लोकमत न्यूज नेटवर्क
कोथरूड : मेंदूच्या रोगनिदान प्रक्रियेत तसेच मेंदूसंबंधित शस्त्रक्रियांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वाधिक होण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी येथे केले. रोहन प्रकाशनतर्फे रोहन साहित्य मैफलीअंतर्गत भावार्थच्या सहयोगाने आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ. पंचवाघ लिखित ‘न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा मेंदू आणि मणक्याचे कार्य, आजार व उपचार’ या पुस्तकाच्या निमित्ताने प्रसाद मिरासदार यांनी डॉ. पंचवाघ यांच्याशी संवाद साधला.
भावार्थ, सक्सेस स्क्वेअर, कर्वे पुतळ्याजवळ येथे कार्यक्रम झाला. न्यूरोसर्जरीचे शास्त्र शंभर वर्षांपासून प्रगत होत गेले असले तरी गेल्या १५ वर्षांत झालेली या क्षेत्रातील प्रगती आश्चर्यकारक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मेंदूच्या अत्यंत नाजूक आणि कौशल्याच्या शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित झाल्या आहेत. जागरूकतेच्या अभावामुळे थेट शस्त्रक्रियेच्या अवस्थेत रुग्ण सर्जनपर्यंत पोहोचतात.