स्वप्नाळू प्रेमाभोवती गुंफलेलं समाजचित्रण

आघाडीचे लिहिते लेखक असलेल्या आणि बरंच लेखन केलेल्या लेखकाच्या हातून निर्माण झालेली, खिळवून ठेवणारी ही कादंबरी ‘चेटूक’! उत्कंठावर्धक आहे. पुढे काय होईल असा विचार सतत मनात राहतो, त्यामुळे खाली ठेववत नाही. वाचून झाल्यावर आपल्या मनात त्यावर काही विचार उमटणं, प्रश्न निर्माण होणं हे नैसर्गिक आहे.

ही कादंबरी, नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे अशा काळातली आहे. १९५०-५२चा काळ. स्वातंत्र्य तर मिळालं. त्यामुळे पूर्वीच्या पिढीला जे भव्य-दिव्य ध्येय होतं ते आता नाही. स्वत:पुढे कुठलंही ध्येय नसण्याची एक पोकळी नव्या पिढीला जाणवू लागली आहे. ऊर्मी तर आहेत, खुमखुमी पण आहे, पण लढायचं कोणासाठी आणि कशासाठी?

मॅट्रिकपर्यंत कसंबसं शिकायचं आणि कुठेतरी नोकरी मिळवायची. बी.ए. करता आलं तर डोक्यावरून पाणी. चकाट्या पिटण्याऐवजी प्रेम करणं जास्त उदात्त वाटतंय अशी स्थिती. निरुद्योगी तरुण मंडळींना विविध भारतीच्या गोड गुलाबी गाण्यांनी वेड लावायचे ते दिवस. ते ऐकून प्रेमाच्या कल्पना अधिक भ्रामक, अवास्तव होत होत्या. त्या स्वप्नाळू प्रेमामध्ये अमृतराव दिघ्यांचा तिसरा मुलगा वसंता आणि कोणी एक राणी नावाची मुलगी अडकते. तिथून नाट्यमय घडामोडी घडायला सुरुवात होते.

याअगोदर अमृतराव दिघे आपला चांगला सुरू असलेला शिंप्याचा उद्योग सोडून गांधीविचारांच्या प्रभावाखाली स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी टाकतात. त्यात भाषणं, तुरुंगवास, कुटुंबाची परवड हे सगळं आलंच. पंचाईत होते ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर! आता या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या पिढीने पुढे काय करायचं? स्वातंत्र्य तर मिळालं. राजकारणात जायचं नाही. मग राहिलं समाजकारण. त्यात चरितार्थ भागत नाही. गांधीजींच्या विचारांच्या मार्गावर चालायचं. पण आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यात मिळत नाहीत.

‘माळ्याची पोरगी लोहाराची सून होऊ शकते का? या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. शेळीचं दूध पिऊन, पेळूतून सूत कातून, हातसडीचा तांदूळ खाऊन, कडूलिंबाचा रस पिऊन, चिकणमातीने दात घासूनही हा प्रश्न अनुत्तरितच उरला होता. जात खरी की खोटी? अमृतराव विचारात पडले.’ आजही सरसकट आंतरजातीय विवाहाला मान्यता नाही. त्या काळी तर हा विचार मनात आणणही शक्य नसणार. गांधी विचारांच्या मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या, तुरुंगवास भोगून आलेल्या आणि आपल्याला पदाची लालसा नाही असं सिद्ध करणाऱ्या अमृतराव दिघेंना असे सामाजिक प्रश्न गोंधळात पाडत होते.

नागपूरच्या जुन्या भागातलं दिघेंचं घर आणि त्यात आसपास आणि कुटुंबात घडणाऱ्या असंख्य गोष्टी! विश्राम गुप्ते एखादा चित्रपट आपल्याला दाखवत असावेत असं वाटत राहतं. त्या काळातल्या आणि समाजातल्या आजूबाजूला घडणाऱ्या इतर गोष्टीच्या पार्श्वभूमीशिवाय मुख्य घटना समजू शकत नाहीत. लेखकाने अतिशय खुबीने केलेल्या बारकाव्यांचं वर्णन वाचताना संपूर्ण सामाजिक पार्श्वभूमी समजते. ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणच्या दृश्यमय वर्णनामुळे डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतो. नागपूरचा वैदर्भीय लहेजा फारच छान, तपशीलवार वर्णनातून, भाषेतून उभा केला आहे. वाचक वैदर्भीय असेल तर त्याला त्यातील बारकाव्यांचा अधिक आनंद घेता येतो. माझं स्वत:चं लहानपण नागपूरला गेल्यामुळे मला तो पुरेपूर घेता आला.

त्या काळातली समाजव्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था कशी होती याचं छान वर्णन विश्राम गुप्ते यांनी केलं आहे. दाम्पत्याला पाच-सात तरी मुलं असण्याची प्रथा, घरातल्या स्त्रीवर-मुलीवर स्वैपाकघरातली कामं करायची प्राथमिक जबाबदारी, नोकरी फक्त पुरुषांनीच करायची, घरातल्या मोठ्या मुलाने कौटुंबिक जबाबदारी उचलायची, भावाने बहिणीची जबाबदारी स्वत:ची मानायची, परिवारातील सर्वांचं एकमेकांवर प्रेम असणं, एकावर आलेलं संकट सगळ्या परिवारावर आहे असं मानण्याची मानसिकता अशी त्या काळातली कुटुंबमूल्ये लेखकाने निरनिराळ्या प्रसंगांमधून छान प्रस्थापित केली आहेत. ती सध्याच्या अतिरेकी व्यक्ती-स्वातंत्र्याच्या आणि आक्रसत जाणाऱ्या कुटुंबाच्या जमान्यात बघायला-वाचायला एक प्रकारे गोड वाटतात; तरी एकत्र कुटुंबव्यवस्था नुकतीच ढासळायला सुरुवात झाली असावी. जातिव्यवस्था, हिंदू-मुस्लीम लोकांचे परस्परसंबंध, बोकाळलेला भ्रष्टाचार हे सगळं समाजवर्णनात आलं आहे.

अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ‘राणी नावाचं वादळ’ दिघेंच्या घरात शिरतं. त्यांच्या वसंता या कविमनाच्या मुलाचं आणि राणीचं प्रेम जुळतं. पण प्रेम बालिश आहे, भ्रामक आहे आणि वास्तवापासून फारच लांब आहे. राणीचं प्रेम कवितांमधून, पत्रांमधून फुलतं. ‘चौऱ्यांशी लक्ष योनींच्या येरझारा करताना एखाद्या भाग्याच्या क्षणी माणसाच्या योनीत जन्म मिळतो, तेव्हा कुठे प्रीती लाभते. अशा या देवदुर्लभ प्रीतीचा, हे मत्प्रिय वसंत, तुम्ही नि:शंक मनाने स्वीकार करा. या प्रीतीला मी माझ्या ओंजळीत बकुळीच्या फुलांसारखी धरून हुंगते आणि प्रत्येक श्वासागणिक धन्य होते.’ अशा अनेक भावूक पत्रांतून व्यक्त झालेली प्रीती वाचून वाचकालाही नायक आणि नायिका या भावूक स्वप्नातून भानावर येऊन वास्तविकतेच्या रखरखीत प्रदेशाचा सामना कसा करतील असा प्रश्न पडतो.

त्या काळच्या मानसिकतेप्रमाणे प्रेमाचं पर्यवसान लगेच लग्नामध्ये व्हायला पाहिजे, मग ते प्रेम पंधरा वर्षांच्या मुलीने अठरा वर्षांच्या मुलावर केलेलं का असेना! कवितेतलं उदात्त, स्वप्नाळू प्रेम आणि संसाराच्या रगाड्यातलं, रात्रीच्या अंधारातलं प्रेम यांतला फरक न उमजल्यामुळे आणि न झेपल्यामुळे राणी-वसंता आणि त्याबरोबर दिघे कुटुंबीय यांची फरफट होते. राणीने वसंतावर आणि दिघे परिवारावर ‘चेटूक’ केलं असलं तरीही.
राणीच्या स्वभावातले कंगोरे कधीकधी समजण्यापलीकडे वाटतात. त्याला तार्किक कारणमीमांसा लावता येत नाही. असं वाटतं की, जरा नंतरचा काळ असता तर समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञ यांची मदत घेणं बरोबर ठरलं असतं. स्वप्नमय प्रीतीच्या राज्यात सिंहासनावर बसलेला आपला राजबिंडा प्रियकर वास्तविक जगातला एक सामान्य कर्तृत्व असलेला पुरुष आहे हे भान आल्यावर राणीचं प्रेम कापरासारखं उडून जातं.
या सगळ्या भावभावनांची कहाणी आहे ‘चेटूक’ ! नक्कीच वाचनीय. त्रिधारामध्ये चेटूकनंतरची कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.

-डॉ. माधवी मेहेंदळे

चेटूक / लेखक : विश्राम गुप्ते / रोहन प्रकाशन

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट / लेखक- सतीश तांबे / रोहन प्रकाशन
    • निसुगपणाचा शेला / लेखक- प्रभाकर करंदीकर / प्रफुल्लता प्रकाशन
    • संवादु अनुवादु / लेखक- उमा कुलकर्णी / मेहता पब्लिशिंग हाऊस
    • तिरपागड्या कथा / लेखक- मुकुंद टांकसाळे / मॅजेस्टिक प्रकाशन
    • वेडी सुमिता / लेखक- अरुण गद्रे / मनोविकास प्रकाशन
    • माझ्या लिखाणाची गोष्ट / लेखक- अनिल अवचट / समकालीन
    • काळेकरडे स्ट्रोक्स / लेखक- प्रणव सखदेव / रोहन प्रकाशन

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जून २०२१


रोहन शिफारस

चेटूक

विश्राम गुप्ते लिखित त्रिधारेतली पहिली कादंबरी

वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृदयाची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडते खरी; पण लग्नानंतर काही दिवसातच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा वाटू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाला… म्हंटलं तर या कादंबरीचं हे थोडक्यात आशयसूत्र असलं, तरी त्यात बहुस्तरीय सूत्रांचा पेड विणण्यात आला आहे. त्यात स्वातंत्र्योतर काळातील नागपूरचं मानववंशशास्त्रीय विवेचन येतं, तसंच मानवी जीवनाच्या अपूर्णतेवर चिंतनशील भाष्यही येतं. जागतिक वाङमयात अभिजात ठरलेल्या अॅना कॅरनिना व मादाम बोव्हारी या कादंबऱ्यांची बरीच कथन वैशिष्ट्य यात एकवटलेली दिसली, तरी ‘चेटूक’चा प्रवास हा समांतरपणे होताना दिसतो. तीत प्रीती म्हणजे काय? ती शारीर कि अशारीर? केवळ भावुकतेवर मानवी व्यवस्था सुफल होऊ शकते का? असे प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत. गुतंवून ठेवणारी, अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी कादंबरी चेटूक…

Chetuk

395.00Add to Cart


विश्राम गुप्ते त्रिधारेबद्दल जाणून घ्या…

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *