मला आठवतंय शाळेत नववीत असताना आमची सहल गेली होती मुरुड –जंजिऱ्याला तेंव्हा त्या महाकाय समुद्री दुर्गाच्या दर्शनाने मी त्यावेळी हरखून गेलो होतो, तो चित्रसंस्कार मनावर उमटला तो दिवसेंदिवस पल्लवित होत गेला. इतिहासाची आवड शाळेपासून होती, त्याचे प्रमाण दहावीत मला इतिहासात १०० पैकी ९१ मार्क पडले. पुढे सह्याद्री फिरण्याची आवड लागली.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या दुर्गांची गोडी लागली. किल्ला पाहावा कसा हे गो.नी. दांडेकर आणि गोपाळ चांदोरकरांची पुस्तके वाचून शिकलो. गो.नी. दांडेकर (आप्पा) यांचा प्रभाव माझ्यावर आहे. सह्याद्रीत फिरताना त्यांचा अदृश्य हात पाठीवर असतो. त्यांच्यासारखेच राजगड, रायगड,राजमाची हे माझे आवडते दुर्ग. अगणित वेळा इथे मी फिरलोय, इथे चार–चार दिवस राहालोय.
एका दिवसात दुर्ग फिरलो असे कधी झाले नाही. फार दिवसांपासून इथल्या प्रवासावर इतिहासावर लिहिण्याची इच्छा होती, मात्र प्रतिभेचा अभिव्यक्ती प्रसव सापडत नव्हता. मी मूळचा पुण्याचा असलो तरी माझे सगळे नातेवाईक बारा मावळात आहेत, माझी सासरवाडी मावळ तालुक्यातली तिथे तर लोहगड-विसापूर, तुंग-तिकोना, राजमाची हे पाच किल्ले काहीशे वर्षांपासून ठाण मांडून आहेत.
माझी मूळची भाषा ही मावळात जी बोलीभाषा बोलली जाते ती आहे, शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करता करता मला शिवकालीन भाषा ज्ञात व्हायला लागली, एके दिवशी मी रायगडाचे वर्णन लिहायला बसलो. त्यानंतर ही लेखमालिका तयार झाली. यातली भाषा ही जाणून –बुजून शिवकालीन मावळी भाषा ठेवलेली आहे. सह्याद्रीतल्या राकट दुर्गांचे वर्णन करण्यासाठी मला ही भाषा योग्य वाटली.
काहींना वाटेल प्रत्येक वेळी त्याचं त्या दुर्गांवर जाणे यात नाविन्य काय? परंतु ज्याला दुर्गांचे भग्न अवशेष पाहून शिवकाळ स्मरत राहतो त्याला प्रत्येक वेळी तोच तो दुर्ग नित्यनूतन वाटत राहतो. गड आणि गडाच्या परिसरातली जी माणसे मला भेटली त्यांचे वर्णन यामध्ये मोठ्या भावूक पद्धतीने आलेले आहे.
माणूस जेवढा निसर्गाच्या सानिध्यात राहतो तेवढा तो मनाने शुद्ध असतो, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मला या परिसरात जी माणसे भेटली ती सगळी जीव ओवाळून टाकणारी भेटली. या परिसरातला एक एक माणूस म्हणजे माणुसकीचा एक स्वतंत्र खजिना आहे. रायगडावरची सुमन मावशी, यशवंता, सोनाली आणि गडावरच्या धनगर आवश्याताली सगळीच माणसे आयुष्यातल्या अनुभवांचे सुखद संचित आहे. हे सर्वच लेख आपणाला आवडतील अशी आशा आहे.
- संतोष सोनावणे