आता आपण गडाव परत सुरवातीपासून यंघाया सुरवात करू. सगळ्यात पहिल्यांदा पाचाडला याचं, औसाहेबांच दर्शान घ्याचं, तेंची कीरत आन मुरत डोळ्यासमुर आणायची आख्खा महाराष्ट्र वसाड पडल्याला असताना मातेने त्यो पुन्हा वसवला.

खवासखानानी रायारावाकडून पुण्याची होळी करून तिथं गाढवाचा नांगुर फिरावला, तिथं त्यांनी शिवबाकडून सोन्याचा नांगुर फिरावला. वसाडल्याली घरं नांदती केली. देवळातून निघून गेल्याला देव तेच्या हाताला धरून परत तेला देवळात बिनघोर बसवला. देवळं धुपती केली. मानसं जागती केली. बारा मावळातली मानसं निवाऱ्याला पुनवडीत आणली. पेठा वसवल्या. कसब्यातल्या गणपतीचा जीर्णोधार केला. तांबड्या जोगेश्वरीव छत्र धरिलं. मुर्दाडल्याल्या माणसांवरून संजीविनी फिरावली. पुंडांचा आन गुंडांचा बंदोबस्त केला. तेनांच नोकरीव ठिवलं.

आया-बहिणी दिवसाढवळ्या पानवठ्यापासून चव्हाट्यापर्यंत उचलून नेल्या जायच्या त्यांचा चौरंग्या केला. तेंच्या म्होरं शिवबा नावाचं कवचकुंडल ठेवलं. समाधीम्होर नतमस्तक व्हयाचं, म्होरं पाचाडलाच तेंच्या वाड्याकडं निघायचं… वाड्यात याचं वाडा फिरायचा तिथं जुन्या विहिरीच्या वरती एक दगडी आसन हाय तिथं महाराज बसत, तेंचं मुद्राआसन स्मरायचं. तिथून रायगड श्वास रोखून बघायचा. म्होरं निघायचं.

पायथ्याला याचं, पहिला टप्पा नाणे दरवाजा. काही नाना दरवाजा म्हणत्यात. तेला हे नाव का ह्या इषयी लई मतं हायती. कोण अभ्यासक म्हणत्याती नाना फडनिसानी तेची डागडुजी केली म्हून तेला नाना दरवाजा म्हणत्यात.

काही अभ्यासक म्हणत्याती की कोकणात लहना म्हनजी नान्हा. महादरवाजाच्या तोडीला नान्हा. पर गोपाळ चांदोरकर सांगत्यात ते पटतंय. प्राचीन काळी तिथ जकात चलनी नाण्याच्या रूपानी गोळा केली जायची तिथं नाणी गोळा कराया एक दगडी भांडं पिन अंजून तुटल्याला अवस्थेत हाय.

नाणी गोळा करायचा दरवाजा म्हंजी नाणे दरवाजा. दरवाजातल्या मारुतीला नमस्कार करून म्होर निघायचं. खूबलढया बुरुजापाशी थोडी इश्रांती घ्याची. म्होरं सरकायचं.

महादरवाजाला यायचं तासभर तिथं घालवायचा. महादरवाजावरून पाहिलं की उजवीडकडं तटबंदी सुरु व्हती ती टकमकीच्या मध्यान्ही जाती आणि डावीकडली हिरकणी बुरुजाच्या दिशेनी जाती. डावीकडं दोन तोफा हाये. आन उजवीकड दोन – चार हायेती. राजं येतानी सलामीची तोफ देऊन्श्यान कशी गर्जन गरजत आसल ते आठवायचं…. गर्जन कानात गुंजत गुंजत रहाती. वरच्या टेपाडाव जाऊन थांबायचं तिथं एक लोखंडी खांब रवल्याला हाय त्याला माथ्याव एक कडी गुंफलेली हाय, तिथलं गाईड सांगत्यात संभाजी राजांचा मलखांब हाय म्हून….काही सांगत्यात हत्तीला बांधायचा खांब हाय म्हून…..तर ते काय खरं नाय.

त्या खांबाच्या सम्बुर जर पाहिलं त एक किलोमीटर च्या अन्तराव दुसरा तसलाच खांब मुसलमानी थडग्यापाशी हाय. ते सूर्यघटिकायंत्र हाय. गोपाळ चांदोरकरांच्या मते अडीच हजार वरसापूर्वी रायगडाव हवामान खातं व्हत. असलाच एक खांब राजमाचीव पिन पडलाय. आता हे थडगं मदारी मेहतरचं पिन म्हणत्यात तेला मदनशहाचा दर्गा पिन म्हणत्यात. पर अजून ठोस असा पुरावा नाय. तिथून म्होरं गेल्याव वाटंमधी गंगासागर तलाव लागतोय. रायगडाच्या बांधकामाला जो पाषाण लागलाय तो हिथून खोदलाय.

असाच एक भवानी टोकाच्या डावीकडं खोदलाय तेला काळा हौद म्हणत्यात. महाराजांच्या अभिषेकाला गंगेचं पाणी आणलं व्हतं अभिषेकानंतर उरल्यालं पाण्याच्या घागरी ह्यात टाकल्या म्हून ह्यो गंगासागर. गंगासागराच्या डावीकडून गेल्यावर हनुमान टाकं लागतंय. त्या टाक्याव हनुमान कोरलाय म्हून ते हनुमान टाकं. तिथून म्होर छुप्या वाटंन यंघ्ल्याव आपुन बाजारपेठेकडं पहुचतो….पर आपण आत्ता चाललोय पालखी दरवाज्याकडं.

raigad 5

पालखी दरवाजातून ज्यांना पालखीचा मान हाय त्यांनाच आत प्रवेश व्हता. पालखी दरवाजासमोर एक भल्या मोठ्या ओसरीचे अवशेष हायेत ती त्या काळची ‘वेटिंग रूम’ आत्ताच्या हाफिसात जे ‘रीसेपश्न’ असतंय तसला परकार. पालखी दरवाजातून आत गेल्याव उजव्या बाजूला भल्या थोरल्या खोल्या लागत्यात, खोल्या कसलं आत्ताचं मोठमोठं बंगलंच म्हणायचं. त्याला राणीवसा म्हणत्यात पर गोपाळ चांदोरकरांच्या मते ती राज्यकारभाराची कार्यालये व्हती. डाव्या बाजूला राजवाडा चालू व्हतो.

पुढं सरळ मेना दरवाजा हाय. तेच्या खाली रोपवे. राजवाड्याच्या पश्चिम बाजूला तीन विजयस्तंभ दात पडल्याल्या सिंव्हावानी अजून तग धरून हायेती. तेला आतमधी कारंजं हायेती आन परतेक खाम्भाला दिवडी हाये. दिवं लावल्याव कारंजं काय दिसत असत्याल ते फकस्त आठवायचं. तेच्या बाजूला टांकसाळ, किती खंडीनी होन आन शिवराई पडली आसल. म्होरं गेलं की तळखाण्यात रत्नशाळा, म्होरं राजसदरेचा भाग चालू व्हतो. आत्ताचं सिंव्हासन तीच पूर्वीची बत्तीस मन सोन्याच्या सिंव्हासानाची जागा. समुर नगारखाना.

लाल माकडांच्या तोफेम्होरं हा एकटा बहाद्दर झुकला नाय. वरचा कौलाचा भाग सोडला त आंग्रेज त्याच्या एका चिरेची ठिकरी उडूवू शकले न्हाई. सिंव्हासानापासून नगारखान्याचं अंतर अडीचशे फुट हाये, तिथून हळू बोललं तरी नगारखाण्यापतुर सपस्ट आवाज जातुया. हिथं हिरुजी इंदलकरांनी ध्वनीविज्ञानशास्त्राचा उपयोग केला हाये. सिंव्हासानापासनं राजांचं आवडतं गड तोरण्या आणि राजगड सपस्ट दिसत्यात. पंधराव्या वरसी तोरण्यापासून कारकिर्दीला सुरवात झाली ती रायगडावर येऊन दिगंतात पहुचली. अंजून डफ गरम होतुया दिमडी ताल धरतिया कवनं आन पवाडं अस्मानाला ललकारी देत्यात. नगारखाण्यापासून उजवीकडं गेल्याव कुशावर्त तलाव तेच्या माथ्याव व्याडेश्वर मंदिर.

शिवकाळात काय नजारा आसल एवढ आठवून डोळ्याची पारनं फिटत्यात. तिथून म्होर खाली गेल्याव गायमुख हाय, तेच्या शेजारी कारंज्यांचा जस्ताचा पाईप अजून तसाच हाये, कुशावर्त तलावातून खाली कारंज्या आन गोमुखातून पाणी पडत आसल आणि म्होर राजबाग आसल. तेच्या शेजारी मंत्रीमहाल हायेती, तिथून सपस्ट पोटल्याचा डोंगुर दिसतुया. तिथून म्होर खाली गेल्याव वाघ दरवाजा. त्यो पघून परत होळीच्या माळाव यायचं तिथून थोडं खाली गेलं की शिरकाई देवीचं दर्शन घ्यायाचं त्यासमूर पूर्वीची नाट्यशाळा. तेला काहीजन गजशाळा म्हणत्याती पर ते खरं न्हाय. तेला चिकटून बाजारपेठ. पर गोपाळ चांदोरकरांच्या मते ही पण कार्यालये व्हती, आन त्यात सुरवातीची सहा कार्यालये गुप्तहेरखात्याची व्हती.

म्होरं गेल्याव डावीकडं टकमक टोकाला रस्ता जातोय. ते पाहून परत वरती यायचं, म्होरं गेल्याव जगदीश्वर मंदिर त्याला खेटूनच महाराजांची समाधी. तिथं लोटांगण घ्यायचं. शिवप्रभुंचं रूप आठवायचं. जगदीश्वर आणि समाधीच्या दाराला पाठीमागून हिरुजी इंदलकरांनी शिलालेख कोरलाय…..लेखाव सुरवातीला रायगडावर जे बांधकाम केलय त्याची माहिती दिल्याली हाय नंतर शेवटाल्या ओळीत लीव्हलंय.

“जोपर्यंत आकाशांत चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र असत्याल तोपर्यंत रायगडाची कीर्ती आसंल.” खाली पायरीव्ह लिव्हलंय “सेवेसी तत्पर हिरुजी इटळकर” जगदीश्वराच्या मंदिरामागं कोळीम तलाव.

उजव्या बाजूला धनगर आवश्यातून खाली बारा टाकी, म्होरं धान्याची कोठारं. परत वरती आलं की म्होरं गेल्याव मावळ्यांच्या छावण्या चालू व्हत्यात. गोपाळ चांदोरकरांच्या मते, “सैनिकांना बराकी बांधून देणारा हा जगातला पहिला राजा.” म्होरं गेल्याव काळा हौद लागतो त्यात बारमाही पाणी असतं. म्होरं गेल्याव दारू कोठाराचे अवशेष, नंतर भवानी कडा. त्यो उतरून गेल्याव मोठी कपार लागती तिथं पूर्वीचा पहारा व्हता.

महाराज पूर्वी कडा यंघायच्या शर्यती घेत, पायथ्याला दवंडी दिल्ही जात. अमुक कडा चढून येणाऱ्यास मानाचं कडं आन सवराज्यात चाकरी. ह्याच्या मागचा मनसुबा मंजी जिथून गडी यंघल त्यो कडा कमजोर झाला समजायचा मग त्यो पुन्यांदा तासून बेलाग करायचा. तर अशी एक गोष्ट हाय भवानी कड्याकडून एक धनगर पोऱ्या चढून वरती आला, महाराजांनी त्याचं कौतुक करून त्याला सोन्याचं कडं देऊन चाकरीस ठेवला त्याचं नाव सर्जा धनगर.

आन त्यो कडा तासून घेतला. परत माघारी फिरायचं मेना दरवाजाकडं यायचं तिथून हिरकणी बुरुजाकडं वाट खाली गेल्याली हाये तिकडं जायचं तिथ गेल्याव मावळती बघायची, परत माघारी फिरायचं. राजवाड्याकडं यायचं तिथ एक पाटी लीव्ह्लीया ‘महाराजांचे प्राण गेले ती जागा.’ अनवाणी व्हायचं आन तिथली माती भाळाला लावायची. रायगड बारकाईने पघायला आठ दिस पुरत न्हाय आन समजून घ्यायला आख्खी हयात.

  • संतोष सोनावणे 

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
 वाटाड्या बारा मावळाचा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *