पुण्यात अनेक जणांनी लहान असताना त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांना घडवणाऱ्या काही मोजक्या संस्थांमध्ये नाट्यसंस्कार कला अकादमीचं नाव येतं. या ठिकाणी घडलेले कलाकार आज मोठं नाव कमावून आहेत.
अनेकांशी बोलतो, तेव्हा त्यांच्या वागण्याबोलण्यातून ते जाणवतं. त्यातलाच एक ओंकार गोखले. त्याच्याशी बोललो, तेव्हा त्यानंही सांगितलं, की त्याच्या अभिनयाची सुरुवात नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये असताना झाली.
तिथं उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं घेतली जातात. ओंकारला त्याच्या पालकांनी यातल्या एका शिबिरात तो साधारण तिसरी किंवा चौथीत असताना पाठवलं होतं. पण त्याला ते इतकं आवडलं, की तो त्यानंतरच्या सगळ्या शिबिरांना जायला लागला.
तिथं नाटकांत लहान-मोठ्या भूमिका करायला लागला. त्याला त्याची मजा यायला लागली आणि मग तिथूनच नाटकाची खरी आवड निर्माण झाली असं तो सांगतो.
बालनाट्यांत खरं तर खूप गमती घडतात. काही जण चालू नाटकांत संवाद विसरतात आणि इकडं-तिकडं बघतात. काही जण नाटक सुरू असताना समोर बसलेल्या पालकांना बघून संवाद विसरून त्यांना हाका मारतात. काही जणांना खूप माणसं बघून रडायला येतं, अशा खूप बघितलेल्या, आठवलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टी मी ओंकारला सांगितल्या.
तेव्हा त्यानंही त्याच्या बालनाट्यात घडलेली गोष्ट सांगितली. तो म्हणाला, ‘शिबिरात असताना छोटं म्हणजे अगदी २० मिनिटांच्या एका नाटुकल्यात मी काम केलं होतं. शिबिर संपलं की त्यात झालेल्या सगळ्या नाटकांचे भरत नाट्य मंदिरात प्रयोग व्हायचे. एका नाटकाच्या वेळी लाइट गेले होते. आम्ही तयार होतो सगळे. त्या वेळी अर्थातच बॅकअप वगैरे नव्हता. पण प्रेक्षकही तयारीचे होते.
त्यांनी आमचा उत्साह तसाच ठेवण्यासाठी ‘आवाज येतोय, नाटक सुरू ठेवा,’ असं सांगितलं. माझे आजोबाही प्रेक्षकांमध्ये होते. प्रेक्षकच असं म्हणाल्यावर मग आम्ही तिथं नाट्यगृहात मेणबत्त्या वगैरे लावून नाटक केलं. ही मी केलेल्या पहिल्या नाटकाची आठवण.’
आपण कुठंही गेलो, तरी भेटलेल्या पाचातले तीन इंजिनीअर असतील, असं या प्रोफेशनबद्दल गमतीनं म्हटलं जातं. हे सांगण्याचं कारण म्हणजे ओंकारही इंजिनीअर आहे. त्यानं बीटेक केलं आहे.
इंजिनीअरबाबत काही गोष्टी सांगितल्या जातात. त्या म्हणजे, घरच्यांमुळे केलं, मित्रांमुळे केलं, करायचंच होतं काही तरी म्हणून केलं, आवड म्हणून केलं, सगळेच करत होते म्हणून केलं वगैरे वगैरे. पण ओंकारच्या बाबतीत आवडतं म्हणून केलं ही गोष्ट खरी आहे.
बरेच लोक इंजिनीअरिंग केलं, की वेगवेगळ्या कारणांमुळं प्रोफेशन सोडून वेगळंच काही तरी करताना दिसतात. तू क्षेत्र बदलायचं कारण काय असं मी ओंकारला विचारल्यावर तो हसला. त्याला बहुतेक हे अपेक्षितच होतं.
तो म्हणाला, ‘मी व्यवस्थित मार्कांनी पास झालो आहे. इंजिनीअरिंग आवडायचं मला. शिक्षण झाल्यानंतर मी एका मोठ्या कंपनीत जॉबही केला दोन वर्षं. पण असं असतानाही नाटक बंद झालं नव्हतं.
कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम, फिरोदियासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेत होतोच. कंपनीत असतानाही जॉब संपल्यानंतर संध्याकाळी आमच्या ‘थिएट्रॉन’ या कंपनीकडून नाटकांत कामं करतच होतो. पण कंपनीत कामाचा त्रास होतोय, त्यामुळं विरंगुळा म्हणून नाटक वगैरे असं काहीही नाही.
कामाच्या ठिकाणीही सगळं व्यवस्थित सुरू होतं, तिथंही माझे छान मित्र झाले होते. पण नाटकांत काम करताना या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करू असं सतत वाटत होतं. मग दोन वर्षं जॉब झाल्यानंतर मी याच क्षेत्रात पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं.’
ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. आता मी काही प्रत्येक इंजिनीअरला भेटून विचारलेलं नाही काहीच. पण ऐकीव माहितीवरून आपलं एक मत ठरत जातं ना, तसं काहीसं आहे या प्रोफेशनबद्दल, पण मग ओंकार फक्त नाटकांतच काम करतो का, तर नाही. तो म्हणतो फक्त नाटक असं म्हणणार नाही. त्यानं एंटरटेन्मेंट आणि मीडिया या क्षेत्रात यायचं ठरवलं. यात नाटक, सिनेमा, वेबसिरीज असं सगळंच आलं.
तो म्हणतो, या क्षेत्रात आतापर्यंत खूप कामं केली आहेत, असं म्हणण्यापेक्षा सलग कामं केली आहेत. एवढं आधी सांगतो आणि मग म्हणतो, की अजूनही नाव असं झाल्यासारखं वाटत नाही. ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईल असं त्याचं मत आहे. ते काही आपल्या हातात असतं, असं त्याला वाटत नाही. मलाही हे एका अर्थानं बरोबरच वाटतं. ओंकार म्हणतो, या क्षेत्रात काम करताना फार छान वाटतं. आपल्या कामामुळं प्रेक्षकांमध्ये काही तरी इमोशन क्रिएट झाली आहे, हे बघून छानच वाटतं.
बऱ्याच लोकांसारखं न वागता या क्षेत्रातल्या तीन-चार गोष्टी ओंकारनं स्वत:साठी ओपन ठेवल्या आहेत, असं मला वाटतं. तो अभिनय करतो, नाटक लिहितो, एका इन्स्टिट्यूटमध्ये नाटकांसंबंधी गोष्टी शिकवायला लेक्चरर म्हणून जातो. हे मला माहिती असलेले ऑप्शन झाले. तो आणखी काही प्रयत्न करतही असेल.
आता या क्षेत्रात लागणारं म्हणजे संगीत असतं, गाणी असतात, लाइट्स असतात तो हे सगळं करून बघतही असेल, पण हे सगळं करण्याचं ज्ञान लॉकडाउनमुळं मिळालं हे ओंकार कबूलही करतो. सध्या ही काळाची गरज असल्यानं तो म्हणतो, की त्याच्या माहितीतले जॉब करणारे लोकही मल्टिपल सोर्स ऑफ इन्कमचा विचार करत आहेत.
आमचं बोलणं सुरू होतंच. पण ते आता पुन्हा एकदा नाटक, तरुण पिढी आणि वाचन याच्याकडं आलं. त्यावर तो जरा नाराज दिसला. थोडं बोलल्यावर त्यानं प्रामाणिकपणे काही मतं मांडली.
तो म्हणाला, “नाटकाला प्रतिसाद नाही असं काही जण म्हणतात. पण मग पुण्यासारख्या शहरात दर आठवड्याला नाट्यक्षेत्रात काही तरी असतंच. एखादा व्यावसायिक नाटकाचा प्रयोग असेल, प्रायोगिक असेल… अर्थात एवढे कार्यक्रम म्हटल्यावर काय सगळीकडेच तुडूंब प्रतिसाद नसेल. पण प्रतिसाद मिळतोय म्हणून तर सादरीकरण होतंय ना. पण एका गोष्टीचं मला दु:ख होतं, की जे लोक नाटकांत कामं करतात ते तितकं वाचत नाहीत. सध्या असं दिसतं, की लोक खूप वाचतात, बरीच पुस्तकं विकली जातात. हे खरं जरी असलं, तरी जेवढ्या प्रमाणात वाचायला पाहिजे, तेवढ्या प्रमाणात वाचलं जात नाही आणि जे वाचणारे आहेत, ते काहीही झालं तरी वाचत आहेतच. पण नाटकांत कामं करणारे लोक खूपच कमी वाचतात, हे माझं निरीक्षण आहे. क्रिएटिव्ह मीडियममध्ये असणाऱ्या व्यक्तीचं वाचन खूपच जास्त पाहिजे असं माझं मत आहे. त्याला आताचा काळ कारणीभूत आहे, कमी झालेली एकाग्रता आहे की आणखी काही. पण वाचन कमी आहे लोकांच हे नक्की. नवीन नाटकं बघतो, किंवा आम्हीही जी नाटकं करतो, तेव्हा जाणवत राहतं की वाचन कमी आहे. ती समज कमी आहे.”
त्याला मी कायम स्मरणात राहील असा एखादा किस्सा आहे का ते विचारलं. त्यावर तो बोलायला लागला.
“न केलेल्या नोंदी हे मी लिहिलेलं आणि क्षितिश दाते या माझ्या मित्रानं दिग्दर्शित केलेलं नाटक आहे त्या नाटकाचा नाशिकला प्रयोग होता. मानसिक आरोग्याशी संबंधित हे नाटक आहे. त्या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर एक माणूस बॅकस्टेजला भेटायला आला आणि त्यानं विचारलं की हे नाटक कोणी लिहिलं आहे? तेव्हा मी तिथंच होतो आणि कोणी तरी त्यांना माझं नाव सांगितलं. त्यांनी माझे हात धरले आणि ते काही बोलतच नव्हते. अर्धा मिनिट ते माझा हात घट्ट धरून उभे होते आणि मान हलवत होते. तेव्हा मी पण काहीच बोललो नाही. तसाच उभा होतो. त्यांना भरून आलं होतं. ते काही न बोलताच निघून गेले. आपल्या कामाचं कोणाही कशाही प्रकारे कौतुक केलं तर ते छान वाटतंच. कोणाला नाही आवडणार?”
त्याचं बोलणं बरोबरच आहे. केलेलं कौतुक कोणाला आवडत नाही? कर्तव्य केलं, तरी त्यात कौतुक हुडकणाऱ्या लोकांपेक्षा काम करणाऱ्या लोकांचं थोडं कौतुक झालं, तर त्यात काय चुकीचं आहे? बरोबर ना?
- गौरांग कुलकर्णी