म्या त्यातलाच एक फिरस्ता, वाटाड्या धारकरी. म्या तिन्ही त्रिकाळ गडाव येतो आन चांगल चार –पाच दिस तिथं राहतो. गडावून पाय एका दिसात माघारा फिरल्यात असं कंधीच झालं न्हाय. परतेक ऋतूत रायगडाचं येगळ रूप बघाया मिळतं.
उन्हाळ्यातला रायगड दुपारी रखरखीत आन सकाळ – संध्याकाळ शीतळ. आभाळ नितळ. रातच्याला सदरंव पडायचं आन आकाशगंगा न्याहाळाची. कवी भूषण “बिन अवलंब कलीकानि आसमान मै है होत बिसराम जहा इंदू और उद्य के महत उतंग मनि जोतिन के संग” आसं का म्हणतो ते समाजतं.
चांदण्या दाटीवाटीनं लुकलुक करीत राजसदरंकडं तांबडं फुटंपर्यंत पघत असत्यात. पूर्णिमा असंल त भाग्यच उजाळतंय. चांदोबा डोळ्यादेखत हाताला यील का काय अस वाटत रहातं. ग्वाड गार वाऱ्याबरुबर झोंबाझोंबी कराची. आन धनगर आवश्यात अन्नपूर्णामायकडं केंबळीव झोपाया जाचं. अन्नपूर्णामायइषयी म्होरं माहिती यीलच.
उन्हाळ्याच्या दिसात तांबडफुटी चुकवायची न्हाई. आवश्यातलं कोंबडं आळीपाळीनं आरावत्यात. साद घेऊन येरवाळीच उठायचं. गडाचा सुर्व्या भवानी कड्याव उगावतोय. त्या आंगुदर तांबडफुटीची लढत बारकाईनी बघायची, नुसत्या भगव्या रंगाच्या दहा –पंधरा कडा पाझरत राहत्यात. तांबड्या आन भगव्या रंगाचं जुझ होऊन गेरूचा रंग तयार होतोया आन त्यामधून सुर्व्या नारायण परकटतोय.
सुर्व्या उलीउली वरलाकडंला सरकल्याव लिंगाणा झळाकतोय. आन मंग भवानी कड्याच्या आन लिंगाण्याच्या गप्पा सुरु व्हत्यात. गडावरचा सुर्व्या मावळतोय हिरकणी बुरुजाव. तांबडफुटीची जी गत तीच थोड्या फरकानं मावळतीची. दोन्ही वक्ताला भगवा गडाला सलामी देऊन काळाची रहाटी हाकतोय.
पाउसकाळातला रायगड डोळ्यांनी टिपावा आन काळजात साठवावा. उलीउली करून रोज रातच्याला स्मरावा. भूक भागत नाय आन धुंद उतरत नाय. पाचाडहून पघितल की गड धुकटानी भूलल्याला असतोया. धुकाट टकमकीला घेऊन आभाळात शिरतंय. जसं जसं वरती जावं तसतशी भूल चढत जाती.
परतेक टप्प्यावून सभोवार पघावा. हिरवाईची झुंबड उडाल्याली असती. वरून खळाळ झुळूझुळू नाचत येतोया, त्यात ओंजळ घालावी ढेकर द्यावा म्होर निघावं. ढग इरून मंधी सुर्व्या दिसला त अपूर्वच चितारतंय. ढगुळ भरून आला की सांदी– कपारीत लपावं. कुडकुडत्या अंगानी समुर निखाऱ्याव कणीस भाजून घ्यावं, करंडत करंडत दुसऱ्या टेपाव चहासाठी थांबावं. चहा अगुदर कांदाभजी आपसुखच येत्यात. बरुबर आमच्या धायरीचा पैलवान सागर पोकळे आणि बाप्पू पोकळे असल्याव त आठ- धा प्लेटी पोटात कधी गडप व्हत्यात ते कळत न्हाय.
राजाभिषेकदिनाला असाच एकदा गड चढून गेलो. रात्री बाराला गड चढाया सुरवात केली, जगदीश्वरापाशी गेलो दर्शान घ्यातलं आन बाहेर प्राकारातच पहाटपर्यंत ताणून दिली. झोप कसली येतीया. एकमेकांच्या कानात इकडच्या तिकाडच्या गप्पा कुजबुजत राहिलो.
भूक काय झोपून द्यायना तव्हा पहाटं चार वाजता जवळच्या खोपटात झोपल्याला मावशीला उठावलं आन पोहे कराया लावलं. भुक्याजल्यालो व्हतो मावशीची धांदल उडाली. सात मोठ्या थाळ्या पोह्याच्या तिघात उडावल्या. आन त्यानंतर दोन दोन कप चहा. रायगडाव भूक बळावती आयुष्य वाढतं.
हिवाळ्यातला रायगड आल्हाद असतोया. सोनकीच्या पिवळ्या फुलांनी जर्द झाल्याला गड भंडारा उधाळल्याल्या जेजुरीसारखा दिसू लागतो. हिवाळ्यात रातच्याला गडाव उब शोधावी आन नीज ल्यावी. सकाळच्याला उशिरा उठावं आन आवरून गड चाळावा.
दुपारी केंबळीव आलं की अंगात बकासुर शिरल्याला असतोया. हिवाळ्यातली गडावरची भूक म्हंजी पोटात आनंदानी खवाळल्यालं ब्रम्ह. त्याला तृप्त करण्याच काम अन्नपूर्णामाय करती. ती म्होर हायेच….हिवाळ्यातलं धुकाट अंगाला बोचतं. हिवाळ्यात टकमक टोकाव अर्धा दिस बसाव. फकस्त वाऱ्याचं ऐकावं मधी ब्र पण काढावां नाय…….क्रमश:
- संतोष सोनावणे