बढिया है!

एका विशिष्ट भूभागावर वस्ती करणारी माणसे विविध प्रकारच्या धाग्यांनी एकत्र बांधली जात असतात. भाषा, संगीत, चाली-रीती, खाण्यापिण्याच्या सवयी तसेच पद्धती आणि स्वभावविशेष. या सगळ्यालाच आपण मातीचा गुण म्हणतो. त्या त्या प्रदेशात जन्म घेणार्‍या प्रत्येकाला हा गुण लागतोच. बहुधा काळाच्या ओघात हे सर्व गुण तेथील लोकांच्या डीएनएमध्येच जाऊन बसत असावेत. कारण ही माणसे त्यानंतर कुठेही गेली तरी ते गुण तसेच राहतात. केवळ त्यांच्यापुरते नाही तर त्यांच्या पुढील पिढ्यांमध्येही ते प्रवाहित होत राहतात. 

एकेकाळी माणसांचे चलनवलन खूप मर्यादित होते. प्रवास करणे जसे सुलभ होत गेले तसे काळाच्या ओघात माणसे एका  ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे प्रमाण वाढू लागले. एकेकाळी युद्धाच्या मोहिमांवर गेलेली सरदार मंडळी आणि सैनिक त्या त्या प्रदेशात राज्य करण्यासाठी वास्तव्य करीत, त्यातून संस्कृतीचे वहन होत असे. बडोदा (गायकवाड), इंदूर (होळकर), ग्वालियर (शिंदे), तंजावर (भोसले) येथे या सरदारांसोबत मराठी कुटुंबे आणि संस्कृती महाराष्ट्राबाहेर याच प्रकारे जाऊन पोचली. व्यापार-उदीमाच्या हेतूने जाणार्‍यांची संख्याही मोठी आहे, मात्र त्यात मारवाडी समाजातील लोकांची संख्याच प्रामुख्याने आहे.

काळाच्या ओघात आता मात्र माणसांचे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे प्रमाण मुख्यतः वाढत राहिले आहे ते नोकरीच्या निमित्ताने.लग्न करून सासरी गेलेली मुलगी जशी सासरच्या गोतावळ्यात कितीही रमली तरी तिच्या मनाचा एक कोपरा कायम माहेराने व्यापलेला असतो, तसे या लोकांचे होते. महाराष्ट्राच्या बाहेर आणि कितीही दूर असले तरी त्यांना मराठी मातीची ओढ कायम असते. मराठी माणूस मुळातच सांस्कृतिक चळवळींमध्ये रमणारा. पुरोगामी विचार, समाज सुधारणेच्या चर्चा आणि लेखक-साहित्यिक यांच्यावर प्रेम करणारा आणि तरीही सणा-समारंभात उत्साहाने सहभागी होणारा. त्यामुळे मराठी माणूस कुठेही गेला तरी आपले आहे ते जपून मग दुसर्‍याचे काय आहे, त्यातले चांगले ते कसे घेता येईल, याकडे लक्ष ठेवून असतो. मध्य प्रदेश, छत्तीसगड, इंदूर, भोपाळ या सर्व प्रदेशांची बोली हिंदी आहे आणि त्यातही ‘दर दहा कोसांवरचे वैविध्य’ आहे. तेथील लोकांच्या स्वभावात आणि व्यक्तिमत्त्वात एक गोष्ट मात्र समान आहे. एलआयसी एजंटकडे असते तशी बोलण्याची लाघवी शैली. समोरच्या व्यक्तीची तारीफ करताना ते अजिबात हात आखडता घेत नाहीत. तिकडे स्थायिक झालेले मराठी बांधव हा गुण सहज आत्मसात करताना दिसतात. त्यामुळे ‘बढिया’ या शब्दाचा मुक्तहस्ते वापर होताना दिसतो. कौतुक करण्याबाबत फारच कंजूष असलेल्या मराठी माणसाच्या मूळ स्वभावावर कौतुकाच्या या अतिरेकाचे कलम होऊन तयार झालेला हा ‘हिंठी’ (हिंदी+मराठी) मसाला फारच मजेदार असतो. महाराष्ट्रात राहणारी एखादी मराठी व्यक्ती जेव्हा तिथेच राहणार्‍या दुसर्‍या एखाद्या मराठी व्यक्तीला ‘कसं काय चाललंय?’ असे विचारते, तेव्हा ती व्यक्ती, ‘बरं चाललंय किंवा चाललंय आपलं ठीक’, अशा प्रकारची उत्तरे देते. मात्र हाच प्रश्न हिंदी पट्ट्यात स्थायिक झालेल्या एखाद्या मराठी माणसाला विचारला तर, ‘अरे, बहोत बढिया चल रहा है’, असे उत्तर मिळते.

आपल्या अंगावर साधा शंभर-दोनशे रुपयांचा सदरा असला तरी, ‘अरे यार, बहोतही बढीया शर्ट है, ये कलर तो बहोत जंच रहा है आपको’, असे काहीतरी तो म्हणणार. हा झाला अर्थात हिंदीकडून घेतलेला एक चांगला गुण. कुठेही गेल्यावर स्थानिक लोकांची भाषा सहजी आत्मसात करणे हा मराठी माणसाचा मोठाच विशेष आहे. दक्षिणेतून अथवा बंगालमधून महाराष्ट्रात आलेले लोक वर्षानुवर्षे राहूनही इथे मराठी शिकत नाहीत, मराठी माणसे मात्र महिनाभर कोलकात्यात राहून आली तरी ‘चा खोबे?’ असा प्रश्न सहज विचारतील. मराठी माणसे जिथे जातील तिथली भाषा शिकून घेतात, कारण त्यांना मुळातच भाषांबद्दल आस्था आहे. हिंदी पट्ट्यात स्थिरावलेल्या मराठी लोकांनी तर आपली भाषा जपत आणि त्या भाषेवर हिंदीचे संस्कार करीत एक नवीनच भाषा जन्माला घातली आहे आणि ती ऐकायलाही फारच गोड वाटते.‘ते दुकान सकाळी किती वाजता खुलते?’ असं विचारल्यावर आधी खुलणारी कळी आठवते आणि मग शटर उघडणारा दुकानदार डोळ्यांपुढे उभा राहतो. ‘अरे यार, अर्धा पगार तर किश्ते देण्यातच जातो माझा’ असे ऐकल्यावर तो पगार नेमका कशात जातो हे कळायला काही सेकंद जातात, किश्ते म्हणजे हप्ते. महाराष्ट्रात ‘अरे यार’ केवळ मित्राला म्हटले जाते, तर हिंदी पट्ट्यात बायकोला किंवा आईलाही सहजपणे ‘अरे यार’ म्हणतात. इंदूरला एखादा मराठी नवरा आपल्या बायकोलासुद्धा ‘अरे भैया, देर मत करना’ म्हणून टाकतो. तर, ग्वाल्हेरची एखादी मराठी व्यक्ती ‘तुम्ही त्यांच्याशी गोष्टी केल्या का?’ असे विचारते, तेव्हा त्याचा अर्थ ‘तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं आहे का’ असा असतो, हे समजायलाही थोडा वेळ लागतो. भोपाळात एकदा एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. पोटात कावळे ओरडत होते. अर्ध्या तासाने तो म्हणाला, ‘बस्स, देवाला भोग लावला की आपण जेवायला बसू.’ तेव्हा हा देवाला नेमके काय लावणार आहे, हे पहायला आम्ही त्याच्या मागोमाग धावलो होतो. भोग म्हणजे नैवेद्य हे कळल्यावर, देवाला आणि त्यालाही हात जोडले.अशा गमती होत असल्या तरी त्यातून हिंदी मिश्रित लडिवाळ मराठी भाषा तयार होते, ती कानांना फारच छान वाटते. हिंदी लोकांचा बोलण्याचा सर्वसाधारण वेगही मराठी लोकांपेक्षा जास्त आहे. साहजिकच महाराष्ट्राबाहेर जन्मलेली बरीचशी मराठी माणसे वेगात मराठी बोलतात त्यामुळे त्यातले हिंदी शब्द समजून घेण्यासाठी थोडा जास्तच वेळ लागतो.

गणपतीपासून दिवाळीपर्यंत आणि भीमसेन जोशींपासून तर पु. ल. देशपांडेपर्यंत सण, संगीत आणि साहित्यिक यांचा वारसा मराठी माणसे परक्या मातीतही प्राणपणाने जपत असतात. तेथील लोकांना आपलेसे करूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपण्याची ही धडपड, हा मानवी स्वभावाचा एक जागतिक पैलू आहे. म्हणूनच तर अमेरिकेतही पूजेचा पेन ड्राइव्ह लावून, यू ट्यूबवर पूजेचा व्हीडिओ लावून अथवा आता थेट व्हीडिओ कॉल, अथवा फेसबुकवर लाईव्ह मंत्रोच्चार ऐकत आणि प्लॅस्टिकचे केळीचे खांब लावून का होईना, सत्यनारायण केला जातो. वर्षभर न काढलेली नथ त्या दिवशी डबीतून बाहेर पडते. आता ही पूजा आनलाईन होत असल्याने भटजी भारतात आणि देव अमेरिकेत, असेही चित्र दिसते. श्रद्धा, संस्कृती आणि तंत्रज्ञान हातात हात घालून प्रवास करताना दिसत आहेत.माणसे कुठून तरी कुठेतरी जात राहणार आणि आपल्या मातीची ओढ त्याला त्याच्या मूळ संस्कृतीशी, भाषेशी बांधून ठेवत राहणार. ही प्रक्रिया निरंतर आहे. कारण संस्कृती तुमच्या रक्तातच असते, तुम्ही कुठेही गेलात तरी ती तुमच्या धमन्यांमधून वाहणारच. भाषा ही आपल्या डीएनएमध्ये कायम राहते. त्यामुळेच ‘बढिया है!’ म्हटले तरी त्याला मराठीचा गंध येतच राहणार.

लता मंगेशकरांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘इनकी हिंदी को वरणभात की बू आती है’ असे दिलीपकुमार म्हणाला होता, त्याचे कारणही तेच होते. दोन राज्यांच्या सीमेवर राहणारी माणसे भाषासंगमात नाहतात ते वेगळे, परंतु गेली काही वर्षे भारताच्या विविध प्रांतांतून बाहेरच्या राज्यात अथवा देशात जाऊन राहणार्‍यांची संख्या खूप वाढली आहे. त्या त्या प्रांतात जाऊन बंगाली, उडिया, कन्नड, तेलुगू, मल्याळी, तामिळ या भाषांशी ज्यांची ओळख होते त्यांनी आणि अगदी मेक्सिको, इटली, स्पेन, फ्रान्स अशा देशांत गेलेल्या मराठी भाषिकांनी, वर्तमानातले मराठी साहित्य या वेगवेगळ्या भाषांमध्ये जावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भाषेचे ऋण चुकविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. आपल्या मराठी साहित्याला इतर भाषिकांनीही ‘बढिया है’ असे म्हटले तर किती बहार येईल! 

श्रीकांत बोजेवार (Shrikant.bojewar@gmail.com)

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *