‘कांचनजुंगा’ म्हणजे जगभरातल्या गिर्यारोहकांना खुणावणारं शिखर! सर करायला हे शिखर अतिशय आव्हानात्मक, खडतर! त्यामुळे या शिखरावरची मोहीम गिर्यारोहकांच्या क्षमतेचा कस लावणारी असते. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं जितकं आवश्यक असतं, तेव्हढंच मानसिकदृष्ट्या सक्षम असणंही गरजेचं असतं. पुण्यातल्या ‘गिरीप्रेमी’ या ख्यातनाम संस्थेच्या तब्बल दहा गिर्यारोहकांनी २०१९ साली ही मोहीम फत्ते केली. या मोहिमेची कथा सांगितली आहे, या टीमचे नेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आणि निष्णात गिर्यारोहक भूषण हर्षे यांनी! संघाचे आणि मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी बेस कॅम्पवरून सर्व सूत्रं हाताळली. त्यांनी बेसकॅम्पवरून या मोहिमेचे तपशील लिहिले आहेत, तर भूषण हर्षे यांनी प्रत्यक्ष चढाई करतानाचे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. हे लेखन डायरीवजा आहे, मात्र मोहिमेच्या दरम्यानचा थरार या दोघांनीही वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोचवला आहे.
उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गिरीप्रेमीच्या सदस्यांनी अनेक गिर्यारोहण मोहिमा सर केल्या आहेत. सर्वांत उंच शिखर – माउंट एव्हरेस्टची मोहीम २०१२ साली त्यांनी यशस्वी केली आणि त्यानंतर सलग सहा वर्षं अष्टहजारी मोहिमा त्यांनी पूर्ण केल्या. कांचनजुंगाची मोहीम आखल्यानंतर शिखरावर पाऊल ठेवून तिथे नतमस्तक होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर या संघाने केलेली तयारी, त्यातल्या अडचणी, आव्हानं आणि त्यातून काढलेला मार्ग या सगळ्या गोष्टी या दोन्ही लेखकांनी वाचकांसमोर उलगडल्या आहेत. या मोहिमेचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही इको-मोहीम होती. मोहिमेच्या वाटेवरच्या पर्यावरणाचा अभ्यास याअंतर्गत केला गेला. पाण्याचे, मातीचे नमुने, वनस्पती-झाडं-फुलं यांचा अभ्यास किंवा पशु-पक्ष्यांचा अभ्यास करण्यात आला. खुद्द मोहिमेचा विचार केला तर त्यासाठी प्रचंड निधीची आवश्यकता होती.
सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत दाते या मोहिमेच्या पाठीशी कसे उभे राहिले, संघभावना अधिकाधिक बळकट करत उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा गिर्यारोहकांनी कशी तयारी केली याचे तपशील थक्क करणारे आहेत. यातला सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे, या मोहिमेचा मानवी चेहरा! अजस्र हिमालय आणि क्षणोक्षणी बदलणार्या त्याच्या रूपापुढे माणूस खरं तर अगदी खुजा आहे. मात्र संकट आलं तर माणूस माणसाच्या पाठीशी किती चिवटपणे उभा राहतो, याचं दर्शन या पुस्तकाच्या पानापानांवर आहे. मग ते शेर्पाबांधवांसाठी दिसणारं सौहार्द असेल, परदेशी गिर्यारोहकांना स्वत:च्या जिवावर उदार होऊन केलेली मदत असेल, कुणा परदेशी गिर्यारोहकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला धीर देत केलेलं सहकार्य असेल….या मोहिमेत गिरीप्रेमीने केलेल्या अनेक गोष्टींना वाचक मनोमन सलाम केल्याखेरीज राहत नाही. अनेक संकटांच्या वादळानंतर या दहाही गिर्यारोहकांना शिखरमाथा गाठताना आणि कांचनजुंगासमोर नतमस्तक होताना बघून वाचकांना जो थरारक अनुभव येतो, ती शब्दांपलीकडचा आहे. आणि या दोन्हीही लेखकांचं यश नेमकं हेच आहे. पुस्तक वाचतांना आपणही त्यांच्या सोबत आहोत, असा अनुभव घेणं म्हणजे लेखकांना जे सांगायचं आहे, ते प्रभावीपणे पोचल्याची पावती असते. प्रभावी लेखन, सुंदर व बोलके फोटो आणि कमाल विजिगिषु वृत्तीचा अनुभव घेण्यासाठी जरूर वाचावं, असं हे पुस्तक आहे.
शिखररत्न कांचनजुंगा साहसी गिरीप्रेमींच्या विक्रमी मोहिमेची गोष्ट लेखक : उमेश झिरपे, भूषण हर्षे किंमत रु.३००