फॉन्ट साइज वाढवा
यंदा हे २०२२ वर्ष उजाडलं तेच करोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल घेऊन! या लाटेत ‘मेहता पब्लिशिंग हाउस’चे सुनील मेहता आणि ‘पद्मगंधा’चे अरुण जाखडे असे दोन दिग्गज प्रकाशक-संपादक आपण गमावले. या दोघाही जाणत्या प्रकाशकांच्या जाण्यानं मराठी प्रकाशनविश्वाची खरोखर फार मोठी हानी झालीय, यात शंका नाही. या दोघांच्या लागोपाठ जाण्यानं राज्यातील प्रकाशन व पुस्तक विश्वावर एक विलक्षण सुन्न करणारी अशी शोककळा पसरली होती.
अर्थात, ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायानं पुढची वाटचाल सुरू करावीच लागते. आता दोन महिने उलटल्यानंतर ही तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे आणि पुण्यातलं, सर्वांना हवंहवंसं वाटणारं सांस्कृतिक विश्व पुन्हा फुलायला सुरुवात झालीय. पुण्यातल्या सर्वांत जुन्या अशा नगर वाचन मंदिराला १७५ वर्षं यंदा पूर्ण झाली. एवढं जुनं आणि समृद्ध ग्रंथालय पुण्यात आहे, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे! एकीकडं एवढं जुनं ग्रंथालय आणि दुसरीकडं उपनगरांमध्ये सुरू होणारी पुस्तकांची नवी दालनं… यामुळं पुण्यात उत्साहाचं वातावरण आहे. मधल्या दोन वर्षांत अनेक ग्रंथालयांची आणि ग्रंथप्रेमींची अक्षरश: उपासमार झाली. अशा वेळी घरपोच पुस्तकं देणाऱ्या फिरत्या लायब्रऱ्या अनेकांना मोठा आधार वाटल्या होत्या. पुस्तकांवरचं निखळ प्रेम हा एकच धागा धरून अनेक प्रकाशकांनी करोनासंकटावर वेगवेगळ्या पद्धतीने मात केली आणि रसिकांची पुस्तकांची भूक शमविली.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीची विमानं लंडन आणि सर्व परिसर बॉम्बगोळ्यांनी भाजून काढत होती. तेव्हाही विन्स्टन चर्चिलनं विद्यापीठं, शिक्षण आणि ग्रंथालयं सुरूच राहिली पाहिजेत, असा आग्रह धरला होता. शरीराला अन्न मिळालं नाही, तर ते कुपोषित होतं, तद्वतच मेंदूला पुस्तकांचा, त्यातल्या विचारांचा खुराक मिळाला नाही, तर बौद्धिक मांद्य येतं आणि एकूणच समाजाची मोठी मानसिक हानी होते, यात शंका नाही. करोनाकाळात आपल्या राज्यकर्त्यांचे प्राधान्यक्रम सगळ्यांच्या लक्षात आले. सांस्कृतिक भरणपोषण करणाऱ्या गोष्टींना सर्वांत तळात स्थान होतं. असो. आता ते दिवस सरले. समाजात वैचारिक घुसळण करणारे, बौद्धिक आनंद देणारे, निखळ मनोरंजन करणारे अनेक कार्यक्रम आता पुण्यात आणि जवळपास सगळीकडंच पुन्हा सुरू झाले आहेत. कुठे एखाद्या जुन्या शैक्षणिक संस्थेच्या आवारातील जुन्या वृक्षाखाली साहित्यविषयक चर्चा रंगत आहेत, तर कुठे उपनगरांतल्या सभागृहात छोटेखानी संमेलनं भरताहेत. मराठी राजभाषा दिन तर दणक्यात साजरा झाला. गेल्या जवळपास पावणेदोन वर्षांची कसर भरून काढण्याचा चंगच आता उत्साही आयोजकांनी बांधलेला दिसतोय. पुण्यात याच आठवड्यात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं (पिफ) धडाक्यात आयोजन होणार आहे. यात चित्रपटांव्यतिरिक्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. पुणेकर रसिक या महोत्सवाची वाटच पाहत असतात. सवाई गंधर्व महोत्सवासारखा महत्त्वाचा संगीत महोत्सव गेली दोन वर्षं होऊ शकलेला नाही. यंदा तरी तो होईल, अशी आशा आहे. पुण्यात बाजीराव रस्त्यावर आचार्य अत्रे सभागृहात भरणारी ग्रंथप्रदर्शनं हा साहित्यरसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आता लवकरच तिथंही नेहमीसारखी पुस्तक प्रदर्शनं सुरू होतील, यात शंका नाही.
डिसेंबरमध्ये नाशिकचं साहित्य संमेलनही उत्साहात आणि जल्लोषात पार पडलं. तिथल्या ग्रंथप्रदर्शनात भरपूर गर्दी लोटली होती. कटू करोनाकाळाच्या पार्श्वभूमीवर ते दृश्य अतिशय सुखद आणि लोभस वाटत होतं. आता लवकरच मराठवाड्यात उदगीर इथं पुढचं संमेलनही भरतं आहे. ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांच्या रूपानं मराठवाड्याच्या मातीतला एक अस्सल साहित्यिक संमेलनाचा अध्यक्ष म्हणून लाभला आहे. आणखी काय पाहिजे! त्यातही गेल्या २५-३० वर्षांचा माझा अनुभव असा आहे, की ग्रामीण भागात होणारी संमेलनं तुफान गर्दीची होतात. नगर, परभणी, कऱ्हाड अशी काही संमेलनं वाचकांच्या तुफान गर्दीमुळं आजही साहित्यरसिकांना आठवतात. पुस्तकांच्या गर्दीत हरवून गेलेली लहान मुलं, कुठला तरी कट्टा पकडून उत्स्फूर्तपणे कविसंमेलनं भरविणारे हौशी कवी, सह्या घेणाऱ्या वाचकांच्या गराड्यात असलेले कुणी लोकप्रिय लेखक, वाद-चर्चांत हिरिरीनं भाग घेऊन आपलं मत ठामपणे सांगणाऱ्या साहित्यविदुषी… ही आणि अशी दृश्यं बघायला मिळतात ती साहित्य संमेलनांतच! मराठी माणसाला मुळात उत्सव, जत्रा-यात्रा, उरुस आवडतात. साहित्य संमेलन म्हणजे तरी दुसरं काय आहे? माणसं माणसांना भेटतात, गप्पा मारतात, संवाद साधतात, आवडीची पुस्तकं विकत घेतात आणि त्यावर चर्चा करतात! एक समृद्ध समाज यापेक्षा निराळा काय असतो? आपल्याकडच्या शंभर अडचणी, प्रश्न, अडथळे, समस्या यांवरचा हा एक महत्त्वाचा उपाय आहे. पुस्तकांची संगत लाभलेला समाज म्हणजे मनात विवेकाचा दिवा कायम तेवता ठेवणारा समाज! विचार करू शकणारा समाज… असा समाज व्यवस्थेला, राज्यसत्तेला प्रश्न विचारू शकतो. सारासार विचारबुद्धीनं समष्टीचा साकल्यानं विचार करू शकतो. आपल्या हिताचं काय आहे, याची नेमकी जाणीव त्याला असते.
पुस्तकांचे उत्सव हवेत ते यासाठी! ‘रोहन’सह मराठीतले सर्वच नामवंत प्रकाशक सतत या पुस्तकोत्सवासाठी धडपडत असतात. या उत्सवात सामील होणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि आपल्या समृद्ध असण्याची खूणसुद्धा!
- श्रीपाद ब्रह्मे
या सदरातील लेख…
वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.
साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात.
स्वरांच्या या परब्रह्माला साक्षात बघण्याचे, भेटण्याचे अगदी मोजके प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझ्या पत्रकारितेच्या पेशामुळंच हे शक्य झालं.