फॉन्ट साइज वाढवा
आशिया खंडातले चीन-भारत हे दोन महत्त्वाचे देश. मात्र त्यांच्यातले संबंध एखाद्या हिमनगासारखे आहेत याचा अंदाज बाहेरच्यांना येत नाही, तसेच या देशातील नागरिकांनीही पटकन उमगत नाही. भारतीयांच्या मनात चीनबद्दल पाकिस्तानसारखी कडवटपणाची भावना अगदी खोलवर रुजलेली नाही; अविश्वास आणि नाराजी आहे, पण पाकिस्तानइतका कडवा विरोध नाही. त्यामागं या देशाबद्दल असलेली अपुरी माहिती आणि उदासीनता ही महत्त्वाची कारणं आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचं ‘शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत’ हे पुस्तक भारत आणि चीनबद्दल नेमकी माहिती देतं आणि या दोन देशांमधले संबंध व त्यांतल्या तणावाची कारणं काय असू शकतील याची पुरेशी कल्पनाही आपल्याला येते.
मुळात चीन हा देश समजून घ्यायला अवघड. त्याने एकतर आपल्याला जगापासून बंदिस्त ठेवलंय आणि त्याच वेळी हवं तिथं खुलंही केलंय. ही कसरत त्याला जमलीय असं नाही, तर त्याने त्या बळावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं स्थान इतकं उंचावलंय की, तो अमेरिकेला त्रास देतोय. अर्थात, त्याला अमेरिकेला नुसता त्रास द्यायचा नाही, तर महासत्ता व्हायचंय. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. विजय नाईक यांनी या पुस्तकात २२ प्रकरणांमधून भारत आणि चीन यांच्यातला तणाव आणि नेमके संबंध कसे आहेत याचा आढावा तर घेतलाच आहे, पण या दोन देशांमधील संबंधाकडे कसं पाहायचं याबद्दलही मार्गदर्शन केलंय. केंद्र सरकारने ज्या वेळी जम्मू आणि काश्मीरचा वेगळेपणा जपणारं ३७० कलम रद्द केलं आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, त्या वेळेपासून चीन आणखीनच अस्वस्थ झाला. अर्थात, त्याआधी चीनने २०१७मध्ये भारत-भूतान सीमेवरील डोकलम भागात घुसखोरी करून भारताला अडचणीत आणलं होतं. हा प्रश्न सुटायला तब्बल ७२ दिवस लागले. चीनने गेल्या काही वर्षांत भारताबरोबरचं सामंजस्याचं धोरण बदललेलं आहे. त्याला आशियात आपल्याला विरोध करणारं कोणी नकोय, त्याचबरोबर भारताने आपल्या वाढत्या ताकदीला मान देऊन या खंडातलं आपलं प्रभुत्व मान्य करावं ही चीनची अपेक्षा आहे. चीनला अमेरिकेवर मात करायची आहे. त्यासाठी आशियात त्याला कोणी प्रतिस्पर्धी नकोय. चीनचा भारतविरोध आहे तो त्यातूनच आणि भारताची वाढती ताकद त्याला त्यामुळेच खुपत आहे.
शी जिनपिंग यांची त्याच्या पक्षातली आणि चीनचे सर्वशक्तिमान नेते होण्यापर्यंतची वाटचाल नाईक यांनी इथे नेमकेपणानं दिली आहे. जिनपिंग यांनी काही महत्त्वाकांक्षा ठेवून आपलं धोरण आखलं आहे. त्यात त्यांनी काही गोष्टी कशा साध्य केल्या त्याचीही कल्पना येते. ‘बीआर’ आणि ‘सीपेक’ या दोन महाकाय प्रकल्पाला भारताने विरोध केल्याने चीनचा भारतविरोधी पवित्रा अधिक कडक झालाय. त्यात भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर ताब्यात घेतला तर? या शंकेने चीन अधिकच अस्वस्थ आणि आक्रमक झालाय. चीनला भारताबरोबर सध्यातरी थेट युद्ध नको असेलही, पण त्या देशाला भारताबरोबरचा सीमावादही लगेच संपुष्टात आणायचा नाही. चीनला जपान आणि अन्य देशाबरोबर वाद घालण्याची खुमखुमी आहेच, त्याचं दर्शनही घडवतो. भारत आणि चीनच्या ताकदीत किती फरक आहे, तर त्याचं उत्तर एका वाक्यात मिळतं. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या आकारमानापेक्षा पाचपट मोठ्या आकारमानाची अर्थव्यवस्था चीनची आहे. त्यामुळे भारताला चीनबरोबर लढताना अनेक बाबींचं भान ठेवावं लागणार आहे.
नाईक यांनी या पुस्तकातल्या २२ प्रकरणांमधून केवळ भारत-चीन यांच्या तणावाचा शोध घेतला असं नाही, तर या दोन देशांमध्ये नेमका झगडा कसला आहे आणि भारतीय बाजूने काय सावधानता बाळगावी लागणार आहे, त्याचीही कल्पना दिली आहे. चीन आणि भारत संबंधांचा आढावा घेताना त्यांनी उगीच कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं नाही किंवा कुठल्या राजवटीची बाजू घेतलेली नाही. आज काय करता येईल, काय करायला हवं याचा मार्ग शोधायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर हा प्रश्न नेमका आहे तरी काय, त्याच्या नेमक्या बाजू किती आहेत यांचा वस्तुनिष्ठ मागोवा त्यांनी घेतलाय. त्यामुळे कारण नसताना कुठल्यातरी बाबींचा अभिनिवेश, कुणाचीतरी व्यक्तिपूजा आणि अस्मितेचा जागर आणि आलंकारिक शब्दांची लयलूट असला कादंबरीमय प्रकार इथं काही नाही. जे आहे ते सत्याच्या आणि तर्काच्या कसोटीवर पारखून घेऊन मांडलंय. त्यामुळे या पुस्तकाची माहिती आपल्याला समृद्ध तर करतेच, पण चीनच्या महाकाय ताकदीने आणि त्या देशाने ती किती अल्पकाळात कशी मिळवली यामुळे चकितही करते.
आंतरराष्ट्रीय संबंधात आणि त्यासंबंधीच्या चर्चांत नेहमीच मोजक्या शब्दांत प्रत्येक देश आपल्या भावना व्यक्त करत असतात. प्रत्येक शब्द तोलून-मापून वापरलेला असतो. हे पुस्तक याची साक्ष पटवतं, कारण जी माहिती आपल्यासमोर येते ती अशीच तोलूनमापून आणि नेमकी, पण प्रश्नाचं स्वरूप आपल्याला लक्षात आणून देईल अशी आहे. या दोन देशांच्या संबंधांचा हा एक प्रकारे ‘क्ष-किरण’ अहवालच आहे.
– सकाळ प्रतिनिधी
- शी जिनिंपग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत- चढती कमान वाढते तणाव
- लेखक : विजय नाईक
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०२१
(सौजन्य : दैनिक सकाळ, सप्तरंग पुरवणी)
रोहन शिफारस
शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत
चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय कसा झाला, कम्युनिस्ट पक्षाच्या अगदी तळागाळापासून अखेर ते पक्षाचे महासरचिटणीस, नंतर चीनचे अध्यक्ष (२०१३) कसे झाले, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख लेखकाने दिला आहे. ते आता चीनचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत… चीन आता जागतिक सत्ताही बनला आहे…. अमेरिकेला आव्हान देण्याची चीनची अंतःस्थ महत्वाकांक्षा असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे… या परिस्थितीचे भारत व चीनच्या संबंधांवर काय परिणाम होतील? चीनने निर्माण केलेल्या आव्हानाचा भारत कशाप्रकारे सामना करणार?… आशियातील चीनचं वर्चस्व भारत घटवू शकेल काय? अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेसह डोकलम, गलवान ते लडाख संबंधीचे वाढते तणाव अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्ष विजय नाईक यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे… भारत व चीन दरम्यानच्या घटना व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची स्पंदन जाणून घेणाऱ्यांसाठी या पुस्तकाची मी नेहमीच शिफारस करेन. – गौतम बंबावाले, माजी सनदी अधिकारी, भारतीय राजदूत म्हणून चीनमध्ये नियुक्त (२०१७-१८)
₹250.00Add to Cart