पुस्तकाची दुनिया अफाट आहेच. कितीही वाचायचे ठरवले तरीही आयुष्य पुरणार नाही. दुसरा जन्म काही माणसाचा मिळणार नाही. म्हणूनच वयाची साठी ओलांडल्यानंतर आता निवडकच वाचायचे असे ठरवले. आतापर्यंत जे जे हातात पडत गेले ते वाचत गेलो. या वाचनाने आयुष्य समृद्ध झाले. पुस्तक हा माझा श्वास आणि ध्यास असला तरी यापुढे मात्र आवडणारी पुस्तके संग्रही ठेवण्याचा विचार करतो आहे. बुक्स आॅन बुक्स हा माझा आवडीचा प्रांत. या पुस्तकांचा परिचयही वाचकांना करून देणार आहे.
मध्यंतरी विष्णू जयवंत बोरकर यांचे मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘प्रास’ हे सुंदर पुस्तक वाचले. या पुस्तकात ‘एका पुस्तकाचे वाचन’ हा सुरेख लेख आहे. पुस्तकाविषयीच्या भावना त्यांनी अतिशय समर्पकपणे व्यक्त केल्या आहेत. तशाच त्या माझ्याही आहेत. ते म्हणतात, ‘‘पुस्तक प्रथम स्वत: बुक डेपोत जाऊन विकत घ्यावं. तेथून ते घरी आणलं की, दोन्ही हाताने आंजारावं-गोंजारावं, हळुवारपणे कुरवाळावं, त्याच्या जावळावरून हलकासा हात फिरवावा. ब्लर्बवरून थोडी नजर टाकावी. काहीच न वाचताही आतील पानेही थोडी चाळल्यासारखी करावी. काही दिवस सतत ते पुस्तक आपल्याबरोबर असू द्यावं. पुस्तक नवीन असते तेव्हा त्याला अनोखा ताजा वास येत असतो. या वासाने सारं घर भरू द्यावं! हा वासच आपला श्वास व्हावा. पुस्तक हे असे संपूर्णत: आपल्या अंतरंगात विरत जावे आणि आपण सगळंच्या सगळं पुस्तकच व्हावे. नंतर पुस्तक वाचण्यास सुरुवात करावी. ’’
ज्येष्ठ पत्रकार, साक्षेपी संपादक अरुण टिकेकर यांचे ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशी इंग्रजी आणि मराठी पुस्तके अरुण टिकेकरांनी लिहिली. डिम्पल प्रकाशनाचे हे 2005 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक. आता या पुस्तकाची दुसरी संवर्धित आवृत्ती पुण्याच्या रोहन प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. पुस्तकाचा आकार, मोहोरेदार छपाई आणि वसंत सरवटे यांची सुरेख अर्कचित्रे यामुळे हे पुस्तक हातात पडताच आपलेसे होऊन जाते.
173 पानाच्या या पुस्तकात दोन भाग आहेत. पहिला ‘ग्रंथबोध’ तर दुसरा ‘वाचनबोध’. दुर्मिळ पुस्तके जमा करण्याच्या छंदातून त्यांची अनेक दुकानदारांची मैत्री झाली. त्याबद्दलही त्यांनी भरभरून लिहिले आहे. पुस्तकाच्या शोधासाठी ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील शहराच्या गल्लीबोळातून फिरले. या सर्व आठवणी त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत. मराठीतील उत्तमोत्तम पुस्तकाची माहिती मिळणे हा वाचनाधिकार आहे असेही ते मानतात. एकंदरीत पुस्तकाविषयी केलेले हे मूलभूत चिंतन आहे. ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ पुस्तकप्रेमी मंडळींनी आवर्जून वाचावे.
– श्याम देशपांडे
(सौजन्य – दै. दिव्य मराठी, ३० नोव्हेंबर २०१९)
हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…
अक्षरनिष्ठांची मांदियाळी
ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध
ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-किभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांकर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.
₹190.00Add to Cart
तुम्हाला हेही वाचायला आवडेल…
प्रगत पुस्तक संस्कृतीचा मनोज्ञ मागोवा (वर्षा गजेंद्रगडकर)
अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे.