भूषणाचा शब्द म्हंजी वनव्यातच्या आगीचा नुस्ता लोळ. ढनाना पेट घेणार. किसन देवाच्या भाषेत म्हंजी ब्रिज भाषेत राजाची कीर्त आख्या हिंदुस्थानात तेनी गायली.


पंपा मानसर आदी तलाब लागे
जेहीके परन में अकथ युग गथ के
भूषण यो साज्यो रायगढ सिवराज रहे
देव चक चाही कै बनाए राजपथ के
बिन अवलंब कलीकानि आसमान मै है
होत बिसराम जहा इंदू औ उद्य के
महत उतंग मनि जोतिन के संग आनि
कै रंगचक हा गहत रविस्थ के
मनिमय महल सिवराजके इमी रायगढ मै राजही
लारणे जच्छ किन्नर असुर सूर गंधर्व हौसेनी साजही
उत्तंग मरकत मंदिरन मधी बहु मृदंग जू वाजही
घन समै मानहू घुमरी कारीघन घनपटल गलगाजही
मुकतान की झालरीन मिली मनी माल छज्जा छाजही
संध्या समै मानहु नरवत गन लाल अंबर राजही


असा कवी लाख वरसातून एकदा जल्माला येतुया. राजाभिषेकाला रायगड असा सजवला की, इंद्रपुरी पुचाट. तुळणा झालीच त पांडवांच्या इंद्रप्रस्थाची. मयसभा न्हाय, पिन बघणारंचं भान हरिखंलं. भीमानी जरासंधाला तोडला आन पांडवांनी इंद्रप्रस्थाचं नगरपूजन करून अश्वमेध यज्ञ केला आन धरम राजा चक्रवर्ती सम्राट झाला. तसंच राजांनी अफ्जुल्य्या फाडला, शाहीस्त्या तुंडा केला. इनायतखानाला भुंडा केला. सिद्धी जौहारला वाकवला. उदेभानला चिरला. कारतालब खानाला खिंडीत गाठून पाय धराया लावलं. मोगलाई फाकावली आन ईदलशाही वाकावली, जंजीऱ्याच्या उंदराचा बंदोबस्त केला.

लाल माकडांना तडाखे दिले. घरभेद्यांना शास्त केली. समिंदराव कब्जा केला. गडामागून गड घेतलं आन राजाभिषेक करवून हिन्दुस्थानचं राजं झालं. मोहीम मांडून मोठी दख्खन विजय केला. नंतर म्होर रायगडाला हादरा बसला हनुमान जल्माच्या दिवशी गडाव धरणीकंप झाला आन राजं परबरम्हात इलिन झालं.

रायगड पोरका झाला. हिंदुस्थान अनाथ झाला. महाराष्ट्रातल्या बाया– बापड्या धाय मोकलून रडल्या. रयतेला सोडून राजा गेला. देह गेला कीर्त उरली. समर्थ रयतेला म्हणाले,
“शिवराजास आठवावे जीवित तृणवत मानावे”

गडाव बंडाळी माजली. गडाला स्वामी उरला न्हाई. त्यायेळी रायगड आतून धुमसत व्हता. पर शेवटी छावा उसाळला. आगीचा लोळ वाळल्याल्या चिपाडात शिरावा तसा माझा शंभू राजा. ज्वलनज्वलतेजस संभाजी राजा. बंडाळी मोडून काढली. अनाजीपंताला हत्तीचा पाय दाखवला. मालसावंताला टकमक दाखवली. फितुरांना शास्त केली. राजाभिषेक करवून घेतला.

धाकंलं धनी राजं झालं. चौ बाजूनी वावटळ आली नऊ वरसं एकट्यानी जुझ दिल्ही. मेव्हण्यानी फितुरी केली सिंव्ह जेरबंद झाला. औरांग्यानी नरक यातना दिल्या तरीबी बुबळात आग व्हती. शेवटाला मरान लाजलं. ब्रम्हांडाला धरमवाट दाऊन राजं मोकळं झालं, देहाची खांडूळी झाली पण धर्माची होऊ नाय दिली.

रायगडानी धाय मोकलून हंबरडा फोडला. महाराष्ट्र पुन्हा पोरका झाला. त्याच वरसाला सरवनात इतिकातखान आन याकुदखानानी गडाला यढा दिल्हा. महाराणी येसूबाई गडउतार झाल्या आन पहिला घन बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसला. इतिकातखानानी तुकडं तुकडं करून सिंहासन पोत्यात भरलं. द्वारिका समुद्रात लोटून किसन देव निघून गेला. तसंच काळानी पण केलं शिवशंभू गेलं आन हैवानांच्या हातात रायगड गेला.

raigad 2

रायगडाच्या दुर्दशेला सुरवात झाली. याकुदखानानी आणि इतिकादखानानी गडाव इध्वंस मांडला. यासाठी म्हून औरंग्यानी इतिकादखानाला झुल्फिकारखान ही पदवी दिल्ही. म्होरं पेशवाईत समाधीची दिवाबत्ती रोज केली जात. स्वामींच्या तख्ताची पूजा केली जात. म्होरं पेशवाईच्या उतरत्या काळात गडाचा कैदखाना झाला.

म्होरं रायगडाच्या लई मोठ्या इध्वंसाचा दिस उजाडला. १ मे १८१८. प्राथर ह्या लाल माकडानी पोटल्याच्या डोंगराव लांब पल्याच्या तोफा चढवल्या आन आठ दिस तोफांचा मारा केला. राजांनी रक्ताचं पाणी करून उभा केल्याला रायगड कोसळला. म्होरं सला झाला. मराठे गडउतार झाले. लाल माकडं गडाव गेली त्यायेळी वाराणशीनबाई वाड्याच्या धुमसत्या राखंसमुर बसून अश्रू ढाळत व्हत्या.

लाल माकडांच्या कुल्फीगोळ्यांनी फुटून रायगड अकरा दिस जळत व्हता. नंतर शंभर वरीस रायगडाव कुन्ही फिराकलं नाय. गडावरले धनगर पायथ्याला जाऊन पोटासाठी रानोमाळ पांगले. नंतर १८९५ ला आन्ग्रेजांचा फारीस्ट खात्यातला एक अधिकारी सिंक्लेअर त्याचं नाव. त्यो गडाव एक दिस आला आन राजांच्या समाधीची अवस्था त्याला बघावली नाय. त्यानं पदरचं पैसं टाकून समाधी नीट केली. आन सरकारकडून समाधीच्या देखभालीसाठी दरवरसी पाच रुपयाची येवस्था लाऊन दिल्ही. मंग आपल्यांना जाग आली आन तिथून म्होर समाधीच्या जीर्णोधाराचं काम चालू झालं. गड हळूहळू पुन्यांदा जागता होऊ लागला, नांदता होऊ लागला. पायथ्याच्या धनगरांनी वर वळचणीला येऊन पुन्यांदा थारा घेतला. दुर्गपंढरीचे धारकरी गडाव येऊन राहू लागले………..क्रमश:

  • संतोष सोनावणे 

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
वाटाड्या बारा मावळाचा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *