READING TIME – 15 MINS

२९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी तुर्की या देशाच्या सरकारने अधिकृतपणे आपल्या देशाचं नाव ‘तुर्कीये कुमहुरियेति’ करण्यात येत असल्याची औपचारिक घोषणा केली.

दोन वर्षांपूर्वी – २०२१ साली – संयुक्त राष्ट्रसंघात आपल्या देशाला ‘तुर्की’ ऐवजी ‘तुर्कीये’ म्हणून संबोधलं जावं, अशी सूचना या देशाच्या अधिकाऱ्यांनी पटलावर ठेवलेली होतीच….त्या प्रक्रियेला २९ ऑक्टोबरच्या अधिसूचनेद्वारे कायमस्वरूपी पूर्णविराम दिला गेला.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगन यांनीच अध्यक्षीय वटहुकूम जारी करून या नामांतराची घोषणा केलेली होती. अमेरिका – युरोप यांच्यामुळे आपल्या देशाला ‘तुर्की’ हे नाव मिळालं असलं, तरी तुर्किश भाषा आणि संस्कृतीला अनुसरून आपली ओळख ‘तुर्कीये’ अशी व्हावी, ही त्यामागची त्यांची भावना होती.

अर्थातच, आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा संकेतांचे उद्देश फार वेगळे असतात. निरुपद्रवी नामांतरांनी ओंजळीत चार फुटकळ मतं जास्त पडण्याइतकीच पुण्याई या अध्यक्ष महाशयांच्या नशीबात येणार असती, तर त्यांनीही हा अट्टाहास केला नसताच….

या एर्दोगन महाशयांना या साध्याशा घटनेतून जगाला काही वेगळंच सांगायचं होतं.

युरोप आणि आशिया खंड जिथे एकमेकांशी सांधले जातात, तिथे हा तुर्की देश वसलेला आहे. इजिप्त, इराक, सीरिया, ग्रीस अशा प्राचीन संस्कृती या भूमीत नांदल्या आहेत.

तब्बल सतराशे वर्षे या भूमीत रोमन साम्राज्य टिकून राहिलेलं होतं. ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती धर्मियांचा प्रभाव असलेल्या या साम्राज्याची कॉन्स्टॅन्टिनोपल ही राजधानी.

हे शहर जगाच्या इतिहासातील एक महत्वाचं केंद्र म्हणून मान्यता पावलेलं होतं. पुढे मुस्लिम ऑटोमन साम्राज्याने हे शहर ताब्यात घेऊन त्याचं ‘इस्तंबूल’ असं नामकरण केलं आणि इथूनच हे ऑटोमन साम्राज्य विस्तारात गेलं.

पहिल्या महायुद्धाच्या काळात युरोपीय महासत्तांनी खिळखिळं झालेलं हे ऑटोमन साम्राज्य पूर्णपणे उध्वस्त केलं. १ नोव्हेंबर १९२२ या दिवशी तुर्की या ‘देशाने’ अधिकृतपणे ऑटोमन ‘सुलतान – शाही’ स्वाहा करून या देशात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली.

या देशाचा नवा नेता मुस्तफा केमाल पाशा ( अतातुर्क ) याने १९२४ साली ऑटोमन साम्राज्याने सोळाव्या शतकापासून मोठ्या दिमाखाने मिरवलेली खिलाफतसुद्धा स्वाहा करून टाकली.

इस्लामी जगात प्रेषित मोहम्मदानंतर इस्लामच्या सर्वोच्च स्थानी जो ‘खलिफा’ नेमला जातो, तो समस्त जगातल्या मुस्लिम समुदायाचा नेता असतो. हा मान १५१७ साली सलीम पहिला या ऑटोमन सम्राटाने मिळवलेला होता, जो त्यानंतर ऑटोमन साम्राज्याकडेच राहिलेला होता.

तर अशा पद्धतीने जन्माला आलेल्या या ‘तुर्की’ देशाने – म्हणजेच ‘तुर्किश प्रजासत्ताकाने’ संसदीय लोकशाही स्वीकारताना बरंच काही गमावलेलं होतं.

एकविसाव्या शतकात जगभरात पुन्हा एकदा ‘राष्ट्रवादाचं’ वारं वाहू लागल्यावर जगभरात ज्या नव्या दमाच्या नेत्यांचा उदय झाला, त्यातले एक होते रिसेप तय्यीप एर्दोगन.

तुर्कीचे ‘इस्लाम- वादी’ नेते नेकमेटीन एरबाकान यांच्या हाताखाली राजकारणाचे धडे गिरवता गिरवता हे एर्दोगन १९९४ साली इस्तंबूलचे मेयर झाले.

या काळात त्यांनी इस्तंबूलमध्ये केलेल्या कामातून त्यांच्या इस्लामच्या चौकटीत बंदिस्त न राहता सुधारणावादी विचारांची कास धरून काम करण्याची पद्धत लोकांना ठळकपणे दिसून आली. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही सोसावा लागला.

अखेर एरबाकान यांच्या प्रभाववर्तुळातून बाहेर येत त्यांनी ‘ एकेपी ‘ हा राजकीय पक्ष स्थापन केला आणि २००२ सालच्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून दाखवला.

युरोपच्या ख्रिस्ती लोकशाही पक्षांच्या धर्तीवर ‘एकेपी’ चं काम चालावं असा त्यांचा मनसुबा होता. इस्लामी धर्माची आधुनिकता आणि प्रगती या दोहोंशी सांगड घालावी, तुर्कीला जुन्या वैभवशाली परंपरेची नव्याने ओळख करून द्यावी, तुर्कीच्या जनतेच्या, विशेषतः नव्या दमाच्या तरुणांच्या आशाआकांक्षांना योग्य त्या संधी उपलब्ध करून द्याव्या असं जाहीरपणे बोलणारे एर्दोगन तुर्कीच्या जनतेला साहजिकच आपलेसे वाटत होते.

तुर्कीचे पंतप्रधान म्हणून एर्दोगन यांनी सूत्रं हाती घेतली, आणि पुढल्या २००७ आणि २०११ सालच्या निवडणुकांमध्येही आपल्या पक्षाला दणदणीत यश मिळवून दिलं.

लोकशाही मार्गाने, आधुनिक विचारांच्या साथीने सत्ता संपादन केल्यावर हळू हळू स्वकेंद्रित एकाधिकारशाही आकाराला आणणे हे एकविसाव्या शतकातल्या राजकारणाचं आणि राजकारण्यांचं वैशिष्ट्य.

एर्दोगन यांनी २०१४ सालीअध्यक्षीय निवडणुकीत बाजी मारली आणि त्यांच्यातला ‘एकाधिकारशहा’ जागा झाला. २०१७ साली तुर्कीच्या देशाची घटनाच त्यांनी बदलून टाकली.

तुर्कीच्या जुन्या संसदीय पद्धतीच्या लोकशाहीऐवजी अध्यक्षीय पद्धतीची लोकशाही त्यांनी आकाराला आणली आणि ‘एक्सिक्युटीव्ह प्रेसिडेंट’ हा नवा हुद्दा जन्माला घातला.

एका अर्थाने केंद्रीय वित्तसंस्था, संसद, लोकप्रतिनिधी मंडळ, सरकारी संस्था अशा सगळ्यांचे अधिकार नियंत्रणात ठेवणारा हा नवा हुद्दा एर्दोगन यांना अनियंत्रित सत्ता देऊ शकणार होता.

तुर्कीच्या जनतेनेच २०१८ साली मतपेटीतून एर्दोगन यांना योग्य तो संदेश दिला. एर्दोगन राष्ट्राध्यक्ष झाले खरे, पण ‘नॅशनॅलिस्ट मुव्हमेंट पार्टी’ च्या टेकूवर.

एकाधिकारशाहीला चटावलेला मनुष्य अशा वेळी अधिकाधिक आत्मकेंद्री होऊ लागतो. आपली सत्ता बळकट करण्यासाठी त्याच्याकडून लोकभावनेचा हात घातला जातो.

राष्ट्राभिमानाचे डोस पाजत लोकांचं लक्ष अर्थकारण, प्रगती अशा गोष्टींवरून भरकटवण्यासाठी त्याच्या चेल्यांकडून ‘ गोबेल्स ‘ तंत्राने प्रचार केला जातो. एर्दोगन यांनीही हेच सगळं केलं.

२००९ साली त्यांनी कुर्दिश अल्पसंख्यांकांच्या पंचवीस – तीस वर्षे जुना प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काही महत्वाची पावलं उचलली. ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ या पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी उच्च पातळीवर बोलणी सुरु केली.

तुर्की सैन्याकडून १९३७-३८ साली तत्कालीन कुर्दिश लोकांचं झालेलं नृशंस हत्याकांड ही या कुर्दिश लोकांच्या मनातली भळभळती जखम…त्या कृतीबद्दल जाहीरपणे माफी मागण्याची एर्दोगन यांची भाषा निश्चितच स्वागतार्ह होती…

पण या सगळ्यातून ते कुर्दिश लोकांची एकगट्ठा मतं आपल्या बाजूला वळवत होते, हे अनेक अभ्यासकांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे.

कुर्दिश लोकांप्रमाणेच आर्मेनियन ख्रिस्ती लोकांचं शिरकाण हाही ऑटोमन – तुर्की साम्राज्याच्या इतिहासातला एक काळाकुट्ट अध्याय. एर्दोगन यांनी जाहीरपणे आर्मेनियाची माफी मागण्याची भाषा बोलून याही मुद्द्याला हात घातला, पण त्यांच्या या कृतीवर आर्मेनियाकडूनच आक्षेप घेतला गेला.

या सगळ्यामागचा एर्दोगन यांचा हेतू प्रामाणिक नसल्याचा आरोप लावत आर्मेनियाचे परराष्ट्रमंत्री ओस्कानियन यांनी एर्दोगन यांच्या मनसुब्यांवर पाणी ओतलं.

अखेर तुर्किश विचारवंतांकडून आर्मेनियन लोकांच्या वंशसंहाराच्या निषेधार्थ सुरु झालेल्या मोहिमेवर कडक शब्दात ताशेरे ओढत एर्दोगन यांनी आपली मळमळ व्यक्त केली.

पुढे तुर्की – आर्मेनिया यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित होण्याच्या प्रक्रियेचं प्रतीक म्हणून उभ्या केलेल्या ‘मॉन्युमेंट ऑफ ह्युमॅनिटी’ लाही एर्दोगन यांनी काढून टाकलं. हे असे विरोधाभास हा एर्दोगन यांच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिलेला आहे.

एर्दोगन यांच्या राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या अनेकांचा असा कयास आहे, की एर्दोगन यांना तुर्कीच्या आधुनिक इतिहासात आपलं नाव सर्वोच्च स्थानी कोरून ठेवायची आस लागलेली आहे.

तुर्कीची स्वतःची भूमिका असावी, आंतरराष्ट्रीय राजकारणात तुर्की हा देश महासत्ता म्हणून ओळखला जावा, शक्य झाल्यास खिलाफत पुन्हा एकदा तुर्कीच्या हाती यावी असे अनेक उद्देश मनात ठेवून हे एर्दोगन आज पुढे जात आहेत.

त्यातूनच त्यांच्याकडून अनेक विरोधाभासी निर्णय घेतले जात आहेत. एर्दोगन एकाच वेळी रशिया आणि अमेरिका या दोघांशीही समसमान अंतरावरून बोलणी करायचा प्रयत्न करताना दिसतात, ते याच कारणाने.

एकीकडे ते अमेरिकेला २००३ सालच्या इराक युद्धात स्वतःहून लष्करी साहाय्य देऊ करतात, तर दुसरीकडे पुतीन यांच्या साथीने रशियातून युरोपला जाणाऱ्या ऊर्जावाहिन्या तुर्कीच्या भूमीतून जाऊ देण्यासाठी सर्वतोपरी मदत करतात.

२००५ साली स्वतःहून इस्राएलसारख्या यहुदी देशाला भेट देणारे एर्दोगन २००९ साली ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ सारख्या जागतिक संमेलनाच्या मंचावरून इस्राएलच्या राष्ट्राध्यक्षांना गाझापट्टीत इस्राएलकडून चाललेल्या दमनशाहीवरुन चार शब्द सुनावतात, तेव्हा त्यांच्या कृतीतील सातत्याचा अभाव प्रकर्षाने समोर येतो.

सीरियाच्या बशर अल असाद यांच्याशी २००४ साली गळ्यात गळे घालणारे एर्दोगन २०११ मध्ये असद यांच्या जागी येणाऱ्या ‘कोणत्याही’ सरकारला आपला पाठिंबा असेल असं जाहीर करतात.

२००६ साली सौदी अरेबियाशी व्यापारी करारमदार करून तुर्की – सौदी यांच्यातला व्यापार २०१० पर्यंत तब्बल १० कोटी डॉलर्स इतका वाढवणारे एर्दोगन सौदीने बहरैन या शेजारच्या देशात केलेल्या हस्तक्षेपावर तीव्र प्रतिक्रिया देतात.

इजिप्तशी सलोख्याचे संबंध स्थापित करताना अचानक इजिप्तने धर्मनिरपेक्ष भूमिका स्वीकारावी, असा फुकाचा सल्ला देऊन ते इजिप्तच्या मुस्लिमांचा रोष ओढवून घेतात.

अशा या काहीशा विक्षिप्त, काहीशा आत्मकेंद्री पण उघडपणे धर्माधिष्ठित राजकारणाऐवजी प्रगतीच्या मार्गावरच्या राजकारणाची भाषा करणाऱ्या एर्दोगन यांनी गेली अडीच दशके तुर्कीच्या राजकारणात आपला एकहाती प्रभाव प्रस्थापित केलेला आहे.

जुन्या ‘तुर्की’ पासून दूर जात त्यांना नवा ‘तुर्कीये’ देश आकाराला आणायचा आहे. प्रश्न हाच आहे, की तितकी क्षमता आणि विश्वासार्हता त्यांच्याकडे आहे की नाही?

कारण अति फुगवून दाखवलेल्या स्वप्नांच्या मागे जी पिढी वेड्यासारखी धावत असते, तिचा भ्रमनिरास कोणत्याही देशाला रसातळाला घेऊन जायला पुरेसा असतो.

उद्याचा तुर्कीये शिखरावर असेल की पाताळात…हे येणारा काळच ठरवेल. एर्दोगन हे तुर्कीयेचे मसीहा ठरतील, की तुर्कीचे गुन्हेगार, याही प्रश्नच उत्तर त्यातूनच सापडेल.

  • आशिष काळकर

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *