लंडनच्या इतिहासाशी आपला (म्हणजे जगाचा) संबंध काय? लंडनचं मुंबईशी नातं काय? आणि मराठी वाचकांना लंडनच्या जडणघडणीत रस घेण्याचं कारणंच काय? स्थापत्य आणि नगरनियोजनशास्त्राच्या अभ्यासक सुलक्षणा महाजनलिखित ‘लंडननामा’ उघडण्यापूर्वी काहींना हे प्रश्न पडतात. पडू शकतात. पण क्षणभरच.
एरवी, प्राचीन शहर-महानगरांचा इतिहास कॉफी-टेबल-बुक किंवा सनावळ्यांमध्ये अडकून राहतो. सुलक्षणा महाजन मात्र, मुंबईच नव्हे, तर अवघ्या जगाच्या नागरी संस्कृतीवर प्रभाव टाकणाऱ्या लंडन शहराचा रोमहर्षक भूतकाळ निवडक छायाचित्रांसह अत्यंत सहजपणे उलगडत जातात.
तब्बल दोन हजार वर्षांचा विशाल पट असलेल्या लंडनच्या संदर्भात काळानुरूप घडत गेलेली आथिर्क-सामाजिक-सांस्कृतिक- वैज्ञानिक प्रगतीची प्रक्रिया एक सलगपणे आपल्यासमोर उलगडत जाते. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून जागतिक घडामोडींचं केंदबिंदू असलेल्या प्रगत लंडनमध्ये कधीकाळी रोगराई, अनारोग्य, बकाली, गुलामगिरी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांच्याजोडीने गरीब-श्रीमंत भेद, स्थलांतरितांची परवड, कामगारांचं शोषण आणि नागरी सुविधांचा अभावही होता, हे वास्तवही पुस्तकाद्वारे आपल्यासमोर येतं. नवतंत्रज्ञानाच्या विकासाची प्रक्रिया महानगरातच का सुरू होते? कारखानदार आणि उद्योगांबद्दल समाजात नकारात्मक मानसिकता का रुजते? नवनिमिर्ती, तंत्रज्ञानाची क्रांती या गोष्टी नगरांच्या अवकाशातच का घडतात? आधुनिक काळात पिच्छा पुरवणाऱ्या आदी प्रश्नांची उत्तरं आपल्याला ‘लंडननामा’ मधून सापडतात.
१६६२ साली प्रथमच लंडन इथे विज्ञानवृत्तीचा प्रसार करण्यासाठी रॉयल सोसायटीची स्थापना करण्यात आली… १८३० साली जगात पहिल्यांदा लंडनच्या रस्त्यांवर गॅसचे दिवे पेटवले गेले… १८५० साली चार्ल्स पिअरमन नावाच्या व्यवसायाने वकील असलेल्या पार्लमेंट सभासदाने जगात सर्वप्रथम मेट्रो रेल्वेची कल्पना मांडली आणि १८६३ साली लंडनमध्ये पहिली मेट्रो धावलीसुद्धा… १८८३ साली एडिसनच्या प्रयत्नाने लंडन इथे जगातलं पहिलं वीजनिमिर्ती केंद सुरू झालं… जॉन मकेडम या स्कॉटिश माणसाने लंडनमध्येच सर्वप्रथम रस्ते निमिर्तीच्या आधुनिक तंज्ञाचा शोध लावला… सिल्व्हिया पॉर्खस्टने सुरू केलेली स्त्रीमुक्तीची चळवळ लंडनमध्येच रुजली… इंग्लंड आणि लंडनचं महात्म्य अधोरेखित करणाऱ्या अशा असंख्य घटनांचा तपशीलही या पुस्तकांत आपल्याला जागोजागी सापडतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने इंग्लंडवर हवाई हल्ले केले. त्यातही लंडन हेच त्यांचं प्रमुख लक्ष्य होतं, पण या काळात लंडनच्या प्रशासनाने कलासक्त नागरिकांच्या मदतीने लंडनच्या वस्तुसंग्रहालयातल्या कलाकृतींचं जतन करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला, नव्हे तो अमलातही आणला. इंग्लंडच्या उत्तरेकडच्या ज्या वेल्स परगण्यातल्या दगडांच्या खाणीत या कलाकृती सुरक्षित ठेवायच्या होत्या, त्या खाणींपर्यंत पोचण्यासाठी विशेष रेल्वेलाइन टाकण्यात आली. रस्ते आणि पुलांचं नूतनीकरण करण्यात आलं. खाणींमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात येऊन युद्ध संपेपर्यंत या कलाकृतींचं आस्थेनं जतन करण्यात आलं. हे वर्णन वाचताना आपल्याकडे गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा, कलासंग्रहालयांबाबत शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरची अनास्था, वस्तुसंग्रहालयांची मोडतोड करण्याची विशिष्ट समाजघटकांची विध्वंसक वृत्ती याची आठवण झाल्यावाचून राहात नाही.
त्या अर्थाने हे पुस्तक फक्त ऐतिहासिक घटनांचा दाखला देऊन, नागरी प्रश्न मांडून थांबत नाही, तर नागरी संस्कृतीला प्रगत करणाऱ्या मानवी प्रेरणांचा, संकटांवर मात करणाऱ्या उपायांचा, शहराला आद्यपण बहाल करणाऱ्या योजनांचा तपशीलही पुरवतं. संकटं येणं, त्यांची कारणं शोधणं, त्यासंबंधी अभ्यास-संशोधन करून उपायांचा विचार आणि आखलेल्या योजनांची अग्रक्रमाने अंमलबजावणी करणं या खास ब्रिटिश कार्यशैलीची पुरेपूर ओळख करून देतं. याच ओघात आधुनिक काळात ज्ञानवंत-श्रमिकांचा वैश्विक समतोल राखण्यासाठी अत्यावश्यक अशा स्थलांतराच्या अपरिहार्य प्रक्रियेकडे बघण्याचा लंडनचा वेगळा दृष्टिकोनही मनावर ठसून जातो नि स्वत:च्या कार्य-क्षमतेवर विश्वास नसलेले, अस्तित्वाच्या भयगंडाने पछाडलेले राज्यकतेर्-प्रशासकच स्थलांतराच्या प्रक्रियेला विरोध करत असतात, हा संदेशही!
आधुनिक लंडनचा वेध घेताना लेखिका आपली ठाशीव मतंही नोंदवतात. १८४४ साली एंगल्स यांचं ‘द कंडिशन ऑफ वर्किंग क्लास इन इंग्लंड’ हे पुस्तक प्रकाशित झालं. या अहवालातील समग्र अभ्यासाची नोंद न घेता केवळ आयरिश लोकांच्या राहणीमानाच्या वर्णनाचा वापर करून क्रांतीचे तत्त्वज्ञान रचले गेले. या पुस्तकाच्या आधारे सुधारणा प्रक्रियेचा पर्याय सर्वस्वी नाकारून कामगार क्रांतीची अपरिहार्यता सिद्ध करणारे लिखाण पुढे कार्ल मार्क्स यांनीही प्रकाशित केले. लेखिकेचं हे विधान मार्क्सभक्तांना झोंबणारं आहे. ज्याप्रमाणे मुलाचं वाढतं वय रोखता येत नाही, त्याप्रमाणे शहराची वाढही रोखता येत नाही, हे वास्तवही त्या सहजपणे सांगून जातात. त्याचबरोबर नागरी उद्योगांचं, वर्तनाचं, नियमन करण्यासाठी सातत्याने संशोधन करून लोकशाही राज्यव्यवस्थे-मध्ये विकास घडवून आणण्याची (पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्रहित जोपासण्याची) परंपरा लंडनने निर्माण केली, याची आठवणही करून देतात. शहरनिमिर्ती, नागरी व्यवहार आणि परिस्थितीनुरूप बदलणाऱ्या मानवी प्रतिसादाची विलक्षण गुंतागुंतीची प्रक्रिया इझमच्या प्रभावाविना समजून घेतल्यामुळेच ऱ्हास आणि उत्कर्षाला कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीचं समतोल वर्णन लेखिका करू शकतात. त्या-त्या काळातल्या परिस्थितीची कल्पना देणारी आवश्यक तेवढी आकडेवारी या पुस्तकात देण्यात आली आहे. एका प्रकरणात मध्यम वर्गाच्या उदयाचा अदमास घेताना लेखिका इंग्लंडमधल्या साक्षरतेचे दाखले देतात. त्यानुसार १७०० साली इंग्लंडमधल्या साक्षरतेचं प्रमाण ४० टक्के, १८०० साली ५० टक्के, तर १९०० साली हे प्रमाण ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचलं होतं. आकडेवारी नजरेखालून घालताना आपल्या हेही ध्यानात येतं, की इंग्लंड आणि लंडनमध्ये ज्या वेगाने साक्षरता वाढली त्या प्रमाणात प्रशासन आणि राज्यकतेर् अधिकाधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि लोकोभिमुख झाले. नागरी सुधारणांना वेग आला.
एकूणच अकल्पित, अनपेक्षित संकटांतून दिमाखाने सावरणाऱ्या आद्य महानगर हा सार्थलौकिक असलेल्या लंडन आणि लंडनकरांचा हा इतिहास थक्क करून टाकणारा असाच आहे. एका अर्थाने, ही केवळ एका शहराची नव्हे, तर धर्मपरंपरा-संस्कृती, व्यापार-अर्थकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-तत्त्वज्ञान आदींच्या उत्क्रांती आणि उत्कर्षाच्या वैश्विक इतिहासाचीच चित्तवेधक कहाणी आहे.
समजा, ब्रिटिशांनी सर्वप्रथम आयरिश आणि मग इतर देशांतल्या, खंडातल्या, विविध जाती-धर्म आणि पंथाच्या लोकांना लंडनची दारं बंद केली असती, स्थानिक जनतेला मागासलेलं ठेवण्याचा कावेबाजपणा केला असता, तर काय घडलं असतं, असा उलटा विचारही पुस्तक वाचताना मनात येतो. तेव्हा हेच जाणवतं की, राज्यकर्त्यांच्या उदार दृष्टिकोनामुळे, प्रशासकीय -राजकीय क्षमतांमुळेच जगाला दिशा देणारं महानगर असा लंडनचा लौकिक निर्माण झाला. अन्यथा कुणा एका समाजाला, समूहाला राज्य आणि राष्ट्राला प्रगतीच्या प्रक्रियेत सामील करून न घेता ब्रिटिशांना जगावर राज्य करताच आलं नसतं.
लंडनच्या जडणघडणीकडे बघण्याचा लेखिकेचा दृष्टिकोन उदारमतवादी आहे. कदाचित म्हणूनच भविष्याचा वेध घेतानाही त्यांचा अप्रोच सकारात्मक असतो. प्रत्येक शहर-महानगर अधोगती आणि प्रगतीच्या आवर्तनातून जात असतं. चंचल वअताकिर्क पद्धतीने वाढत असतं. या प्रक्रियेत शहरांवर येणारी संकटं काही ज्ञात असतात, काही अज्ञात. पण या संकटापाठोपाठ इतिहास-लोकजीवनाला वळण देणाऱ्या संधीही येतात, हेच त्यांना त्यातून सुचवायचं असतं.
अर्थातच, पुस्तकाचं प्रत्येक पान वाचताना आपण लंडनची मुंबईशी तुलना करतो. स्वत: लेखिका काही मुद्दे स्पष्ट करताना मुंबईचा ओझरता तुलनात्मक संदर्भही देतात. तेव्हा नागरी सुधारणांच्या बाबतीत आपण अजूनही खूप मागे आहोत, ही बोच आपल्याला अस्वस्थ करून टाकते.
एरवी, आपले लोकप्रतिनिधी विविध अभ्यासाच्यानिमित्ताने परदेश दौरे करतात. ते गरजेचेही असतात. पण नगरनियोजन आणि नगरविकासाच्या आकलनासाठी पुस्तकांचं महत्त्वही काही कमी नसतं, हा विश्वास ‘लंडननामा’ देतं!
– शेखर देशमुख
(सौजन्य : दै. महाराष्ट्र टाइम्स)
रोहन शिफारस
लंडननामा
जडणघडण पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ची
लंडनमध्ये व्यापार -उद्योग वाढले. ऐश्वर्याला गगन ठेंगणं झालं आणि त्याबरोबर गुन्हेगारीही फोफावली. खून, मारामार्या, रोगराई, दारिद्र्य सर्व काही एकत्र नांदू लागलं. बघता बघता लंडन बकाल होत गेलं. मात्र नंतर दूरदृष्टीच्या व्यक्तींनी व संस्थांनी याच लंडनचा कायापालट केला आणि ते बनलं एक सर्वांगसुंदर महानगर… पहिलं ‘जागतिक महानगर’! मानवी सर्जनशीलता, बुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान म्हणजेच आजचं लंडन. लंडनचा हा प्रवास थोडाथोडका नव्हे, तर २००० वर्षांचा आहे. या पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ च्या जडणघडणीची, चढ-उतारांची सुरस कथा म्हणजेच… ‘लंडननामा!’
₹350.00Add to Cart