मैफल संवाद : जागते राहो! – रोहन चंपानेरकर

“Technology Increases Exponentially”तंत्रज्ञान झपाट्याने वाढतं.- माहिती तंत्रज्ञानात असं कायमच म्हटलं जातं नवं शतक सुरू होण्याच्या दरम्यान आपण नवीन युगात म्हणजेच प्रगत इंटरनेट युगात प्रवेश केला आणि त्यावरील नवीन घडामोडी, नव्या बदलांचा अनुभव घेऊ लागलो. YouTube वर आपण व्हिडिओज बघू लागलो तर गुगलवर आपण प्रचंड प्रमाणात माहिती मिळवू लागलो. त्याचबरोबर पुढे फेसबुक, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांचा वापर करून व्यक्त होऊ लागलो. अशा अनेक गोष्टी इंटरनेटमुळे आपल्याला नव्याने अनुभवता  आल्या.  त्याचबरोबर अमेझॉन, फ्लिपकार्टसारखे ऑनलाईन शॉप्स तयार झाले व त्यामुळे आज आपण जगातील कुठलीही वस्तू कुठूनही मिळवू शकतो. इंटरनेटचे जे काही फायदे-तोटे आहेत ते सगळेच आपण अनुभवतो आहोत. 

साहित्यक्षेत्रालाही या तंत्रज्ञानाने चांगले-वाईट असे अनेक अनुभव दिले. निर्माण झालेल्या नवीन आव्हानांच्या अनेक पैलूंवर विचार करणं व त्यावर नवीन मार्ग शोधणं क्रमप्राप्त झालं. अनेक प्रकाशक आता पुस्तकाचा प्रसार हा समाजमाध्यमं वापरून करत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन दुकानांमधली विक्रीही वाढते आहे. या नवीन मार्गांवर प्रवास सुरू असतानाच एक नवं तंत्रज्ञान जगासमोर आलंय, ते म्हणजे ChatGPT. सगळीकडे त्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. पण ChatGPT म्हणजे नेमकं काय?

ChatGPT (Generative Pre-Trained Transformer) हा एक प्रोग्रॅम आहे जो पूर्णपणे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), LLM (Large Language Model) या तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रोग्रॅमकडे काही विचारणा केल्यास, इंटरनेटवरची विविध स्वरूपातील उपलब्ध माहिती सर्च करून हा प्रॉग्रॅम त्यावर एका अभ्यासकाप्रमाणे विचार व प्रक्रिया करून अतिशय कमी वेळेत आपल्यासमोर उत्तर आणून ठेवतो. यात भाषेचाही योग्य वापर केला जातो. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर एका मुलाला समजा अमेरिकेबद्दल एखादा निबंध लिहायचा असेल तर तो ChatGPT प्रोग्रॅम वापरून आपला निबंध सादर करू शकतो. पण निबंधाचा विषय समजा ‘अमेरिकेत जर कोलंबस २०२३ साली आला असता तर?’ असा असता तर मात्र ChatGPTने हा विषय कल्पित असल्याचे नमूद करून, अमेरिकेचा इतिहास व आत्ताचं नवयुग अशा दोन्ही पैलूंच्या आधारे निबंध तयार केला असता. आपल्याला हवे असलेले मुद्दे सांगून ChatGPT कडून एखादं पत्र किंवा भाषणही मिळू शकतं. या प्रोग्रॅमचा शिक्षण, वैद्यकीय, मानसोपचार इ. अनेक क्षेत्रांत उपयोग होऊ शकतो. 

असं समजतं की काही देशात पुस्तकंसुद्धा ChatGPTद्वारे तयार होऊ लागली आहेत. चीन किंवा अमेरिकेमध्ये लोकं ChatGPT द्वारे आपल्या डोक्यातील एखाद्या संकल्पनेवर पुस्तक तयार करून घेत आहेत आणि त्याची विक्री ही अमेझॉनवर होते आहे. अशा पुस्तकांच्या विक्रीवर अमेझॉनने सध्या तरी कुठली बंधनं आणली नाहीत. त्याच जोडीला अमेरिकेतील काही दुकानांमध्ये ChatGPTने तयार झालेल्या पुस्तकांचा एक विभाग करण्यात आला आहे. भविष्याचा विचार केला तर साहित्य क्षेत्रासाठी हे सगळं काळजी निर्माण करणारं आहे, कारण कोणतं साहित्य माणसाच्या स्वत:च्या विचारशक्तीतून, स्वत:च्या प्रतिभेतून निर्माण झालं आहे याबाबत वाचकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. लेखकांच्या स्वनिर्मितीच्या दाव्याभोवती संशयाचं धुकं निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर माणसाची क्रिएटिव्हिटी अर्थात सर्जनशीलतेचं महत्त्वही कमी होऊ शकेल. दूरगामी परिणामांचा विचार करता असं वाटतं की मानवाची स्वत:ची विचार करण्याची शक्ती काही प्रमाणात कमी होऊ शकेल, कारण सगळं रेडिमेड मिळू लागलं तर मेंदूची क्रयशक्ती खंगत नाही का जाणार? तुम्ही म्हणाल की आपल्याकडे जेव्हा टीव्ही आले, त्यानंतर कम्प्युटर आले, इंटरनेट आलं, पाठोपाठ समाजमाध्यमं आली. या सर्वांचा आपल्या जीवनावर व साहित्य व्यवहारावर परिणाम झाला का आणि झाला असल्यास किती प्रमाणात झाला? मला असं वाटतं की परिणाम-दुष्परिणाम हे नक्कीच झाले मात्र काही प्रमाणात आपणही बदललो, आपण या बदलांचा नाही म्हणता म्हणता स्वीकार करत गेलो.बदल हे अपरिहार्य आहेत कारण मानवजातीला नव्याचं आकर्षण असतं तसंच इतरांच्या पुढे जाण्याची ईर्षा असते. मागे वळून बघता याचे अनेक दाखले आपल्याला दिसतील. नवं तंत्रज्ञान आलं की पुढील काही काळात त्या क्षेत्रात गतिमान प्रगती झालेली दिसते व त्याचबरोबर नको असलेले पडसादही सोसावे लागतात. मशिनं आली की सोय आणि वेग साध्य होतो, पण त्याच्याबरोबर अनेकांच्या रोजी-रोटीवर गदा येते. पण पुढील काळात त्यांपैकी अनेकांचा कौशल्यविकास होत राहतो मात्र वेगळ्या कार्यपद्धतीत. नव्या बदलातून नवीन मार्ग तयार होतात आणि कार्यक्षमताही वाढते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं.ChatGPT व लेखन-प्रकाशनक्षेत्र असा विचार करता चिंता वाटणं स्वाभाविक आहे. कारण या प्रोग्रॅमची पुढची Versions हे अतिशय झपाट्याने विकसित होत आहेत व AI द्वारे  आणखी शक्तिशाली होणार आहेत. मराठीतील अनुवाद, माहितीपर पुस्तकं, चरित्र आणि हो, कथा-कादंबरीही पुढील काळात ChatGPT द्वारे आपल्या वाचनात येऊ शकतील. आणि मनापासून विचार केला, तर असं सर्व आपल्याला नको आहे. इटली या देशाने तर, यावर बंदी जाहीर केली आहे.

प्रकाशक, वाचक अशा बौद्धिक संपदा निर्मितीक्षेत्रातील संबंधितांनी स्वत:ला येणार्‍या काळात बजावयास हवं… ‘जागते रहो!’

रोहन चंपानेरकर 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *