प्रवासवर्णनात विविध प्रकार दिसून येतात. दहा दिवसांत आठ देश बघितल्यावर इंटरनेटवरील माहितीच्या आधारे लिहिलेलं प्रवासवर्णन, ऑफबीट ठिकाणांची भटकंती करून वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेली निरीक्षणं, प्रवासातील अनुभवांच्या अनुषंगाने केलेलं लिखाण आणि आणखी इतर काही प्रकार… वस्तुत: कन्डक्टेड सहलींमधून तुम्ही खूप काही पाहू शकत नाही, खूप काही अनुभवू शकत नाही. त्या देशाला, जागेला तो केलेला केवळ भोज्जा असतो. पण या कन्डक्टेड टूर्सकडेही पूर्णत: निराळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो, अनुभवू शकतो याची प्रचीती देणारं पुस्तक, एका भटक्याने, श्रीनाथ पेरूर यांनी इंग्रजीत लिहिलं व आता त्याचा ‘मदुराई ते उझबेकिस्तान’ हा उल्का राऊत यांनी केलेला मराठी अनुवाद अलीकडेच प्रकाशित झाला आहे.

या आयोजित सहलींना उघड मर्यादा असतात. पण त्या ग्रुपमध्ये काही मजाही अनुभवता येते. अन्य प्रवाशांचे वर्तन, त्यांच्या सवयी, बसप्रवासातले अनुभव, दैनंदिनी, स्थळदर्शन या सर्वांकडे अगदी निराळ्या दृष्टीने पाहण्याची लेखकाची वृत्ती आहे. देशविदेशांतील दहा ठिकाणांच्या भटकंतीचं वर्णन या पुस्तकात आहे. भ्रमंतीतील काही जागा नेहमीच्या, तर काही आडवळणाच्या. त्यात दक्षिण भारतातील मंदिरं, सात दिवसांची युरोप टूर, कबीर संगीत गाणाऱ्या कलाकारांसोबतची यात्रा, थरच्या वाळवंटातील उंटावरची थरारक राइड, हजारो भक्तांसमवेत अनुभवलेली पंढरीची वारी, उझबेकिस्तानमधील सेक्स टुरिझम आदी दहा आगळ्या वेगळ्या सहलींचा समावेश आहे. साहस, वासना, कुतूहल आणि अगदी ईश्वरभक्ती…. असे विविध अनुभव वाचावयास मिळतात. त्याचप्रमाणे काही वेळा हे लिखाण अंतर्मुखही करतं. या पुस्तकाच्या लेखकानेही २०११पर्यंत कधीही कंडक्डेट टूरबरोबर प्रवास केला नव्हता. पण कधी एखाद्या मासिकाने कामगिरी सोपवल्यामुळे, तर कधी आगळावेगळा अनुभव घेण्याच्या दृष्टीने हा प्रवास करण्यात आला आणि त्यातील भन्नाट अनुभव शब्दबद्ध केले गेले.

अर्थात केवळ एखाद्या स्थळाचं वर्णन, एवढंच या प्रवासवर्णनाचं स्वरूप नाही. टूरमध्ये सामील पर्यटकांचं वर्णन, वागणूक यांचंही अचूक, पण गमतीदार वर्णन पुस्तकात आहे. उझबेकिस्तान हे सध्या भारतीयांचं एक ‘हॉट’डेस्टिनेशन झालं आहे. तिथल्या ‘सेक्स टुरिझम’च्या गमतीजमती मजा आणतात. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व त्या वेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान अयुबखान यांच्यात ताश्कंद इथे वाटाघाटी होऊन ‘ताश्कंद करार’ झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शास्त्रीजींचं तिथे निधन झालं. त्यांचं स्मारक व अर्धपुतळा तिथे उभारण्यात आला आहे. तो बघण्यासाठी टूर गेली. तेव्हा सहलीतील बऱ्याच जणांनी चक्क दांडी मारली. जे आले होते त्यांतीलही अनेकांना अशा आदराच्या जागी कसं वागायचं याचंही भान नव्हतं. सेक्स टुरिझममधील काही जणांच्या हिडीस वर्तनाने अखेर आपल्या देशाचीच प्रतिमा कशी मलिन होते, यावरही अगदी योग्य प्रकाश टाकण्यात आला आहे.
तर ‘विठू माऊली’ प्रकरणात अत्यंत भक्तिभावाने, विठोबादर्शनाच्या ओढीने, शिस्तबद्ध दिंडीत सामील होणारे वारकरी पाहावयास मिळतात. लेखकही या दिंडीत मोठ्या उत्साहाने सामील होतो. त्या दिंडीची त्याने दिलेली टिपणं, वैशिष्ट्यं खूप काही नवीन माहिती देऊन जातात. लेखकाच्या दिंडीत दीडशेहून जास्त ‘आयटी’ व्यावसायिकांनी, आळंदी ते पुण्याच्या पहिल्या काही अंतरापर्यंत भाग घेतला होता. ‘वारीमध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांनी व्यावसायिक तडजोडी केल्यात’, असं त्यांतल्या काहींनी लेखकाला आवर्जून सांगितलं.

भारतात येण्याचं परदेशी पर्यटकांचं प्रमाण खूपच कमी आहे. पण जे पर्यटक येतात त्यांना केरळ, राजस्थान, वाराणसी वगैरे भाग फिरायला आवडतो. केरळमध्ये योगा, ध्यानधारणा, याचबरोबर ‘बॅकवॉटर्स’मधील भटकंतीचं पर्यटकांना आकर्षण वाटतं. अमेरिकन व मेक्सिकन पर्यटकांना घेऊन केरळमध्ये फिरताना, लेखकाला आलेले अनुभवही पुस्तकात आहेत. ‘अस्सल भारत दर्शन’ हे प्रकरणही वाचनीय आहे. ती एक आगळी-वेगळी शोधयात्रा होती व मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील खेडेगावातून ती निघाली होती. ही ग्रामीण भागातील आठवड्याची पदयात्रा आहे. तेथील परंपरा, ज्ञान, माहिती… तसंच स्थानिक पातळीवरील वेगवेगळे उपक्रम, प्रयोग यांविषयी जाणून घेण्यासाठी ही शोधयात्रा होती. त्यातून खरोखरच खूप काही शिकण्याचे धडे मिळतात. सर्वच प्रकरणं वाचनीय झाली आहेत. उल्का राऊत यांनी केलेला अनुवाद हा जणू हे लिखाण मूळ मराठीतच झालं आहे. असं वाटावं एवढ्या सहजतेने झाला आहे.

– जयप्रकाश प्रधान

  • मदुराई ते उझबेकिस्तान
  • लेखक : श्रीनाथ पेरूर / अनुवाद : उल्का राऊत


पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०१९

(सौजन्य- दै. महाराष्ट्र टाइम्स)


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

Madurai Te Usbekistan

मदुराई ते उझबेकिस्तान

१० ठिकाणांचे हटके अनुभवकथन

‘कन्डक्टेड टुर्स’मधून प्रवास करणं म्हणजे भोज्जास हात लावून येणं…असा एक सर्वसाधारण समज ! या पुस्तकाचा लेखक श्रीनाथ पेरुर याने अशा प्रकारच्या टुर्सचं अंतरंग समजून घेण्यासाठी देश-विदेशातल्या विविध छटा असणाऱ्या १० ठिकाणांची भ्रमंती केली. वेगळा दृष्टीकोन ठेवल्यामुळे लेखक त्या भ्रमंतीत अनपेक्षितपणे रमला. त्याच भ्रमंतीचं नवी दृष्टी देणारं, हे खुसखुशीतपणे रंगवलेलं अनुभवकथन वाचायलाच हवं!
या भ्रमंतीतील काही ठिकाणं अगदी नेहमीचीच होती तर काही वेगळ्या वाटेवरची ! अशा या वैविध्यपूर्ण ठिकाणांमध्ये दक्षिण भारतातली मंदिरं, सात दिवसात आटोपलेली युरोप टूर, कबीर संगीत गाणाऱ्या कलाकारांसोबतची यात्रा, थरच्या वाळवंटातील उंटावरची थरारक राइड, हजारो भाविकांसोबत अनुभवलेली वारी, उझबेकिस्तानमधील सेक्स टुरिझमचा बाजार अशा हटके ठिकाणांचा समावेश आहे.
साहस, वासना, कुतूहल आणि अगदी ईश्वरभक्तीपर्यंतचा अनुभव कधी उपरोधिक, तर कधी खट्याळ शैलीत वाचायला मिळतो. लेखकाच्या निरीक्षणक्षमतेमुळे हे सगळे अनुभव आपल्यापर्यंत जिवंतपणे पोहोचतात.
‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन…

240.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *