‘त्या’जगाची दु:खं, उपेक्षा समजून घेण्यासाठी…

समीर गायकवाडला ओळखायला लागले ते फेसबुकवरच्या स्त्रियांविषयी लिहिलेल्या त्याच्या पोस्ट्समुळे. लिहिणारा खूपच संवेदनशील आणि प्रामाणिक असल्याचं जाणवलं होतं. त्यामुळेच रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं त्याचं ‘खुलूस’ हे पुस्तक वाचायला घेतलं. खुलूस वाचण्याआधी असंही वाटलं होतं, आपल्याला आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकांमधून, नाटक आणि चित्रपटांमधून वेश्या व्‍यवसाय करणार्‍या स्त्रियांविषयीचं विदारक वास्तव माहीत झालं आहेच, मग हे पुस्तक पुन्हा का वाचायचं असं वाटत होतं. एक प्रकारचं कोरडेपण, रुक्षपणा मनाला आला होता. आपण बोथट झालो आहोत का, आपलं मन बधिर झालंय का अशा विचारांनी थोडा वेळ गोंधळल्यागत झालं. मात्र तरीही मनात येणारे सगळे विचार दूर सारून खुलूस वाचलं आणि वाचल्यानंतर एकप्रकारची बेचैनी आणि अस्वस्थता आली. मी स्वत: स्त्री-पुरुष असा भेद न मानता प्रत्येकाकडे व्‍यक्‍ती म्हणून, माणूस म्हणून बघायचा प्रयत्न करत असले तरी आजही जगभर स्त्री म्हणून एक भेदाची, एक उपेक्षेची, एक दुय्यमत्वाची भावना स्त्रीच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात येतेच हे एक विदारक सत्य आहे.

 ‘खुलूस’मध्ये रेड लाईट परिसरात वेश्याव्‍यवसाय करणार्‍या वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रियांची कहाणी आहे. हिराबाई, नसीम, अमिना, सुरेखा, जयवंती, बिस्मिल्ला, शांतव्‍वा, सावित्री, जानकी, नलिनी, साखरीबाई, मुमताज, परवीन, मालती, सलमा, भारती अशा अनेक स्त्रियांची ओळख समीर गायकवाड या तरुणामुळे झाली. प्रत्येकीची कहाणी वेगळी, प्रत्येकीचं कुटुंब, परिस्थिती, गाव, वेगळा पण तरीही वाट्याला आलेल्या वेदना, त्रास, दु:ख, हाल-अपेष्‍टा एकच. फसल्या गेलेल्या, फसवल्या गेलेल्या, कुठल्यातरी मोहात अडकून वाट चुकलेल्या, निमूटपणे त्रागा न करता मार्ग स्वीकारलेल्या, अशा अनेक स्त्रिया खुलूसच्या निमित्ताने भेटल्या.खुलूसमधल्या काळोख्या जगात जगणार्‍या स्त्रियांचं सच्चेपण सतत जाणवत राहतं. त्यांच्या वाट्याला येणारं बकाल, नरकयातनांनी भरलेलं, नकोसं असणारं जग एखाद्या जादुई चमत्काराने बदललं जावं अशा कल्पना करणं वेगळं आणि ते जगणं जरा तरी सुसह्य करण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते वेगळे. समीर गायकवाड असाच एक तरुण. आपण काहीतरी मोठं काम करतोय असा कुठलाही आविर्भाव न आणता त्याने हे जग वाचकांसमोर अत्यंत प्रामाणिकपणे आणलं आहे. या स्त्रियांचं दु:ख समजून घेत असताना आपण याच जगाचे भाग असल्यामुळे त्यांच्या या स्थितीला कळत-नकळत आपणही जबाबदार असल्याची अपराधी भावना जशी त्याच्या मनात दाटून येते, तशीच आपल्याही. 

‘खुलूस’चं लिखाण सरळ, सोपं, ओघवतं असं आहे. प्रसंगाच्या ओघात लिहिलेली वाक्यं लक्षात राहतात. उदाहरणार्थ, हिराबाईचं गायन, तिची कला बहरण्यात गुलाबभाईंचं योगदान व्‍यक्‍त करताना लेखक म्हणतो, ‘गुलाबभाईने तिच्या गायकीत फलांचे सौंदर्य भरले, अत्तरांचे गंध ओतले, शृंगाराचे कुंभ तिच्या गायकीत रिते केले, तिला खयाल शिकवले, नानाविध चीजा शिकवल्या.’ त्याच हिराबाईच्या बेवारशी मृत्यूविषयी लिहिताना लेखक म्हणतो, ‘त्या अंधार्‍या रात्री आयुष्यभर संघर्ष करत जगलेल्या हिराबाईचे प्राण हलकेच निघून गेले. हॉस्पिटलमधल्या भिंती तेव्‍हा गदगदून गेल्या होत्या. ती ज्या बिछान्यावर पडून होती, तो तिचं कलेवर अंगावर घेऊन मूकपणे रुदन करत होता. तिचं कण्हणं ज्यांनी ऐकलं होतं त्या सर्व निर्जीव वस्तूंनी गहिरे उसासे टाकले होते. वारा सुन्न होऊन जागीच थबकला होता, तर काळ्यानिळ्या आभाळातल्या कृष्णमेघांनी तिच्या आत्म्याला दिक्कालाच्या पलीकडे जाण्यासाठी सोबत दिली होती’. नसीमसारखी एखादी स्त्री कामाठीपुर्‍यातलं वाट्याला आलेलं आयुष्य तक्रार न करता कशी स्वीकारते याविषयी लिहिताना लेखक आपल्यासमोर एक जिवंत कलेवर उभं करतो. एखादं माणूस इतकं सोशिक, सहनशील असू शकतं का असा प्रश्न पडावा असं. सहनशील असणं आपलं कंडिशनिंग आहे का असाही प्रश्न पडतो. हीच नसीम ज्या वेळी एखादं गिर्‍हाईक लहान मूल असलेल्या स्त्रीला निवडतं, त्या वेळी ते गिर्‍हाईक परत जाईपर्यंत कोणाएकीचं बाळ छातीला कवटाळून बसलेली नसीम दिसायला लागते. तिच्या आयुष्यातला एखादा अंधुकसा समाधानाचा क्षण तिथे असल्याचा भास होतो. 

तीन दशकांतल्या स्त्रिया खुलूसमध्ये भेटत गेल्या. या व्‍यवसायात आल्यानंतर आपल्या मुलीच्या वाट्याला नरकमय आयुष्य येऊ नये यासाठीची धडपड, अपराधीपणाची भावना, मनात दडपलेल्या इच्छा-आकांक्षा आणि परिस्थितीपुढे शरण जावं लागल्याने लागलेली टोचणी, त्यातूनच खंगत खंगत आलेला मृत्यू ही कहाणी असलेल्या काहीजणी इथे भेटल्या, तर परिस्थिती बदलण्याची हिम्मत ठेवणारी, लढणारी, अशीही तरुणी इथेच भेटली. शकिला, नसीम यांच्यामधलं कासावीस करणारं मातृत्व इथे दिसलं, तर अमिनासारख्या मुलीच्या आयुष्यात आलेल्या प्रेमाची आणि त्याच प्रेमाच्या शेवटाची दर्दभरी दास्तान इथेच बघायला मिळाली. सुरेखा बिश्तसारख्या तरुणीवरच्या अत्याचाराची, माणसाच्या विकृतीची कहाणीही डोळ्यादेखत घडल्याचा अनुभव आला. मात्र त्याच वेळी स्वत:वरचा अत्याचार सहन करणारी सुरेखा एका अपंग वृद्धेवर होणारा बलात्कार बघू शकली नाही, तिथे सगळं बळ एकवटून तिने त्या प्रसंगाशी दोन हात केले. तिच्या बंडखोरीची, अन्यायाविरोधात लढण्याची जबरदस्त किंमतही तिला चुकवावी लागली. या आणि अशा अनेक कहाण्यांनी मला स्तिमित केलं. त्यांच्या-माझ्यामध्ये विनाकारण निर्माण झालेलं अंतर कमी केलं.  व्‍यवस्थेतला प्रत्येक घटक या परिस्थितीला कसा कारणीभूत आहे हे खुलूसने, लेखकाने आणि या स्त्रियांनी मला सांगितलं. इथे खितपत पडलेल्या स्त्रियांच्या मृत्यूचं रूप दारुण आणि विदारक आहे. अशा स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुला-मुलींची आयुष्यं आणखीनच भेसूर, भयंकर आहेत, हेही त्यांनी सांगितलं.खुलूसमध्ये कोरोनाकाळात अशा परिसरातल्या स्त्रियांची झालेली दयनीय अवस्था तर वाचवत नाही. आंध्र प्रदेशातली दिव्‍या चेकूदुराई असो की दिशा असो, खरं तर नावं काहीही असोत, पण त्यांचा जगण्याचा अधिकारही हिरावून घेतला जावा आणि नरकापेक्षाही क्रूर यातना देऊन त्यांचा मृत्यू घडवावा अशा कहाण्यांनी मन सुन्न झालं. मुख्य म्हणजे अशा विषयावरचा एखादा चित्रपट असो की कादंबरी, ती वाचून बाजूला ठेवली की आपण आपल्या जगात काहीच वेळात परत येतो. तसंच चित्रपटातल्या सादरीकरणात अतिशयोक्ती, अतिरंजित वर्णन यांचा अंतर्भाव केल्यामुळे ते थोड्या वेळापुरतंच मनाला अस्वस्थ करतं. पण समीरचं खुलूस वाचून झाल्यावर, त्या जगात प्रवेश केलेले आपण परत जसेच्या तसे आपल्या पहिल्या जगात परत येऊ शकत नाही. खुलूसमधल्या प्रत्येकीचं दु:ख, तिच्या वेदना, तिची उपेक्षा, तिचं मूक रुदन, तिची असहायता, हतबलता, हे सगळं सगळं खोलवर रुतत जातं.

 जेव्‍हा आपण म्हणतो या जगावर, निसर्गावर प्रत्येक माणसाचा, पशू, पक्षी, कीटक या सगळ्यांचा अधिकार आहे. कोणी परिस्थितीने गरीब असेल वा कोणी श्रीमंत असेल, कोणाकडे गाडी असेल तर कोणाचा एक पाय अधू असेल, कोणी एखाद्या महालात सुखासीन आयुष्य कंठत असेल, तर कोणाच्या वाट्याला फूटपाथवर रात्र काढावी लागत असेल. असं कसंही विरोधाभासी चित्र असलं तरी असू देत. पण त्या त्या परिस्थितीत जगण्यासाठी प्रत्येकाला मोकळा श्वास घेण्यासाठीचं अनुकूल वातावरण एक असू देत, पोट भरण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना थोडं तरी यश लाभू देत, कोणीही कोणाचं एक्स्प्लॉयटेशन करण्याची, बळजोरी करण्याची वेळ न येऊ देत, नैसर्गिक मृत्यू कधीही येवो, मात्र समोरच्याचं आयुष्य, त्याने जगायचं की मरायचं याचा निर्णय कोणा एकाच्या हातात असू नये असं मात्र ‘खुलूस’ वाचल्यावर पुन्हा पुन्हा वाटतं. खुलूसमधला एक भाग आशेच्या किरणासारखा भासला, तो म्हणजे कोलकात्यामध्ये दूर्गापूजेच्या वेळी तिथल्या काही युवांच्या गटाने वेश्यालयाचा देखावा उभा केला. यात त्यांना सनातन्यांचा खूप विरोध झाला, पण त्यांनी हाही वर्ग समाजाचाच एक भाग असल्याने हिम्मत दाखवली. यात पंडालच्या आत शिरताच सोनागाची या भागातल्या वेश्यावस्तीची झलक उभी करण्यात आली. इथे असलेल्या स्त्रिया येतात कुठून, त्यांच्या खोल्या (पिंजरा) कशा असतात, त्यांचं विश्व कसं असतं, त्यांच्या कहाण्या, असं बरंच काही. असा विषय घेऊन त्यावर धाडसाने काम करणार्‍या वंगबंधूना सलाम. तसंच काही स्त्रियांमध्ये असलेलं दुर्गेचं रूप खुलूसमध्ये दिसलं. त्यांचा बंडखोरपणा, अन्यायाविरोधात उचललेलं पाऊल बघून त्यांच्याविषयीचा अभिमान वाढला. ही व्‍यवस्था, या वस्त्या, इथे राहणार्‍या स्त्रियांची उपेक्षा पूर्णपणे कधीही थांबणार नाही असं मानलं तरी आपणच केलेली ही दोन जगं, या दोन जगातलं अंतर कमी करण्यासाठी माणुसकीचा हात पुढे करणार आहोत की नाही, वेश्या असोत वा एलजीबीटीक्यू समुदाय यांना आपण आपल्यातलाच एक भाग मानणार आहोत का नाही, हे प्रश्न स्वत:ला विचारून त्यावर सकारात्मक पावलं उचलायची आहेत. ‘खुलूस’ म्हणजे सच्चेपण, आस्था किंवा निष्ठा… आणि खुलूसच्या निमित्ताने समीर गायकवाडसारखा एक सच्चा कार्यकर्ता, प्रामाणिक लेखक अशी पावलं उचलायलाच सांगू इच्छितोय असं मला वाटतं. आपण या व्‍यवस्थेला कसं बदलणार आहोत, आपल्या या मैत्रिणींचं आयुष्य सुसह्य कसं करणार आहोत हे ठाऊक नाही, पण माणूस म्हणून जरा संवेदनशीलपणे या सगळ्याकडे बघणार आहोत का? अन्वर हुसेनचं विषयाला साजेसं मुखपृष्ठ आणि रोहन प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती याबद्दल त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. माणुसकीला काळिमा फासणारं एक दुसह्य जग जाणून घेण्यासाठी, त्या जगाची दु:खं समजून घेण्यासाठी, त्यांची उपेक्षा कमी करण्यासाठी जरूर वाचा समीर गायकवाड लिखित खुलूस : रेडलाइट डायरीज…

– दीपा देशमुख (adipaa@gmail.com)
 रेड लाइट डायरीज…खुलूस  लेखक : समीर गायकवाड  किंमत रु.३००

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *