फॉन्ट साइज वाढवा

या वर्षी पावसाळ्यात देशात सरासरीच्या आठ-नऊ टक्के जास्त पाऊस पडला. हवामान विभागाच्या भाषेत तो सरासरीइतकाच. महाराष्ट्रात पावसाने मोठी ओढ दिली खरी, पण एकूण चार महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात २५ टक्क्यांपेक्षा जास्त, तर विदर्भात सरासरीच्या १० टक्के कमी. हे खरे असले तरी अनेक भागात नुकसानकारक ठरला. वादळे तर झालीच, शिवाय जुलै महिन्यात तळकोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला पुराचा फटका बसला. दरडी कोसळल्यामुळे २०० जणांचे बळी गेले. त्यामुळे हे संकट आणखीच गहिरे बनले. खरेतर जास्त पावसाचा प्रदेश म्हटले की पूर, दरडी कोसळणं या आपत्तींसाठी प्रवणच असतो. पण या घटना लागोपाठच्या वर्षी घडलेल्या फारशा पाहायला मिळत नाही. त्या दृष्टीने हे वर्ष अपवाद ठरले. दक्षिण महाराष्ट्रात येणारे मोठे पूर – विशेषत: कृष्णा नदीच्या खोऱ्यात ते दहा ते पंधरा वर्षांच्या अंतराने आल्याचे इतिहास सांगतो. दोनच वर्षांपूर्वी या प्रदेशाने (सांगली, कोल्हापूर जिल्हे) महापूर म्हणता येईल असे पूर अनुभवले. आता पुन्हा तेच घडल्याने धास्ती वाढली आहे. कोकणातही आलेले पूर पूर्वी कधीही पाहिलेले असे होते, असा लोकांचा थेट अनुभव आहे.

या घटना गंभीर आहेत, पण त्यांच्याकडे नेमके कसे पाहायचे याचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी आतापर्यंतच्या घटना आणि हवामानात नव्याने काय होत आहे का, हे पाहावे लागेलच. पण जोडीने आपण हवामानाच्या पलीकडे नेमके काय केले आहे, याकडेही लक्ष द्यावे लागेल. आधी या गोष्टींकडे पावसाच्या अनुषंगाने पाहूया. कोकण किंवा दक्षिण महाराष्ट्रात पूर येतात, ते सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर (पश्चिम घाट) पडणाऱ्या पावसामुळे. तो भाग हे मुसळधार पावसासाठी प्रसिद्धच आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडणारा हा प्रदेश. अंबोली, गगनबावडा, नवजा (कोयना), महाबळेश्वर, ताम्हिणी, लोणावळा, माळशेज, कसारा, त्र्यंबकेश्वर ही त्यातील काही प्रसिद्ध ठिकाणे. महाराष्ट्राची रचना पाहता, या घाटमाथ्यांवर पडणारा पाऊस दोन्ही बाजूंना म्हणजे पश्चिमेला कोकणाकडे आणि पूर्वेला देशाकडे वाहतो. त्यामुळे दोन्ही बाजूला येणाऱ्या पुराचे मुख्य कारण हा घाटावर पडणारा पाऊसच ठरतो. त्याठिकाणी सलग तीन-चार दिवस मोठा पाऊस पडला की (त्यातही पावसाळ्याचे एक-दीड महिने झालेले असतील तर) पूर येण्याची शक्यता जास्त असते. या वर्षी २२ ते २३ जुलैच्या आसपास असा पाऊस झाला. त्यामुळे पुराच्या दृष्टीने परिस्थिती पूरक होती. त्यातच एका दिवसांत पडलेला पाऊस कितीतरी मोठा होता. सातारा जिल्ह्यातील कोयना (६१० मिलिमीटर), महाबळेश्वर (५९४), सांगली जिल्ह्यातील वारणा (५७४), कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी (५६७) येथे प्रचंड पाऊस पडला. या सर्वांवर कडी म्हणजे राधानगरी धरणजवळ असलेल्या तुळशी धरणाच्या क्षेत्रात चोवीस तासांत तब्बल ८९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजे दिवसात ३५ इंचापेक्षा जास्त. हे आकडे जलसंपदा विभागाचे अधिकृत असल्यामुळे ग्राह्य धरावे लागतील. ही नोंद महाराष्ट्रातील आतापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची ठरेल. यापूर्वी मुंबईत (सांताक्रुझ) एका दिवसात तब्बल ९४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तो दिवस होता २६ जुलै २००५. त्यानंतरची ही तुळशी धरणाच्या क्षेत्रातील नोंद म्हणावी लागेल.



आधी तीन-चार दिवस पाऊस सुरू असताना पुन्हा एका दिवसात एवढा जास्त पाऊस पडल्यावर अवस्था बिकट होणार हे ओघाने आलेच. त्यामुळे कोकण आणि देशावरही, विशेषत: दक्षिण महाराष्ट्रात असे दोन्ही बाजूला पाणी वाढणं स्वाभाविक होते. त्यानुसार पूर आलेसुद्धा. पण त्यांची तीव्रता आणि सोबत दरडी कोसळून झालेली जीवितहानी यामुळे ही आपत्ती गडद बनली. असेच काहीसे मराठवाड्यात अचानक होणारी वृष्टी आणि येणारे पूर याबाबत घडत आहे. किंवा कमी-अधिक प्रमाणात राज्याच्या इतरही भागात दिसते.

यामागच्या कारणांचा शोध घेताना हे हवामानबदलाचे परिणाम आहेत, असाच सूर सर्वत्र ऐकायला मिळाला. माध्यमे, धोरणकर्ते आणि काही पर्यावरणअभ्यासकांनी याच गोष्टीवर भर दिला. या घटनांचा हवामानबदलाशी संबंध येतोच, तो जोडावाही लागेल. कारण वातावरणाच्या तापमानात वाढ होत जाईल तशा हवामानाच्या घटनांची तीव्रता वाढेल, यावर बहुतांश हवामानअभ्यासकांचे आणि तज्ज्ञांचे एकमत झालेले आहे. स्थानिक तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वच परिषदांमधून या मांडणीला पाठिंबा मिळतच आहे.

हे वास्तव असले, तरी या मांडणीमध्ये वाहून जाता कामा नये. सर्वच गोष्टी हवामानदलाच्या माथी मारणं योग्य ठरणार नाही. कारण या बदलांच्या सोबत आपणही जमिनीवर खूप बदल करून ठेवले आहेत. पूर काय किंवा दरडी कोसळणं काय? यांचा संबंध आपण त्या त्या परिसरात केलेल्या बदलांशी किंवा चुकांशी जोडवाच लागेल. नद्यांना पूर येणं ही काही नवी बाब नाही आणि नदी ही सर्वकाळ फक्त दोन काठांमधून पाणी वाहून नेणारी एवढीच व्यवस्था नसते. तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, ओढे, नाले, ओहळ यांची मिळून बनलेली व्यवस्था असते. पावसाळ्यात तिचे पात्र फुगते आणि काठ ओलांडते, दोन्ही बाजूंना बाहेर पडते, तिचे गाळाचे मैदान किंवा वाळवंट तयार होते. हा तिचा नैसर्गिक स्वभावच आहे. तो आत्ताचा नाही. माणूस नव्हता, तेव्हापासून हे अव्याहतपणे चालत आले आहे. मुद्दा हा की पूर हे येतातच, येत राहणारच. आपण आपल्या गरजेनुसार, सोयीनुसार पुरांकडे पाहत राहिलो तर गफलत होते. आज जे काही घडते आहे, त्यात याचाच मोठा भाग आहे.

नदीचे गाळाचे मैदान, तिला येऊन मिळणारे ओढे-नाले यांच्यामध्ये आपण जाऊन बसलो तर पुराची तीव्रता वाढणारच. नदीचे पाणी शोषून घेणारी व्यवस्था – मग ती नदीकाठच्या ओतांची असेल किंवा जागोजागी जमिनीत पाणी मुरण्याची असेल – मोडून टाकली तर तीव्रता वाढणारच. गेल्या कित्येक दशकांपासून आपण हे करत आलो आहोत. अजूनही त्याला विराम दिलेला नाही.

हेच दरडींच्या समस्येलाही लागू होते. बहुतांश दरडी या डोंगराळ भागात आणि मुसळधार पावसाच्या वेळेस पडल्या आहेत. त्याचबरोबर एक महत्त्वाची बाब म्हणजे, त्या माणसाच्या वस्तीजवळ, रस्त्यांजवळ, रेल्वेमार्गाजवळ किंवा जिथं जिथं माणसाचा हस्तक्षेप आहे, तिथेच पडल्या आहेत. याचे कारण स्पष्ट आहे. आपण वेगवेगळ्या कारणांसाठी त्या भागातील डोंगरउतार अस्थिर करतो. त्याचेच परिणाम कालांतराने त्या भागात पाहायला मिळतात. ही अतिशय संथ प्रक्रिया असल्याने त्याचा संबंध आपण आधी कधीतरी केलेल्या बदलांशी असतो. तो संबंध लक्षात येतोच असे नाही. अर्थात, माणसाशिवाय निसर्गातही हे घडते, पण सह्याद्रीचा विचार करता माणसाच्या हस्तक्षेपामुळे हे कितीतरी पटींनी वाढते, हे निश्चित.

या घटनांशी अशा प्रकारे आपला थेट संबंध पोहोचतो. किंबहुना, या आपत्तींची मारक क्षमता वाढवण्यात आपण कारणीभूत ठरतो. हे वास्तव नाकारता येणारच नाही. तसे केले तर ते भविष्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरेल. आपली मूळ समस्या सर्वंकषपणे लक्षात येणारच नाही. तरीही असे का केले जाते? या समस्येचा अर्धा भागच का विचारात घेतला जातो? त्याच्या दोन शक्यता संभवतात. एकतर या समस्येचे संपूर्ण आकलन नसणे. दुसरी म्हणजे तसे करणे म्हणजे सर्वच काही हवामानबदलाच्या माथी मारणे हे आपल्या दृष्टीने सोयीचे ठरते. कारण सर्व काही हवामानबदलामुळेच घडत असेल तर आपली जबाबदारीच संपते. आपण केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून आपण हवामानबदलामागे दडायला मोकळे होतो. म्हणूनच हवामानबदलाकडे बोट दाखवण्याचा कितीही मोह झाला, तरी उरलेली बोटे इतर समस्यांकडे वळालेली असतात. हे लक्षात घेऊन सर्वंकष अशा वास्तववादी मांडणीला पर्याय नाही.

हवामानबदलातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेतच. त्यासाठी जगाने एकत्र येऊन आपापल्या परीने शाश्वत जीवनशैली आत्मसात करायला हवी. त्याचबरोबर यातून मार्ग निघेपर्यंत जे काही बदल होऊ घातले आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे सामोरे जाता येईल असे अनुकूलन (अडाप्टेशन) करायला हवे, त्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था उभारायला हव्यात. पण त्याच वेळी अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक व्यवस्था चांगल्या प्रकारे राखण्याची जबाबदारीसुद्धा खांद्यावर घ्यायला हवी. दर वेळी अतिवृष्टीकडे बोट दाखवताना हे भान राखले पाहिजे. अन्यथा, आधीच मोडकळीस आलेल्या व्यवस्था पार संपवून टाकल्या जाण्याचा धोका आहे. याबाबत वेळीच सावध व्हायला हवे.

– अभिजित घोरपडे


दिवाळी अंकातले इतर लेख 

‘माझे कॉलेजचे दिवस’ (खास विभाग)

ललित लेख विभाग

पेंटींग गॅलरी – राजू देशपांडे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *