

इंग्रजीचा मराठीवरील प्रभाव
Sale₹495.00 ₹550.00
समाजभाषावैज्ञानिक आणि शैलीलक्ष्यी अभ्यास
लेखक : भालचंद्र नेमाडे
अनुवाद : डॉ. विजया देव
एकोणिसाव्या शतकात विविध भारतीय भाषांमधल्या वाड्मयावर इंग्रजीचा प्रभाव पडला. वाड्मयाचे अभ्यासक आणि समाजभाषावैज्ञानिक यांनी या विषयाच्या अनुषंगाने त्याचे वर्णन केले आहे. त्यांचे सर्वसाधारण एकमत असे आहे की, या संस्कृतिसंपर्काचे स्वरूप आश्चर्यजनकरित्या सर्जनशील होते. असे असले तरी, या प्रभावयंत्रणेच्या समग्र मापनाकडे आणि संस्कृतिसंपर्काच्या मूलभूत भाषावैज्ञानिक पैलूंकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही.
प्रा. भालचंद्र नेमाडे हे मराठीतील प्रतिभावंत लेखक आणि मान्यवर अभ्यासक आहेत. एकोणिसाव्या शतकातील भारतीय संस्कृतिसंपर्काचा भाग म्हणून एका प्रमुख भारतीय साहित्यावर पडलेल्या इंग्रजीच्या भाषिक प्रभावाचे स्वरूप आणि नमुना (Type) यांचे विश्लेषण करणारे हे संशोधन हा या दृष्टीने झालेला बहुधा पहिलाच पद्धतशीर प्रयत्न आहे. प्रभावाची तौलनिक वाड्मयीन संकल्पना या अभ्यासातून विस्ताराने समोर आली आहे. समाजाच्या अंतःस्तरीय पातळीवर ज्या विशिष्ट समाजभाषावैज्ञानिक प्रक्रिया कार्यरत असतात त्यांच्या संपूर्ण मापनपद्धतीचे उपयोजन येथे केले आहे.
हा एक नावीन्यपूर्ण मांडणी करणारा मौलिक ग्रंथ आहे. एखाद्या प्रबळ संस्कृतीच्या दबावाखाली नव्या परिस्थितीत देशी भाषाप्रणाली स्वतःला कशी जुळवून घेते, संस्कृतिसंपर्काच्या दीर्घ वासाहतिक कालावधीत परकीय मूल्यांची निवड करून हळूहळू आपल्या उपप्रणालीमध्ये ती जिरवून घेते आणि तरीदेखील आपल्या देशीवादी तत्त्वांच्या बळावर पारंपरिक सौंदर्यात्मक प्रणालीही टिकवून ठेवते, याचे लक्षणीय विश्लेषण यात आहे. या संशोधन अभ्यासातील भाषिक प्रभावाच्या विश्लेषणाचे प्रारूप हा वाङ्मयीन प्रभाव अभ्यासासाठीदेखील एक पायाभूत आराखडा ठरेल. तौलनिक साहित्य आणि भाषाविज्ञान यांचे विद्यार्थी तसेच एकोणिसाव्या शतकातील भारताबद्दल कुतूहलपूर्ण आस्था असणान्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
अशोक रा. केळकर
Reviews
There are no reviews yet.