आजूबाजूच्या ठिकाणांची नावाव्यतिरिक्त फारशी माहिती नव्हती. मग फ्री वायफायचा पुरेपूर वापर करत अनेगुंडी गावाची माहिती काढली आणि उद्या काही करून इथे जायचं हे ठरवलं. 

दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू झाला. चांगली पाच-सहा किलोमीटर सायकल हाकली. मध्येमध्ये थांबून लोकांना गावाची दिशा विचारू लागलो. अनेकांनी ‘अजिबात जाऊ नका, काही नाहीये तिथे!’ म्हणत आयुष्यात मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण आपलीही यार कमिटमेंट होती. मग त्या हायवे सदृश रस्त्यावरून डावीकडे एका गावात वळलो, तिथे अनेक वळणं मध्ये आली, ती पार केली आणि एका शेतकऱ्याला त्या ठिकाणाबद्दल विचारलं, तर त्यानं त्याच्याच शेताकडे आत हात करत, ‘हे इथे मागे आहे..’ म्हणाला. बरं आपल्याला हा सुसंवाद वाटत असेल तर तसं नाही; मी कर्नाटकातल्या तद्दन खेडेगावात होतो, भाषेची अबाळ होती, त्यामुळे शब्दांसोबत भावना समजून घ्यायचेच कार्यक्रम अधिक वेळा झाले. तेव्हा सायकल चालवून थकवा आल्यानं जरा विश्रांती घेत बसलेलो असताना स्कुटीवर एक परदेशी जोडप तिथे आलं. ‘हाय-हलो’ झालं. मुलगा जर्मनीचा आणि मुलगी अर्जेंटिनाची, दोन्ही माझ्या फुटबॉलमधल्या आवडत्या टीम्स!  मग आम्ही तिघे त्या शेतातल्या पायवाटेनं आत गेलो, तर भलामोठा लोखंडी दरवाजा, त्यावर तारा, असा मजबूत नकार आम्हाला समोर मिळाला. आता काय करावं? इतकी तंगडतोड करत यायचं आणि आता परत मागे फिरायचं? ना मंजूर..! म्हणत आत जाता येण्याच्या शक्यतांचा शोध घेऊ लागलो.

इतक्यात मागून एक गुराखी त्याच्या गायींना घेऊन तिथपर्यंत आला, गायींना बघून माझा ‘cow fear phobia’ जागा झाला (संदर्भ: पुलगा सफर), मी शिस्तीत बाजूला झालो. त्याच्याजवळ या लोखंडी नकाराची किल्ली होती आणि आम्हाला वाटलं ‘भाई व्वा, नसीब खुल गया’! त्यानं किल्लीनं तो काटेरी लोखंडाचा दरवाजा उघडला, आपल्या गायींना त्यानं आत येऊ दिलं आणि नंतर आम्ही आत शिरणार तोच त्यानं ‘चालते व्हा..’ असा इशारा आम्हाला करून शेवटी दरवाजा लावून, आतून कुलूप लावून घेतलं. 

आम्ही तिघे एकमेकांच्या तोंडाकडे नुसतं बघत राहिलो. पुढच्या तीस-एक पावलांवरती एक जागतिक आश्चर्य असताना, इतका आटापिटा करूनही आपल्याला ते बघता येऊ नये, याचं जरा मनात चरचरलं! बराचवेळ आम्ही विचार केला, शेवटी ती अर्जेंटिनियन मुलगी विरक्त होत, ‘तुम्हाला काय करायचंय ते करा’ म्हणत दूर खडकावर बसून मेडिटेशन करू लागली. जर्मनीचा मुलगा मात्र आपल्या हिमतीचा निघाला आणि आम्ही तो लोखंडी नकार चक्क चढून ओलांडण्याचा निर्णय घेतला. दोन माणूस उंचीचा दरवाजा, त्यावर तारा, तरीही सारं पार करून, धैर्य एकवटून आतला पुरातन सोहळा अनुभवायची आम्हाला असोशी होती. हा जर्मन मुलगा बळकट आणि अथलिट शरीराचा होता. शेजारच्या झाडावर टुणकन चढून भावानं मलाही हात देऊन वर खेचलं आणि फॅन्टसी चित्रपटांत जसं दुसऱ्या दुनियेत प्रवेश करताना एका अग्निचक्रातून छलांग मारतात, तसं आम्ही थेट तारांवरून कुंपणाच्या पलीकडे उडी मारली आणि धडपडत एक महत्त्वाचा टप्पा पार केला. हे आमच्याकरिता नाहीतरी अग्निदिव्यच होतं! 

या भागात रान माजलं होतं. कर्नाटक राज्य आणि भारतीय सरकारची पर्यटनाबद्दलची टोकाची अनास्था इथल्या शून्य नियोजनामुळे आधीच उमजली होती, ती आत घुसखोरी केल्यानंतर अधिक स्पष्ट झाली. आता पुढचं आव्हान समोर उभं होतं- ते म्हणजे समोरच्या अनेक टेकड्यांपैकी, त्यांच्यातील शेकडो गुहांपैकी, ती अश्मयुगीन चित्र असलेला खडक नक्की कुठला! दोघांनी मग दोन भाग वाटून घेतले आणि अपेक्षित गुहेचा शोध सुरू झाला. अर्धा तास उलटूनही ती सापडली नाही. आणि तो मगाचचाच गुराखी वर एका उंच खडकावर आमच्याकडे पाहत देवासारखा बसलेला मी पहिला.

आता मी धीट झालो. ज्यानं मगाशी आतही येऊ दिलं नाही, ज्याला न जुमानता आम्ही आत घुसलो, त्यालाच जाऊन विचारायचं शेवटी ठरवलं. प्रवासात मान-अपमान फारसे मनावर घेऊ नयेत असं मला वाटतं. एखाद्या प्रसंगपुरता माणसं संपर्कात येतात, पण त्यांना पार केल्यावर नंतर कदाचित ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ दिसू शकते, हे अनुभवातून शिकल्यामुळे, उड्या मारत वर त्यांच्यापर्यंत पोहचून मी आधी विनंती केली. त्यानं ‘नालायकांनो आलातच..’ असा एक दृष्टिक्षेप माझ्यावर टाकला आणि अलगद त्याच्याच मागच्या गुहांकडे बोट दाखवलं. माझी नजर त्याच्या बोटाचा आधार घेत समोर गेली, तेव्हा मी ‘युरेक्का’ असं मनातल्या मनात जोरात ओरडलो. जर्मन मित्राला ताबडतोब वर बोलावलं. आणि आम्ही दोघेही अश्मयुगात जाऊन पोहचलो.

नेटवर ‘या गुहा किती जुन्या?’ असं विचारल्यावर, ४००० वर्षांपासून १५००० वर्षांपर्यंत अशी वेगवेगळी माहिती मिळते, त्यावर डोकेफोड करत बसलं, तर समोरचं सौंदर्य निसटून जाईल असा प्रकार. त्यामुळे मी त्या भानगडीतच न पडता, या गुहांच्या खडकांवर लाल-पांढऱ्या रंगात चितारलेली माणसांची, शेतीची, नागांची चित्र डोळे विस्फारून बघत राहिलो. कमीतकमी चार हजार वर्षे धरून चाललो, तरी ऊन-पावसात हा लाल-पांढरा रंग मानवतेची आदिम खूण टिकवून होता. गुहेच्या आत-बाहेर, प्रत्यक्ष-लपलेली अशी अनेक चित्र इथल्या खडकांवर आहेत. माणसाची व्यक्त होण्यासाठी असलेली ही प्राचीन धडपड मला कसल्याशा विचारात लोटून गेली. विस्मित, आश्चर्यचकित हे शब्द खूप प्राथमिक वाटावेत अशी माझी स्थिती झाली. सारं डोळ्यांत साठवून झाल्यानंतर मी ही चित्र कॅमेरात कैद केली. पूर्वजांच्या चित्रसहवासात आजचा दिवस व्यतीत करावा अशी इच्छा होती, पण एका तासानंतर त्या गुराख्यानं सूचक मागे बघितलं आणि आम्ही दोघे माघारी वळलो. 

कातळाचा कॅनव्हास आणि बहुदा बोटांचा कुंचला करून चितारलेली ती चित्र मला मानवी जीवनातील अभिव्यक्तीचा महत्त्वाचा स्त्रोत वाटतात. असं निवांत कधी बसलो, तर आजही ती अश्ममयुगीन चित्र डोळ्यांसमोर उभी राहतात आणि अर्थातच तो अद्वितीय प्रवासही!

– आदित्य दवणे

या सदरातील लेख…

‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)

अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…

लेख वाचा…


माणुसकीचे त्यांचे चेहरे!

– कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं.

लेख वाचा…


जान है तो जहान है! (कलगा-पुलगा-तुलगा)

– मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं! 

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *