IMG_20181115_131654639-768x1024

आचवलांचा फॉर्म्युला आणि वेरूळ-कैलास! (एकला सोलो रे)

फॉन्ट साइज वाढवा

जगात असे काही देश आहेत ज्यांनी फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर नव्हत्याचं होतं करून पर्यटन क्षेत्र विकसित केलं; आपल्याकडे कमी अधिक प्रमाणात असणाऱ्या संसाधनांचा सर्वोत्तम वापर करून असा काही करिश्मा घडवून आणला की त्यांची अर्थव्यवस्था आज याच पर्यटन क्षेत्राकडून पोसली जात आहे. आणि त्याचवेळी दुसरीकडे स्वतःचा अमूल्य ठेवा न उमजलेला आपला देश, त्यातही महाराष्ट्र म्हणजे एखाद्या देखण्या युवतीनं स्वतःच्या सौंदर्याचं सामर्थ्य न ओळखता कसंही अघळपघळ राहावं असं राज्य आहे. आपल्याकडचे किल्ले, समुद्र किनारे, अनेक निसर्गपूर्ण ठिकाणं, प्राचीन मंदिरं आपल्याला अजूनही मार्केट करता आली नाहीयेत. भारतात अनेक सोलो डेस्टिनेशन्स आपल्याला बघायला मिळतात, परंतु त्यातली महाराष्ट्रात फारच थोडी आढळून येतात. माझ्या मते त्यातलं एक आहे ‘औरंगाबाद’! वाचकांना कदाचित हे वाचून धक्का बसेल, परंतु अशीच चटकन डोक्यातही न येणारी ठिकाणं आपल्याकडे आहेत, ज्यांचा पर्यटन खात्यानं गंभीरपणे विचार केल्यास या क्षेत्रात क्रांती घडून येऊ शकते. पण…  

मी भारतातील विविध राज्यांतील ठराविक सोलो डेस्टिनेशन्सला भेटी देत होतो, परंतु  माझ्या महाराष्ट्रातील एक ठिकाण मला आतून बोलावत होतं, ते होतं ‘वेरूळ’! यापूर्वी काही कामानिमित्त औरंगाबादला गेलो असताना अर्थातच ते समूहासोबत बघून झालं होतं, परंतु तरीही पुन्हा त्या ठिकाणची ओढ मनाला लागली होती. माधव आचवलांच्या ‘किमया’ पुस्तकातील एक वाक्य आजही माझ्या काना-मनात ताजं आहे, ‘कलाकृती ही जत्रेच्या कोलाहलांत बघण्याची गोष्ट नाही. ती बाहेरच्या (आणि आतल्याही) शांततेत एकट्याने, क्वचित दोघांनी अनुभवायची असते.’ हेच एकमेव वाक्य त्या आंतरिक बुलाव्यामागचं कारण होतं. ताजमहाल ज्याप्रमाणे तिकीट काढून जाताजाता झरझर बघून होत नाही (किंबहुना तो तसा बघितला जाऊ नये), त्याचप्रमाणे वेरूळ-अजंठा यांसारखी ठिकाणं तुम्हाला मनातल्या एकांत क्षणी जपून ठेवायची असतील तर त्यांना अपेक्षित असणारा वेळ तुम्हाला द्यायलाच हवा, तो त्या कलाकृतींचा अधिकार आहे! त्यामुळे ती अजरामर कलाकृती अनुभवायला, माझ्यातल्या ‘मी’चं जोपर्यंत समाधान होत नाही, तोपर्यंत ती डोळ्यांनी पिऊन घेण्याच्या इराद्यानं नियोजन सुरू केलं. नियोजनात देवगिरी किल्ला, वेरूळ, बिबी का मकबरा ही ठिकाणं निश्चित केलीच, पण मग जरा गुगल धुंडाळलं आणि जणू परत येताना सौंदर्याचा ओव्हरडोस होण्याची तयारी ठेवून चक्क ‘अजिंठा’लाही त्या सफरीचा भाग केलं.

आपल्याला भविष्यात खरंच औरंगाबादला सोलो जायचं असेल तर सुदैवानं त्या ठिकाणी हॉस्टेल्स आहेत, परंतु मी माझा मित्र पार्थ बावस्कर याच्याकडे राहणार होतो. रात्री ठाण्यावरून निघून पहाटे औरंगाबाद गाठलं. पार्थच्या आईनं केलेला चविष्ट नाष्टा पोटभर करून त्याच्याच बाईकला किक मारून मी औरंगाबाद-वेरूळच्या हायवेवरती सुसाट सुटलो. वाटेवरतीच देवगिरीचा भुईकोट किल्ला लागतो. सकाळी नऊच्या सुमारास मी त्याच्या पायथ्याशी पोहचलो. भारताच्या इतिहासाला नवं वळण देणारा हा किल्ला, अल्लाउद्दीन खिलजीनं दख्खन प्रांतात आक्रमण करताना ज्याचा पहिला घास घेतला तो हा किल्ला आणि पेशवाईत नानासाहेब पेशव्यांनी महत्प्रयासानं पुन्हा स्वराज्यात आणलेला हा किल्ला- ‘देवगिरी’ उर्फ दौलताबाद! सुरेख आखीव-रेखीव बांधणी, सुरुवातीला लागणारा उंच मिनार, मेंढा आणि इतर अनेक सुंदर तोफांचे वास्तव्य अजूनही असलेला देवगिरी किल्ला सर्वार्थाने प्रेक्षणीय आहे. भुईकोट असल्यामुळे हा अधिक थकवतसुद्धा नाही. मीसुध्दा एकीकडे माहिती वाचत हा सर केला आणि साडेअकरा दरम्यान उतरून खाली आलो. ओढ वेरूळची मनाला लागली होती.

पुढच्या अर्ध्याच तासात बाईकनं वेरूळ गाठलं आणि ठराविक आनंदाची फी भरून त्या सौंदर्याच्या संमेलनात मी प्रवेश केला. होय गर्दी होती, पण आचवलांनी दिलेला आतल्या शांततेचा दिलासा आत तेवत होता. इथे एकूण शंभरहून अधिक गुहा आहेत, परंतु त्यातील ३४ गुहा आपण बघू शकतो.  ३४ पैकी १७ हिंदू, १२ बौद्ध आणि ५ जैन गुहांचे समूह आहेत. यातील १६वी गुहा म्हणजेच कैलासनाथाचं मंदिर हे माझ्याकरिता मुख्य आकर्षण होतं. एकसंध खडकात कळस ते पाया अशा आश्चर्यकारक घडणीतून बांधलेलं हे मंदिर म्हणजे शिल्पकलेच्या आविष्कारातून साकार झालेलं महाप्रचंड शिल्पच आहे.

उष्म्यातून आत प्रवेश करताच, सर्वप्रथम त्या खडकांमधला गारवा तुम्हाला आल्हाददायक वाटतो आणि दुसऱ्या क्षणाला २९ मीटर उंच, ५० मीटर लांब आणि ३३ मीटर रुंद इतक्या आकारमानात उभी ही कलाकृती तुम्ही स्तब्ध-स्तिमित होऊन नुसती बघत राहता. मी मुसाफिर वाचकांना सल्ला देईन की या शिल्प-अवकाशात जर शक्य झालं तर कृपया अनवाणी चाला, कारण पायांखालचा थंड कातळस्पर्श तुमचा अनोखा कनेक्ट इथल्या जागेशी करून देईल. मीही असाच अनवाणी चाललो. मंदिराच्या चारही बाजूंनी असणाऱ्या गुहांत भरताचे राज्यारोहण, कृष्णजन्म आणि असे अनेक पौराणिक प्रसंग रेखाटलेले आहेत. जे आपण बघताना, समजून घेताना इतके गुंगून जातो की आपलेच नकळत शिल्प होते, भान हरवते! परंतु त्याचबरोबर या साऱ्याचं आश्चर्य वाटताना, मुघली आक्रमणांतून झालेली याच शिल्पांची नासधूस बघून मन विषण्ण होतं. तरी या भग्नावस्थेतही आज पाय रोवून घट्ट उभ्या शिल्पांतील अलौकिक सौंदर्य आपल्या मनाच्या क्षणिक जखमेवरती फुंकर मारतं, पुन्हा एकदा आपल्याला स्वतःत गुंतवतं.

आठव्या शतकाच्या उत्तर्धात राजा कृष्णराजाच्या काळात या लेण्यांची घडण सुरू झाली, ते शंभर वर्षाहूनही अधिक काळ ती पूर्ण करण्याकरिता हजारो शिल्पकारांच्या पिढ्या आपलं सर्वस्व अर्पण करत राहिल्या. तुम्ही तास-दोन तास याच आवारात फिराल, तुमचे पाय बोलू लागतील, पण मन काही भरणार नाही. शेवटी मीसुद्धा आगेमागे-आजूबाजूला फारसं काही नाही अशा फोटोजेनिक नसलेल्या एका निवांत गुहेच्या पोटात शिरलो, पाठीवरची सॅक काढून त्यातलं पाणी प्यायलं आणि तीच मागे ठेवून तिच्यावर रेलून मग विचार करू लागलो. ती सगळी अर्धजीवित शिल्प माझ्या भोवती होती. पिढ्यान् पिढ्या ती घडवणाऱ्या कलापूर्ण हातांना नक्की कसली आस होती आणि एकाच क्षणात त्याच शिल्पांवर आघात करणाऱ्यांना कसली भूक? असा प्रश्न माझ्या विसावल्या मनातून वर तरंगत आला. या शिल्पांच्या प्रत्येक आकारावर बसलेले छिन्नी-हातोड्याचे घाव आणि कालांतरानं तिथेच पडलेले हातोड्याचे आघात मला माझ्या मनाच्या एकटेपणात ऐकू आले आणि मी फार डिस्टर्ब झालो. आणि उठलोच!

‘कैलास’ हा चमत्कार आहे. इथली शिल्प तुम्हाला स्वतःवरून निश्चिंत हात फिरवू देतात, ती तुमच्याशी जिवंत होऊन संवाद साधतात, हे जाणवून घ्यायचं असेल तर आचवलांचा फॉर्म्युला तुम्हाला अंगीकारावा लागेल. समूहात होतं काय, की संवाद माणसांशी होतो आणि शिल्प गप्प होतात. मुसाफिर वाचकांपैकी अनेकांनी नक्कीच वेरूळची सफर केली आहे, परंतु जर ती अशी केली नसेल तर जरूर एकदा एकट्यानं किंवा तुमच्याच संवेदनेच्या एखाद्या सख्यासह ती अनुभवा.

माझा पाय या एका शिल्पघरातून निघत नव्हता. मी काही त्याचा अभ्यास-बिभ्यास करायला गेलो नव्हतो, मला असंच ठरवून नुसतं तिथे वावरायचं होतं, कातळमाया जगायची होती, जी मी पुरेपूर जगलो. शेवटी जाताना पुन्हाएकदा त्या कैलासनाथाच्या भोवती एक प्रदक्षिणा मारली आणि दोन्ही दगडी द्वारपालांचे आभार मानून शरीरानं बाहेर पडलो. ३४ मधली मी फक्त एक गुहा बघितली होती. ३३ अजूनही शिल्लक होत्या, मी खरं मान्य करतो की त्यांच्यावर मी अन्यायाच केला.

हल्ली पोट पटकन भरण्यासाठी इंस्टंट फूडचा पर्याय उपलब्ध आहे, तसा इंस्टंट प्रवासाचा पर्याय उपलब्ध असत नाही, आपण तो गृहीत धरतो. फिरणं ही खूप निवांत प्रक्रिया आहे, इतकी की ठिकाणाहून निघताना तुमच्या तळव्यांना तिथल्या मातीचा आणि बाकी शरीराला तिथल्या हवेचा गंध बिलगायला हवा.

मी सायंकाळी पुन्हा एकदा पार्थकडे आलो. दिवस अनोखा गेला होता. पण तरीसुद्धा मी एका बौद्ध गुहेतून घाईत निघताना तिथल्या बुद्धमूर्तीच्या डोळ्यांतील करुणा मला अस्वस्थ करून गेली ती मला आठवत राहिली. मला परत, परत-परत तिथे जावं लागणार आणि जितक्या वेळा जाईन तितकी मनाच्या भुकेची व्याप्ती वाढणार हे कळून चुकलं.

या एका सौंदर्याचं वर्णन करतानाच माझी दमछाक झाली, काही वर्ष उलटून गेली मध्ये, तरी ती सगळी चित्र मनमेंदूतून उगवून आली. बाकी अनुभवलेलं औरंगाबाद आणि नंतर अजिंठा अनुभव याच लेखात समाविष्ट करायचा म्हणजे वेडेपणा ठरेल. तो आपण कधीतरी भविष्यात स्वतंत्र लेखात निवांत करू…!
– आदित्य दवणे 

RohanSahityaMaifaljpg-1-1

या सदरातील लेख…

‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)

अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…

लेख वाचा…


माणुसकीचे त्यांचे चेहरे!

– कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं.

लेख वाचा…


जान है तो जहान है! (कलगा-पुलगा-तुलगा)

– मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं! 

लेख वाचा…


अनेगुंडी : एक अद्वितीय सफर!

-त्या खडकांवरील अनघड चित्रांवरून हात फिरवताना मला अबोल-सर्जनशील पूर्वजांना स्पर्श केल्याचा भास झाला, पण त्यापूर्वीचा प्रवास म्हणजे एक दिव्य होतं! 

लेख वाचा…


बद्रीनाथ : एक नियोजित बुलावा

-थंडी कडाडून वाढली आणि मंदिराशेजारील गरम पाण्याच्या कुंडांनी आम्हाला हाक दिली. दोघांचे डोळे एकमेकांकडे बघताना लकाकले. 

लेख वाचा…


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *