एखादा चांगला समीक्षक मनानं अत्यंत रोमँटिकसुद्धा असेल, तर तो कसं लिहील? याचं उत्तम उदाहरण द्यायचं, तर समोर येतं ते डॉ. आशुतोष जावडेकर यांचं ‘वा! म्हणताना…’हे पुस्तक ! एरवी समीक्षेचं पुस्तक म्हटलं की, सामान्य वाचकच काय, साहित्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीसुद्धा ते पुस्तक कोरडं, एखाद्या पोस्टमॉर्टेमच्या अहवालासारखं भावनाशून्य असेल असं समजतात. मात्र ‘वा! म्हणताना…’ हा या वास्तवाला मोडीत काढणारा एक सुखद अपवाद आहे.
दोन वर्षांपूर्वी डॉ. आशुतोष जावडेकर यांचा ‘वा! म्हणताना’ हा स्तंभ दै. लोकसत्तामध्ये प्रसिद्ध होत होता. त्या वेळी तो वाचतानाच त्यातलं वेगळेपण लक्षात येत होतं. एखाद्या मित्राशी पुस्तकांबद्दल गप्पा मारतो आहोत, असं ते सदर वाचताना वाचकांना वाटत असायचं. खरंतर एखाद्या पुस्तकाचं वाचन हा त्या त्या वाचकाचा अत्यंत वैयक्तिक अनुभव असतो. किंबहुना पुस्तकातून प्रत्येकाच्या मनात उभं राहणारं जग प्रत्येकाला वेगवेगळं दिसणं, हेच तर चांगल्या ललित पुस्तकाचं शक्तिस्थळ असतं. आपल्या मनातल्या या जगाबद्दल इतरांना सांगता येतं का? स्वत:च्या या खाजगी जगाला शेअर करण्याजोगा मित्र किंवा मैत्रीण प्रत्येकाला नसते. मग त्यातले बारकावे समजू शकणारी, ते उलगडून दाखवणारी व्यक्ती मिळणं तर दूरच. आपल्याला न दिसलेल्या त्यातल्या नव्या गोष्टी कशा उलगडणार? ते तर दूरच राहिलं ना. सुदैवानं ‘वा! म्हणताना…’च्या रूपाने वाचकाला असा मित्र सापडतो. आणि ते वाचताना याची प्रकर्षाने अनुभूती वारंवार येते. एखाद्या पुस्तकातल्या आपल्याला भावलेल्या गोष्टी, बारीकसं सौंदर्यस्थळ दुसऱ्यालाही तसंच भावलेलं आहे, हे पाहून आनंद होतो, तर अनेकदा एखादी गोष्ट आपल्याला कधीच कशी जाणवली नाही, याचं आश्चर्यही वाटतं. (उदा. ‘सावित्री, रेगे आणि राजकारण’ हा लेख). इंदिरा संतांच्या कवितेकडं मार्क्सवादाच्या नजरेतून पाहता येईल; आणि व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखनातली पुरुषी रगेलपणाची लक्षणं पाहता येतील, याची एरवी कधी आपण कल्पना तरी केली असती का?
जगातला कुठलाही कानाकोपरा असो, माणसाच्या आदिम जाणिवा, इच्छा-आकांक्षा आणि जाणिवा सारख्याच असतात. त्याला येणारं हसू आणि रडू यांमागच्या प्रेरणा सारख्याच, वैश्विक असतात. साहित्यातली एखादी गोष्ट आपल्याला खोलवर का भिडते, हे लेखक आपल्याला सहजरीत्या, त्याच्या फसफसत्या उत्साही शैलीत उलगडून दाखवतो. वाचताना ‘अरेच्चा! हे आपल्याला या रूपात दिसलंच नव्हतं’ किंवा ‘यामागं अमुक कारण होतं होय,’ असं जाणवत राहतं. मात्र, साहित्यामागची ही उकल करून सांगताना ‘ही आदिबंधात्मक समीक्षा होती,’ वगैरे बुद्धिवादी आव लेखक अजिबात आणत नाही, किंबहुना हे लेखन बोजडपणाला टाळणारंच आहे म्हणूनच ते आपलंसं वाटतं. ते सहज, प्रवाही असल्याने आपण वाचत पुढे पुढे जातो.
डॉ. जावडेकर यांनी केवळ ललित साहित्य किंवा क्लासिक्स यांचाच आढावा या पुस्तकात घेतलेला नाही, तर रूढ परिघाबाहेरचे अनेक विषयही त्यांनी यात हाताळलेले आहेत. मग त्या विनायक येवलेंसारख्या नव्या कवीच्या कविता असोत, की संभाजी भगतांचा पहाडी आवाजातला पोवाडा! समीक्षाजगतातल्या बोजड संज्ञा न वापरताही लेखक आपल्याला त्या पुस्तकांमधली सौंदर्यस्थळं दाखवत जातो. डिकन्स्ट्रक्शनसारख्या बोजड संज्ञा मुद्दामच टाळल्या आहेत. समीक्षेची परिभाषा न वापरताही लेखकाने अनेक लेखकांच्या शैलीचं, आणि त्या त्या लेखनामागच्या भावभावनांचं मर्म उलगडून दाखवलं आहे. समीक्षा आणि आस्वाद यांमधली धूसर सीमारेषा कुठं आहे, हे लेखकाने नीटच जाणलं आहे. हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यविश्वाचा घेतलेला आस्वाद आहे, नुसतं त्याचं ऑडिट नव्हे. लेखकाला असलेली जागतिक संगीताची आणि साहित्याची जाण, त्या जाणिवेच्या भिंगातून लेखक आजच्या मराठी साहित्याविश्वाकडं पाहताना आपल्याला दिसत राहतो. लेखांची ‘ललित म्हणजे काय रे भाऊ’ किंवा ‘बॉब डिलन ते उरीपाटण’ ही नावं पुरेशी बोलकी आहेत.
यात ‘ग्रेसांचा रॅप’मध्ये कवितेवर जितक्या उत्कटतेने लिहिलेलं आहे, तितक्याच प्रेमाने ‘हा तेल नावाचा इतिहास आहे’ सारख्या तथ्याधिष्ठित पुस्तकावरही… फास्टर फेणेवर जितक्या बारकाव्यांनिशी लिहिलं आहे, तितंकच लंपनविषयीही! यात झुंपा लाहिरी आहेत, अन् विश्राम बेडेकरही, ज्ञानेश्वर आहेत अन् पाडगावकरही! शब्दांच्या भाषेवर लेखकाचा मुख्य भर असला, तरी तो संगीतासारख्या अन्य माध्यमांच्या आणि अगदी ‘इमोजीज’च्या भाषेलाही कमी लेखत नाही. आपल्या लेखाने नकळत कुणी क्वचित दुखावलं गेलं, याने तो हळवाही होतो. अशा वेळी नैतिकता आणि समीक्षेचं कर्तव्य यांमधला पेचप्रसंग यांचं कोडं सोडवू पाहतो.
परिचित गोष्टींची पुनर्भेट आणि त्याचवेळी नव्या, वेगळ्या नजरेने गोष्टींची केलेली उकल या दोन्हींचा आनंद मला या पुस्तकातून मिळाला. पुस्तक वाचताना तुम्ही मेंदूऐवजी हृदयाचा वापर करत असाल, तर ‘वा! म्हणताना…’ला चुकवून चालणार नाही.
-सुश्रुत कुलकर्णी
‘वा! म्हणताना… / लेखक- आशुतोष जावडेकर / रोहन प्रकाशन
- मला आवडलेली इतर काही पुस्तकं
- मौनराग / लेखक- महेश एलकुंचवार / मौज प्रकाशन.
- स्टुडिओ / लेखक- सुभाष अवचट / पॉप्युलर प्रकाशन.
- वाद्यवेध / लेखक- भास्कर चंदावरकर / राजहंस प्रकाशन.
- खरं सांगायचं तर…/ लेखक- करण जोहर, सहलेखन : पुनम सक्सेना
अनुवाद : नीता कुलकर्णी / रोहन प्रकाशन.
- बिंदूत खूप जागा आहे / लेखक- प्रिया जामकर / कॉपरकॉइन प्रकाशन.
- प्रतीक / लेखक- मृणालिनी वनारसे / मेनका प्रकाशन.
- टांकसाळीतली नाणी / लेखक- मुकुंद टाकसाळे / मॅजेस्टिक प्रकाशन.
- असा घडला भारत / संपादन : मिलिंद चंपानेरकर, सुहास कुलकर्णी / रोहन प्रकाशन.
- पायऱ्यांचा गेम / लेखक- प्रणव सखदेव / अमलताश बुक्स.
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०२०
रोहन शिफारस
वा! म्हणताना…
‘‘माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’ -डॉ. आशुतोष जावडेकर
₹250.00Add to Cart
जाणून घ्या लेखक आशुतोष जावडेकर यांच्या विषयी…
संगीत, साहित्य, वैद्यकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये लीलया मुशाफिरी करणारं तरुण व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. आशुतोष जावडेकर यांची ख्याती आहे.