एखादा दिग्दर्शक वयाच्या पन्नाशीच्या आसपास बासष्ट सिनेमे दिग्दर्शित करतो. त्या सिनेमांना अनेक राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळतात. आता तो हॉलिवूडसाठीही काम करतोय. त्याने असे वेगाने सिनेमे बनवणे ही गोष्ट थट्टेची की अभ्यासाची? गजेंद्र अहिरे यांच्या स्टोरी‘टेलर’मध्ये या सगळ्या प्रवासाबद्दलच्या कोड्यांची उत्तरं मिळतात.
स्टोरी‘टेलर’ या पुस्तकाचं वेगळेपण त्याच्या नावापासूनच सुरू होतं. आपण एक स्टोरी‘टेलर’ आहोत असं गजेंद्र म्हणतात. इथं ‘टेलर’ म्हणजे गोष्ट सांगणारा नव्हे, तर गोष्टी विणणारा किंवा त्या जोडणारा! ’मैं कहानियाँ बुनता हूं’ असं ते म्हणत राहतात. अनेक गोष्टींचे, कलांचे तुकडे एकत्र जोडून निर्माण होणारी कलाकृती प्रेक्षकांना सादर करणारा हा दिग्दर्शक. विनोदी आणि करमणूकप्रधान सिनेमांनी मराठी चित्रपटसृष्टीचा सगळा अवकाश व्यापलेला असण्याच्या काळातही वेगळे, आशयपूर्ण सिनेमे बनवणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. गजेंद्र या पुस्तकांत त्यांच्या बारा निवडक सिनेमांच्या प्रामुख्याने निर्मितीप्रक्रियेबद्दल सांगत आहेत. सिनेमा बनवणं ही एक कला असली, तरी त्यात ‘क्राफ्ट्समनशीप’सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते. सिनेमा बनवणं, दिग्दर्शन करणं हे काही एकट्या-दुकट्याचं काम नव्हे. त्याला सोबत मोठी टीम लागते. टीममधल्या प्रत्येक माणसाचे स्वभाव-विभाग वेगळे. प्रत्येक कलाकाराचा नि निर्मात्याचा इगो वेगळा. खुद्द दिग्दर्शकालाही स्वाभिमान असतोच की! तो किती काळ सगळ्यांशी जुळवून घेणार? या सगळ्या मनोव्यापारांचं रसायन सिनेमा बनत असताना एकत्र खदखदत असतं. जर ही भट्टी नीट जमली, तर उत्तम सिनेमा निर्माण होतो. अनेकदा सिनेमा बनताना उत्तम होतो, पण चुकीच्या कॅमेर्याची निवड करण्यासारख्या तांत्रिक बाबींमुळे तो पडद्यावर चांगला दिसत नाही. क्वचित कला, आशय आणि तंत्र सगळं उत्तम जुळूनही त्या सिनेमाला पडद्यावर झळकण्याचं भाग्य लाभत नाही.
गजेंद्र यांचे काही चांगले चित्रपट रिलीजच होऊ शकले नाहीत. मात्र, लेखक ते खूप काळ मनाला लावून घेत नाही. तो चित्रपट निर्मितीची प्रक्रिया घडत असताना तिचा आनंद पुरेपूर लुटत असतो. ‘आयुष्य ही एक सहलच आहे, इथे छान मजा करू या’ असा त्याचा एकंदर दृष्टिकोन असतो.एखादा सिनेमा सुचणं आणि तो पुरा करू शकणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रतिभेचा दिव्यस्पर्श असलेल्या, झपाटून टाकणार्या एका क्षणी सिनेमा सुचत असला, तरी तो पूर्ण करण्याची प्रक्रिया मात्र खूपच दीर्घ, अनेक महिन्यांचीच काय, अनेक वर्षांचीसुद्धा असू शकते. (शिवाय ती कष्टप्रद आणि खर्चिकही असतेच.) एखादा चित्रपट बनतो कसा, नेमका कोणत्या क्षणाला त्याचा जन्म होतो, ते बीज मनात कधी रुजायला लागतं याचा सारा प्रवास गजेंद्र यांनी प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे. गजेंद्र यांच्या सिनेमाबद्दलच्या विचारांत असणारी स्पष्टता पुस्तकात जागोजागी जाणवते. (कदाचित याच स्पष्टतेमुळे ते दहा-पंधरा दिवसांतही एखाद्या सिनेमाचं शूटिंग पुरं करू शकतात. कधी कधी हा टीकेचा, बरेचदा असूयेचा तर क्वचित थट्टेचाही विषय होतो. मात्र स्वीडनमधल्या एका विख्यात नाट्य-चित्र संस्थेनं गजेंद्र यांची फिल्ममेकिंगची वेगळी शैली यावर त्यांना मोठा अभ्यासनिबंध लिहिण्याची विनंती केली आहे. म्हणूनच असं वेगवान फिल्ममेकिंग हा थट्टेचा नव्हे, तर गंभीरपणे घेण्याचा विषय आहे असं वाटतं.)
गजेंद्र नुसते दिग्दर्शक नाहीत, तर ते कथा, पटकथालेखनही करतात. ते गीतलेखन करतात, क्वचित संगीत दिग्दर्शनही. या सार्या प्रवासात केवळ सगळेच अनुभव गोड नाहीत, काही कटू अनुभवही त्यात आहेतच. प्रस्तुत पुस्तकात केवळ लेखकानेच नव्हे, तर त्याच्या सिनेमांमध्ये काम करणार्या सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, मृण्मयी लागू, सोनाली कुलकर्णी, नीना कुलकर्णी आणि किशोर कदम यांसारख्या कलाकारांनीसुद्धा गजेंद्र यांच्या सोबत काम करताना आलेले अनुभव या पुस्तकात मोकळेपणे लिहिलेले आहेत. गजेंद्र यांच्या ७-८ सिनेमांत सहभागी असलेला त्यांचा मित्र कवी सौमित्र म्हणजे किशोर कदम, तर अनेक प्रकरणांत दिसत राहतो. त्याचा स्वतंत्र लेखही या पुस्तकात आहे. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, रवींद्र मंकणी, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर यांसारखे अनेक ज्येष्ठ कलाकार, त्यांचं सिनेमाबद्दल असणारं प्रेम, शिस्त हे सारं या पुस्तकांत दिसतं. अनेकदा सिनेमाच्या सेटवर कलाकारांशी मतभेद होतात. किशोर कदमसारख्या जवळच्या मित्राबरोबर तर कधीकधी अक्षरश: कॉलर धरून शारीरिक हाणामारीही होते. पण दोन दिवसांनी सगळं विसरून सिनेमा पूर्ण करायचा, तो चांगलाच करायचा या ध्यासापोटी पुन्हा सगळे एकत्र येतात. हा सारा मुळातूनच वाचण्यासारखा ऐवज रंजकपणे गजेंद्र यांनी लिहिला आहे. पुस्तकात विशेष लेख लिहिणार्या नागराज मंजुळे, नीना कुलकर्णी आणि सुबोध भावे यांसारख्या कलाकारांनी गजेंद्र यांनी ‘करिअरचा एक मोठा टप्पा गाठला आहे, आता त्यांनी तब्येतीने काम करावं, सिनेमा बनण्याच्या प्रक्रियेला योग्य अवकाश मिळू द्यावा’ अशी सूचना केलेली आहे. गजेंद्रने आता ‘तब्येतीने’ सिनेमा करावा असा या सगळ्या मंडळींचा आग्रहाचा सूर आढळतो.
मराठी सिनेमा तमाशा आणि विनोद यांच्या चाकोरीतून बाहेर पडला आहे. भारतात आशयपूर्ण सिनेमा करणार्यांच्या यादीत मराठी सिनेसृष्टीचं नाव आता आघाडीवर आहे. यात केवळ संख्यात्मकच नव्हे, गुणात्मक दृष्टीनेही महत्त्वाचा वाटा उचलणार्या, देश-विदेशांत अनेक सन्मान मिळवणार्या दिग्दर्शकाचं हे आत्मकथन चुकवू नये असंच आहे. नव्वदोत्तर काळातल्या सिनेमाचा जुन्या स्टुडिओतल्या १६ मि.मी.च्या कॅमेर्यावर केलेल्या शूटिंगपासून ते आजचं अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान, बदलणारा व्यवसाय, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरचं वितरण यांपर्यंतचा प्रातिनिधिक प्रवासच आपल्याला या पुस्तकातून दिसत राहतो.
पुस्तकाची निर्मिती रोहन प्रकाशनाच्या परंपरेनुसार देखणी झाली आहे. दीप्ती देवेंद्र यांचे मुखपृष्ठ, (खासकरून त्यातली ‘टेलर’ या शब्दात ओवलेली सूचक सुई) खूपच बोलकं आहे. हार्डबाउंड डिलक्स आवृत्ती, उत्तम आणि विपुल छायचित्रं व देखणं मुद्रण असलेलं हे पुस्तक वाचकांनी, खास करून सिनेरसिकांनी आवर्जून संग्रही ठेवण्याजोगं आहे.
-सुश्रुत कुलकर्णी
sushrutkulkarni@gmail.com
स्टोरी टेलर लेखक : गजेंद्र अहिरे किंमत रु.५९५