WaahKya_Swades

वाह! क्या ‘सीन’ है – ‘स्वदेस’

READING TIME – 8 MINS

गळ्या सुविधांनी परिपूर्ण असं संपन्न जीवन जगत असतांना, प्रत्यक्षात जे करतोय त्यापेक्षा खूप काही वेगळं केलं पाहिजे या विचाराने काहीजण अस्वस्थ होतात.

१९९८ साली रवी कुचीमंची आणि अरविंदा पिल्लालामारी या भारतीय तरुण-तरुणीने अमेरिकेतील आपलं सुखासीन आयुष्य सोडून भारतात परतण्याचं ठरवलं. तेव्हा भारतात जाऊन नक्की काय करावं हे त्यांनी ठरवलेलं नव्हतं. भारतातल्या ग्रामीण भागासाठी आपल्याला काहीतरी करायचंय ही उर्मी दोघांच्या मनांत होती. ‘जिथं कोणतीही संधी नाही, त्या ठिकाणी जाऊन काम करू’ या जाणिवेनं भारावलेली ही दोन माणसं एकत्र आणायची असं नियतीच्या मनात होतं.

बिलगाव हे महाराष्ट्राच्या नर्मदा खोऱ्यातील एक दुर्गम खेडगांव. पहिल्यांदा जेव्हा रवी आणि अरविंदा या गावांत आले, तेव्हा ते गाव वीजेअभावी अंधारात बुडालेलं होतं.

रवी आणि अरविंदा यांनी बिलगांवातील वीजसमस्येवर काम करण्याचं ठरवलं. शहरी जीवन सोडून एका कधीही न पाहिलेल्या खेड्यात वेगळ्या स्तरावर जाऊन काम करणं हे तसं धाडसाचं काम, पण कधीकधी सामान्य व्यक्तीही हे धाडस करतात आणि अनपेक्षित बदल घडवून आणतात.

देखणे ते हात ज्यांना

निर्मितीचे डोहाळे ।

मंगलाने गंधलेले

सुंदराचे सोहळॆ॥

-बा. भ. बोरकर            

बऱ्याचदा अवतीभवती असलेली प्रतिकूलताच निर्मितीचा पाया होते. सर्वबाजूंनी प्रतिकूलता असलेल्या त्या गावांत रवी आणि अरविंदा यांच्या चाणाक्ष नजरेला पडला तो गावांतील ९ मीटर उंचीचा पाण्याचा धबधबा!

रवी आणि अरविंदा यांनी हा पाण्याचा स्रोत वापरून वीजनिर्मिती करायचं ठरवलं. वेगवेगळ्या विचारांची गावांतील माणसं झपाटल्यासारखी कामाला लागली. संवेदना जागृत होत गेल्या. प्रयत्नांना यश येऊन जानेवारी २००३ साली १५KW क्षमतेचा वीजप्रकल्प बिलगावमध्ये कार्यान्वित झाला. हा सगळा प्रवास लेखिका रजनी बक्षी यांनी आपल्या “बापू कुटी” पुस्तकांत शब्दबद्ध केला आहे.

आशुतोष गोवारीकरने “बापू कुटी” वाचून यावर सिनेमा काढायचं ठरवलं (‘स्वदेस’ मध्ये, पहिल्या भेटीत मोहन गीताची पुस्तके पिशवीत भरत असतांना तिथे ठेवलेले “बापू कुटी” प्रेक्षकांच्या नजरेस पडते). आशुतोष रवी आणि अरविंदाला भेटला. त्यांना वीजनिर्मीतीबाबत बारीक सारीक प्रश्न विचारून त्यातून ‘स्वदेस’ची  स्क्रिप्ट आकार घेऊ लागली. 

आशुतोषच्या म्हणण्यानुसार, त्याचा प्रत्येक सिनेमा document स्वरूपात कसा मांडता येईल यावर त्याचा भर असतो. अशावेळी सिनेमा ज्या विषयावर तयार होतोय त्यावरचा अभ्यास, रिसर्च आशुतोष कोणावर न सोपवता, स्वतःच हे काम करतो. 

‘स्वदेस’ साठी स्वतः असा अभ्यास केल्याने तो रिसर्च केवळ माहिती (information) स्वरूपात न राहता गावातले जीवन, तेथील जातव्यवस्था, शिक्षणाकडे झालेलं दुर्लक्ष असे अनेक मुद्दे मूळ कथेला जोडले जाऊ लागले.

सिनेमातले कलाकार निवडतांना मुख्य नायकांची भूमिका आमिर आणि ह्रितिकच्या नकारानंतर शाहरुखला मिळाली. सिनेमातील इतर दोन मुख्य पात्रांत गीता (गायत्री जोशी) आणि कावेरीअम्मा (किशोरी बल्लाळ) यांची वर्णी लागली. 

खरं म्हणजे ‘स्वदेस’ची  पटकथा ही “वापसी” या १९९४-९५ सालातल्या हिंदी मालिकेवर आधारित आहे. मालिकेतले बरेचसे प्रसंग जसं मोहन-गीताची पहिली भेट, शाळेत जाणं असे कित्येक प्रसंग जसेच्यातसे मालिकेतले आहेत. किशोरी बल्लाळ यांनीच मालिकेत कावेरीअम्माची भूमिका केलीये, तर मोहन भार्गवची भूमिका केली होती खुद्द आशुतोषनेच!  

स्वदेस मोहन भार्गवचे स्थित्यंतर हळूहळू उलगडून दाखवत पुढे सरकत जातो. पूर्वार्धात कावेरीअम्माला आपल्यासोबत न्यायला आलेल्या मोहन हा गावांत आपल्या आलिशान caravan मध्ये झोपणारा, केवळ बाटलीतलं packaged पाणी पिणारा ‘सायलेंट ऑबझर्व्हर’ आहे, पण नंतर कावेरीअम्मा आणि गीताच्या भेटीतून गावातल्या भीषण समस्या त्याला कळू लागतात.

सारखी गायब होणारी वीज गावातली मुख्य समस्या आहे, पण गावातले लोकं त्याला समस्याच समजत नसल्याचं पाहून तो चिडतो, वैतागतो. देशाच्या खोट्या, आभासी महानतेच्या कल्पनेत रमलेल्या गावकऱ्यांना सुनावतो. NASA (कावेरीअम्माच्या भाषेत नशा) मध्ये इंजिनियर असलेला मोहन शेवटी स्वतःच गावासाठी वीजनिर्मिती करायचं ठरवतो.    

swades-1

वीजनिर्मितीचा हा प्रसंग बऱ्याच अर्थाने खूप वैशिष्ट्यपूर्णआहे. सिनेमा बघायला सगळ्या स्तरातली प्रेक्षक येतील, ज्यांचा कधी विज्ञानाशी संबंध आला नाहीये ती सुद्धा असतील, तेव्हा या दृश्यात वीजनिर्मितीची प्रक्रिया कशी सांगायला हवी याचा आशुतोषने केलेला परिणामकारक विचार लख्खपणे दिसून येतो. 

गावातल्या एका उंच जागेत पाण्याची एक मोठी टाकी बांधली आहे. या उंचावर असलेल्या पाण्याच्या टाकीतून वाहणारे पाणी टर्बाईनचे पाते फिरवू लागेल, त्या गतीतून ऊर्जा निर्माण होईल, मग त्याला जोडलेले जनरेटर टर्बाइनच्या या गतीला विद्युतऊर्जेत रूपांतर करेल. 

कुठलीही माहिती वैज्ञानिक बोजड स्वरूपात न मांडता साध्या-सोप्या भाषेत मोहन जेव्हा गावकऱ्यांना उलगडून सांगतो, तेव्हा खरं म्हणजे ज्यांना या विषयाची माहिती नाहीये त्यांनासुद्धा हा प्रसंग बघतांना त्याबद्दलची उत्सुकता निर्माण होते.    

सगळी तयारी पूर्ण होऊन वीजनिर्मितीचा दिवस उजाडतो. सगळे गावकरी हा प्रयोग बघायला हजर झाले आहेत. काहींना आज नक्कीच काहीतरी वेगळं घडेल हा आशावाद आहे, तर काहीजण “अरे कब आयेगी ये बिजली” असं खिल्ली उडवल्यागत वाट बघतायेत. 

मोहन आपल्या कामात मग्न आहे. व्हॉल्व सुरु केल्यावर पाण्याच्या टाकीतून पाणी यायला सुरुवात होते. पाण्याच्या प्रवाहाने टर्बाईनचे पाते फिरू लागते. ५०-१००-१५०-२०० हळूहळू voltmeter चा काटा पुढे पुढे सरकतोय.अजून किती वेळ?

“२३० पे बिजली तयार होगी “, सगळ्यांच्या मनांत आलेल्या प्रश्नाचं मोहन आधीच उत्तर देऊन टाकतो.

सगळ्यांचे डोळे आता काटा कधी २३० पर्यंत येतो याची वाट बघतायेत. एकेका क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा होऊ लागते, पण अचानक पाईपमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागतो, पाण्याच्या अभावी टर्बाईनच्या पात्यांचा वेग देखील कमी होऊ लागतो. २००-१५०-१०० voltmeter चा काटा आता गटांगळ्या खाऊ लागलाय. अरेच्या! हे काय अघटित?

आपला प्रयोग फसतोय हे बघून मोहन सरसर वर चढत पाण्याच्या टाकीजवळ येतो आणि सरळ पाण्यात डुबकी मारतो. पाईपच्या तोंडाशी अडकून पडलेला गवताचा पुंजका बाहेर ओढून काढतो. त्याबरोबर पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत होतो. निराशेचं मळभ दूर होऊन आकाश पुन्हा निरभ्र होतं. १००-१५०-२०० करत voltmeter चा काटा शेवटी २३० ला स्पर्श करतो. 

मोहन गावांत उभारलेल्या विजेच्या खांबाकडे बघतो. आता त्या तारांमधून सळसळ वाहणारी वीज गावातल्या घराघराला प्रकाशमान करत निघालीये. गावकरी जल्लोष करतात. त्याचवेळी फाटक्या झोपडीत राहणाऱ्या एका वृद्ध स्त्रीचा सुरकुतलेला चेहरा विजेच्या दिव्यामुळे प्रकाशमान होतो आणि तिच्या तोंडून फक्त एकच शब्द अनाहूतपणे बाहेर पडतो – बिजली!

swades-2

इतक्या वर्षांनी हा सीन बघतांना आशुतोषला या सीनसाठी ही वृद्ध व्यक्तीच का बरी हवी असेल, हा प्रश्न माझ्या मनांत आला. उभं आयुष्य ज्या अंधाराला सरावलं होतं, आयुष्यातील एका संध्याकाळी काही बदल घडेल अशी पुसटशी आशा नव्हती अशा परिस्थितीत हा चमत्कार घडला. 

‘होय, हे घडू शकतं. आमचा आशावाद अजून जिवंत आहे’, हा मेसेज कदाचित त्या वृद्ध स्त्रीचा बोलका चेहरा दाखवून प्रेक्षकांना दिला गेला, जो कदाचित इतर अर्थाने दिला गेला नसता.    

हा सीन क्लायमॅक्सचा असायला हवा इतक्या सर्वार्थाने हा परिपूर्ण आहे. शेवटी जाताजाता या प्रसंगाची एक आठवण! वीज आल्यानंतरचे चेहऱ्यावर हवे असलेले भाव टिपण्यासाठी आशुतोषने ३० जणींच्या ऑडिशन्स घेतल्या आणि त्यातून “बिजली” हा एक शब्द म्हणायला आशुतोषने निवडलेली ही वृध्द स्त्री त्यावेळेस होती फक्त १०२ वर्षांची!    

कुठे बघता येईल : Netflix
संदर्भ :
https://www.indiatimes.com/lifestyle/self/meet-aravinda-and-ravi-the-inspiration-behind-shahrukh-khan-s-movie-swades-249108.html
https://en.wikipedia.org/wiki/Swades

– उन्मेष खानवाले. 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *