कलेच्या अवकाशातील विविध रंग आणि त्यांची रुजवात

फॉन्ट साइज वाढवा

‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’चे तत्कालीन अॅकेडमिक डायरेक्टर डॉ. रुकून अडवानी हे एक गंभीर प्रकृतीचे परंतु अतिशय मृदू आणि आतिथ्यशील व्यक्तिमत्त्व… त्यांच्या चर्येवरूनच ते समजून येतं. दिल्लीला गेलो असता त्यांची निवांत भेट झाली होती. ही गोष्ट १९९७ सालची. त्या भेटीत त्यांनी मला दोन पुस्तकं भेट दिली. एक म्हणजे PAST FORWARD आणि दुसरं INDIRA GANDHI, THE EMERGENCY and INDIAN DEMOCRACY. अर्थात दोन्ही पुस्तकांचा रोहन प्रकाशनाने मराठी आवृत्तीसाठी विचार करावा ही त्यांची अपेक्षा असणारच होती. परंतु एवढं निश्चित की, ही दोन्ही पुस्तकं त्यांनी मला अतिशय प्रेमाने दिली होती.

सहा प्रतिभावान कलाकारांच्या बालपणाचा मागोवा घेणाऱ्या ‘पास्ट फॉरवर्ड’ने नावापासूनच मला आकृष्ट केलं होतं. विषयासाठी अतिशय कल्पक असं हे नाव, त्यात विषय माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा–कला, संगीत, साहित्य असा. दिल्लीहून परतताना मी ‘राजधानी एक्स्प्रेस’मध्येच ते वाचून काढलं. पुस्तकाच्या लेखिका गौरी रामनारायण या इंग्रजीतल्या नामांकित पत्रकार. त्यांनी संगीत-कलाक्षेत्रातील सहा महामेरूंच्या भेटी, मुलाखती घेऊन त्यांचं कुतूहलजनक बालपण सर्जनशीलतेने चितारलं. एक-एक कलाकाराच्या लहानपणीच्या सवयी, वेडं, छंद, जगावेगळे उद्योग, प्रसंग असं सर्व त्यांनी या मुलाखतींतून कागदावर, नाहीतर मेंदूत टिपून घेतलं आणि त्यातूनच हे पुस्तक साकारलं. एखाद्या क्षेत्रात उत्तुंग स्थानावर पोहोचलेल्या व्यक्तीच्या बालपणाविषयी आपल्या मनात कधी विचार डोकावतो का? कसं असेल यांचं बालपण? आणि तसा विचार केला, तरी आपली कल्पनाशक्ती सत्याच्या १०-२० टक्के तरी जवळ पोहोचेल का? म्हणूनच या पुस्तकाचं मला विशेष अप्रूप वाटलं. लेखनाचा फॉर्म आणि शैलीमुळेही मी प्रभावित झालो. या पुस्तकामुळे अनेकांची कुतूहलं काही प्रमाणात तरी शमतील, अनेक पालकांना आपल्या मुलाच्या थोड्या जगावेगळ्या हिकमती, त्यांची जगावेगळी स्वप्नं यांमुळे काळजीचा सूर लागणार नाही, आणि ते या खोड्यांकडे सकारात्मकतेने पाहतील असं वेगळेपण मला त्या पुस्तकात दिसलं. त्यामुळेच पुण्यात पोहोचताच मी डॉ. रुकून यांना माझी स्वीकृती कळवली.

अनुवादासाठी माझा मित्र अशोक जैनने त्याच्या स्नेही उल्का राऊत यांची शिफारस केली. उल्का राऊत यांना पुस्तक पाठवून नंतर त्यांची मी भेट घेतली. मी त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की, पुस्तकाच्या अनुवादाचा त्यांना अनुभव नसला तरी त्यांचं इंग्रजी-मराठी दोन्हीतलं मुबलक वाचन आहे आणि एकुणातच त्यांची साहित्यिक जाण उत्तम आहे. आणि ‘पास्ट फारवर्ड’च्या मर्मस्थळांचं त्यांना उत्तम आकलन झालं आहे. निर्धास्तपणे मी त्यांच्यावर अनुवाद सोपवला आणि त्यांनी तो उत्तमरीत्या साकारला. अशोकनेही त्यावर त्याचा सराईत हात फिरवला. पुस्तकाचं मुखपृष्ठ व सजावटीची चित्रं अनिल दाभाडे यांनी अतिशय सर्जनशीलतेने साकारली, विषयासाठीची उत्तम वातावरणनिर्मिती करून दिली. पुस्तकाचं नामकरण ‘ऋतु-शैशव’ असं केलं. परंतु नंतर पुढील आवृत्तीत जन-सामान्यांचा विचार करून ‘आमचं बालपण’ असं साधंसरळ पुनर्नामकरण केलं. याच नावाने आज वीस वर्षांनंतरही पुस्तक उपलब्ध आहे.

पुस्तकात आपल्या सरोदवादनाने मंत्रमुग्ध करणारे अमजद अली खान, चित्रकला जगतात; मोठा दबदबा असणारे एम.एफ. हुसेन, आपल्या अलौकिक स्वरांनी श्रोत्यांना मोहिनी घालणाऱ्या भारतरत्न एम.एस. सुब्बलक्ष्मी, एखाद्या मोठ्या घडामोडीवर एका छोट्या चित्राद्वारे परिपूर्ण भाष्य करणारे व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण, ओडिसी नृत्यकलेकडे जगाचं लक्ष वेधून घेणारे केलुचरण महापात्रा, नाटक-चित्रपट लेखनातून समाजातील विदारक सत्य सर्जनशीलतेने आणि निर्भीडपणे मांडणारे विजय तेंडुलकर अशा दिग्गज कलाकारांच्या बालपणाची सफर गौरीने घडवून आणली आहे. सोबत सर्वांचा चारपानी अल्पपरिचयही करून दिला आहे. प्रत्येकाचं कलाक्षेत्र वेगळं असल्याने पुस्तकातलं कलेचं अवकाश विविध रंगांनी व्यापलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्या रंगांच्या रुजवातीचा माग अशा पुस्तकामुळे घेता येतो…

-प्रदीप चंपानेरकर

  • आमचं बालपण : सहा श्रेष्ठ कलाकारांचं बालपण
  • लेखक : गौरी रामनारायण
  • अनु. : उल्का राऊत

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०२१


रोहन शिफारस

थोरा-मोठ्यांचं बालपण संच

आपण भविष्यात कोण होऊ, काय करू याची बीजं बरेचदा आपल्या बालपणातल्या, अत्यंत संवेदनशील मनावर रुजलेली असतात. मोठ्या व्यक्तीच्या बालपणाची रंजक पद्धतीने ओळख करून देऊन, प्रेरणा देणारा… ३ पुस्तकांचा संच

440.00Add to Cart


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *