जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने एका प्रतिकूल पार्श्वभूमीत वाढलेल्या तरुण वाचनवेड्याचं हे मनोगत…वाचन मला आज फार महत्त्वाचं वाटतं. अवांतर वाचन आयुष्यात खूप मोठा इम्पॅक्ट करत असतं. असंख्य महापुरुषांपासून ते माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांचं आयुष्य वाचनाने बदललं आहे. चांगली पुस्तके आपल्याला खूप काही देऊन जातात. ‘आपण जेव्हा वाचन करत नाही तेव्हा आपलं आयुष्य सीमित राहतं, चौकटीच्या बाहेर जाऊन आपण विचार करत नाही. आपली प्रगल्भता वाढत नाही. माहिती आपल्याला चोहीकडे मिळेल पण पुस्तकांतून आपल्याला ज्ञान मिळतं आणि या ज्ञानाला जेव्हा अनुभवाची जोड मिळते तेव्हा खरंच आयुष्य समृद्ध होत जातं. माझं याच प्रकारे झालं आहे, होतंय. पुस्तकांनीच आजपर्यंत मला मार्गदर्शन केलं आहे मला एक नवी दिशा दिली आहे. माझ्या आयुष्यात पुस्तकांचा वाटा फार मोठा राहिला आहे. पुस्तकांनीच मला आज एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. पुस्तकांवर मनापासून केलेल्या प्रेमानेच मी आज ‘स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार’ या पहिल्या-वहिल्या वाचकाला देण्यात येणार्या पुरस्काराचा मानकरी ठरलो. मी वाचलेल्या पुस्तकांमुळेच हालाखीच्या परिस्थितीतून येऊन सुद्धा योग्य मार्गावर मार्गक्रमण करतोय.
आजपर्यंत मी असंख्य पुस्तकं वाचली आणि माझ्या ‘स्टडी बंकर’मध्ये संग्रह करून ठेवली आहेत. ‘स्टडी बंकर’ माझं वैयक्तिक ग्रंथालय असून मी ते आजूबाजूच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा खुलं केलं आहे. जेणेकरून इतरांनासुद्धा वाचायला वाचनीय पुस्तकं मिळावी आणि वाचनाची आवड लागावी. तर एकंदरीत वाचनामुळे माझ्या आयुष्याचं याप्रकारे परिवर्तन झालं.मी वाचनाकडे वळलो ते एका निमित्ताने. तो निमित्त म्हणजेच जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट. या चित्रपटामुळेच आंबेडकरांचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला. यामध्ये त्यांचा अभ्यास आणि पुस्तकांवर प्रेम बघून माझ्या मनातसुद्धा वाचनाची इच्छा निर्माण झाली. तेव्हा अजिबात विचार केला नव्हता की मला वाचनाची एवढी आवड लागेल. कारण माझ्या पिढीत शिक्षण आणि वाचनासोबत दूर दूर पर्यंत कोणाचाही संबंध नव्हता. आजोबांपासून तर पालकांपर्यंत सर्वंच अशिक्षित. यांपैकी कोणीही शाळेची पायरीसुद्धा ओलांडलेली नव्हती.त्यामुळे मला वाचनाची आवड लागेल असा कोणीही कधीही विचार केला नव्हता.मला वाचनाची आवड निर्माण झाली ती इयत्ता सातवी पासून आणि तीसुद्धा एका चित्रपटामुळे. पहिली ते सातवीपर्यंत माझं आयुष्य बघता ते पूर्ण अंधकारात होतंडॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यावर पुन्हा कुठं काही नवीन वाचायला मिळतंय का, याचा शोध घेत होतो. एकेदिवशी तालुक्यातल्या बस स्टँडवर माझ्या हाती दहा रुपये किमतीचं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र’ हे छोटेखानी पुस्तक पडलं आणि मी ते वाचून पूर्ण केलं. माझ्या आयुष्यातील हे पहिलं खरेदी केलेलं पुस्तकं होतं. मी बाबासाहेबांच्या सोबतच अनेक इतर महापुरुषांबद्दलसुद्धा वाचायला सुरुवात केली. शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, भगत सिंह, सुभाषचंद्र बोस इत्यादी. महापुरुषांबद्दल मी मिळेल ते वाचून काढलं, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. ग्रंथालयासारखा काही प्रकार असतो हे माहिती झाल्यावर मी गावातील व आजूबाजूच्या ग्रंथालयात जाऊन काही पुस्तकं वाचली आणि वेगवेगळी पुस्तकं जमवायलासुद्धा सुरुवात केली.
सुरुवातीला मी बसस्टँडवरून छोटेखानी पुस्तकं विकत घेतली. त्यामध्ये शेखचिल्ली, हातीमताई, छान छान गोष्टी, चंपक, अकबर बिरबल, पंचतंत्राच्या गोष्टी, ठकठक आणि इतर काही पुस्तकं समाविष्ट होती. पुढे मी माझा पुस्तक वाचनाचा आवाका वाढवायचं ठरवलं आणि आठवीत असताना ‘अग्निपंख’ हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. ‘अग्निपंख’ वाचल्यानंतर मला वाचनाचं जणू वेडच लागलं आणि मी जमेल तशी पुस्तकं खरेदी करूनच वाचायला सुरुवात केली. बघता बघता माझ्याजवळ बराच पुस्तकांचा संग्रह जमा झाला. आणि पुढे पुस्तकांसोबत चांगलीच गट्टी जमली. पुस्तकं हेच माझे खरे मित्र झाले. मी पुस्तकांसाठी वेगळं गुल्लक बनवून फक्त आणि फक्त पुस्तक खरेदीसाठी पैसे जमवायला सुरवात केली. अशाप्रकारे शून्यातून सुरवात करून आणि डॉ. बाबासाहेबांचा आदर्श घेऊन माझं एक छोटंसं ग्रंथालय निर्माण केलं. यामध्ये मी दलित, ग्रामीण, ललित, ऐतिहासिक, चरित्र, आत्मचरित्र, काव्य, प्रवासवर्णन आणि सेल्फ हेल्प या विविध साहित्यप्रकारांत मोडणारी पुस्तकं वाचली आणि संग्रहही केला आहे.‘जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल.’ बाबासाहेबांच्या या वाक्यानं प्रेरित होऊन माझ्यासारख्या तळागाळातल्या वाचकांपर्यंत पुस्तकं पोचवण्याची आणि ती वाचायला प्रवृत्त करण्याची जबाबदारी घेऊन ‘वुई रीड’सारखा उपक्रम सुरू केला. अशातच विविध सोशल मीडियावर मी वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल त्याचे अनुभव शेअर केले आणि करतोय.मी एक अतिशय सामान्य वाचक आहे. जो फक्त जगावं कसं आणि समाजात नेहमी माणूस बनून कसं राहावं यासाठी वाचत असतो. वाचलेलं जगायचं प्रयत्न करत असतो.
आजपर्यंत वाचलेल्या पुस्तकांतील विचारांची अंमलबजावणी केली आहे. मार्गदर्शन करणारं आजूबाजूला कोणीही नसल्याने पुस्तकांनीच आजपर्यंत मला योग्य मार्गदर्शन केलंय. त्यातून खूप काही शिकलोय, जगलोय आणि घडलोय. आजपर्यंत वाचलेल्या पुस्तकांमुळेच मी आज दोन शब्द लिहू शकतो, व्यक्त होऊ शकतो. माझी वाचन ही प्रक्रिया कधीही संपणारी नाही किंवा संथ होणारी नाही. वाचन रोज सुरूच आहे. दररोज ४० पृष्ठं वाचण्याचं माझं टार्गेट असतं, ते पूर्ण करण्यावर मी रोज भर देतो. वाचनाला मी ‘मानवी चौथ्या मूलभूत गरजेत’ समाविष्ट केलं असल्याने माझं वाचन नियमितपणे होत असतं. एका आठवड्यात दोन तर महिन्यात आठ पुस्तकं मी वाचून पूर्ण करण्यावर भर देतो. पुस्तकं फक्त वाचतच नाही त्यावर मनन-चिंतन करतो. आजपर्यंत मी कायम चौफेर वाचनाला प्राधान्य दिलं आहे आणि देत असतो. एका वाचकाच्या दृष्टिकोनातून पुस्तकाचं वाचन करून त्यातून महत्त्वाचं घेणं आणि त्यावर अंमलबजावणी करणं हा माझा वाचनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे.माणूस बनून राहण्यासाठी, संवेदनशील होण्यासाठी आणि आदर्श जीवन कसं जगायचं या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी वाचन करत असतो.मोईन खान