प्रवासात जेव्हा बरंच मोठं अंतर पायी चालून कापायचं असतं, किंवा त्यात मोठा चढ पार करायचा असतो, तेव्हा नकळतपणे मागे नजर जातेच. किती अंतर कापून झालं? किती शिल्लक राहिलं असावं? किंवा कितीसा चढ पार केला गेला? अजून किती पार करायचा शिल्लक आहे? असं एक तुलनात्मक गणित मनात चालू असतंच. आणि ‘अरे वा, नाही म्हणता म्हणता बरंच अंतर पार केलं की…’ असा एक दिलासादायक विचार मनात डोकावला, तर पुढचं अंतर कापायला, चढ चढायला नवी उमेद, नवी ऊर्जा तो विचार मनाला देऊ शकतो. आणि असा खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
नववर्ष उगवण्याची चाहूल लागली; जसं की, मी आता हे संपादकीय मनोगत लिहिताना मला ती लागली आहे; की, चालू वर्षात काय काय घडलं, काय काय साधलं गेलं हे जाणून घेण्यासाठी मागे वळून आढावा घेण्याची मनाला खोड लागलेलीच असते. एक वर्षापूर्वी असाच मी मनातल्या मनात २०१९चा लेखाजोखा घेतला होता. आणि समाधानाचा सुस्कारा सोडला होता. त्या वर्षात ‘टीम रोहन’ने जिकीरीने काम करून अनेक पुस्तकं मार्गी लावली होती. काही पुस्तकं काही उचित निमित्ताने प्राधान्याने पुढे नेली होती आणि वेळेत प्रकाशित केली होती.
असंच एक पुस्तक म्हणजे, उमेश झिरपे लिखित ‘पवनपुत्र शेर्पा’! हिमालयातील अगणित मोहिमा फत्ते करता करता झिरपेंची अनेक शेर्पांशी ओळख झाली, मैत्री झाली. त्यामुळे त्यांचं जीवन जवळून जाणून घेण्याची त्यांना संधी प्राप्त होत गेली. त्यातूनच त्यांनी शेर्पांच्या खडतर जीवनाची सर्वांगीण ओळख करून देणारं पुस्तक लिहिलं. आधीच ठरल्याप्रमाणे ‘रोहन’च ते प्रकाशित करणार होतं. गिर्यारोहकाच्या एका मेळाव्याच्या निमित्ताने झिरपेंचे काही शेर्पामित्र पुण्यात येणार होते. त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. तर, या निमित्ताने पुस्तकही त्या प्रसंगी प्रकाशित व्हावं, अशी इच्छा झिरपे यांनी व्यक्त केली. ‘टीम रोहन’ पैकी रोहन व नीता यांनी हे आव्हान स्वीकारलं, आणि पुस्तक वेळेत प्रकाशित झालं.. २०१९ साली प्रसिद्ध झालेलं हे शेवटचं पुस्तक.
साल २०१९ची सांगता शेर्पांच्या खडतर जीवनाचा धांडोळा घेणाऱ्या पुस्तकाने झाली खरी, पण २०२०सालात काय वाढून ठेवलं आहे, याची तेव्हा कुणाला पुसटशीही कल्पना नसावी. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर खांद्यावर, पाठीवर नाना प्रकारची ओझी वाहणारा शेर्पा पुढचा चढ चढण्याच्या तयारीत असलेला दिसतो. २०२० सालाचं जणू हे सूचनच असावं… अत्यंत खडतर अशा आयुष्याची, अनुभवांची कहाणी लोकांसमोर आणून केवळ भागत नाही तर कधी काळी वेगळ्या संदर्भातल्या, पण अतीव खडतर जीवनाला, प्रतिकूल परिस्थितीला स्वत:लाही तोंड द्यावं लागतं याचंच जणू सूचन!
वास्तविक २०१९च्या भरीव आणि समाधानकारक अशा कामगिरीनंतर ‘रोहन’ची २०२० सालाची सुरुवात तर, दमदार झाली. तीन वर्षं रखडलेल्या डॉ. अरुण टिकेकर यांच्या ‘इति-आदि’ या पुस्तक-प्रकल्पाने नव्या वर्षाची सुरुवात झाली. टिकेकर यांच्यासारख्या चोखंदळ आणि काटेकोर व्यक्तीचं पुस्तक त्यांच्या पश्चात प्रसिद्ध करणं हे अतिशय जबाबदारीचं काम होतं. ते काम मी अनेक घरगुती अडचणींचा सामना करत पूर्ण केलं. जानेवारीच्या मध्यात माझी आई व रोहन प्रकाशनाची भागीदार मीना चंपानेरकर हिचं अनपेक्षितपणे गंभीर आजारपण उद्भवलं. (१३ फेब्रुवारी रोजी तिचं दु:खद निधन झालं.) ‘इति-आदि’ टिकेकरांच्या वाढदिवशी, म्हणजे १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करायचं ठरलं होतं. टिकेकरांच्या जिव्हाळ्याच्या अशा ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या दरबार हॉलमध्ये अत्यंत भारदस्त कार्यक्रमात ते पुस्तक प्रसिद्धही झालं. पाठोपाठ प्रणव सखदेव लिखित प्रयोगशील कादंबरी ‘९६ मेट्रोमॉल’ प्रसिद्ध झाली. वास्तविक प्रणवची ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही प्रसिद्ध झालेली पहिली कादंबरी. पण ‘९६ मेट्रोमॉल’ ही त्याची लिहून पूर्ण झालेली पहिली कादंबरी होय. पुढे लगोलग महाराष्ट्राचे आणि देशाचे मान्यवर नेते यशवंतराव चव्हाण यांच्या डॉ. जयंत लेले यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतींचा महत्त्वपूर्ण ग्रंथ (संपादन : डॉ. प्रकाश पवार) यशवंतरावांच्या वाढदिवशी १२ मार्चला मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात माननीय श्री शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाला.
जॉन स्टाइनबेक यांची ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ ही जगप्रसिद्ध कादंबरी. त्या कादंबरीचा मराठी अनुवाद करण्याचं आव्हानात्मक काम मिलिंद चंपानेरकर यांनी अभ्यासपूर्णरीत्या, मोठ्या जिकीरीने आणि परिश्रमपूर्वक पूर्ण केलं होतं. या ६७५ पानी पुस्तकाचं पुढचं काम मीही प्राधान्याने सुरू केलं होतं. पुस्तक तयार होऊन आलं ते १८ मार्च रोजी… महाराष्ट्रात जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी! पुस्तकाच्या प्रती स्वीकारण्यापुरतं ऑफिसचं शटर उघडलं गेलं… आणि नंतर पाठोपाठच्या लॉकडाऊन्समध्ये ही सर्व चार पुस्तकं तीन-चार महिने बंदीवान म्हणून राहिली.
या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ (WFH) या गोंडस नावाच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये ‘टीम रोहन’चं काम सुरू राहिलं. पण पुस्तक प्रकाशनाचं काम असं सलग WFH पद्धतीने करून फारसं पुढे जात नाही. पण या काळात आम्ही धीर सोडला नाही. नव्या पुस्तकांची कामं करता करता काही ई-बुक्स मार्गी लावली. पुस्तकाचं, वाचनाचं वातावरण टिकून राहण्याच्या दृष्टीने आमच्या पुस्तकांची माहिती देणारे ‘पॉडकास्ट’ प्रसृत केले. ‘गपशप दिलसे’ फेसबुक लाइव्हचे कार्यक्रम सुरू केले. त्यात सातत्य राखलं. त्यामुळे ‘रोहन प्रकाशन’ समाजमाध्यमात आघाडीवर राहिलं, चर्चेत राहिलं. सद्य परिस्थितीच्या अनुषंगाने काही नवे विषय हाताळावेत, यासाठी झूमवर आमच्या चर्चा होत राहिल्या. त्यातूनच निर्माण झाला ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’- हा आठ लिहित्या लेखकांच्या आठ कथांचा संग्रह. हे पुस्तकं संकल्पनेपासून लिखाणापर्यंत आणि पुढे प्रकाशनापर्यंत केवळ अडीच महिन्यांत साकार झालं. संकल्पनेपासून संपादनापर्यंत टीमपैकी अनुजाचा या पुस्तकात सहभाग होता. या पुस्तकाची साहित्य क्षेत्रातील लोकांनी चांगलीच दखल घेतली. करोनाकाळात निर्भयतेने, आत्मविश्वासाने कामासाठी बाहेर पडता यावं यासाठी चार पुस्तकांची उपयुक्त ‘अनलॉक’ मालिका अशीच शीघ्रगतीने साकारली गेली. संकल्पनेपासून प्रत्यक्ष निर्मितीपर्यंत सर्व काही अल्पावधीत साध्य केलं गेलं. त्याचप्रमाणे विश्राम गुप्ते लिखित त्रिधारेतील ‘ऊन’व ‘ढग’या उर्वरित दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या.
हे सर्व आम्ही साध्य केलं खरं, पण पुस्तकांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे, हे सत्य अबाधित राहतं. सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत ‘सस्पेन्स स्टोरीज’ वाचकांना आकर्षून घेतील असा विचार मनात आला. श्रीकांत बोजेवारांनी ‘अगस्ती’नावाच्या आजच्या काळातील डिटेकटव्हच्या तीन रहस्यकथा आमच्या हाती दिल्याच होत्या. तेव्हा या रहस्यकथा आम्ही ‘फास्ट-ट्रॅक’ वर टाकल्या. आणि दसऱ्याच्या दिवशी या अगस्ती मालिकेने सीमोल्लंघन केलं. या दरम्यान एक चांगली संधी चालून आली. माझ्या स्नेही अपर्णा वेलणकर यांच्या ओळखीने अमेरिकास्थित धनंजय जोशी लिखित ‘सहज’ हे निर्मितीचं वैशिष्ट्य असलेलं पुस्तक प्रकाशित करण्याविषयी विचारणा झाली. झेन तत्त्वज्ञान आणि दैनंदिन जीवन यांची सहज सांगड घालून ललित शैलीत लिहिलेलं हे अनुभवकथन सहजपणे बरंच काही सांगून जातं. दसऱ्याच्या दरम्यान या पुस्तकानेही सीमोल्लंघन केलं.
तेव्हा २०२० हे सर्व जगाची कठीण परीक्षा घेणारं वर्ष ‘रोहन’साठीही अर्थातच कठीण गेलं. पण तरीही आम्ही जिद्दीने काम करून, चांगले प्रकल्प राबवून काही पुस्तकं प्रसिद्ध केली, हे समाधान नसे थोडके! या कठीण समयी काळाची पावलं ओळखून आम्ही भविष्यासाठीही काही वेगळ्या योजना आखल्या आहेत आणि त्यांची कार्यवाही सध्या चालूच आहे. शेवटी कसोटी पाहणारा काळच आपल्या हातून काही भविष्यवेध घेणारी कामगिरी करून घेत असतो, हेच खरं.
…
‘देवाला वाहून टाकलं…’ असं म्हणण्याचा एक प्रघात आहे. करोना विषाणूने त्या प्रघाताला अनुसरून २०२० हे साल जवळजवळ पूर्ण जगालाच ‘देवाला वाहून टाकायला’ लावलं आहे. पण ‘एक वर्ष आयुष्यातून निसटलं’ एवढीच या आपत्तीची व्याप्ती नाही. झालेले आघात दूरगामी आहेत. तेव्हा २०२१ या नववर्षाच्या सुरुवातीपासूनच ‘कामाला वाहून घेतलं…’ असं म्हणत नववर्षाचं स्वागत करूयात.
– प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित :रोहन साहित्य मैफल जानेवारी २०२१
रोहन शिफारस
सहज
आलेल्या क्षणाला सहज सामोरं जाणं हे तत्त्व झेन तत्त्वज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक मानलं जातं. या तत्त्वाचं आचरण करण्यासाठी शिकागोस्थित लेखक धनंजय जोशी यांनी भारतातून, थायलंडमधून आणि दक्षिण कोरियातून अमेरिकेत आलेल्या बौद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विपस्सना (विपश्यना) आणि झेन मेडिटेशन या दोन्ही अध्यात्मपरंपरांची प्रदीर्घ काळ साधना केली. एवढंच नव्हे तर त्यांनी झेन तत्त्वज्ञान आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालून ललितशैलीत अनुभवकथन लिहिलं. त्याचंच हे पुस्तक म्हणजे ‘सहज’. एखाद्या मित्राने किंवा जवळच्या व्यक्तीने त्याला आकळलेली शहाणीव जाता जाता आपल्याला सांगून जावी, असा अनुभव देणारं पुस्तक…
₹250.00Add to Cart
आवर्जून वाचावं असे
रोखठोक, बेधडक तरीही आनंद देणारं ‘नाइन्टीन नाइन्टी’
लेखकाची शब्दकळा बघितली की वाटतं, हा जन्मत: लिहिणारं बोट घेऊन आलाय अन् त्याने त्याची जाणीवपूर्वक मशागत केलीय…
द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या दीर्घ संवादातून साकारलेलं पुस्तक :
‘भारत : समाज आणि राजकारण’ पुस्तकातील निवडक भाग
”आपण तयार केलेली राज्यघटना आपल्या समोर असलेल्या समस्यांवर तोडगे देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. खरं सांगायचं तर भारताच्या राज्यघटनेच्या विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण अध्यायात असलेली निर्देशक तत्त्वं अमलात आणण्यात अडचण आहे…”