आयुष्यात ज्या काही सुंदर गोष्टी आल्या आणि ज्यांनी एक अनमोल आनंद दिला त्यांतली एक प्रमुख गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळामधली अवीट गोडीची गीतं. सुरांइतकंच माझं शब्दांवरही मनापासून प्रेम आहे. कदाचित हेच ते कारण असेल ज्यामुळे ‘रहे ना रहे हम’ हे रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेलं डॉ. मृदुला दाढे-जोशी लिखित पुस्तक मला प्रचंड आवडलं.
डॉ. मृदुलांनी सुवर्णकाळातल्या संगीतकारांच्या संगीताची समीक्षा या पुस्तकात केली आहे, व मी त्या काळाची साक्षीदार असल्याने त्यांनी या विषयात किती खोलवर शिरून विविध अंगांनी या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा विचार केला आहे हे मला पूर्णपणे जाणवलं. वास्तविक विज्ञान-संशोधन हे माझं क्षेत्र. म्हणूनच बहुतेक मला या पुस्तकाचं लिखाण हे संशोधनात्मक वाटलं असावं. आणि म्हणूनच अनेक गाण्यांचं बारकाईने केलेलं विश्लेषण हे मनाला विशेष भावलं. अशा प्रकारचं गाण्यांचं केलेलं अभ्यासपूर्ण विवेचन गाण्यातली अनेक-सौंदर्यस्थळं दाखवत, गाण्यांची मर्मस्थळं उलगडत जातं.
लेखिकेचा एक दृष्टिकोन मला फार आवडला तो म्हणजे या संगीतकारांच्या मर्यादांबद्दल न बोलता त्यांच्या संगीतातलं जे चांगलं वाटलं त्याचाच फक्त त्यांनी विचार केला. प्रत्येक गीतामध्ये शब्द कसे योग्य वापरले गेले आहेत, स्वररचना, वाद्यमेळ यांचा परिणाम गीतामध्ये कसा दिसतो, त्या गीताचं गायकांनी कसं सोनं केलं आहे हे तर त्या सांगतातच, पण त्यांना स्वत:ला शास्त्रीय संगीताचं सखोल ज्ञान असल्याने त्या अंगानेही त्यांनी गीतांचं सुंदर विवेचन केलं आहे. प्रत्येक संगीतकाराची पार्श्वभूमी, त्यांच्यावर झालेले संगीताचे संस्कार, यांचा त्यांच्या स्वररचनांवर झालेला परिणाम, याचंही सखोल निरीक्षण या पुस्तकात आहे. एखाद्या गीताचे वेळी चित्रपटामध्ये जसा प्रसंग असेल, त्यासंबंधीचे ‘भाव’ गीताच्या स्वररचनेतून कसे व्यक्त झाले असतील, याचाही विचार लेखिकेने केला आहे.
लेखिकेला संगीताची जाण तर आहेच, पण तिला काव्याचीही तितकीच जाण आहे, हे विविध उदाहरणांतून कळून येतं. गीतासाठी कोणती वाद्यं वापरली आहेत आणि कुठलं वाद्य गीतामध्ये केव्हा वाजतं हे वाचताना वाद्यांची त्यांना केवढी जाण आहे, हेही पूर्णपणे कळतं आणि भावतंही. त्यांच्या लेखनशैलीची काही उदाहरणं इथे द्यावीशी वाटतात…
शंकर-जयकिशन यांच्या संदर्भात त्या म्हणतात– ‘‘गाण्यांमधून कथा प्रकट व्हावी, त्या कॅरेक्टर्सना चेहरा मिळावा, आपण त्यांच्यात गुंतावं, असे कित्येक क्षण एसजेंची गाणी बघताना मिळतात. ‘दिल की गिरह खोल दो’ मधली ‘ग्रेस’ किती वेगळी आहे. संपूर्ण गाण्याचा प्रवाहीपणा जबरदस्त आहे. पहिल्या आलापानंतर लताबाई ‘मेहफिल’ या शब्दावर जी झेप घेतात ती विलक्षण आहे. आधी वॉल्ट्झवर चालत असलेला ठेका नंतर तबल्यात परिर्वितत होतो. अंतऱ्याच्या आधीच्या इंटरल्यूडमध्ये व्हायोलिनची गुंफण, फेड आऊट होत जाणं आणि तबल्याची उठावण घेऊन अंतरा सुरू होणं, हे एका प्रवाहात येतं.’’
एस. डी. बर्मन यांच्या संदर्भात त्या म्हणतात– ‘‘अनेक रागांच्या अभिजात चौकटीत बर्मनदांची स्वरनिर्मिती सजली. अनेक उपशास्त्रीय गायनशैली त्यांच्या गाण्यामध्ये आपलं सुरेल अस्तित्व दाखवून गेल्या. गाण्यातल्या एखाद्या ‘अक्षराला डोलवणं’ ही एक सुंदर खासियत त्यांच्या गाण्यात दिसते. तालाच्या नेहमीच्या ठेक्याला काहीसं चकवणारं स्वरूप देणं, हा तर बर्मनदांच्या डाव्या हातचा खेळ. त्यामुळे शब्दांना खूप वेगवेगळ्या वजनांनी ओळीत मांडता येतं. पण हे ऐकायला जेवढं सहज वाटतं तेवढं सुचणं आणि गाऊन, वाजवून घेणं सोपं नाही. जसं– ‘‘ ‘जलते है जिसके लिये’मध्ये – ‘दिल में रख लेना इसे । हाथों से ये । छूटे ना कहीं । गीत नाजूक है मेरा । शीशे से भी । टूटे ना कहीं ।’ असं विभाजन करणं किंवा ‘दी । वा । ना । म । स्ता । ना’ अशी अक्षरं विभागणं.’’
मदन मोहनविषयी त्या म्हणतात, ‘‘काही वेळा उदासीसुद्धा विलोभनीय होऊ शकते आणि त्यामुळेच अस्वस्थता मन व्यापून उरते, याचा प्रत्यय मदनमोहनजींची गाणी देतात. विरहगीतांना मदनमोहनजींचा ‘मिडास टच’ लाभला की, त्याचा परिणाम खोलवर होणारच! ‘दो दिल टूटे, दो दिल हारे’ हे हीर रांझा’तलं गाणं म्हणजे दुखावलेल्या प्रेमिकेच्या तडफडणाऱ्या जिवाचं आक्रंदन ! म्हणूनच गाण्याच्या सुरुवातीला चक्क एक उसासा ऐकू येतो. सतार आणि (अ)शुभसूचक शहनाई, या सगळ्या विलापात भर घालतात आणि प्रत्येक ओळीनंतर बासरी हळुवार फुंकर घालते.
अशा प्रकारे पुस्तकात एकूण बारा संगीतकारांच्या संगीतातली आणि त्यांच्या काही गाण्यांतली मर्मं नेमकेपणे उलगडून सांगताना असं रसाळ वर्णन पानापानांमधून दिसत राहतं.
या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील अनेक दुर्मीळ छायाचित्रं आणि त्यांना रसिकतेने दिलेली समर्पक कॅप्शन्स. त्याचप्रमाणे पुस्तकाचं बोलकं मुखपृष्ठ आणि पुस्तकाची सर्वांगसुंदर अशी निर्मिती, हेही वैशिष्ट्य वाखाणण्यासारखं आहे.
आतापर्यंत मी ही अवीट गोडीची गाणी वर्षानुवर्षं ऐकत आले, पण हे पुस्तक वाचल्यानंतर एखादं गाणं ऐकताना मी ते गाणं त्यांच्या नजरेतून ऐकणार आहे. खरं तर काही गाणी ऐकलीही, पाहिलीही आणि आता ती अधिक सुंदर वाटू लागली आहेत. त्यांतला गोडवा, बारकावे, वाद्यांचं अस्तित्व हे आता मनाला खोलवर स्पर्श करत आहे. मला वाटतं, हेच या पुस्तकाचं खूप मोठं यश आहे.
– डॉ. वर्षा जोशी
रहें ना रहें हम / डॉ. मृदुला दाढे-जोशी / रोहन प्रकाशन
- मला आवडलेली इतर काही पुस्तकं
- सुन मेरे बंधु रे – एस.डी. बर्मन / लेखक- सत्यासरन / अनु. मिलिंद चंपानेरकर / रोहन प्रकाशन.
- अटलजी / लेखक- सारंग दर्शने / राजहंस प्रकाशन.
- एक मुठ्ठी आसमाँ / लेखक- शोभा बोंद्रे / रोहन प्रकाशन.
- दीड-दमडी (१. राजकीय, २. अ-राजकीय) / लेखक- तंबी तुराई (श्रीकांत बोजेवार) / रोहन प्रकाशन.
- करके देखो / संपा. सदा डुंबरे / समकालीन प्रकाशन.
- टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न / मूळ लेखक- सॅम पित्रोदा / अनु. शारदा साठे / रोहन प्रकाशन.
- गांधींनंतरचा भारत / मूळ लेखक- रामचंद्र गुहा / अनु. शारदा साठे / मॅजेस्टिक प्रकाशन
- लोककवी साहिर लुधियानवी / मूळ लेखक- अक्षय मनवानी / अनु. मिलिंद चंपानेरकर / रोहन प्रकाशन.
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०१९
रोहन शिफारस
रहें ना रहें हम
हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ… या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते? प्रत्येक संगीतकाराचा बाज वेगळा कसा? त्याची वैशिष्ट्यं कोणती? त्यांची अजरामर गाणी कोणती? त्या गाण्यांच्या चालींची, ऑर्केस्ट्रेशनची वैशिष्ट्यं कोणती? त्यातील हरकतींचं, केलेल्या प्रयोगांचं महत्त्व काय? त्यांतील कोणत्या जागा म्हणजे त्या गाण्यांची सौंदर्यस्थळं म्हणता येतील? एकंदर सांगायचं तर, ही गाणी आपल्यावर ४०-५०-६० वर्षं कसं काय गारूड करू शकतात हे नेमकेपणे सांगून, रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच… हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ मृदुला दाढे-जोशी लिखित एक आस्वादात्मक पुस्तक रहें ना रहें हम….
₹395.00Add to Cart