WebImages_2222

बद्रीनाथ : एक नियोजित बुलावा (एकला सोलो रे)

फॉन्ट साइज वाढवा

एखाद्या प्रवास कंपनीची आपण जाहिरात बघतो. रस वाटला तर त्यांना संपर्क करतो, ते मिनिटा-मिनिटाचं तुम्हाला नियोजन देतात आणि आपली संपूर्ण जबाबदारी घेऊन पुन्हा राहत्या शहरात आणून सुखरूप सोडतात. अशा प्रवासी सेवांचा आपण जरूर लाभ घ्यायला हवा, पण त्याचसोबत कधी जमलं तर ‘‘No plan’ is the plan’ असं ठरवून एका ठिकाणी गेलात तरीही काही अनोखे आठवणींचे शिंपले तुम्हाला सापडू शकतात. असा एक सुंदर शिंपला आणि त्यातील अजूनही चमकणारा मोती आज आपल्याला दाखवावासा वाटतो.

‘फक्त ऋषिकेशला पोहचू मग पुढचं ठरवू’ असं म्हणूनच इथपर्यंत पोचलो होतो. ऋषिकेशमध्ये तीन दिवस मनसोक्त फिरून झालं. एकदा फिरल्यानंतर फक्त चिल्ल करत दोन-तीन दिवस बसून टाईमपास करण्याचा माझा स्वभाव नाही. पण या वेळी ‘नियोजन नाही, हेच नियोजन असल्यामुळे’ पुढचं शेड्युल काहीच डोक्यात नव्हतं. देहरादून जावं, जोशीमठला जावं की एखादा नवा पर्याय शोधावा, यात गोंधळ उडाला होता. त्यामुळे कुठेही जायचं ठरत नव्हतं. त्यादिवशी ऋषिकेशमधले काही धबधबे, काही मंदिरं बघितली आणि आता उद्या काय? हा प्रश्न घेऊन होस्टेलवर परत आलो.

दुपारी हॉस्टेलवर एक मुलगा भारताचा नकाशा उघडून बसला होता. मी चार्जर घेताना सहज त्याला ‘हाय..’ केलं आणि त्यानं प्रतिसाद दिला. चार्जर घेऊन जाईपर्यंत एकमेकांची गावं, नावं कळली. आणि सहज त्याला मी उद्याचं त्याचं नियोजन विचारलं तर तो म्हणाला ‘I’m going to Badrinath’ आणि मला मनातून निसटलेल्या शक्यतेचा उलगडा झाला. याचं नाव भालचंद्र, वय (दोन वर्षांपूर्वी) २०-२१, हा हैद्राबादचा, याचं वैशिष्ट्य म्हणजे गेले आठ-नऊ महिने हा भारत एकटा पिंजून काढत होता. त्याला सगळे ‘भालू’ म्हणतात असं तो म्हणाला. त्याला मी माझ्या मनात असलेला गोंधळ बोलून दाखवला आणि अहो आश्चर्यम्, एकमेकांच्या संमतीनं ‘आपण उद्या बद्रीनाथला एकत्र जाऊया’ असं ठरलं.

आता बद्रीनाथ म्हणजे इथून पलीकडचं गाव नव्हतं, तीनशे किमी अंतर पार करून गाठायचा तो एक स्वतंत्र प्रदेश होता. बर्फामुळे बद्रीनाथ बंद आहे, अशाही अफवा ऐकल्या होत्या. माझं या वेळी नियोजन बक्कळ चुकल्यामुळे माझ्याकडे गरम कपडे नव्हते, म्हणून मग तिथून फक्त मी जाड जॅकेट विकत घेतलं आणि पायातल्या सँडलवर भागेल असं स्थानिकांचं ऐकून बूट न घेण्याचा कंजूषपणा (मूर्खपणा) केला. उद्याच्या सकाळी पाच वाजता (एकमेव) सुटणाऱ्या बसची माहिती काढली आणि सकाळचा गजर लावून झोपी गेलो. ‘बद्रीनाथ का बुलावा आया है’ म्हणत इन्स्टंट म्हणावा असा प्लॅन ठरला होता.

प्रवासात आपण स्वतःव्यतिरिक्त कुणाचीही शाश्वती देऊ शकत नाही. पण सुदैवानं भालू ठरल्याप्रमाणे वेळेवरती उठला. बसही वेळेवर मिळाली आणि ‘जय बद्री विशाल की’ची घोषणा होत बस सुरू झाली. बद्रीनाथ बंद असल्याची अफवा दिल्लीवरून येताना ऐकली होती, पण ते खरंच पुढच्या तीन दिवसांत बर्फवृष्टीमुळे बंद होणार आहे अशी बातमी गाडीच्या वाहकानं दिली. आम्ही खरोखरच भाग्यवान होतो. आनंदाची गोष्ट म्हणजे प्रवासात माझ्या बाजूला एक महाराष्ट्रीयन जवान बसले, त्यांच्यासोबत मस्त मराठीतून गप्पा झाल्या. बद्रीनाथ येईपर्यंत आम्ही फक्त चौघे जण बसमध्ये उरलो. ‘बद्रीनाथ बंद आहे’ ही अफवा खरी मानली असती तरी चाललं असतं, अशी कडकडून थंडी वाजू लागली. आयुष्यात माझा फारतर संबंध फ्रीजमधल्या बर्फाशीच तेही कोकम सरबतासोबत आला, पहिल्यांदा इथे बर्फाला मी असं अनुभवत होतो, वर बूट विकत न घेण्याचा निर्णय नडणार आहे हे आता कळून ‘चुकलं’ होतं.

बद्रीनाथला उतरल्या-उतरल्या काही हॉटेलवाले अपेक्षेनं आले, कारण वर्दळ खूप कमी झाली होती, व्यवसायाचा शेवटचा आठवडा. आम्ही बसमधले चौघे एकत्र येऊन एकच खोली घेतली, ती प्रशस्त आणि स्वस्त पडली. सकाळी पाचला सुरू केलेला प्रवास संध्याकाळी आठला या खोलीत पूर्ण होत होता. आणि यांचं, त्यातही भालूचं मत झालं ‘चला दर्शन घेऊन येऊ!’. मी माझी थंडीची पंचाईत अशी खुली करून सांगूंही शकत नव्हतो, शेवटी मीही बद्रीनाथाचं नाव घेऊन शेवटी ‘चला..’ म्हणालो. रात्री दर्शन फारच सुंदर झालं. अक्षरशः गुडघ्यापासून खाली सुन्न झाले पाय घेऊन मी खोलीवर परतलो आणि आधी अंथरुणात शिरून गुडगुप झालो.

उरलेले दोघे काल झालेल्या दर्शनामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे लगेच परतीच्या वाटेवर लागले, मी आणि भालू अजून एक दिवस राहणार होतो. बद्रीनाथ पासून पाच किमीवर असणारं भारतातलं शेवटचं गाव ‘माना’ आणि ‘वसुंधरा धबधबा’ बघणार होतो. माझ्या शरीरानं सकाळी उठलो तसा इकडच्या थंडीशी समझोता केला. पायाचं संवेदन परत आलं आणि आम्ही माना गावाच्या दिशेनं निघालो. भारत-चीन सीमेवरचं शेवटचं गाव ‘माना’ या वैशिष्ट्याशिवाय व्यास गुहा, भीम पूल आणि महाभारतातील संदर्भ असलेली ठिकाणं इथे बघण्यासारखी आहेत.

इथूनच पुढे वसुंधरा फॉल्ससाठी ट्रेल सुरू होतो. दमावणारं नसलं तरी चांगलच लांब असलेलं हे hiking destination आहे. पुन्हा इथे जास्त चालण्याची मनाने तयारी केली नसल्यामुळे, आता येईल, मग येईल म्हणताना फक्त नवं वळण आणि उंचवटे वाटेवरती येत होते. जवळ-जवळ चार-साडेचार तासांनी आम्ही वसुंधरा धबधब्यावर पोहचलो. आपली चालण्याची तयारी असेल, तर बघायलाच हवं असं हे ठिकाण आहे. नोव्हेंबर असल्याने तेव्हा चारही बाजूनी बर्फ आणि समोर झिरिमिरी बरसणारा वसुंधरा धबधबा सगळ्या थकव्याचा इलाज असल्यासारखा वरून कोसळत होता. बऱ्याचदा मला मित्र खोचकपणे विचारतात ‘तू सोलो जातोस तर मग तुझे फोटो कोण काढतं..!’ खासकरून मित्रांना अशी शंका येणं साहजिक आहे, पण असेच भालूसारखे दोस्त आशा वाटांवर हमसफर होतात, त्यामुळे ते शक्य होतं.

आम्हाला परतायला चांगलाच उशीर झाला. म्हणजे संध्याकाळचे सात साडेसात वाजले असतील, त्यामुळे बद्रीनाथला परत जायला एकही वाहन मिळालं नाही. पुन्हा पाय तुडवत दमलेलं शरीर घेऊन उलटा प्रवास सुरू केला. अशा गैरसोयीचा तात्पुरता त्रास होऊ शकतो, पण त्याच्याच नंतर आठवणी होतात अशी माझी धारणा आहे. जशी एक आठवण इथे मिळाली. दोघे प्रचंड थकलेलो असताना, ह्या पठ्ठ्याला पुन्हा दर्शन घ्यायची हुक्की आली. मनात मी चरफडलो, पण उद्या निघताना धावपळीत ते शक्य नसल्यानं मी होकार दिला. आणि इथल्या दुसऱ्याही रात्री तशा अवस्थेत आम्ही पुन्हा दर्शन घेतलं. थंडी कडाडून वाढली आणि मंदिराशेजारील गरम पाण्याच्या कुंडांनी आम्हाला हाक दिली. दोघांचे डोळे एकमेकांकडे बघताना लकाकले. कडक थंडीत कपडे त्यागून, अशा गरम पाण्यात पहिलं पाऊल ठेवताना मनाला काय वाटलं असेल, फक्त आपण कल्पना करा. तो अनुभव थोड्याचवेळात पूर्ण शरीरानं घेतला. गर्दी कमी होती. मनसोक्त डुंबलो. आणि शेवटी पुन्हा सत्यात यावंच लागतं तसं आम्ही आवरून खोलीवर परतलो.

ऋषिकेशमध्ये एका संवादामुळे ही सुंदर शक्यता जगता आली. नियोजन चुकीचं ठरलं, असं तरी कसं म्हणणार, त्याशिवाय का हे शक्य झालं. सोलो मुशाफिरीत तुम्ही कुठल्याही टूरनं ठरवून दिलेल्या आयटनरीशी बांधील नसता, यात वाटा बदलतात, माणसं भेटतात आणि प्रवास हा असा सुरस होतो.. !

आपले प्रवासाचे हेतू स्वच्छ असतील, तर नियोजन केलं नाही, तरी कुणी ‘भालचंद्र’ भेटून जातो, कुणी ‘बद्रीनाथ’ आपल्यासाठी वर काही ठरवत असतो, यावर माझा विश्वास आहे!

– आदित्य दवणे

RohanSahityaMaifaljpg-1-1

या सदरातील लेख…

‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)

अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…

लेख वाचा…


माणुसकीचे त्यांचे चेहरे!

– कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं.

लेख वाचा…


जान है तो जहान है! (कलगा-पुलगा-तुलगा)

– मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं! 

लेख वाचा…


अनेगुंडी : एक अद्वितीय सफर!

-त्या खडकांवरील अनघड चित्रांवरून हात फिरवताना मला अबोल-सर्जनशील पूर्वजांना स्पर्श केल्याचा भास झाला, पण त्यापूर्वीचा प्रवास म्हणजे एक दिव्य होतं! 

लेख वाचा…


Tags: No tags

One Response

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *