जे पुस्तक वाचून आपल्या मनाला आनंद वाटतो, जे पुन्हा वाचावंसं वाटतं, ज्याच्या स्मरणरंजनातही मजा येते, असं पुस्तक माझ्यासाठी आवडतं असतं. अलीकडेच अशा आनंद देणाऱ्या पुस्तकाची गाठभेट झाली. भान हरपून मी ते वाचतच राहिले. सचिन कुंडलकरचं ‘नाइन्टीन नाइन्टी’ हे ते पुस्तक. मला नेहमीच आनंद शेअर करायला आवडतं म्हणून हे लेखन.
हे पुस्तक शीर्षकापासून वेगळेपण जपणारं, कुतुहल वाढवणारं आहे. हे वेगळेपण केवळ शीर्षकापुरतंच मर्यादित नाही, तर ते लेखकाच्या विचारांचं, जाणिवांचं, संवेदनशीलतेचं आणि दृष्टिकोनाचंही आहे. नव्वदचं दशक हा लेखकासाठी सांधाबदल म्हणता येईल. १९७६ साली जन्मलेल्या सचिनचं टीन एज याच दशकात सुरू होतं. वादळीवयाचा हा कालखंड शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांचा जसा असतो, तसाच करिअरची दिशा ठरवण्याचा, ‘स्व’ची ओळख होण्याचा, स्वत:ला घडवण्याचाही असतो.
मूलत: लेखक हा संवेदनशील, परिपक्व, उत्तम समज आणि शहाणीव असणारा आहे. त्यामुळे भवतालचा त्याच्यावर परिणाम होणं अपरिहार्य ठरतं. या दशकाने अॅनॉलॉग मानसिकतेतून डिजिटल काळात कूस बदलली होती. या टीनएजरसाठी हा केवळ तांत्रिक बदल नव्हता, तर मानसिक, भावनिक आणि वैचारिक उलथापालथीचा होता. ‘माझं मन अजूनही वाचणारं मन आहे, पाहणारं मन नाही’ असं म्हणत तो एकप्रकारे वाचनाचं महत्त्व अधोरेखित करतो.
पुढे महेश एलकुंचवार, श्रीपु भागवत, विजय तेंडुलकरांसारखी माणसं त्याला भेटत गेली अन् वाचनाला दिशा मिळाली; वाचनाचा आणि विचारांचा परीघ विस्तारला. देशोदेशीचं साहित्य मग खुणावू लागलं. वाचणारा माणूस एक दिवस लिहायला लागतो असं मला वाटतं. २२-२३ वर्षांच्या वयात फ्रेंच शिकताना याला एक विद्यावृत्ती मिळते अन् हा पठ्ठा थेट पॅरीसमध्ये जाऊन धडकतो. तीन-साडेतीन महिन्यांच्या काळात हा खूप गोष्टी शिकतो.
‘‘…पॅरीसने मला अमूर्ततेला स्वीकारायला शिकवलं. शब्दातील, प्रतिमेतील, खाण्यापिण्यातील आणि प्रेम करण्यातील अमूर्तता… स्वत:च्या अंगात अमूर्ततेचा स्नायू कमावता यावा म्हणून मी सावकाशपणे शास्त्रीय संगीत ऐकू लागलो…’’
लेखकाची शब्दकळा बघितली की वाटतं, हा जन्मत: लिहिणारं बोट घेऊन आलाय अन् त्याने त्याची जाणीवपूर्वक मशागत केलीय. याच्या विचारांचा पैस एवढा विस्तारलेला आहे की, त्यातून त्याचं स्वत:चं असं जीवन तत्त्वज्ञान तयार झालं आहे.
बावीसाव्या वर्षी हा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ नावाची लघु कादंबरी लिहितो. एकदम वेगळ्या विषयावरची. नवख्या बॅट्समनने पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकावी अन् सर्वांना चकित करावं तसं याच्याबाबतीत झालं. पहिलंच लेखन मौज प्रकाशनाने प्रकाशित करावं ही कमाल तो सहजपणे करू शकला. या निमित्ताने श्रीपुंशी झालेल्या चार भेटींनी याला समृद्ध केलं. पुढे ही कादंबरी इंग्रजीतही आली अन् गाजलीदेखील. लक्षात येतं की, लिहिणं हे याचं केवळ पॅशन नाही, तर श्वास आहे.
विजय तेंडुलकरांच्या सहवासात सचिन नावाच्या हिऱ्याला पैलू पडले. तेंडुलकरांचं बोलणं, त्यांचे विचार, त्यांचं वाचन याचा सचिनवर मोठा प्रभाव दिसतो. त्यांनीच ओळख करून दिलेला तुर्की लेखक ओरहान पामुक हाही पुस्तकात आपल्याला अधूनमधून भेटतो. तसंच, अमूर्तता अन् ऊर्जा हे शब्दही. या पुस्तकातील तेंडुलकरांवरचा ‘मोनोलॉग’ सुंदर! ‘तें’चं व्यक्तिचित्रच ठळकपणे लेखक आपल्यापुढे उभं करतो.
जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाईंच्या पत्रव्यवहारातूनही त्याला अनेक पुस्तकांपर्यंत पोचता आलं.
माधुरी पुरंदरे, सुमित्रा भावे आणि शांता गोखले या तीन बुद्धिमान स्त्रियांकडून त्याला अनेक गोष्टी शिकता आल्या. हे सगळं वाचताना फार मजा येते. तसंच लेखक, दिग्दर्शक, नाटककार, पटकथाकार, त्याचे सिनेमे, त्याची जडणघडण सारंच वाचतानादेखील मनस्वी आनंद वाटतो. त्याची भाषा एवढी प्रवाही, चित्रदर्शी अन् लोभस आहे की, आपण त्यात वाहत जातो. त्याने उभ्या केलेल्या काळाशी पटकन रिलेट होत जातो. कोचीतील चित्रप्रदर्शनाचं वर्णन करताना जुन्या गोदामांच्या कल्पकतेने केलेल्या वापराचं तो कौतुक करतो. त्याच वेळी ही गोदामं मसाल्याची असल्यामुळे सर्व प्रदर्शनावर जायफळ, दालचिनी तसंच मिरीचा जुना गंध पसरला असल्याचं तो लिहितो तेव्हा आपल्यालाही तो गंध जाणवतो. इथे त्याची शैली स्वादमयी होते.
लेखकाचा प्रेमभंग, हाताची शीर कापणं, त्यातून सावरणं, एकटेपणा आणि नैराश्य, झालेल्या चुका, मिळालेले धडे – सारंच खूप प्रामाणिकपणे मांडलंय.
या पुस्तकातील मला सर्वांत जास्त आवडलेला लेख म्हणजे ‘डाळिंबाचे दाणे’. कुमार गंधर्वांच्या पंचविसाव्या पुण्यतिथीनिमित्ताने देवासला आलेल्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचं आणि तेथील वास्तव्याचं वर्णन इतकं सुंदर आहे की, ते ताल, लय, सूर, नाद सारं काही घेऊन येतं. …कुमारजींची लेक- कलापिनीचं व्यक्तिमत्त्व इतकं छान, घरगुती, सहज, साधं आहे की, ती आपली जिव्हाळ्याची सखीच वाटते. माळव्यातला गोडवा लेखभर जाणवतो. टाळ्यांसाठी वापरलेलं ‘करतालध्वनी’ हा सुंदर शब्द या लेखामुळे कळतो.
हे लयभारी पुस्तक मुळातूनच वाचायला हवं. यात आवडलेल्या गोष्टींचा मनमोकळेपणाने केलेला स्वीकार, कौतुक जसं आहे तसंच न आवडलेल्या, खटकलेल्या गोष्टींबद्दल, व्यक्तींबद्दल बेधडक आणि रोखठोकपणेदेखील सचिन लिहितो. पुस्तक वाचून झालं तरी त्याची शेरेबाजी आठवत राहते.
‘श्रीदेवी हे माझ्यासाठी नव्वदीच्या दशकाचं बोधचिन्ह आहे.’ ‘सध्याच्या काळाची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही काम करायचं थांबलात की त्या क्षणी तुम्ही विसरले जाता. माणसाचं ‘शेल्फ लाइफ’ फार कमी झालं आहे.’ आपल्याला सचिन कुंडलकरचे अजून खूप सिनेमे बघायचे आहेत, नवीन छान छान पुस्तकं वाचायची आहेत त्यामुळे तो थांबण्याचा प्रश्नच नाही!
-डॉ. विजया फडणीस
नाइन्टीन नाइन्टी /लेखक- सचिन कुंडलकर / रोहन प्रकाशन
- मला आवडलेली इतर काही पुस्तकं
- सुनीताबाई /लेखक- मंगला गोडबोले / राजहंस प्रकाशन.
- ‘तें’ आणि मी / लेखक- शकुंतला पुंडे / रोहन प्रकाशन.
- त्या चौघी / लेखक- अनिल बळेल / स्नेहल प्रकाशन.
- आत्मोल्हास / लेखक- विमला ठकार / केशव भिकाजी ढवळे प्रकाशन.
- मधुमेही खुशीत…/ लेखक- डॉ. प्रदीप तळवलकर / रोहन प्रकाशन.
- ज्ञान ते सांगतो पुन्हा / लेखक- विनोबा / मौज प्रकाशन.
- मुसाफिर / लेखक- अच्युत गोडबोले / मनोविकास प्रकाशन.
- त्या दहा वर्षांतील गुरूदत्त / लेखक- सत्या सरन – अनुवाद : मिलिंद चंपानेरकर /रोहन प्रकाशन.
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जून २०२०
रोहन शिफारस
नाइन्टीन नाइन्टी
आघाडीचा चित्रपट-दिग्दर्शक, संवेदनशील लेखक सचिन कुंडलकर… या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतोय, जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन… नाइन्टीन नाइन्टी !
₹340.00Add to Cart