यशवंतराव चव्हाण संच
३ बहुमोल पुस्तकांचा संच
यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!