शेफाली वैद्य हे नाव सोशल मीडियावरच्या मंडळींना माहिती आहे ते त्यांच्या आक्रमक राजकीय भूमिकांबद्दल. त्या अनेकदा वादग्रस्तही असतात. मात्र, ‘घार हिंडते आकाशी’ या इंद्रायणी साहित्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं, या परिचित प्रतिमेपेक्षा अगदीच वेगळं रूप समोर येतं. ते आहे आजच्या युगात आपल्या तीन मुलांना घडवू पाहणाऱ्या, त्यांच्यात माणूसपण रुजवू पाहणाऱ्या संवेदनशील, सृजनशील मातेचं.
या छोटेखानी पुस्तकातील लेख हे शेफाली यांनी गोव्यातील ‘दैनिक हेराल्ड’मध्ये लिहिलेल्या सदरातून निवडण्यात आले आहेत. वृत्तपत्रीय सदरलेखनामध्ये तात्कालिकता हा दोष फार सहज उमटू शकतो. परंतु, शेफाली यांनी निवडलेला विषयच सार्वकालिक असल्याने आणि त्यांची मराठी भाषेवर अप्रतिम पकड असल्याने या पुस्तकातल्या लेखनाला तात्कालिकतेचा जराही बट्टा नाही. साक्षेपी लेखिका आणि संपादक दिवंगत कविता महाजन यांनी या पुस्तकासाठी लेख संपादित करून घेतल्यामुळे त्यातला सार्वकालिक आशय पारखुन घेतला गेलेला असावा. शेफाली यांचं लेखन ओघवतं आहे. त्या अगदी साध्या सहज भाषेत वाचकांशी गप्पा मारत असल्याप्रमाणे लिहितात. हे पुस्तक आहे मोठ्यांसाठी, पालकांसाठी. पण त्यातली अनेक प्रकरणं संस्कारक्षम वयातल्या मुलांना ‘गोष्टीं’सारखी वाचून दाखवता येतात आणि ती गोष्ट ऐकणारी मुलं आणि वाचून दाखवणारा पालक; या दोहोंनाही तिच्यातून काहीतरी शिकायला मिळतं, हे या पुस्तकाचं अनोखं वैशिष्ट्य आहे. (ते प्रस्तुत शिफारसकर्त्याच्या घरात मुलींसाठीच्या अभिवाचन-प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे.)
शेफाली या तिळ्या मुलांची आई आहेत. अर्जुन, आदित हे मुलगे आणि अनन्या ही मुलगी अशी ही तीन मुलं एकाच वेळी वाढवायची ही काय प्रकारची कसरत असेल, याची कल्पना एक मूल वाढवतानाही दमछाक झालेल्या कोणाही आई-वडलांना कळेल. त्यात शेफाली यांनी मुलांना जन्म दिला अमेरिकेत. तिथे त्यांना अपुऱ्या दिवसांची मुलं वाढवण्याचं दिव्य करावं लागलं. त्यांतल्या एकाला झालेल्या ‘क्लब फूट’वर उपचार करावे लागले. अमेरिका, गोवा, दुबई, पुणे अशा अनेक ठिकाणचे संस्कार घेत ही मुलं मोठी होत आहेत. या मुलांना वाढवताना आलेल्या छोट्या छोट्या अनुभवांवर आधारलेले लेख या पुस्तकात आहेत.
अतिशय व्यक्तिगत स्वरूपाच्या, आपल्या मुलांच्या वाढीभोवती गुंफलेल्या पुस्तकात एक दोष सहजगत्या येऊ शकतो. तो म्हणजे, फारच व्यक्तिगत तपशील देत बसून मुलांचं किंवा स्वत:चं अतिरेकी कौतुक करण्याचा. अशा लेखनावर ‘आम्हाला काही मुलं नाहीत का,’ ‘जगात यांनाच तिळं झालंय का,’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू शकतात. अनुभवाचा भाग नेमका किती सांगायचा आणि त्यातून मिळालेली शिकवण किंवा विचार कसा मांडायचा याचा परफेक्ट समतोल या पुस्तकात पाहायला मिळतो. त्यांनी कुठेही हा तोल ढळू दिलेला नाही.
त्याचबरोबर आणखी महत्त्वाचा विशेष म्हणजे बाजारात पैशाला पासरी झालेल्या ‘हाऊ टु’ पुस्तकांप्रमाणे हे पुस्तक उच्चासनावरून मार्गदर्शन केल्याची ‘संस्कारी’ भूमिका घेत नाही आणि ‘हाऊ टु रेझ चिल्ड्रन’ किंवा ‘हाऊ टु बिकम गुड पेरेंट्स’ असले उपदेशाचे डोस पाजत नाही. इथे एक आई आपल्या मुलांबरोबरचा काळ लेखणीतून जिवंत करते. मुळात ती मुलांना सतत काही शिकवत नाही, पोकळ उपदेश करत नाही. त्यांना कृतीतून शिकवण्याचा प्रयत्न करते आणि मुलांकडूनही शिकण्याचा प्रयत्न करते. आधुनिक पालकांच्या बाबतीत हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. लेखिकेला मुलांबरोबर भरपूर काळ व्यतीत करायला मिळाला आहे, तो सगळ्याच पालकांच्या नशिबी नसतो. मुलांबरोबर जो वेळ मिळतो त्यात त्यांना काही सांगायचं की त्यांचं ऐकायचं, असा प्रश्न पडतो आणि साहजिकच पालक मुलांना सतत काही ना काही सांगत राहतात. त्यांचं काही ऐकून घेत नाहीत. जिथे मुलांचं बोलणंच ऐकायला वेळ नाही तिथे मुलांच्या कृतींवर, शब्दांवर, प्रश्नांवर विचार करायला आणि त्यातून शिकायला वेळ कुठून मिळणार?
मुलांना वाढवण्याचा एक समाजमान्य पॅटर्न बनून बसला आहे. त्यांना उत्तमात उत्तम (म्हणजे काय तर बाजारात खपाऊ प्रॉडक्ट बनवेल असं) शिक्षण देणं, मुलांना वेळ देता येत नाही तर त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी टीव्हीचा रिमोट आणि मोबाइल त्यांच्या हातात देणं, त्यांना आवड आहे की नाही, इच्छा आहे की नाही, याचा विचार न करता त्यांना असंख्य प्रकारच्या क्लासेसना टाकून अष्टपैलू बनवण्याचा हट्ट धरणं, आयुष्याला रॅट रेस मानून त्यात मुलांना उतरवणं या सगळ्या कल्पनांच्या विरोधात जाऊन मुलांना वाढवण्याचं धाडस शेफाली यांनी चालवलं आहे. ‘मी माझा’ ही या युगाची थीम असताना शेफाली मुलांना समाजाचं दायित्व समजावू पाहतात, कपड्यांवरून माणसांची परीक्षा करायची नाही, सामाजिक स्तर पाहून मैत्री करायची नाही, सतत आपल्याला काहीतरी हवं आहे, याचा हव्यास न धरता काही देण्यातला आनंद लुटायचा. असे अनोखे भासतील असे संस्कार त्या मुलांवर करतात आणि मग ‘बोले तैसे चालण्या’चं बंधनही पाळतात. मुलांच्या अनेक प्रतिक्रिया त्यांच्या विचारचक्राला चालना देतात, त्यांना त्यांच्या बालपणात घेऊन जातात आणि तेव्हाच्या-आताच्या परिस्थितीशी तुलना करून काही निष्कर्षांना येतात. तेही त्या आक्रमकतेने मांडत नाहीत, हळुवारपणे समोर ठेवतात.
या अनोख्या आईचा तिच्या मुलांबरोबरचा अनोखा प्रवास अतिशय लोभस आहे. तो वाचकाला वाचनाचा आनंद देतो आणि अंतर्मुखही करतो. आदित, अर्जुन आणि अनन्या यांच्या पाठमोऱ्या छबीचं मुखपृष्ठ या पुस्तकाच्या व्यक्तिगत असूनही गळेपडू न झालेल्या स्वरूपाशी सुसंगतच आहे.
-मुकेश माचकर
घार हिंडते आकाशी / लेखक- शेफाली वैद्य / इंद्रायणी साहित्य प्रकाशन
- मला आवडलेली इतर काही पुस्तकं
- बदलती पत्रकारिता / लेखक- कामिल पारखे / सुगावा प्रकाशन.
- लोककवी साहिर लुधियानवी / लेखक- अक्षय मनवानी, अनुवाद : मिलिंद चंपानेरकर / रोहन प्रकाशन.
- अल्बर्ट आईनस्टाईन / लेखक- चैताली भोगले / कनक बुक्स.
- खरं सांगायचं तर… करण जोहर / सहलेखन : पुनम सक्सेना, अनुवाद : नीता कुलकर्णी / रोहन प्रकाशन.
- महाराष्ट्र दर्शन / संपादक : सुहास कुलकर्णी / समकालीन प्रकाशन.
- रस्किन बाँड संच / अनुवाद : नीलिमा भावे, रमा सखदेव हर्डीकर / रोहन प्रकाशन.
- द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फ*क / लेखक- मार्क मॅन्सन / मधुश्री पब्लिकेशन
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०२०