व्यवसाय किंवा नोकरी-धंद्यातील प्रगतीसाठी…
सुब्रोतो बागची हे ‘माइंड–ट्री लिमिटेड’चे व्हाईस चेअरमन आणि सहसंस्थापक आहेत. २००८ पर्यंत ते ‘माइंड–ट्री’चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते. त्यानंतर माइंड–ट्रीचे ‘गार्डनर’ होण्यासाठी त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला. माइंड–ट्रीच्या ग्राहकांसाठी नवीन उपक्रम तयार करणं, तेथील अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या 100 सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणं अशा प्रकारचं काम ते सध्या करतात. ते ‘माइंड–ट्री’च्या इनोव्हेशन कौन्सिलच्या चेअरमनपदीही आहेत. त्यांची सगळी पुस्तकं बेस्ट-सेलर ठरली व अतिशय गाजली आहेत.
अनुवाद :
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे.
फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.
चांगला उद्योजक / व्यावसायिक / नोकरदार होण्यासाठी
तुम्ही ‘जागरूकपणे’ प्रयत्न करायला तयार आहात?
सुप्रसिद्ध लेखक, ‘माइंडट्री’ कंपनीचे संस्थापक सुब्रोतो बागची यांनी
‘द प्रोफेशनल’ (मराठी आवृत्ती : मैत्री व्यावसायिकतेशी) हे पुस्तक लिहिलं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या पुस्तकात त्यांनी व्यावसायिकतेबद्दल त्यांच्या अनुभवांआधारे भाष्य केलं होतं, तर ‘तुमचा सच्चा साथीदार’मध्ये त्यांनी व्यावसाययिकांमध्ये आवश्यक असणार्या गुणांचा विकास व्हावा, यासाठी एका वर्कबुकचीच निर्मिती केली आहे.
या पुस्तकात त्यांनी चांगला व्यावसायिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५ गुणांबद्दल थोडक्यात, पण मौलिक माहिती दिली आहे. तसंच हे गुण आपल्या अंगी कसे बाणवावेत, ते अधिकाधिक विकसित कसे करावेत, हे आपलं आपल्यालाच समजावं यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रश्नही विचारले आहेत. त्यांची उत्तरं देण्यासाठी पुस्तकात मोकळ्या जागा देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आपल्याला सामोरे जावे लागणारे, आपल्या क्षमतांचा कस लावू पाहणारे वेगवेगळे घटना-प्रसंगही देण्यात आले आहेत. त्या घटना-प्रसंगांत तुम्ही कसं वागाल, काय कृती कराल हे पुस्तकात लिहायला सांगितलं आहे. कधीकधी आधी दिलेल्या उत्तरांचं पुनरावलोकन करायलाही सांगितलं आहे.
‘प्रत्यक्ष स्वाध्याय’ करायला लावून स्वत:च्या आत डोकवायला लावणारं हे आगळंवेगळं पुस्तक सगळ्या व्यवासायिकांना, उद्योजकांना आणि नोकरदारांना मौलिक मार्गदर्शन तर करेलच, शिवाय व्यावसायिक जीवनातला ‘तुमचा सच्चा साथीदार’ही होईल !