फॉन्ट साइज वाढवा
दुबईमध्ये बरोब्बर १ जानेवारी २००६ या दिवशी मी कामाच्या निमित्ताने आलो आणि त्यानंतर इथलाच होऊन गेलो. सुरुवातीच्या काळात ‘एकटा जीव सदाशिव’ असल्यामुळे मला जितका फावला वेळ मिळत असे, तितका मी भटकंती करण्यात खर्ची घालत असे. सुरुवातीला एकटाच आणि नंतर मित्र जोडले गेल्यावर ‘कळपाचा’ भाग होऊन, ही भटकंती चाले. माझ्या सुदैवाने माझ्या आयुष्यात असे अनेक मित्र आले, जे माझ्याइतकेच, किंबहुना माझ्यापेक्षाही ‘अतरंगी’ होते. समस्त जगाला दुबईचा झगमगाट आवडतो, पण आमच्या टोळक्याला मात्र दुबईतल्या चित्रविचित्र जागाच जास्त खुणावायच्या. अशाच एका दिवशी माझ्या एका अरबी मित्राने मला सकाळी साडेतीन वाजता फोन केला आणि अर्ध्या तासात तयार राहायला सांगितलं.
“काय रे, काय लढाईवर चाललोय का?”
“अरे चल ना माझ्याबरोबर…. आज बघ तुला काय दाखवतो मी… अनुभव घे, मग मला दुवा देशील बघ तू…”
“काय ‘जन्नत’ बघायचा पास मिळालाय की काय तुला?”
“तसच समज… अर्ध्या तासात तुला ‘पिक’ करेन. उशीर नको करूस…”
बरोब्बर अर्ध्या तासानंतर आपल्या लालचुटुक ‘बीटल’ गाडीने शरीफ माझ्या घरापाशी आला. या प्राण्याला भडक रंगाचं काय आकर्षण होतं कुणास ठाऊक, पण कपड्यांपासून ते कॉफीच्या कपपर्यंत त्याला सगळं लाल किंवा पिवळ्या रंगाचंच लागायचं. त्याचा दुसरा छंद म्हणजे कॅमेरा घेऊन फोटो काढत जग हिंडणं. आजही स्वारी कॅमेरा घेऊन आलेली दिसल्यावर मला पुढचे काही तास मस्त जाणार याचा अंदाज आला. त्याने गाडी थेट अबू धाबीच्या दिशेने वळवली तेव्हा मात्र माझी उत्सुकता चाळवली गेली.
“आज काय अबू धाबी?”
“होय, आपण अबू धाबीच्या अल-मक्ता भागात चाललोय…”
“काय आहे तिथे?”
“वॉच टॉवर”
“म्हणजे?”
“अरे, पूर्वी जेव्हा खाडीतून व्यापारी वाहतूक व्हायची ना, तेव्हा त्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी तेव्हाच्या सैनिकांनी ‘वॉच टॉवर्स’ उभे केले होते… हा त्यातलाच एक. मजा येईल बघ तो बघायला…. आणि त्याच्याच बाजूला एकछोटा ‘किल्ला’ आहे. जुन्या काळी त्या किल्ल्यात सैनिक बसलेले असायचे…”
थंडीच्या दिवसात सूर्योदय थोडा उशिराने होत असल्यामुळे आम्ही ‘मक्ता’ किल्ल्याच्या समोर गाडी उभी करेपर्यंत उजाडलेलं नव्हतं. शरीफने आपला कॅमेरा, लेन्स, ट्रायपॉड असा सगळं जामानिमा काढून त्याच्या मनासारखा ‘सेट-अप’ लावला आणि सूर्योदयाच्या पार्श्वभूमीवर त्याने त्या खाडीच्या मधोमध उभ्या असलेल्या वॉच टॉवरचे फोटो घ्यायला सुरुवात केली. मला तो जुन्या काळचा ‘मक्ता’ किल्ला (खरं तर ती अगदी छोटीशी गढी होती…)
आणि समोरच्या खाडीच्या मधोमध उभा असलेला तो टेहळणी बुरूज -वॉच टॉवर- प्रचंड आवडला. नकळत मनातल्या मनात मी शंभर दीडशे वर्षं मागे गेलो आणि डोळ्यांसमोर मला कुडामातीची छोटेखानी घरं, लाकडी होड्या(ज्याला अरबी भाषेत ‘अब्रा’ म्हणतात) आणि त्या टेहळणी बुरुजांवर जुन्या बंदुका घेऊन झावळीच्या आडोशात बसलेले अरबी सैनिक दिसायला लागले.
शरीफचा या विषयाचा अभ्यास दांडगा होता. दुबईला परत निघालो, तेव्हा वाटेत त्यानेच मला या टेहळणी बुरुजांच्या इतिहास सांगायला सुरुवात केली. ‘दुबई क्रीक’ या खाडीमुळे दुबई ही उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागात दुभंगलेली आहे. उत्तरेचा ‘देरा’ आणि दक्षिणेचा ‘बर दुबई’ हा भाग खूप पूर्वीपासून व्यापारासाठी प्रसिद्ध होता. पूर्वीच्या लोकांनी तटबंदी उभारून या दोन्ही भागांना सुरक्षित केलेलं होतं. शहर विस्तारात या तटबंद्या पाडाव्या लागल्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने कमी खर्चिक अशा ‘वॉच टॉवर्स’ची संरचना स्थानिक अरबांनी स्वीकारली. तेव्हा ‘देरा’ भागात तब्बल वीस, तर ‘बर दुबई’ भागात सात टेहळणी बुरुजांची उभारणी स्थानिकांनी केली होती असं इतिहासात नोंदलेलं आहे. ‘बर दुबई’ माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे दुसऱ्याच दिवशी तिथले टेहळणी बुरूज शोधायला माझा मोर्चा वळवला ‘दुबई क्रीक’कडे.
अखेर मीना बाजार या दाटीवाटीच्या वस्तीतून समुद्राखालच्या ‘शिंदगा टनेल’च्या दिशेला जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर मला दुबईच्या पुरातत्व खात्याने निगुतीने सांभाळलेला एक बुरुज सापडला. ‘शिंदगा बुर्ज अल्मुराकबा’ म्हणून ओळखला जाणारा, जेमतेम वीस पंचवीस फुटी उंचीचा हा चौकोनी बुरूज तेव्हाच्या तुटपुंज्या साधनांनी कसा उभारला असेल, याचं आश्चर्य मला राहून राहून वाटत होतं. प्रवाळांचे दगडगोटे, जिप्सम, चुनखडी, वाळू आणि खजुराच्या झाडाच्या सुकलेल्या झावळ्या अशा सगळ्यातून हा आणि असे अनेक बुरूज उभारले गेले होते. बुरुजाच्या छताच्या कडेने पाच फुटी भिंत उभारून त्यात खोबणी तयार केल्या जायच्या. त्यातून खाडीच्या दिशेला बंदुका रोखून तेव्हाचे अरबी सैनिक पहारा देत असायचे. छतावर जायची परवानगी नसल्यामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या छतावर जाऊन मला टेहळणी बुरुजांच्या वरच्या भागाचं शक्य तितकं निरीक्षण करता आलं असलं, तरी प्रत्यक्ष बुरुजाच्या आत आणि छतावर जायची माझी इच्छा अपुरीच राहिली. या बुरुजापासून दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर जुना अल-फाहिदी किल्ला आहे, हे मला माहित होतं. तिथेही बुरूज नक्कीच असेल, या आशेने मी तिथे गेलो तेव्हा मला चौकोनी नव्हे, तर गोलाकार बुरूज दिसला. हे कशामुळे, याचा छडा लावण्यासाठी मी थेट ‘बर दुबई’ स्थित ‘दुबई म्युझियम’च्या स्थानिक व्यवस्थापकाला गाठलं.
“टेहळणी बुरुजांची रचना कशामुळे बदलली?”
“तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जे गोलाकार बुरूज आहेत ना, ते जुने आहेत आणि चौकोनी बुरूज आहेत ते नंतरच्या काळात बांधले गेले आहेत. चारशे-पाचशे वर्षांपूर्वी संरक्षण हा खूप मोठा विषय होता इथे… साधनांची कमतरता, तुरळक वस्ती, खाडीत मोत्यांच्या व्यापारामुळे वाढत असलेली गलबतांची वर्दळ या सगळ्यांमुळे या भागाला संरक्षित करण्याची जबाबदारी इथल्या शेखांनी आपल्या पदरच्या काही खास लोकांकडे सोपवली. हे बुरूज तेव्हा गोलाकार यासाठी बांधले गेले होते, कारण गोलाकार संरचनेत लपण्यासाठी कोपरेच सापडत नसत; जेणेकरून हल्लेखोरांना वरून टिपणं सोपं जाई. तेव्हाच्या त्या बुरुजांना तळमजल्यावर दरवाजेच नसत. वरच्या मजल्याच्या खिडकीतून शिडी किंवा दोरी लावून सैनिक वरखाली करत. अजूनही तेव्हाच्या काळच्या बुरुजांच्या भिंतींवर खाचा दिसतात… वर चढताना सैनिक त्यात पाय खोचायचे….”
“आणि त्या भिंतींतून बाहेर आलेल्या चोची कसल्या आहेत?”
“बाहेरून हल्ले झाले तरी त्या चोचींसारख्या रचनेमुळे भिंतींवरच्या खिडक्यांना रक्षण मिळत असे. इथल्या भागात बंदुकींसारखी शस्त्रं जवळजवळ नव्हतीच… म्हणून जड दगड किंवा उकळतं तेलसुद्धा या खिडक्यांमधून खालच्या हल्लेखोरांवर टाकलं जाई. हे सगळं करताना हल्लेखोरांकडून आतल्या सैनिकांना इजा होऊ नये म्हणून या चोची प्रत्येक खिडकीला दिसतील.”
“पण या गोलाकार संरचनेपासून तेव्हाचे संरक्षक-तज्ज्ञ चौकोनी संरचनेकडे का वळले?”
“गोलाकार रचना तयार करण्यासाठी खर्च खूप यायचा, शिवाय वेळही लागायचा आणि डागडुजी करण्यासाठीही ही रचना जिकिरीची होती. त्यामुळे सुटसुटीत चौकोनी रचना पुढच्या लोकांनी अंगिकारली. तोवर बंदुका, दारुगोळा वगैरे मिळणं तसं सोपं झालं होतं. त्याचप्रमाणे संरक्षणाच्या दृष्टीने खिडक्या कमी करून नंतरच्या काळातल्या अरबांनी बुरुजांमध्ये ‘छिद्रं’ कोरायला सुरुवात केली. त्यातून आतल्या सैनिकांना बाहेरचे हल्लेखोर टिपणं सोपं झालं, आणि बाहेरच्या हल्लेखोरांपासून आतल्या सैनिकांना असलेला धोकाही बराच कमी झाला. आपल्याकडच्या गड- किल्ल्यांना जंग्या असतात, तोच हा प्रकार. बुरुजांमध्ये दारुगोळा साठवण्यासाठी कोठारं बनवली गेली.
कालांतराने या बुरुजांचा बाकीही उपयोग व्हायला लागला. पूर्वी नागरिकांना हल्ल्याची सूचना द्यायला बुरुजांवर चढून हाळी दिली जायची, पण नंतर नंतर या बुरुजांच्या उंचीचा उपयोग ईदच्या काळात चंद्राचं अवलोकन करण्यासाठीही व्हायला लागला. बाहेरच्या दौऱ्यावरून परतत असलेल्या स्थानिक राजाला, राजकुमाराला आणि मह्त्त्वाच्या अधिकाऱ्यांचं तेव्हा वेशीवर जाऊन स्वागत करण्याची प्रथा होती…. या बुरुजांवरून सैनिक स्थानिक जनतेला राजाच्या आगमनाची सूचना द्यायचे. प्रवाशांना शहरात प्रवेश करायच्याआधी वेशीवरच्या बुरुजांवरच्या सैनिकांकडे आपापली शस्त्रं जमा करावी लागत. गलबतांनासुद्धा खाडीतून आत प्रवेश करायच्याआधी टेहळणी बुरुजांवरच्या तेव्हाच्या ‘नोंदणी कचेरीत’ कागदपत्रांची पूर्तता करावी लागे.
इथल्या प्रत्येक अमिरातीच्या स्थानिक प्रशासनाने आपल्या या अमूल्य वारशाची जपणूक मनापासून केलेली आहे. इथल्या पुरातत्व विभागाने २००२-०३ साली या बुरुजांची शास्त्रशुद्ध पद्धतीने डागडुजी करायची मोहीम हाती घेतली, तेव्हा या बुरुजांच्या इतिहासाचाही त्यांनी आढावा घेतला. सध्याच्या ‘बर दुबई’ वस्तुसंग्रहालयाच्या बाजूचा बुरूज थेट १७९९ सालचा आहे, तर ‘हता’ भागातला बुरूज १८६० सालचा आहे. ‘बुर्जनहार’ भागातला बुरूज १८७० सालचा आहे, तर १९३९ साली बांधलेला उम-अल–रायुल बुरूज सात खांबांवर बांधला गेलेला आहे.
आपल्याकडच्या शिवकालीन गड-किल्ल्यांच्या सध्या झालेल्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर इथल्या प्रशासनाने त्यांच्या या तुटपुंज्या वारशाला जपण्यासाठी केलेला खटाटोप नक्कीच सुखावतो. उम-अल-रायुल बुरुजाच्या संवर्धनासाठी दुबईच्या वयोवृद्ध स्थानिकांना भेटून त्यांच्याकडून मूळ आराखड्याची जमेल तितकी माहिती काढून घ्यायचा आटापिटा असो, की शेख सईद या त्यांच्या जुन्या नेत्याचं घर ‘युनेस्को’च्या ‘वर्ल्ड हेरिटेज’ साईटमध्ये सामील होण्यासाठी घेतलेले कष्ट असो, इथल्या अरबांनी खरोखर आपल्या पूर्वजांना अभिमान वाटेल असं काम करून दाखवलेलं आहे.
‘वारसाहक्काने जमीन, घर किंवा सत्ता मिळू शकते, पण आदर मात्र स्वकर्तृत्वाने कामवावाच लागतो’ या अर्थाच्या जुन्या म्हणीचा प्रत्यय या टेहळणी बुरुजांच्या भटकंतीतून मला पदोपदी येत गेला. अजूनही एखाद्या दिवशी उगवत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर ‘बर दुबई’च्या जुन्या भागातला टेहळणी बुरूज बघायला माझी पावलं ‘क्रीक’च्या दिशेला वळतात, बुरूज दिसतो, मन मला शेकडो वर्षं मागे घेऊन जातं आणि मी इतिहासात हरवून जातो. माझ्यासारख्या उपऱ्याचं तसं हरवून जाणं हीच इथल्या पुरातत्व विभागाच्या मेहेनतीला मिळालेली दाद असते… नाही का?
– आशिष काळकर
“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”
रोहन शिफारस
मदुराई ते उझबेकिस्तान
10 ठिकाणांचे हटके अनुभवकथन
दक्षिण भारतातली मंदिरं, सात दिवसात आटोपलेली युरोप टूर, कबीर संगीत गाणाऱ्या कलाकारांसोबतची यात्रा, थरच्या वाळवंटातील उंटावरची थरारक राइड, हजारो भाविकांसोबत अनुभवलेली वारी, उझबेकिस्तानमधील सेक्स टुरिझमचा बाजार अशा हटके ठिकाणांचा समावेश आहे. साहस, वासना, कुतूहल आणि अगदी ईश्वरभक्तीपर्यंतचा अनुभव कधी उपरोधिक, तर कधी खट्याळ शैलीत वाचायला मिळतो. लेखकाच्या निरिक्षणक्षमतेमुळे हे सगळे अनुभव आपल्यापर्यंत जिवंतपणे पोहोचतात. ‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन… .
₹240.00Add to Cart
इतक्या सुरेख पद्धतीने लेखक सगळ्या गोष्टी सांगतात की वाचताना सतत आपण त्या जागी फिरत आहोत आणि सगळं स्वतःच बघत आहोत असं वाटतं. या लेखांचं पुस्तक होऊ शकेल नक्कीच.
लेखकाकडून अरबस्तान बद्दल अजून खूप काही वाचायला नक्कीच आवडेल. याचं एखादं पुस्तकं प्रकाशित झालेलं आहे का?
अप्रतिम लेख.
पुढे या लेखांचं एखादं पुस्तक रोहन प्रकाशनने काढावं असं वाटतं. प्रस्तुत लेखकाची पुस्तकं असल्यास कृपया माहिती द्यावी, नक्कीच वाचायला आवडतील.
Wow.. मस्त लिहिलेय… डोळ्यासमोर उभे राहिले… जसे काही मीच आत्ता दुबईला फिरते आहे…