आडवाटंला म्हणावं त हमरस्ता पडतोया आन हमरस्ता म्हणावं त आडवाटंला हाय, घाटाच्या खाली म्हणावं त घाटवाटा आडवल्यात आन घाटाव म्हणाव त कोकनाव नजर हाय, सह्याद्रीचा डोंगुर म्हणावं त येगळा झालाय. आन येगळा म्हणावं त सह्याद्रीला तसूभर बी कमी नाय.
सह्याद्रीनं असं इटुळ घातलंय की घेऱ्यात उभं राहिल्याशिवाय गड वळीखता येत न्हाय. हे सह्याद्रीचं लेकरू, ह्याचा जलमच शिवबासाठी. घडीव अशी की ज्वालामुखी वडवानलानी पिळून काळ्या पाषाणाचा सिंव्ह आभाळाकडं गरजत उभा केलाय. चहूबाजूनी कडं आसं ताशीव की वाऱ्याशिवाय वर आन पाण्याशिवाय खाली उतरायची- यंघायची छाती नाय कुन्हाची.
काळ आन गांधारी ह्या दोन नद्या पावसाळ्यात चार महिने दुथडी पहारा देत्यात. ह्याच्या मस्तकावरला पाऊस म्हंजी तांडव. सहाशे वर्सापूर्वी पाळेगार नांदत व्हता त्यानी विजयनगरला मुजरा हान्ल्याव तेंच्या ताब्यात गेला. नंतर निजामशाही, इदलशाही. पूर्वी ‘तणस’ आन ‘रासिवटा’ ह्या दोन नावांनी वळखित; नंतर रायरीचा डोंगुर.
माझ्या राजाचा पाहिलं पाऊल लागलं आणि त्यांनी पहिली डरकाळी फोडली. त्याचं झालं असं…. जावळीच्या वतनाव राजांनीच बसवलेला यसवंतराव मोरे सापासारखाच सवराज्याव उलाटला. त्याच डोचकं ठेचायचं व्हतं म्हून जावळी रातोरात मारून काहाडली. अल्याड जोरला हनुमंतराव मोरा ठेचला.
यसवंतराव रायरीव पळाला. तेच्या मागोमाग राजं. रायरीव घेरा पल्डां. शिळीमकर आन जेध्यांनी रायरी घेरली. हात हात झाडं कापून राजांनी घेरा नजरबंद केला. टकमकीपाशी आल्याव सुं सुं करीत तीर आल्यालं. मोऱ्या वरून जाच करीत व्हता. शेवटाला वाट गवसलीच आत्ताचा ज्यो वाघ दरवाजा हाय ना तीच निस्नीची वाट. वाट कसली मरणवाटच की. पाय निसाटला की हाडाचा भुगा आन मासाचा लगदाच.
हिथं यंघाया वान्याराचं पिन काम न्हाय. हिथं घोरपडच. महाराजांकडं दोन पायाच्या अश्या लई घोरपडी व्हत्या. सह्याद्रीच्या अंगाखान्द्याव हिंडताना हेरल्याल्या. वैशाखातल्या वनव्यानी वाळल्यालं गवात धरीत दोन पायाची घोरपड वर यंघली आन दोराच्या माळा लावून हैबतराव शिळीमकरांनी मोऱ्याला जेरबंद केला. महाराज रायरीव यंघले आन गुंगाटल्याला सिंव्ह गरजाया लागला. डोंगराचा गड आन रायरीचा राया झाला. रायगड.
म्होरं पन्हाळ्याच्या यढ्यात राजं अडकल्याव राजापूर वखारीतल्या लाल माकडांनी पन्हाळ्याव कंपनीचा बावटा लाऊन तोफा डागल्या. त्याची चुकती म्हून पन्हाळ्याहून निसटल्याव राजापूरची वखार लुटून लाल माकडांचा सुपडा साफ केला; आन चोवीस हजार होनांची लूट रायगडाच्या डागडुजीसाठी वापारली. ही रायगडावून डागलेली डंक्याची पहिली तोफ. ह्या भरपाईचं टुमनं लाल माकडांनी राजाभिषेकापर्यंत लावलं.
तेरा वर्षे रायगडाच्या चकरा माराय लावल्या माकडांना आन पदरात धोंडा बांधला. उस्टीक आला, निकल्स आला, नारायण शेणवी आला, आन सरते शेवटी राजाभिषेकाच्या येळस हेन्री ऑक्जीन्डन आला. १६५६ पासून चालू झाल्याल गडाचं काम राजाभिषेकानंतर पिन चालूच व्हतं.
याच समयाला कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद इजापूरला खजिना घिऊन चालल्याला त्याला पिन लुटला. सुरतेची लूट आन रायगडाचा तोरा एकाच नाण्याच्या दोन बाजू. रयतेला लुटून मोगलाई माजाटली व्हती. सुरत लुटून जरा तिची चरबी कमी केली. रायगडला हिरुजीनी असा सजावला की गडाच्या आभाळमाथ्याव त्याचं वैभाव बघाया देव जमा झालं.
उत्तरेतून त्रिविक्रमपूर म्हंजी आत्ताचं टिकमपूर हिथून एक कवी घर सोडून राजांची कीर्त ऐकून लमाणतांड्याबरुबर चालत चालत रायगडाव आला. आडनाव त्रिपाठी आन नाव भूषण. ह्यो गड बघावा- ऐकावा त फकस्त तेच्या नजरंतून तेच्या सब्दातून………….क्रमश:
- संतोष सोनावणे