सौ. दैनिक सकाळ
पुणे, ता. २ : “विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असल्याच्या काळात राजीव साबडे यांनी पत्रकारिता केली. वार्तांकनावेळी आलेल्या अनुभवांवर आधारित विविध घटनांचे चित्रण कथारूपात करण्याची त्यांची ही कल्पनाही वेगळी आहे. त्यांच्या पुस्तकात स्थानिक विषयांपासून जागतिक स्तरावरील घडामोडींचा लेखाजोखा मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक समाजाला मिळालेली देणगी आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी केले.
‘सकाळ’चे माजी सहसंपादक राजीव साबडे यांच्या ‘वार्ताच्या झाल्या कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते आणि ‘सकाळ माध्यम समुहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर, साबडे, प्रा. संजय तांबट उपस्थित होते.
प्रतापराव पवार म्हणाले, “मी ‘सकाळ’ची सूत्रे हाती घेतली, त्यानंतर पत्रकारितेत नवनवीन प्रयोग करताना अनेकांना वार्तांकनासाठी परदेशात पाठवले. यात प्रामुख्याने विजय साळुंके, प्रल्हाद सावंत, राजीव साबडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हे ‘सकाळ’चे वेगळेपण होते. पत्रकारितेला उपयुक्त ठरतील, असे अनेक नवे पायंडे ‘सकाळ’ने पाडले. ‘सकाळ’मधील वातावरण चांगले असते. त्यामुळे पत्रकारितेतील विविध अनुभव नेहमीच सर्व जण घेतात. यातून लिहिलेल्या गोष्टींचे वेगळेपण असते, ते साबडे यांच्या पुस्तकात दिसते.”
साबडे म्हणाले, “मला ‘सकाळ’साठी पत्रकारिता करताना जगभरातील घटनांच्या वार्तांकनाची संधी मिळाली. त्यातील निवडक विषय अनेकांना माहीत नसलेल्या संदर्भासह कथारूपात देण्याचा प्रयत्न मी पुस्तकात मी केला आहे.”