फॉन्ट साइज वाढवा
वाचकहो…!
गेला पावणेदोन वर्षांचा काळ आपणा सगळ्यांसाठी कठीण आणि विचित्रसा गेला आहे, जातो आहे. आजवर कधी विचारही केला नव्हता अशी गोष्ट या काळात घडली ती म्हणजे सक्तीने घरी बसणं! आणि त्यामुळे आपल्या जीवनशैलीत आणि पर्यायाने सवयींमध्ये बरेच बदल झाले आहेत; कमी-अधिक प्रमाणात आपण त्यांच्याशी जुळवून घेतलं, घेत आहोत.
यामुळे आपल्या वाचन-सवयीदेखील बदलल्या – खरंतर, तंत्रज्ञानाचा प्रचंड वेगाने प्रचार-प्रसार झाल्याने गेल्या दहा वर्षांपासूनच हे परिणाम झाले होते – पण या कोविडकाळात या परिणामांची गती वाढली, हे निश्चित. आधीपेक्षा, आपलं मोबाइल, टॅब्लेट, ईबुक रीडर अशा उपकरणांवर होणारं वाचन वाढलं. अर्थात कागदावर वाचण्याची प्रक्रिया पूर्णतः दूर सारली गेली नसली, तरी बरीच वेबपोर्टल्स, अॅप्स या काळात आली, त्यांनी त्यांचा असा एक वाचकवर्ग तयार केला. डिजिटल युगाचा रेटा पाहता येत्या काळात ही नवी वाचन-प्रक्रिया आणखीही वाढीस लागेल, अशी शक्यता आहे.
हे लक्षात घेऊन टीम रोहनने जुलै २०२१मध्ये ‘मैफल एक्सक्लुसिव्ह’ हे डिजिटल प्लटफॉर्म सुरू केलं. त्यावर विविध लेखकांचे विविध विषयांवरचे स्तंभ सुरू केले. तिथे ते नियमित प्रकाशित होत असतात आणि वाचकही त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत.
दिवाळी हा दिव्यांचा पर्यायाने, ज्ञानाचा उत्सव. अशा उत्सवाच्या निमित्ताने मराठीसारख्या भाषेत काही शे दिवाळी अंक प्रकाशित होतात ही निश्चितच लक्षणीय बाब म्हटली पाहिजे. त्यासाठी संपादक, प्रकाशक, नवे-जुने लेखक, चित्रकार अशी सगळी मंडळी एकत्रितरीत्या काम करतात. भारतात बंगाली भाषा वगळता असे अंक केवळ मराठीतच निघतात हे विशेष.
आपल्या या समृद्ध परंपरेला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल दिवाळी अंक काढू या, अशी कल्पना ‘टीम रोहन’चा सभासद आणि ‘रोहन’चा लेखक, भाषांतरकार आणि संपादक प्रणव सखदेव याने मांडली आणि टीम रोहनच्या संपादिका अनुजा जगताप, नीता कुलकर्णी यांनी, तसंच प्रदीप व रोहन चंपानेरकर यांनी – सर्वांनीच तत्काळ होकार दिला. त्यातूनच आज हा ‘साहित्य मैफल – रोहनचा डिजिटल दिवाळी अंक’ प्रत्यक्षात आला आहे. या अंकाची मांडणी करण्यात महत्त्वाचा वाटा आहे तो टीम रोहनची मेंबर प्राची एक्के हिचा. तसंच दया साळगावकर यांनीही अंकाचं नेटकं मुद्रितशोधन करून दिलं.
या अंकात ‘माझे कॉलेजचे दिवस’ हा खास विभाग आहे, ज्यात प्रसिद्ध लेखक, अभिनेत्री यांनी कॉलेज- जीवनाने त्यांना काय दिलं, त्यांची वैचारिक तसंच मानसिक जडणघडण कशी झाली याबद्दल विस्ताराने लिहिलं आहे. याशिवाय या अंकासाठी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून, तसंच लेखकांकडून ललित लेख लिहून घेतले आहेत. मराठीमध्ये विपुल ललित लेख लिहिले गेले आहेत आणि या लवचिक साहित्य प्रकाराने मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. या अंकातले हे ललित लेख वाचून तुम्हाला नक्कीच त्याची प्रचिती येईल. विशेष म्हणजे आम्ही यात मुद्दामहून कोकणी, खान्देशी बोलीभाषेतले दोन लेख घेतले आहेत. त्यामुळे या अंकाला वेगळा पोत प्राप्त झाला आहे.
डिजिटल अंकाला आगळवेगळं दृश्यरूप यावं यासाठी ‘रोहन’शी संलग्न असलेले चित्रकार राजू देशपांडे यांची चित्रं प्रत्येक लेखासोबत जोडली आहेत. ही चित्र तुम्हाला स्वतंत्ररीत्या गॅलरीतही पाहता येतील आणि त्यांचा आनंद घेता येईल.
येत्या काळात, ‘मैफल एक्सक्लुसिव्ह’ या वाचन-प्लॅटफॉर्मवर आम्ही आणखी आशयसमृद्ध लेखन प्रकाशित करणार आहोत, उपक्रम राबवणार आहोत. त्यांच्या अपडेट्ससाठी, तसंच हा अंक मोफत असला तरी तो वाचण्यासाठी या साइटवर रजिस्टर व्हा. आमचं फेसबुक, इन्स्टाग्राम पेजही फॉलो करा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा, तीच आमची ऊर्जा!
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या उदंड शुभेच्छा!
- टीम रोहन
अनुक्रम
‘माझे कॉलेजचे दिवस’ (खास विभाग)
- फसाद – अनंत सामंत
- फर्ग्युसनssssss फर्ग्युसन – विभावरी देशपांडे
- आयुष्य समृद्ध करणारे ‘खर्डेकर’चे दिवस – प्रवीण बांदेकर
- सफर खुबसुरत है मंजिल से भी! – किरण केंद्रे
ललित लेख विभाग
- मी प्राध्यापिका…- मृदुला दाढे-जोशी
- गडग्याकडेचो माड – रश्मी कशेळकर
- लच्चनबाई…. – समीर गायकवाड
- ‘माना शाळेचा ड्लेस आना’ – किरण येले
- महानगर, निम-शहर : सांस्कृतिक पर्यावरणाचा धांडोळा – मिलिंद चंपानेरकर
- लिहिण्याचे प्रयोग – शर्मिला फडके
- माजी सरपंच – रवींद्र पांढरे
- माझ्या झेन गुरूंच्या आठवणी – धनंजय जोशी
- त्यांच्या ‘मनात’ला भारत – सुवर्णा साधू
- विधवा कलर – दीप्ती राऊत
- महाराष्ट्रातील आपत्तींकडे कसे पाहायचे? – अभिजित घोरपडे
- आम्हाला तुझी चित्रं समजत नाहीत… – राजू देशपांडे