रायगड म्हणलं की आमचा पैलवान सागर पोकळे आणि मी हे ठरल्यालं. सागर शिवाय मी क्वचितच गडावर जाऊन राहिलोय. रायगडावरच्या माझ्या हिंडफिरीची सावली म्हंजी सागर. रायगड आणि माझ्या नात्यातला साक्षीदार म्हंजी सागर. ओसाडल्याल्या, भग्न अवशेषातून शिवकाळ ज्याच्या बरोबर राहून मला अनुभवता येतो त्यो हा माझा जिवाचा जीवलग.
शिवभारतानंतर महाभारतावर आमचे इशेष प्रेम. किस्नाचं दोघांनाही याड. वारं, उन, पाउस, थंडी, धुकाट ह्यांचा आनंद लुटीत आम्ही दोघांनाबी रायगड जमल तसा हुडाकला. तरी पाच टक्केबी रायगड कळाला न्हाय. किल्ला बघावा कसा हे आप्पांची पुस्तकं वाचून मी शिकलो. ‘रानभुली’तील आप्पांची लाडकी मानसलेक मनी आत्ताची मनी आज्जी तिला भेटायची आम्हाला लई इच्छा व्हती.
इचारपूस करीत आम्ही पुनावड्यात पहुचलो त घराचं दार बंद व्हतं. शेजारी इचारपूस केली त कळालं की म्हातारी मागच्या गावात रेशन आनाया गेली हाय. मंग मागच्या गावात गाडी वळवली त म्होर गेल्याव एक म्हातारी डोक्याव पाच किलो धान्याचं बाचकं टाकून येत व्हती, “मनी आज्जी का, इचारल्याव….हा म्या मनी आज्जी….आन मला कसा काय हुडकलं लेकरांनो म्हनाली. मंग आज्जीला तशीच गाडीव टाकली आन तिच्या घरी गेलो.
आज्जीनं घराच्या देशी गाईचं चांगलं तांब्याभर दही दिल्ह. चांगल्या तासभर गप्पा हाणल्या. मनी आज्जीन काकुळतीनं आप्पांची आठवण काल्ढी. आपण पुस्तकातून ज्या पोरसवदा मनिला भेटलो, तिच्या सुखात हसलो आन दुखात रडलो ती ही मनी. आत्ता चेहऱ्याव सुरकुत्या पडल्यात आन पाय थकल्यात. डोळ्यांव इस्वास बसत नव्हता.
सिद्धहस्त लेखक आपली पात्रं अशी चिरतरुण ठेवतो. वरून आकाशीच वझं घेऊन आल्याला लेखक खाली रितं करतो. आप्पा (गो.नी.दांडेकर) देवकुळीचा माणूस. तेंच्या पाउलखुणा आजबी भाळी लाऊन आमच्यासारखी फिरस्ती मानसं सह्याद्रीत बिनघोर फिरत्याती. यस्वन्ता भेटला नसता त गडाच्या पायथ्याला उपऱ्यावाणीच राहिलो असतो. हेची माया काय सांगावी.
जन्मापासून एका पायानी अधू असल्याला यस्वन्ता गडाव वाचमन हाय. पायथ्याला पोहचाया रात झाली तरी तेच्या घरात निवारा मिळतोय. लई माणसं असली त दूसरीकडं सोय करून देतो. निघतासमयी सागर आणि मी असंल त राहण्याचं- जेवणा – खावनांचं पैसं किती झालं असं इचारल्याव म्होर निघून जातो. “पैस नाय घेतलं त परत येणार नाय, असं म्हणल्याव म्हणतो, परत नाय येणार त पुण्याला किती दिस रहाणार….कधी न कधी तुम्ही येणार की.” लई रेट्यानी पैसं खिशात ठेवाया लागत्यात. ” जगरहाटी कुन्हाला चुकली ” म्हून. हेच्यामुळच अन्नपूर्णामाय आम्हाला भेटली.
गडाव पहिलीछुट आठवडाभर राहायचं व्हतं, एमटीडीसीच्या खोल्यांचं पुनर्निर्माण चालू व्हतं, आन त्या चालू असत्या तरी परवाडनारं नव्हतं….म्हून मंग यस्वन्तानी जगदीश्वराच्या माघच्या धनगर आवश्यात सुरवातीची केंबळी सुचावली. आम्ही कुठही राहयला तयार व्हतो, फक्त निवारा पाहिजे व्हता.
ही केंबळी सुमन मावशीची म्हणजी आमची अन्नपूर्णामाय. जे रांधील त्याला चव. नुस्ता खरपूस दरवळ. तिच्या पदार्थांची यादीच देतो १) वाटाण्याची आमटी- भात, चटणी- दही २) मुग-बटाटा, खाली लुसलुशीत वरती कडक पापुद्र्याच्या तांदळाच्या भाकऱ्या, खिचडी- भात, ताक. ३) पिठंलं –भाकर –भात –मसालाकांदा- दही ४) कांदा- भजी, बटाटा-भजी, कढी-भात ४) ताकभात-चटणी, ५) दहीभात-चटणी ६) मुगाची आमटी – भात, लसणाचा ठेचा ७) जगातील सर्वश्रेष्ठ अंडाकरी
मी मायकडं जेवढा जेवलो तेवढा कधीच आणि कुठंच जेवलो नाय. गावरान गाईचं तूप शहरात दोन हजार रुपये किलो चाललंय ते पिन भेसळीवालं. घरच्या गावरान गाईचं तूप आणि भात प्रेमानं वाढणारी आन तुपाची आख्खी बरणी समुर ठेऊन किती पण खा म्हनणाऱ्या माझ्या अन्नपूर्णामायचं जेवण जो जेवला त्यो जोगावला, धन्य झाला.
तृप्तीचा ढेकर म्हंजी काय तिच्या हातचं खाल्ल्याशिवाय सर्गातल्या देवाला पिन कळणार नाय. सागरला आणि मला आम्हाला दोघांनाच वाटलं आम्हीच लई जेवतो….आठ- दहा भाकरी एकएकट्यानी खाऊन इरशीर दाखवायचो पिन ज्यायेळी ‘पुरंदर केसरी’ बाप्पू पोकळे- मी आन पैलवान सागर आमच्या तिघात भाकरीची लढत झाली त्यायेळी सागरनी आन मी नांग्या टाकल्या आमचा गर्व बाप्पुनी उतरावला चौदा भाकऱ्या खाऊन.
सुमन मावशी अन्गुदार काल्वान– भात उरकून घेती मंग चुलीपुढं आम्ही भाकऱ्या चालू असताना बसणार मंदी एक टोपलं आसतंय त्यात दोन फुठाहून भाकरीची भिंगरी पडणार आम्ही ती उन उन उचलायची आन मंग लढत चालू ठेवायची. आम्ही खायला दमू पिन मावशी दमणार न्हाय.
असाच एका पावसाळ्यात आम्ही दुपारचं सुमन मावशीकडं पोहोचलो, “जेवायला काय हे इचारल्याव, गडावची रानभाजी चालताव का, चालताव नाय माय पळताव. अन्नपूर्णा मायनं भाजी बनावली, काय सांगू …मटान नांगी टाकतंय रायगडावच्या रानभाजी म्होर.
आत्तापर्यंत मी मावळात कुळई, बेन्द्रा, चीचार्डी, करटूली ह्या भाज्या खाल्य्यात पिन ह्या भाजीची तऱ्हांच न्यारी. म्या त्या भाजीचं नाव इचारलं पिन कुन्हाला त्याचं नाव माहिती नव्हत. तिच्या नावाचा पत्त्या काढण म्होरच्या वरसाला बाकी ठिवलया.
अन्नपूर्णा माय आता नाय. करोना काळात ती गेली. लॉकडाऊन असल्यामुळं मयतीला जाता आलं नाय. दैवी माणसं साध्या माणसांत राहिलेली देवाला बघवत नसावं… कदाचित देव मायच्या हातचं जेवण जेवत असंल………क्रमश:
- संतोष सोनावणे