जाणकार वाचक जेव्हा पुस्तकाविषयी अभिप्राय पाठवतात, तेव्हा खरंच आनंद होतो. ‘नाकारलेला’ या पुस्तकाविषयी मेधा रानडे यांनी लेखक विलास मनोहर यांना पत्र लिहून पुस्तकाबद्दलचा अभिप्राय कळवला आहे. तोच अभिप्राय इथे देत आहोत. मनापासून धन्यवाद मेधाताई!
मा. विलास मनोहर,
सप्रेम नमस्कार,
आपले नुकतेच प्रकाशित झालेले ‘नाकारलेला’ हे पुस्तक वाचले. तुम्ही पूर्वी लिहिलेले ‘एका नक्षलवाद्याचा जन्म’ हे पुस्तक वाचले होतेच. गडचिरोली म्हणजे नक्षलग्रस्त भाग , तिथे होणारे सुरुंगाचे स्फोट ,सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यामध्ये होणाऱ्या चकमकी आणि त्यात होणारी मनुष्यहानी हे आमच्यासारख्या सामान्य व्यक्ती नेहमीच वाचत असतात. कादंबरीचा नायक म्हणजेच लालसूला २० वर्षानंतर पुन्हा त्या भागात पाठवून तुम्ही त्या जिल्ह्यातील आदिवासींच्या स्थितीचे अनेक पैलू समोर आणले आहेत आणि ते सगळे अजूनच कोड्यात टाकणारे आहेत. या सगळ्यामध्ये आदिवासींचा काही दोष असेल तर तो इतकाच की दुर्दैवाने ते त्या भागातील रहिवासी आहेत आणि त्यामुळे धारदार अशा कात्रीत सापडले आहेत या सर्वामध्ये काही बदल होण्याची शक्यता नजीकच्या भविष्यामध्ये तरी दिसत नाही .
लालसूला केंद्रस्थानी ठेऊन तुम्ही कादंबरीच्या कथानकामधे सर्वांचीच बाजू मांडली आहे त्यामुळे वाचकाला तिथल्या परिस्थितीचे व्यवस्थित आकलन होऊ शकते. ज्या आदिवासी व्यक्तींवर अन्याय होतो आहे त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं लालसूला वाटलं तरी त्याला प्रोत्साहन मिळत नाही आणि आपलं सुखाचं आयुष्य पणाला लावून कोणीच ते करू शकणार नाही हे ही मनोमन पटतं.
लालसू जेव्हा दादा लोकांना भेटायला जातो तेव्हाचे वर्णन वाचून ते प्रत्येक बाबतीमध्ये किती गोपनीयता ठेवतात हे कळू शकले. सुरक्षा दल आणि नक्षलवादी या दोघांचे खबरे विविध धोके पत्करून संदेश वहन अतिशय जलदगतीने करत राहतात हे वाचून नवल तर वाटलेच पण या सगळ्यातली अपरिहार्यता लक्षात आली.
कादंबरीचा नायक विविध प्रकारच्या द्वंद्वात/ दुविधेत सापडलेला दिसतो. एकीकडे त्याला वाटते की आपल्या आईने ,बहिणीने अंधश्रद्धा बाळगू नयेत, त्याच्या आहारी जाऊ नये पण शेवटी अशाच एका अंधश्रद्धेचा आधार घेऊन तो परत आपल्या सुरक्षित जीवनाकडे परत फिरतो. लेखक म्हणून तुम्ही हा विरोधाभास कथानकात छान आणला आहे.
वर्षानुवर्षे त्याच भागात कार्यरत असल्यामुळेच तुम्ही अनेक बारकाव्यांसह ही कादंबरी लिहू शकलात. कादंबरीतील अनेक प्रसंग तसेच पात्रे यांची गुंफण छान झाली आहे. कादंबरीच्या शेवटी परत एकदा लालसू आणि कोमटीची भेट घडवून तिथल्या वास्तवाची जाणीव करून देऊन तुम्ही वाचकाला हलकासा धक्का दिला आहे.
इथून पुढे जेव्हा जेव्हा वर्तमानपत्रात यासंबंधीच्या बातम्या येतील तेंव्हा तेंव्हा कादंबरीतले प्रसंग डोळ्यापुढे तरळत राहतील आणि त्यातील सर्वांचीच हतबलता सामोरी येईल यात शंका नाही.
- आ. वि.
मेधा रानडे