गेल्या अंकातील ‘रोहन क्लासिक्स’मध्ये ‘ऑक्सफर्ड’च्या डॉ. रुकून अडवानी यांनी शिफारस केलेल्या ‘इंदिरा गांधी, आणीबाणी…’ या पुस्तकाचा मी उल्लेख केला होता. ‘पास्ट फॉरवर्ड’प्रमाणे या पुस्तकाचा विषयही माझ्या कुतूहलाचा, जिज्ञासेचा आणि जिव्हाळ्याचा. त्यात या पुस्तकाचे लेखक प्रो.पी.एन. धर हे इंदिरा गांधी यांचे सल्लागार आणि पंतप्रधान कार्यालयातले उच्चस्तरीय अधिकारी. तेव्हा पुस्तकाविषयी चांगलंच कुतूहल होतं. पुस्तक वाचून मला ते अनेकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. पुस्तकाची तीच प्रत मी उत्साहाने अशोक जैनकडे पाठवली. अशोकलाही हे पुस्तक मराठीत यावं असं आवर्जून वाटलं. मी माझा होकार डॉ. रुकून यांना कळवला.
परंतु पुस्तक मराठीत आणण्यात एक किंतु होता. हा ‘किंतु’ कोणता, तर पुस्तकाचं शंभर-पानी पहिलं प्रकरण. त्यातील मजकूर पुस्तकाच्या मूळ विषयाशी पूर्णपणे साधर्म्य राखणारा नव्हता. लेखक प्रो. धर यांच्या जडणघडणीविषयी, शिक्षणाविषयी होता. ते प्रकरण वगळण्याविषयी अशोक आणि माझं दोघांचं एकमत होतं. मी याबाबत ‘ऑक्सफर्ड’कडे विचारणा केली. त्यांनी धर यांच्याकडे विचारणा केली. धर यांनी असहमती दर्शवली. आता पुढचा किस्सा सांगण्यासारखा आहे. अशोकने ‘महाराष्ट्र टाइम्स’चे भूतपूर्व संपादक गोविंद तळवलकर यांच्याशी ई-मेलवर संपर्क साधला. त्यांचा धर यांच्याशी उत्तम परिचय होता. त्यांच्या मतेही हे प्रकरण मराठी आवृत्तीसाठी अनावश्यक होतं. मी ‘ऑक्सफर्ड’ला तसं कळवलं. त्यावर तळवलकर यांनी गैरसमज करून घेतला. त्यांना वाटलं की, मला पुस्तकाचे हक्क मिळावेत म्हणून मी त्यांच्या नावाचा त्यांना न विचारता वापर केला आहे म्हणून. त्यांनी ईमेल पाठवून याबाबत माझ्याकडे ‘त्यांच्या पद्धतीने’ नाराजी व्यक्त केली. त्यावर मी तळवलकरांना उलटटपाली ईमेल पाठवून म्हटलं, माझे ‘ऑक्सफर्ड’शी उत्तम संबंध आहेत आणि तुमच्या शिफारसीची मला कोणतीच आवश्यकता नाही. उलटपक्षी ‘ऑक्सफर्ड’चे संचालक डॉ. रुकून यांची पुस्तकाची मराठी आवृत्ती मीच प्रकाशित करावी, अशी इच्छा आहे. यावर तळवलकर यांनी राखलेलं मौन ‘बोलकं’ होतं.
असो. नंतर धर यांच्याशी मी थेट फोनवर बोललो. त्यांना माझा मुद्दा स्पष्ट केला. नंतर हे प्रकरण संक्षिप्त करून २०-२५ पानांत घेऊयात असं सुचवलं. त्यांना हा तोडगा मान्य झाला. अशा प्रकारे हा गुंता सामोपचाराने सुटला. अशोकने त्वरेने अनुवाद केला. मी त्यावर शेवटचा संपादकीय हात फिरवून पुस्तक उत्तम निर्मितीत साकारलं. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर मी धर यांना प्रत पाठवली. पुस्तक पाहून; धर मनापासून समाधानी वाटले. त्यांनी मला त्यांच्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं. दिल्लीच्या पुढच्या वारीत मी त्यांची निवांत भेट घेतली. पुष्कळ गप्पा झाल्या. इंदिराजींविषयी ते भावूक होऊन बोलले. त्यांनी त्यांचं अर्थकारणावरील विचारांचं पुस्तक भेट दिलं. पंतप्रधान कार्यालयातील एका उच्चपदस्थ व्यक्तीशी आणि विशेषत: ज्या व्यक्तीविषयी मला प्रथमपासून आदर होता, त्या व्यक्तीशी झालेल्या संवादाचं, भेटीचं मला मोठं मोल वाटलं, आणि एक उत्तम पुस्तक प्रसिद्ध केल्याचं समाधान होतं, ते अलाहिदा. आज १९ वर्षांनंतरही पुस्तकाला मागणी आहे.
या पुस्तकातून त्या वेळी राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या इंदिरा गांधींचे अनेक चांगले-वाईट राजकीय पैलू उलगडतात. एका अंत:स्थ अधिकाऱ्याने ‘इंदिरा पर्वा’चा केलेला हा लेखाजोखाच होय. बँकांचं राष्ट्रीयीकरण, आणीबाणी लागू होताना आणि उठवतानाची नेमकी परिस्थिती, ‘बांगलादेश’ची निर्मिती, सिमला करार, सिक्कीमचं विलीनीकरण इत्यादि अनेक महत्त्वपूर्ण घटनांसंबंधीचे काही अप्रकाशित, अज्ञात माहितीसह तपशील यात मिळतात. पडद्यामागे काय घडतं, सूत्रं कशी हलतात, याचं विश्वासार्ह दर्शन पुस्तकातून घडतं. म्हणूनच हे पुस्तक जितकं चित्तवेधक वाटतं, तितकंच ते उद्बोधकही वाटतं.
-प्रदीप चंपानेरकर
एक वैशिष्ट्य… : आणीबाणीदरम्यान संजय गांधीने कम्युनिस्टांविषयी वादग्रस्त विधानं करून इंदिरा गांधींना पेचात टाकलं होतं. त्या वेळच्या त्यांच्या विमनस्क असहाय्य अवस्थेत इंदिरा गांधींनी पुढ्यात असलेल्या कागदांवर त्यांची चिंता खरडून काढली व पी.एन. धर यांच्याकडे ते कागद दिले. इंदिरा गांधींच्या हस्ताक्षरातील ही टिपणं पुस्तकात अंतर्भूत आहेत आणि त्यांचा स्वैर अनुवादही आहे.
- इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही
- लेखक : पी.एन. धर
- अनुवाद : अशोक जैन
रोहन शिफारस
इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही
महत्त्वपूर्ण राजकीय घटना-घडामोडींनी, निर्णयांनी आणि व्यक्तित्वांनी १९७० चे दशक व्यापून टाकले होते. या सर्वांचा या पुस्तकात एका अंतस्थाने अतिशय तारतम्याने आढावा घेतला आहे. तसेच भारतातील लोकशाहीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले आहे. आणीबाणी लागू करतानाची परिस्थिती, उच्च पातळीवरील निर्णयप्रक्रिया, पडद्यामागील गुप्त हालचाली, संजय गांधी व चौकडीच्या कारवाया आणि इंदिरा गांधींची याबाबतची भूमिका, जयप्रकाश नारायण यांच्याशी गोपनीय वाटाघाटी, तसेच या दशकातील बांगला देशाची निर्मिती, सिमला करार, सिक्कीमचे विलिनीकरण इ. अभूतपूर्व घटनांमागील तपशील रंजक तितकाच उद्बोधक! पुस्तकाचे लेखक पी.एन.धर हे इंदिराजींचे सल्लागार व यावेळचे पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख होते. इतिहासाच्या पानात दडलेले सत्य सांगणारे, इंदिराजींच्या राजकीय जीवनाचे बरे-वाईट पैलू उलगडणारे आणि आतापर्यंत अज्ञात असलेली माहिती उघड करत परिस्थितीचा सर्वंकश परामर्श घेणारे महत्त्वपूर्ण पुस्तक.
₹395.00Add to Cart